शुक्रवार, २७ मार्च, २००९

रथजात्रा



जगन्नाथस्वामी नयनपथगामी भवतु मे ।

-जयदेव, गीतगोविंद


उद्यम कमी असला तरी उत्सव साजरे करण्याच्या बाबतीत ओडिया लोकांइतके उत्साही देशात (पर्यायाने जगात)  सापडणार नाहीत. ‘बारो मास तेरो पोर्ब’ अशी म्हणच आहे. पोर्ब म्हणजे पर्व – सण/ उत्सवांना इथे पर्व – पर्वणी म्हणतात. वर्षभरात इथे किती सण होतात त्याची यादीच करतोय. प्रत्येक महिन्यात सरासरी तीन-चार तरी असतातच. रथजात्रा हा इथल्या उत्सवांचा राजा. मागे सांगितल्याप्रमाणे इथे ‘य’ म्हणता येत असले तरी बऱ्याच ठिकाणी ‘ज’ वापरला जातो. कुठे ‘ज’ वापरायचा याचा माझ्यापुरता मी आडाखा बांधला आहे – जिथे ओठ, तोंड, जीभ थोडी वळवावी लागेल, तिथे बिनधास्त ‘ज’ वापरा. उदा. जोजना (योजना), अविजान (अभियान). पण जबाबदारीला दायित्व म्हणतात. दाजित्वपेक्षा सोपे पडते. शाब्बास. याला म्हणतात खरी आळशी भाषा!

ही रथयात्रा म्हणजे धमाल असते. या धमालीपुढे हौशी पंजाब्यांचे लग्न काहीच नाही. काय म्हणता, गणपती? ना, ना. इथली गंमतच न्यारी. गणपतीचे काय लाड करता सांगा बरं तुम्ही? त्याला वेगवेगळे कपडे घालता का? थोड्या थोड्या वेळाने त्याला छप्पन प्रकारचे भोग खाऊ घालता? आंघोळ केल्यावर त्याला पंधरा दिवस ताप येतो?  थांबा, व्यवस्थितच सांगतो सगळं.

रथयात्रेची थोडक्यात गोष्ट अशी – आषाढाच्या शुक्ल द्वितिये  दिवशी जगन्नाथ, बळभद्र आणि सुभद्रा ही तीन भावंडे आपली मावशी गुंदेचा देवीच्या घरी सुट्टीला म्हणून जातात. आपले आपले तीन रथ घेऊन. हे तीन रथ लोक ओढतात. हीच रथयात्रा – ओडिया भाषेत ‘रथजात्रा’. नऊ दिवसांनी देव परत फिरतात. त्या यात्रेला ‘बाहुडा’ म्हणतात. बाहुडा करून आल्यानंतर लक्ष्मी तिला सोडून जगन्नाथ आपल्या भावा-बहिणीबरोबर गेला म्हणून भांडण काढते आणि रथ मोडून टाकते. (म्हणजे जगन्नाथ पुन्हा पुढच्या वर्षी नवीन रथात बसून यात्रा करायला मोकळा!)

भगवान श्री आदि शंकराचार्यांनी स्थापन केलेल्या चार पीठांपैकी पुरीचे गोवर्धन पीठ हे सर्वश्रेष्ठ. (पुरीत २८ मोठे मठ आहेत. लाहिरी महाशयांचे शिष्य आणि परमहंस योगानंदांचे गुरू श्री युक्तेश्वरांचा मठही येथे आहे.) जगन्नाथाचे श्रीमंदीर १२व्या शतकात अनंतवर्मन चोळगंगाने बांधले असून हे नागर शैलीचा एक अप्रतीम नमुना आहे. जगन्नाथ हा श्रीकृष्ण नसून कृष्णाचेही आदिरूप आहे. तो सर्व सृष्टीचे कारण आहे. सगुण – साकार ब्रह्म आहे. जनसाधारणांसाठी त्याने पार्थीव रूप धारण केले आहे. 

जगन्नाथाची मूर्ती परंपरागत मूर्तींप्रमाणे नसते. निंबाच्या लाकडाची असते. एखाद्या आदिवासी देवाची आठवण

यावी अशी – फक्त चेहेरा, आणि कानांपासून समोर निघालेले दोन हात. हातांना पंजे, बोटे नाहीत. सुभद्रेला तर हातही नाहीत. मूर्ती खूप मोठी. पुरुषभर उंचीची. प्रमुख दारातूनही सहज दर्शन होईल अशी. डोळे हे असे मोठे मोठे गोल गोल. एकदा पाहून डोळे मिटले तरी दृष्टीसमोरून हटणार नाहीत असे. जगन्नाथ कळा (काळा), बळभद्र धळा (पांढरा) आणि सुभद्रा हळदिया (पिवळी). सोवळे ओवळे कडक. अहिंदूंना मंदिरात प्रवेश वर्ज्य. पण पतित पावन रूप घेऊन रथयात्रेच्या निमित्ताने जगा (टाहिया हलेई ! – डोक्यावर बांधलेला मुकुट हलवीत) बाहेर येतो आणि सर्वांना दर्शन देतो, इतकेच नाही तर त्याला कुणीही स्पर्श करू शकतो. (लोकांसाठी लोकमान्यांच्या द्वारा रस्त्यावर येणारा गणपती पहिलाच नाही!)

जगन्नाथाचे पार्थिव रूप बारा ते तेरा वर्षे (तिथीवर अवलंबून) राहते. त्यानंतर नवीन मूर्ती बनवावी लागते. कुणा एकाच्या स्वप्नात एक विशिष्ट वृक्ष येतो. त्याचा शोध घेतला जातो. त्यावर शंख – चक्र-गदा- पद्म आदि चिन्हे शोधली जातात. (दलाई लामांच्या शोधासारखेच आहे हे). विधीवत पूजा करून नवीन मूर्ती विश्वकर्मा घडवतो. जुन्या मूर्तीमधील ‘दारुब्रह्म’ (दारु म्हणजे देह, झाडाचे खोड – हे दारुब्रह्म म्हणजे श्रीकृष्णाच्या अस्थी होत) नवीन मूर्तीमध्ये प्रतिष्ठापित केले जाते. जुन्या मूर्तीचे विधीवत दफन केले जाते. त्या स्थानाला कुलेउ बैकुंठ म्हणतात.

रथयात्रेच्या अगोदर पंधरा दिवस देव समुद्रात आंघोळ करायला जातात आणि आजारी पडतात. मग पंधरा दिवस दर्शन बंद. या काळात रंगरंगोटी आणि यात्रेची कामे केली जातात. देवाला त्रास होतो म्हणून बॅण्ड वाजवणे इ. ला या काळात पुरीमध्ये बंदी असते.

जगन्नाथाच्या पुजाऱ्यांना पंडे म्हणतात. रथयात्रेच्या दिवशी यांच्याजवळ असेल नसेल ते सर्व सोने अंगावर चढवून ही मंडळी रथावर बसतात (हे व्ही आय पी – गर्दीत कसे बरे मिसळतील?) आणि थाळ्या पिटून कान बधीर करतात. लक्ष्मीला सोबत न घेता स्वतः जगन्नाथच एकटा निघाला आहे, तर या पंड्यांना अंगावर लक्ष्मी कशाला हवी हे मला समजलेले नाही.  सोबतच अर्वाच्य शिव्याही देत असतात - देवाला. त्याचे कारण मला न पटल्यामुळे माहित असूनही मी येथे सांगणार नाही.

पुरीच्या गजपती घराण्याचा राजा (दिव्यसिंह देव – ओडिया मध्ये दिब्यसिंग देब) पहिला मानकरी. हा प्रभूचा मानस पिता. महाराज पालखीत बसून येतात आणि सोन्याच्या झाडूने रथ झाडतात. मग यात्रेला सुरुवात होते.

हे रथ ओढणे ही सुवर्णसंधी मानली जाते. रथाच्या दोरीला किंवा रथाला स्पर्श करणे हे गंगास्नानाइतके पवित्र मानले जाते. लाखोंचा समुदाय रथ ओढण्यासाठी चढाओढ करत असतो. एकूण दहा लाखांच्या आसपास लोक या यात्रेच्या काळात पुरीला भेट देतात. चेंगराचेंगरी नित्याचीच. रथाच्या खाली चिरडून मृत्यू येणे म्हणजे थेट वैकुंठारोहणच समजले जाते – अजूनही. श्री सनातन गोस्वामींनी (भगवान चैतन्य महाप्रभूंचे शिष्य) रथाखाली प्राण देऊन लोकांना हे नसते उदाहरण देऊन ठेवले. पण अलीकडे कडक पोलीस बंदोबस्तामुळे चेंगराचेंगरीला बराच आळा बसला आहे. प्रत्यक्षात पोलीसच रथ ओढत असतात. चाकाजवळ कुणाला फिरकूही देत नाहीत. तरीही मी जो अनुभव घेतला आहे त्याला भयानक म्हणू की थरारक म्हणू समजत नाही. पैशांचा पाऊस पडला तरी होणार नाही एवढी गर्दी आणि चेंगराचेंगरी रथाच्या दोरीला हात लावण्यासाठी होते. भक्तीचा उन्माद एवढा प्रचंड असतो की रॅशनॅलिटी, बुद्धीनिष्ठा सर्व विसरून जाऊन या सर्व एकजीव जनसागरातला आपण केवळ एक छोटासा थेंब आहोत असे वाटायला लागते. एवढा भला थोरला रथ – (त्यावर शंभरेक पंडे बसलेले असतात) पण आपण एक छोटासा हिसका देतो आणि वेगाने हलायला लागतो. आश्चर्य वाटल्याखेरीज रहात नाही. अशा वेगाने धावणाऱ्या अवढव्य रथाखाली चिरडून मरणारी माणसे बघूनच टोपीकराने ‘जगर्नॉट’ हा इंग्रजी शब्द उपयोगात आणला.

तीन रथ ओळीने उभे असतात. ‘हरी बोल’ आणि हुळहुळीच्या (हुळ हुळ असा आवाज बायका काढतात – बंगाली लग्नात वगैरे काढतात तसाच) गजरात पहिल्यांदा बळभद्राचा ताळध्वज निघतो. हा थोडा पुढे गेला की सुभद्रादेवी निघते. हिचा रथ अजून थोडा पुढे गेला की जगन्नाथस्वामी निघतात. 

यांचा रथ सर्वात मोठा. अठरा चाकांचा नंदीघोष. पिवळ्या आणि लाल वस्त्रांनी आच्छादलेला. ४४ फूट उंच. तिन्ही रथांना बनवण्यासाठी एकूण ११३५ मोठे ओंडके  (४०० घन मीटर) लाकूड लागते. हे आसन, कदम्ब, देवदार अशा चांगल्या दर्जाचे असते. आपल्याला वाटेल काय ही झाडांची नासाडी! हे दरवर्षी. शिवाय रोज श्रीमंदिरात महाप्रसाद शिजतो, तो शिजवायला आणि वाटायला मातीची भांडी लागतात. ही मातीची भांडी बनवायलाच पुरीतल्या कुंभारांना रोज २ ते ३ टन जळाऊ लाकूड लागते. आता बोला.

ही यात्रा गुंदेचाचे देऊळ किती लांब त्यावर अवलंबून आहे. पुरीत हे अंतर सुमारे दोन किमी आहे. एवढ्या गर्दीत एका दोरीला हात लागला तरी खूप. पण अजून पुण्य साठवायची हाव बाळगून बरेच लोक एक रथ थोडा ओढून लगेच दुसऱ्या रथाकडे पळत सुटतात. साहजिकच काही बापड्यांना वैकुंठाचे तिकीट मिळते.

रस्त्यात ‘जगा’ला भूक लागते. मग यात्रा थांबते आणि दशम्या सोडल्या जातात. आमचा जगा कपड्यांच्या आणि खाण्याच्या बाबतीत भलताच हौशी. (त्याला मांसाहार मात्र चालत नाही.) असे म्हणतात की विष्णु रामेश्वरात स्नान करतो, बद्रीनाथला ध्यान करतो, पुरीमध्ये जेवण करतो, आणि द्वारकेमध्ये झोपायला जातो. छप्पन प्रकारचे भोग त्याला लागतात. हे भोग मंदिराच्या आवारात बनवले जातात. सर्व एकत्रच वाफेवर शिजवले जातात. सेवायत आणि पण्डा मंडळी हे भोग नाममात्र मूल्याच्या बदल्यात भक्तांना देतात. जात पातीच्या बाबतीत ओरिसाची सहिष्णुता ही जगन्नाथाची अशी कृपा आहे. एकाच ठिकाणी शिजवलेले भोग सर्व जातींचे लोक मंदिराच्या आवारात एकत्र बसून खातात. येथे अस्पृश्यतेला थारा नाही.

मराठ्यांनी जगन्नाथ मंदिराला मिळणाऱ्या यात्राकराच्या अभिलाषेने मंदिर ताब्यात ठेवले होते. पण तिरूपतीच्या तुलनेत जगन्नाथ गरीबच. लक्ष्मीशी भांडत असल्याचा परिणाम असावा. रथयात्रेची एकंदर उलाढाल केवळ काही (२-३) कोट रुपये एवढीच असावी असा अंदाज आहे.

एकूण आपल्या पंढरपूरच्या वारीची ही यात्रा म्हणजे बहीण आहे असे म्हणायला हरकत नाही. तशीच भक्ती, तसाच मेळावा, तसाच भक्तवत्सल भगवंत, तसलेच बडवे, तसलेच पण्डे, आणि वाळवंटात अगदी तशीच असह्य दुर्गंधी आणि घाण! 

शनिवार, २१ मार्च, २००९

माझी ओडिया

भाषावार प्रांतरचनेमुळे मला वाटत होते की ओडिया ही बऱ्यापैकी एकसंध भाषा असून संपूर्ण ओरिसा राज्यात थोड्याफार फरकाने एक प्रमाण भाषा म्हणून प्रचलीत असेल. पण हे तितकेसे खरे नाही. अर्थात विविधता ही सर्वच भाषांमध्ये असते. माझा एक मित्र यवतमाळहून पुण्याला शिकायला आला होता तेंव्हा त्याचे मित्र त्याला म्हणाले होते, सांभाळ बे, तिकडचे लोक छापल्यासारखे बोलतात! भाषा दहा कोसांवर बदलते म्हणतात. पण ओडियामध्ये असे बदल लक्षणीय आहेत. संबलपूर भागातील ओडिया ही कटक – पुरी भागातील ओडियापेक्षा इतकी निराळी आहे की आपल्याला आपल्या कोंकणी, अहिराणीची आठवण व्हावी. इथे एका भाषातज्ञांनी तर संबलपुरी – ओडिया शब्दकोषच काढला आहे. भुवनेश्वरमध्ये सुरुवातीला आलो तेंव्हा सुलभाने एका अटेण्डण्टला विचारले, वो सुरेश को हिंदी आती नही क्या? तर तो म्हणाला, मॅडम, उसे तो ओडिया भी नही आती, वो संबलपुरीया है! संबलपूर भागातील जुनी माणसे अजून कटक – पुरी ला जायचे असेल तर म्हणतात, ओडिसा ला जायचे आहे! (इथे प्रादेशिकता फार. कटकिया, अंगुलिया, ढेंकेनालिया, संबलपुरिया, इ. ओडिया कुणीच नाही. बाहेरच्या माणसांनी या सर्वांना म्हणायचे.)

आपल्या प्रमाण मराठी मध्ये (असला काही प्रकार आहे हे गृहीतक !) जसे लिहिले असेल तसे उच्चारण असते (तुलना सोपी व्हावी म्हणून इंग्लिश शब्दांची उदाहरणे देतो) उदा. हॉटेल, बॅंक. हिंदीमध्ये उलट, जसा उच्चार तसे लिखाण उदा. होटल, बैंक. पण ओडियामध्ये उच्चार वेगळा, लिखाण वेगळे: म्हणतील होटेल आणि लिहितील हटेल. फोटो म्हणणार पण लिहिणार फट. लॉज म्हणणार पण लिहिणार लज. कॉट ला कट. (एकदा माझ्या असिस्टंटने सी ओ टी ऐवजी सी यू टी असेच स्पेलिंग लिहिले होते.) खरंतर इथे ओ पण स्पष्ट नसतो. अ, ओ आणि ऑ च्या मधला एक स्वर असतो. तोच ‘अ’ ला पण चालतो. बारकाईने ऐकला तर लक्षात येतो. कसे साधतात आश्चर्यच आहे. या भाषेत ‘व’ नाही. ‘व’ ला ‘ब’ म्हणतात. ‘व्ह’ ला ‘भ’ म्हणतात. ड्राइव्हिंग ला लिहितात ड्राइभिं. प्रभात ला प्रवात. स, श, आणि ष तिन्ही लिहितात वेगवेगळे, पण उच्चार एकच – स. म्हणूनच ओडिशा ला ओडिसा म्हणतात. (ओड्र विशय – ओडि विशा – ओडिशा). बऱ्याच जणांना हलका ‘ड’ चा उच्चार नीट जमत नाही. घोडा सडकपे दौडा असे म्हणणार – घोरा सरकपे दौरा. म्हणून ओरिसा. आपण मराठी बिचारे जसे ते बोलतात अगदी तसे बोलून दाखवतो – आपले संस्कार करत बसत नाही!

आम्हाला भाषा शिकवायला एक तज्ञ येत असत. त्रिपाठी नावाचे. ते म्हणायचे ओडिया इज ऍन ‘अ’फुल लॅंग्वेज! (अ चा उच्चार ऑ सारखा). म्हणजे प्रत्येक शब्दाच्या शेवटी ‘अ’ हे जोडायचेच. हलन्त ठेवायचा नाही. म्हणजे अमिताभ नाही, अमिताभं. जोडाक्षरांची पण गंमत. इतर लिप्यांमध्ये एका ओळीत जोडाक्षरे असतात. इथे एकाखाली एक. त्यामुळे मुद्रणात अडचणी येतात. मग जोडाक्षर आले की फॉंट साइझ एकाच शब्दामध्ये दोन अक्षरांसाठी वेगवेगळा!   

त्रिपाठी सर वयस्क असले तरी काळाच्या बरोबर चालणारे होते. त्यांनी ओडियातले बरेच बारकावे आम्हाला समजावून दिले. त्यांच्या मते  भाषा जिवंत ठेवायची असेल तर नवीन तंत्रज्ञानाच्या सोबत तिने चालायला हवे. मोबाइल फोन, इंटरनेट वर सहज रीत्या व्यक्त होऊ शकली पाहिजे. त्यासाठी लिपीतले बोजड कालबाह्य प्रघात काढून टाकायला हवेत असे ते म्हणत. हिंदी, मराठी, बांग्ला, तेलुगु इ. भाषा ज्या गतीने इंटरनेट वर आणि मोबाइलवर पसरत आहेत त्या तुलनेत ओडिया बरीच मागे आहे याची त्यांना खंत वाटे. पण ते गप्प बसणारातले नव्हेत. भाषातज्ञ, प्रमुख वृत्तपत्रांचे संपादक आणि सॉफ्ट्वेयर डेव्हलपर्स च्या एका सेमिनार मध्ये त्यांनी आपले मुद्दे ठासून मांडले आणि मान्य करवून घेतले. या प्रयत्नांनी इंटरनेटवर ओडिया किती पसरते ते पहावे लागेल.

भाषेवर संस्कृतीची छाप असतेच असते. जसा लोकस्वभाव तशी भाषा. मराठी आणि उर्दू पहा. उर्दूतले आर्जव, ‘दरबारी’ औपचारिकता साध्या सरळ रांगड्या मराठीत नाही. ‘आइये, आइये, तशरीफ रखीये’ ला मराठीत म्हणतील, ‘या, बसा.’ त्याच न्यायाने ओडिया स्वभावही या भाषेत दिसतो. हे लोक बंगाली लोकांप्रमाणे बोलण्यात पटाईत. यांना संस्कृतचे फार प्रेम. आपल्याला एखादा शब्द आठवला नाही तर खुशाल संस्कृत शब्द ठोकून द्यायचा! उदाहरण म्हणून सांगतो, कमी दाबाचा पट्टा तयार होण्याला इथे ‘लघुचापसृष्टी’ म्हणतात! म्हणजे पारिभाषिक शब्द नव्हे, बोलण्यात वापरतात. एकदा मला माझ्या ऍकॅडेमीतल्या मॅडमना विचारायचे होते, आपली तब्येत बरी आहे ना? मी माझ्या अंदाजाने म्हणालो, आपणंकं प्रकृति भलं अछि तो? त्यांनी मला दुरुस्त केले – आपणंकं देहं  भलं अछि तो? विचार करा मराठीत मी बाईंना विचारतो – आपला देह बरा आहे ना! बाई काय अर्थ घेतील सांगता येणार नाही. माणूस मरण्याला चक्क ‘नष्ट’ होणे म्हणतात. पण शब्द थोडे विचित्र असले तरी व्याकरण मराठीच्या तुलनेत फारच सोपे. क्रियापदाला ब, छ, ल जोडले की झाले भविष्य, वर्तमान आणि भूतकाळ. म्हणजे मु खाइबि – मी खाईन, मु खाइछि – मी (नुकतेच) खाल्लेले आहे, मु खाइलि – मी खाल्ले. असो. बोलण्याची ढब अशी की आळसावून बोलल्यासारखी. (ओडिया लोक उद्योगी म्हणून मुळीच प्रसिद्ध नाहीत.) म्हणूनच ते व, व्ह असले आवाज काढण्याचे कष्ट घेत नाहीत.

माझ्या हिंदी मित्रांना आश्चर्य वाटते की मी इथल्यासारखेच उच्चार कसे काय करू शकतो. पण त्यांना काय माहीत की मी आळश्यांचा राजा आहे, आणि ही माझीच भाषा आहे !

गुरुवार, १९ मार्च, २००९

पैसे मिळवण्याचा कुठलाच मार्ग चांगला नसतो?

एक मित्र होते माझे. वयाने माझ्याएवढेच. पण योग्यतेने श्रेष्ठ. व्यासंगी, आध्यात्मिक. इन्फटेक मध्ये खूप सीनियर. एकेकाळी पैसा खूप मिळवला. पण काय झाले मला माहीत नाही. त्यांनी धंदापाणी सोडून दिले. त्यांना मी एकदा विचारले. तुम्ही एवढे शिकलेले, अनुभवी. काम करणे बंद का केले? पैसे मिळवणे बंद का केले? त्यांनी उत्तर दिले, हे खरे आहे की मी आज काम करू लागलो तर खूप पैसे मिळवीन. मिळवले आहेतही. पण पैसे मिळवणे म्हणजे शोषण. म्हणून त्या घाणीत जायची माझी इच्छा नाही. मला चमत्कारिक वाटले हे विचार. चांगल्या मार्गाने पैसे मिळवताच येत नाहीत का? त्यांचे उत्तर होते, नाही. पैसे मिळवण्याचा कुठलाच मार्ग चांगला नसतो. गरजा भागवणे वेगळे आणि पैशांचा संग्रह करणे वेगळे. माझा प्रश्न होता, मग जग चालेल कसे? संग्रहाशिवाय गृहसथाश्रम कसा चालणार? संस्कृती उत्क्रान्त कशी होणार? ते म्हणाले मला ते माहीत नाही. मी पैसे मिळवणार म्हणजे मी कुणाचे तरी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष शोषण करणार. मला हे करायचे नाही.

खंबानी नावाचा एक काल्पनिक उद्योजक घेउया. याचा उद्योग फार मोठा आहे. इतका मोठा की कर भरण्याचे नियम थो~डेसे इकडे तिकडे केले तरी त्याचे शेकडो कोटी वाचतात. म्हणजे सरकारला किंवा दुसर्‍या शब्दांत लोकांना जे मिळायला हवे होते ते मिळत नाही. पण खंबानी हे 'वाचलेले' पैसे एकटाच खात नाही. त्याच्या सरकारी मित्रांना, त्याच्या नोकरांना आणि त्याच्या भागधारकांना वाटून खातो. त्याच्याकडे काम करणार्‍या आणि इमाने इतबारे पगार घेणार्‍या लोकांना वाटते ते 'चांगल्या' मार्गाने पैसा मिळवतात. त्याचे 'भाग' बाळगून असणारे लोक समजतात की ते कोणतेच गैर काम करत नाहीत. पण त्यांना ही कल्पना येत नाही की त्यांनीच गुन्तवलेल्या पैशांमधून मोठ मोठे सट्टे खेळले जात असतात.

सगळेच उद्योग 'असले' धंदे करत नाहीत. खरे आहे. पण अर्थकारणामध्ये एवढी गुंतागुंत आहे, की प्रत्येक गोष्ट ही दुसर्‍या अनेकानेक घटकांवर अवलंबून असते. मग अर्थकारणात गुंतलेल्या प्रत्येकावरच ही जबाबदारी येत नाही का? कुणाला किती श्रमांच्या बदल्यात किती पैसे मिळायला हवेत हे कोण ठरवते? जे लोक हे ठरवण्याच्या 'वॅंटेज पॉइण्ट' ला बसलेले आहेत तेच. ते योग्य तेच करतात कशावरून?  

मांस खाणारा प्रत्येक जण हिंसेला - हत्येला जबाबदार आहे. त्याचप्रमाणे पैसा मिळवणारा प्रत्येक जण अर्थकारणात होणार्‍या कुणाच्यातरी शोषणाला जबाबदार आहे.

विचार करतोय या गोष्टीचा.

रविवार, १५ मार्च, २००९

माझा हिरो

एक हिरो होता माझा.  

हरवला कुठेतरी.

मारुती कांबळेचे काय झाले?

जब्बारचा 'सामना' हा एक अनुभव आहे. इतर अनेक गोष्टी बाजूला ठेवून एक जाणवले ते म्हणजे माहितीचा अधिकार ही काय जबरदस्त चीज आपल्याला मिळाली आहे हे समजण्यासाठी 'सामना' बघायला हवा.

खुदा मेहेरबान तो गधा पहेलवान!

जवळपास ‘इडियट’ असणारा फॉरेस्ट गम्प त्याच्या एकाच होपलेस आयुष्यामध्ये अशा गोष्टी अनुभवतो की ज्या भल्या भल्यांच्याही वाट्याला येणार नाहीत. युद्धामध्ये अनपेक्षितपणे असाधारण कामगिरी, तीन राष्ट्राध्यक्षांसोबत चहा, एका राष्ट्राध्यक्षांच्या राजीनाम्याचे कारण, सतत धावत राहणारा माणूस म्हणून देशव्यापी प्रसिद्धी, ध्यानी मनी नसताना अनेकांना आपल्या निरर्थक बोलण्याने स्फूर्ती देणे आणि त्यांच्या समृद्धीचे कारण बनणे आणि एका फॉर्च्युन फ़ाइव्ह हण्ड्रेड कंपनीचा मालक! हे सगळं घडत जातं. एखादं मूल आपोआप मोठं व्हावं त्या सहजतेनं.

आपल्याला काय मिळतं याचा आपल्या लायकीशी काहीही संबंध नसू शकतो. असंच ना? 


शनिवार, १४ मार्च, २००९

माझा राऊ


 

राऊ  मला भेटायच्या आधीपासूनच माझ्या मनाने हे पक्के घेतले होते की राऊ माझा मित्र असेल. त्याचे नाव त्यावेळी नक्की नव्हते. पण तो आल्याक्षणी आणि त्याला पाहताक्षणी हे नक्की झाले की तो माझा मित्रच असणार! त्या चोराने पण हे ओळखले असणार बरोबर. आमच्या वडीलांना आम्ही अजूनही भितो, पण या साहेबांना आमची सोडा, त्यांचीच आम्हाला भीति वाटत असते.

 

सगळ्याच आई बापांना त्यांची बाळे छान छान वाटत असतात. आम्हाला पण वाटते. पण आम्हालाही याचे कधी कधी आश्चर्य वाटते की तो आमचे ‘क्रिएशन’ आहे असे कधीच वाटले नाही. उलट वाटत राहते की आमचा कुणी सखाच आला आहे सोबतीला.

 

राऊ चंचल खूप. सारखा हलत असतो. एका जागी बसणे म्हणजे त्याला शिक्षाच. चालायला येत नव्हते तेंव्हा पडल्या पडल्या आणि उचलून गेतल्यानंतर पाय इतक्या वेगाने झाडत राही की अभिषेक म्हणायचा याच्या ढुंगूमध्ये ड्युरासेल लावले आहेत! पण अगदी बाळ असताना माझ्याजवळ पडला की मधूनच एकदम शांत होऊन जाई. सुलभाला पण याचे आश्चर्य वाटे आणि म्हणे की बघ त्याला तुझ्या व्हाइब्ज जाणवतात. चांद्याला असताना तो कुठे जाईल आणि कुठे सापडेल याचा काही नेम नसे. नुकतेच त्याला पाय फुटले असल्यामुळे त्याचे काही ना काही प्रयोगातून विज्ञानाचे प्रकार सुरू असत. अवती भवती सगळे जंगलच असल्यामुळे आम्हाला फार भीति वाटत राही. पण राऊ बिनधास्त कुठल्यातरी रोपट्याच्या मागे जाऊन समाधी लावून बसलेला सापडे.  

 

हे अवखळ क्षण पकडून ठेवण्यासाठी मी एक छान कॅमेरा घेतला. पण मला बरेच वेळा ‘स्पाय फोटोग्राफी’ च करावी लागली. कारण हा पठ्ठ्या माझ्या हातात कॅमेरा दिसला रे दिसला की झेपावून पहिल्यांदा तो ताब्यात घेई. त्याला कंठ फुटल्यानंतर त्याने फर्मान सोडायला सुरूवात केली – असा उभा रहा, कॅमेरा इकडे दे, वगैरे.

 

त्याला झोपवण्याचा तर एक मोठाच कार्यक्रम असे. पहिल्यांदा अंधार करून सुलभा आणि मी आपसात कुजबुजत बोलत असू की एक माऊ आणि एक मोठा राक्षस खिडकीत आला आहे आणि विचारतोय राऊ झोपला का म्हणून. एवढ्याने भागण्याची शक्यता नगण्यच. मग मी हळूच उठून बाहेर जात असे आणि मांजराचा आवाज काढून खिडकीवर मोठ मोठ्याने आवाज काढत असे. तेंव्हा कुठे महाराज शांत पडून रहात. पण कराडला असताना एकदा राऊने माझी विकेटच काढली. झोपताना आजीला म्हणाला, असं झोपायचं नसतं; अगोदर तातू बाहेर जाता (म्हणजे जातात), मग माऊचा आवाज काढता, मग खिडकीवर थप थप करता, मग झोपायचं!

 

सर्किट हाऊस वर येणाऱ्या पोलीसांचे याला भारी आकर्षण. आपल्या खेळातल्या बंदूका त्यांना दाखवून त्यांच्या बंदुकींना हात लावण्यासाठी तो त्यांना मस्का लावत बसे.

 

मी बी. डी. ओ. चा चार्ज सांभाळत होतो तेंव्हा मला परतायला काही वेळा उशीर होई. अशावेळी तो दारात उभा राहून म्हणे – माझ्या ऑफिसमध्ये कशाला आलाय? तुमच्या तुमच्या ऑफिसला जावा बघू. बऱ्याच वेळाने त्याचा राग शांत होत असे. कधी मजेत असला की मला म्हणे कसलं तुमचं ऑफिस? ए बी सी डी शिकवतात का तिथं? या इकडे मी शिकवतो.

 

काही गोष्टींना त्याची नावे पण मजेशीर असतात. गोपबंधू ऍकॅडेमीला तो डोकंबंदूक म्हणतो. धमक्या पण त्याला व्यवस्थित देता येतात. मला आणि सुलभाला एकमेकांच्या नावाच्या देतो आणि दोस्त राष्ट्रांचा एकदमच हल्ला झाला तर हल्ला ओसरल्यानंतर सरळ कराड किंवा उस्मानाबादला फोन लावा म्हणतो आणि एफ. आय. आर. नोंदवतो. कधी कधी ‘सावजीं’ च्या कडेही कंप्लेंट फाइल केली जाते. सावजी म्हणजे साहू – सर्किट हाउसचा खानसामा. कराडला गेल्यानंतर तर त्याची खोडी काढायची माझी काय बिशाद आहे; सरळ दारामागची काठी नेऊन आजोबांना देतो आणि हुकुम सोडतो – हेला मारा.

 

जसजसा मोठा होत चालला आहे तसतसं मला बेचैन वाटत आहे. हा माझा राऊ हळू हळू हरवत जाणार आहे. हे सगळं इथंच असंच थांबवून नाही ठेवता येणार?

 


शुक्रवार, १३ मार्च, २००९

संस्कृती स्त्रियांची, स्त्रियांसाठी, पुरुषांकरवी!

असे गमतीने म्हटले जाते की जगाच्या इतिहासात जी काही युद्धे झाली आहेत त्या सर्वांना कारण स्त्रिया होत. वानगीदाखल रामायण, महाभारत, इलियड यांचे दाखले दिले जातात. एका मजेशीर संस्कृत वचनात तर असे म्हटले आहे की कृत युगात रेणुका (भगवान परशुरामाची माता), त्रेता युगात जानकी, द्वापार युगात द्रौपदी, आणि कलियुगात घरा-घरातील बायका या कलहाचे कारण ठरतात!


गमतीचा भाग सोडला तरी माझे असे मत आहे की केवळ कलहाचेच नव्हे तर मानवी संस्कृतीचेही कारण स्त्रियाच होत. माझे मामा म्हणायचे की एका दहा बाय दहा च्या खोलीत दहा पुरुष सुखाने राह्तील पण दोन बायका मोठ्या बंगल्यातही शांतपणे नांदू शकणार नाहीत. हे आपण सोयीसाठी १००% खरे समजूया. यामागचे कारण विचार करण्यासारखे आहे. याचा सरळ सरळ अर्थ असा होतो की स्त्रियांची ’स्पेस’ ची गरज पुरुषांच्या तुलनेत अधिक तीव्र आहे. आणि संस्कृतीचा जन्म हा स्पेस च्या गरजेतूनच होत असतो.  


शरीरशास्त्राचा विचार करता निसर्गाने स्त्रीच्या पारड्यात झुकते माप टाकले आहे. कुणी म्हणेल कसं शक्य आहे, स्त्री तर अबला, शारीरिक कटकटींनी सतत गांजलेली. पण थांबा. टेक्नॉलॉजीचे विस्तारणारे जाळे आपल्याला निराळा विचार करणे भाग पाडणार आहे. परिस्थिती अशी आहे की संतती जन्माला घालण्यासाठी पुरुषाला स्त्रीची गरज आहे; स्त्रीला पुरुषाची मुळीच गरज नाही! रामायणात वाचलेले स्त्रीराज्य अगदीच अशक्य नाही. (मेघालय मध्ये ते वास्तविक अस्तित्त्वात आहेही, आणि बंगालातल्या स्त्रियांचा एकूण व्यवहारातला वरचष्मा सर्वश्रुत आहेच). जगभरातल्या सर्व देशांमध्ये असे दिसून येते की स्त्रियांचे सरासरी आयुर्मान पुरुषांच्या तुलनेत अधिक आहे. जोडीदाराच्या मृत्यूनंतर पुरुषांच्या तुलनेत स्त्रिया जास्त जगतात असे आढळून येते. ह्रृदयविकारापासून स्त्रिया तुलनेने अधिक सुरक्षित असतात. निसर्गाने त्यांचे शरीर लहान ठेवून त्यांना अजून एक आघाडी दिली आहे – अन्नाची कमतरता असेल तर स्त्री अधिक काळ निभावू शकेल. मानसिक क्षमतांमध्ये स्त्री कमी तर नसतेच, पण पुरुषापेक्षा काकणभर सरसच असते. बौद्धिक बाबतीत म्हणाल तर सर्व स्तरातल्या परीक्षा स्त्रियांचीच आघाडी दाखवतात. आता सांगा कोण आहे फायद्याच्या जागी?  


घरात पुरुष व्यक्ति नसेल तर त्या घराला लुळेपणा येतो खरा, पण तरी ते घर असते. पण जर का घरात स्त्री नसेल तर त्या घराला घरपणच उरत नाही. ते होस्टेल होते. का असे?  


माणूस जगतो कशाच्या आधाराने? त्याच्या आयुष्यातले महत्त्वाचे टप्पे कोणते? जन्म. स्त्रीशिवाय अशक्य. मोठे होणे. या प्रक्रियेमध्ये परंपरा दाखवते की बाप हे पैसे मिळण्याचे ठिकाण आणि आई हे संस्कार मिळण्याचे. मग लग्न. या गुंतागुंतीच्या प्रक्रियेमध्ये वरकरणी पुरुष पुढे असतात पण प्रत्यक्षात सर्व कारभार हा स्त्रियांच्या बोटावर नाचत असतो. म्हातारपणी पुरुषाला स्त्रीच्या आधाराशिवाय जगणे केवळ अशक्य बनते.  


जगणे एकूणच संघर्षमय आहे. कुठून आणायची शक्ति लढायची? आणि लढायचे तरी कुणासाठी? दोन्ही प्रश्नांचे एकच उत्तर – स्त्री. कोणताही विरंगुळा घ्या. कथा, काव्य, संगीत, नृत्य, नाटक, चित्रपट, काहीही घ्या. विषय हा स्त्री भोवती गुंतलेला असणार.  


बोलू तेवढे थोडे. आजच्या या गुंतागुंतीच्या सिव्हिलायझेशन (सभ्यता हा शब्द योग्य वाटत नाहीये) मध्ये, जिथे शारीरिक शक्ति दुय्यम ठरते आहे, तिथे स्त्रियांना निर्विवाद आघाडी आहे. थोडक्यात सांगायचे तर हे जग स्त्रियांनी स्त्रियांसाठी पुरुषांकरवी चालवलेले आहे! त्यांना अर्थातच हे सत्य सामूहिक रीत्या नीटसे लक्षात आले आहे असे दिसत नाही, नाहीतर एव्हाना पुरुष प्रधान संस्कृतीचे ’मिथ’ ढासळून पडले असते.  

गुरुवार, १२ मार्च, २००९

माझे सर


आमचे एक मेहबूब म्हणून सर होते. मी छोटा होतो. केजी म्हणतात त्या वर्गात होतो. त्यांचा मी फार लाडका होतो. काही विशेष कारण नव्ह्ते. अकारणच त्यांचे माझ्यावर प्रेम होते. (पुढे शाळेमध्ये एका सरांचा माझ्यावर असाच अकारण राग होता).मला असे पुढच्या ओळीत बसवीत. प्रार्थना सांगायला मला बेंचवर उभे करीत, वगैरे. 

एकदा त्यांनी वर्गात सांगितले की रात्री झोपताना देवाची प्रार्थना केली तर देव सकाळी आपल्या उशाला दोन चॉकलेटे ठेवतो. मी हे आईला सांगितले आणि रात्री प्रार्थना करून झोपी गेलो. सकाळी उठल्या उठल्या मी उशी चाचपून पाहिली तर मला खरेच दोन चॉकलेटे मिळाली! मी शाळेत गेल्या गेल्या सरांना ती दाखवली. वर्गात कुणालाच अशी चॉकलेटे मिळाली नव्हती. कोणत्या देवाने ती ठेवली होती हे सरांच्या लक्षात आले. (मला समजायला बरीच वर्षे जावी लागली). 

त्यांचे माझ्यावरचे प्रेम अकारण नव्हते. एका गुरूतुल्य आईचा मी मुलगा होतो म्हणून ते माझा लाड करत होते. आणि म्हणूनच मीही त्यांना कधी विसरू शकणार नाही.

ब्रिज ऑन रिवर क्वाइ


चारित्र्य आणि नेतृत्वाची कहाणी


दि ब्रिज ऑन दि रिवर क्वाइ हा 1957 सालचा ब्रिटीश दिग्दर्शक डेविड लीन चा गाजलेला यद्धपट. कथा काल्पनिक असली तरी 1942 साली दुसर्‍या महायुद्धा च्या दरम्यान घडलेल्या हकिकतीं वर आधारित आहे.

क्वा‌इ नदीवरील पूल हे एक निमित्त आहे. कथेचा गाभा आहे एका लष्करी अधिकार्‍याचा आत्मसन्मान. त्याची कहाणी. काळ आहे दुसर्‍या महायुद्धातला. स्थळ आहे आग्नेय आशियातील बँकॉक जवळील घोर अरण्य. एक ब्रिटीश बटालियन जपान्यान्च्या तावडीत सापडून युद्धकैदी झाली आहे. जपानी कर्नल सैतो या बटालियानला बजावतो की सर्व युद्धकैद्यांना एका पुलाचे काम करायचे आहे. हा पूल सिंगापूर ते बँकॉक रेल्वेमधला महत्त्वाचा दुवा असतो. एका विशिष्ट तारखेच्या आत तो पूर्ण होणे आवश्यक आहे कारण मामला युद्धाचा आहे. हा पूल पूर्ण झाल्यास जपानला फार मोठी आघाडी मिळणार असते.

 

ब्रिटीश कर्नल निकोल्सन सैतो च्या निदर्शनाला आणून देतो की जीनिव्हा करारानुसार अधिकारी युद्धकैद्यांना शारीरिक कामे करण्यापासून मोकळीक आहे. परंतु कर्नल सैतो सुनावतो की अधिकाऱ्यांनासुद्धा काम हे करावेच लागेल. एक तर त्यांच्याच नाकर्तेपणामुळे आणि भित्रेपणामुळे त्यांची बटालियन शरण आली आहे. जपानी अधिकारी असते तर त्यांनी हाराकिरी केली असती पण शरण नसते गेले. अशा भित्र्या अधिकाऱ्यांना आपल्या सैनिकांसोबत काम करण्याची मुळीच लाज वाटता कामा नये.

 

निकोल्सन आपल्या भूमिकेवर ठाम राहतो. तो शरण आलेला असतो कारण तसे आदेश आलेले असतात. आणि तो शारीरिक काम नाकारत असतो कारण त्याच्या सैनिकांची अस्मिता त्याला जपायची असते. सैतो निकोल्सन आणि त्याचे अधिकारी यांना टॉर्चर चेम्बर मध्ये डाम्बतो. दरम्यान त्याचा जपानी इंजिनियर ब्रिटिश सैनिकांना कामाला लावतो. पण पुलाचे काम रखडत चालते. जपानी इंजिनियर्सना पुलांचा अनुभव नसतो, आणि ब्रिटिश सैनिकही पुलाचे काम इमाने इतबारे करण्याइतके खुळे नसतात.

 

ब्रिटिश डॉक्टर सैतोला समजावतो, की ब्रिटिश अधिकारी पुलाच्या कामात अनुभवी आहेत. त्यांच्या हाती हे काम सोपवले तर काम निश्चित तडीस जाईल. वेळ चाललेला असतो. सैतोचा अहं काही कमी होत नसतो. हो नाही करत वाटाघाटी होतात आणि सैतोला निरुपायाने निकोल्सनला शरण जावे लागते.

 

पण गोष्ट इथे संपत नाही; तर इथून सुरू होते.

 

निकोल्सन आपल्या लोकांना  सांगतो की पुलाचे काम वेळेत पूर्ण करायचे. या जपान्यांना दाखवून द्यायचे की ब्रिटिश लष्कर ही काय चीज आहे. त्याचे अधिकारी चक्रावून जातात. शत्रूला मदत करायची? का? निकोल्सन त्यांना समजावतो की युद्धकैद्यांना काम नाकारण्याचा अधिकार नसतो. त्यामुळे ते देशद्रोही ठरवले जाऊ शकत नाहीत. हे एक. दुसरे. त्याला पुलापेक्षा महत्त्वाचे वाटत असते ते त्याच्या सैनिकांचे मनोबल. ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या अधीन राहून सैनिक शिस्तबद्ध रीतीने काम करत राहिले तर ते गुलाम किंवा कैदी राहणार नाहीत, तर सैनिक राहतील. उद्या युद्ध संपल्यानंतर ते जेंव्हा हे स्मरतील तेंव्हा त्यांचा स्वाभिमान आणि देशाभिमान उफाळून येईल. ताठ मानेने जगू शकतील. एक ब्रिटिश जवान प्रतिकूल परिस्थितीत काय साध्य करू शकतो हे निकोल्सनला दाखवून द्यायचे असते.

 

त्यानुसार निकोल्सन आपल्या बटालियनची पुनर्बांधणी करतो आणि कामाला आरंभ करतो. या दरम्यान तो एक महत्त्वाची गोष्ट साध्य करतो - जपान्यांकडून आदराची वागणूक. 

 

ठरल्याप्रमाणे सर्व अडचणींवर मात करून ब्रिटिश सैनिक पूल वेळेत पूर्ण करतात.

 

सिनेमा एवढाच नाही. तो मुळातूनच बघण्याचा विषय आहे. पण चारित्र्य आणि नेतृत्व यांचे इतके सुंदर चित्रण करणारा सिनेमा मी आजवर पाहिला नव्हता.