गुरुवार, २ डिसेंबर, २०१०

स्मशानानुभव - दोन

दोन

साधना करण्यासाठी साधक जेंव्हा जेंव्हा स्मशानात पाय ठेवील तेंव्हा तेंव्हा मी स्वत: त्याच्यासोबत तिथे असेन.

गुरुंनी हे अनेक वेळा बोलून दाखवलेले होते. मला त्यांच्या या आश्वासनाची गरज नव्हती. तारकब्रह्माच्या सर्वव्यापकत्त्वाची आणि अंतर्यामीत्त्वाची प्रचीती मी कैक वेळा स्वत: घेतलेली होती. तरीही, ‘व्याघ्रो मिथ्या, पलायनोपि मिथ्या’ या न्यायाने गुरुंनी स्मशानातील संभाव्य धोके कापालिक दीक्षेच्या वेळी समजाऊन दिले होते. काय काळजी घ्यायची तेही समजाऊन सांगितले होते. त्यातील हा सर्वात मोठा धोका होता – अविद्या तांत्रिकाशी सामना.

मी तांत्रिकच. पण विद्या तांत्रिक.

तंत्र म्हणजे तन आणि त्र. मनाला विस्तारून मुक्त होण्याचा मार्ग. याची बीजे सजीवांच्या रचनेतच दडलेली आहेत. उत्क्रांती होता होता मानव अशा टप्प्याला आला की त्याला हे गवसले. अपघाताने म्हणा, जाणीवपूर्वक अभ्यासाने म्हणा. पण त्याला दिशा नव्हती. शिस्त नव्हती. हजारो वर्षांपूर्वी – वेदांच्याही निर्मीतीपूर्वी आदिगुरू दक्षिणामूर्ती शंकराने, ज्याला आपण भगवान शिव मानतो त्याने, एका शिस्तीमध्ये तंत्रविद्या बांधली. दोन दिशांनी एकाच ध्येयापर्यंत जाणारी. विद्या तंत्र आणि अविद्या तंत्र. विद्या तंत्र पुढे अष्टांग योग आणि नंतर भक्तिमार्गामध्ये मिसळून गेले. तंत्राची ओळख प्रामुख्याने अविद्या तंत्रातूनच होत राहिली. बौद्ध, जैन तंत्र याचीच रूपे. स्मशानसाधना हे तंत्राचे अत्यावश्यक अंग अविद्या तंत्राशीच प्रामुख्याने जोडले जाऊ लागले. स्मशानात रात्रीच्या रात्री घालवणारा शंकर, शं म्हणजे कल्याण करणारा शंकर, आदिनिवासी अनार्यांचा गुरु शंकर पुढे आर्य संस्कृतीनेही स्वीकारला, ईश्वराचे स्थान देऊन. या इतिहासाला आधार केवळ माझ्या गुरुंचा शब्द. माझ्यासाठी प्रमाण असणारा.

अविद्या तंत्र फारच वेगळ्या वाटेने जाणारे. विद्या तंत्रात असलेल्या विधीनिषेधांना इथे स्थान नाही. रामकृष्णांचे समकालीन महान सिद्ध अविद्या तांत्रिक वामा खेपा तर देवीला अर्वाच्य शिव्या देत. उन्मत्तासारखे वागत. तोही सत्य जाणण्याचा एक मार्गच. सत्य अमुक एका प्रकारचेच असते, आणि ते अमुक अमुक मार्गानेच गवसते असे म्हणण्यात काहीच अर्थ नाही. त्यामुळे अविद्या तंत्राला मी नाक मुरडण्याचे कारण नाही. परंतु, या अविद्या तंत्राने भल्यापेक्षा बुरंच अधिक केलेलं आहे. हे तांत्रिक साधनेच्या मार्गाने जात असता अधिकाधिक शक्ति मिळवत जातात. एकामागोमाग एक सिद्धी अर्जत जातात. वामा खेपांसारखे अतिशय मोजके महासाधक या सिद्धी बाजूला टाकत पुढे पुढे जात राहतात. बाकीचे अडकतात एकेका सिद्धीच्या मोहात. वापरायला लागतात. वापरली तर वापरली. कशासाठी वापरतात, तर हेव्या-दाव्यांचे हिशेब पूर्ण करण्यासाठी. किरकोळ मानसिक शक्ती मिळताच निसर्गनियमांत ढवळाढवळ करायला लागतात आणि लोकांच्या आयुष्यात अजून दु:खं निर्माण करून सोडतात. पाच मकारांचा अर्थ अविद्या तांत्रिक शब्दश: घेतात. विद्या तांत्रिक त्यामागचा अर्थ शोधतात. साधनेसाठी, आणि एरवीही, पशुहत्येला विद्यातंत्रात स्थान नाही. वेदांमध्ये शब्दश: यज्ञ दिलेले आहेत; वेदांतामध्ये यज्ञाचा सांकेतिक अर्थ समजावला आहे, तशापैकी. विद्या तंत्राने, आणि नंतर योग मार्गाने, भक्तिमार्गाने, कायम सिद्धींच्या मोहापासून दूर रहायची शिकवण दिली आहे. समस्त मानवजातच नव्हे, तर अखिल प्राणिमात्रांच्या कल्याणाचा मार्ग दाखवला आहे. असो.

अविद्या तांत्रिक हा माझ्यासाठी धोका अशासाठी होता, की स्मशानसाधना करत असताना मला परास्त करून माझी तप:साधना हस्तगत करण्याचा विधी अविद्या तंत्रात आहे. कुणीही अविद्या तांत्रिक हे करणारच करणार. मी त्याच्याकडे दुर्लक्ष करीन, पण तो नाही करणार. माझे ध्येय आहे गुरुप्राप्ती. त्याचे ध्येय आहे अधिकाधिक शक्ति मिळवणे. कसे जमायचे!

त्या रात्री ती जी आरोळी ऐकू आली ती ऐकून माझ्यासारखा निर्भय तांत्रिकदेखील क्षणभर स्तब्ध झाला. माझा वाटाड्या मित्र मागच्या मागे पसार झाला होता. त्याच्या पायांत पळण्याची ताकत उरली होती ह्याचेच मला क्षणभर आश्चर्य वाटून गेले. दुसऱ्याच क्षणी मी पाऊल पुढे टाकले. पुन्हा तशीच धमकी. असला आवाज मी आजपर्यंत ऐकला नव्हता. त्या माणसाच्या आतड्यांत विलक्षण ताकत होती. नुसत्या आवाजाने त्याने एखाद्याला मारुन टाकले असते. तिसऱ्या वेळी त्याने अर्वाच्य शिव्या द्यायला सुरुवात केली. मी दाट अंधारात तसाच पुढे चाललो होतो. दूर कुठेतरी मला काहीतरी चमकताना दिसत होते. त्या दिशेने मी जाऊ लागलो. मला दुसरा रस्ताच नव्हता. आता मला तो तांत्रिक स्पष्ट धमकी देऊ लागला, परत फिरला नाहीस तर इथेच तुझी खांडोळी करून आख्खा खाऊन टाकीन! ही धमकी कदाचित तो खरी करू शकला असता. आचार्यांनी मला या तांत्रिक विधीविषयी सांगीतले होते.

गुरुंवर हवाला टाकून मी कीर्तन गुणगुणत पुढे चाललो. त्या तांत्रिकाची बसण्याची जागा मला अंदाजाने लक्षात आली होती. मी त्याच्या विरुद्ध दिशेने चाललो होतो. स्मशानाच्या दुसऱ्या टोकाला नदीकिनारा होता असे वाटाड्याने सांगितले होते. मला तिकडे जायचे होते. त्या चमकणाऱ्या ठिकाणी मी पोचलो. मला गुर्र गुर्र असे आवाज ऐकू येऊ लागले. एक जवळजवळ विझलेली चिता होती. त्या अंधुक प्रकाशात मला चमकणारे कैक डोळे दिसले. मी थबकलो. अनेक कुत्री की तरसे माझ्या रस्त्यात उभी होती. माझ्यावर डोळे रोखून. दहा-पंधरा-वीस-तीस किती होते कुणास ठाऊक. सगळीकडे इतका दाट अंधार होता की मला तिथूनच जाण्याखेरीज पर्याय नव्हता. मी गुरुमंत्र स्मरला आणि पाऊल पुढे टाकले. आश्चर्य म्हणजे त्यांची गुरगुर चालूच राहिली, पण अंगावर कुणीच आलं नाही. मी तो भाग ओलांडताच मात्र आश्चर्यकारकरीत्या त्यांचं भुंकणं एकदम वाढलं. पण त्यांनी माझा पाठलाग केला नाही.

नदीजवळ पोचलो. कपडे उतरवले. उपकरण हातात घेऊन थंडी जाईपर्यंत तांडव केले. यावेळेपर्यंत सगळे शांत झाले होते. हवी तशी स्मशानशांतता पसरली होती. शांत चित्ताने ध्यानस्थ झालो.

ध्यान संपवून आल्या रस्त्याने परत निघालो. आता मात्र मला आश्चर्याचा धक्का बसला. ती सर्व कुत्री माझ्यासमोर उभी ठाकली होती. एका लष्करी शिस्तीत. सर्वात पुढे एक. त्यामागे दोन. त्यामागे तीन. अशा बाणाच्या टोकाच्या आकारात. माझ्यावर कोणत्याही क्षणी हल्ला करण्याच्या तयारीत सज्ज.

त्या नेमक्या क्षणी गुरूंनी काय विचार माझ्या मनात उत्पन्न केला…मी झोळीतून बाळगत असलेला सुरा हातात घेतला आणि मनाशी म्हणालो हा पहिला कुत्रा तरी निश्चित मरणार! त्याच क्षणी कुत्र्यांची ती ऑर्डर विस्कटली. सगळी कुत्री वेदनेने विव्हल झाल्यासारखी भुंकत शेपूट पायांत घालून स्वत:भोवती गिरक्या घेऊ लागली. मी तिथून निघून आलो.

*****

पोस्ट स्क्रिप्ट

आचार्यांना हा अनुभव सांगितला. ते म्हणाले, गुरुंवरील अढळ भक्तीने तुला वाचवले. कुत्र्यांचे हे असे संघटन हा बऱ्यापैकी सामान्य अनुभव आहे. तांत्रिक त्यांच्या रक्षणासाठी आणि प्रसंगी हल्ला करण्यासाठी त्यांना वापरतात. कुत्र्यांशी लढण्याचा तुझा विचार पकडूनच तांत्रिक घाबरला, त्याने कच खाल्ली. एका जरी कुत्र्याला इजा झाली असती तरी त्याचे प्राण धोक्यात आले असते.

(इति.)

मंगळवार, ३० नोव्हेंबर, २०१०

स्मशानानुभव - एक

त्या दिवशी अमावस्या होती. सलग तीन दिवस निर्जळी उपासाचा तिसरा दिवस. आजची स्मशानसाधना अतिशय महत्त्वाची. दीक्षा घेऊन दहा वर्षे झाली. अजून तरी गुरुकृपेने साधना कधी चुकलेली नव्हती. पण आज जरा बिकटच प्रसंग होता. गेले दोन महिने सतत फिरतीवर होतो. मला दिलेल्या अंचलातल्या गावांमध्ये शाळांची काय अवस्था आहे याचा सर्व्हे जवळजवळ पूर्ण होत आला होता. अमावस्या-पौर्णिमेला एखाद्या ठिकाणी तरी एखाद्या देवळात किंवा संघ बंधूकडे मुक्काम पडलेला असायचा. तिथले स्मशान जवळ करणे अवघड नसायचे. कुणीतरी संघ बंधू वाट दाखवायला मिळेच. संध्याकाळी आंघोळ करुन ताजेतवाने व्हायचे, कीर्तन करायचे, कुणी मंडळी भेटायला आली तर त्यांच्याशी गुरुचर्चा करायची, आणि अंधार पडल्यावर ध्यान लाऊन बसायचे. अर्ध्या रात्री साधनेची उपकरणे घेऊन स्मशानाची वाट चालू लागायची. पण त्या दिवशी मात्र रात्र होत आली तरी मी रेल्वेतच होतो. अनपेक्षितपणे वेळेचे सगळेच गणित सकाळपासून कोलमडले होते. रात्रीचे नऊ वाजत आले होते. कसली परीक्षा घेताय असे गुरुंना मनाशी विचारत मी सरळ आल्या स्टेशनला खाली उतरलो.

स्टेशन छोटेच होते. लखनौच्या जरा अलीकडले स्टेशन होते. त्या रात्रीची साधना याच ठिकाणी व्हायची होती असे मला वाटून गेले. स्मशानाचा पत्ता शोधण्याच्या कामाला लागलो. एका नवख्या दीक्षिताने एकदा विचारले होते, दादा, अनोळखी गावात स्मशान कसे शोधता? लोक संशय घेत नाहीत? मी त्याला हसून उत्तर दिले होते, तू हाच प्रश्न एखाद्या दारुड्याला विचार: अनोळखी गावात गुत्ता कसा शोधतोस!

अर्ध्या एक तासाने मला माझा वाटाड्या मिळाला. हो नाही करत मला रस्ता दाखवायला तो कसाबसा तयार झाला. मात्र त्याने मला सावधगिरीची सूचना दिली – त्या स्मशानात एक सिद्ध अविद्या तांत्रिक साधना करण्यासाठी अधूनमधून येत असे. गुरुंना माझी आज खरेच परीक्षा घ्यायची आहे असे मला वाटून गेले. भरीस भर म्हणून आजची अमावस्या सिद्धी प्राप्त करण्यासाठी सुयोग्य वेळ होती. माझे लर्नेड फ्रेंड आज नक्कीच स्मशानात असणार हे मी ताडले. माझ्या अनुत्सुक वाटाड्याला बोलण्यात गुंतवत माझा कार्यभाग उरकायच्या मागे लागलो.

गाव मागे पडले आणि अंधार दाट झाला. या प्रदेशातील स्पंदने मला स्पष्ट जाणवू लागली. कोणे एके काळी नक्कीच हे एक तंत्रपीठ असणार. माझा वाटाड्या मित्र मात्र पुरता भ्याला होता. दबल्या आवाजात त्याने मला सांगितले हे असेच सरळ पुढे गेले की स्मशान सुरु होते. पण बोलण्याच्या नादात आम्ही तिथवर पोचलोच होतो.

अचानक ती भयाण शांतता कापत एक आरोळी ऐकू आली – तिथेच थांब!


********


स्मशानात मी आज पहिल्यांदाच जात नव्हतो.

एअरफोर्सच्या ट्रेनिंग कॅम्पमध्ये असताना रुममेटला पहाटे एक तास आणि रात्री एक तास ध्यानस्थ बसलेला पहात असे. त्याला त्याविषयी विचारल्यावर तो मंद स्मित करुन एवढेच म्हणत असे, तुला बुद्धीविलास हवा आहे की अनुभव? अनुभव हवा असेल तर मला विचार. सांगतो. मी नंतर त्याच्या नादाला लागलो नव्हतो.

साहसाची आवड होती म्हणून तर एअरफोर्समध्ये दाखल झालो होतो. वडीलांचा स्थिरावलेला व्यापार सोडून देऊन. आईची नाराजी स्वीकारुन. पण इथे येऊन माझी साहसाची भूक भागण्याची चिन्हे दिसेनात. हे आयुष्य नि:संदेह साहसी होते. पण माझी भूक निराळी होती. रेजिमेंटेड लाइफ माझ्यासाठी नव्हते. चौकोनी शिस्तीच्या दिनक्रमात असणारी आखणी केलेली करमणूकदेखील मला कृत्रिम वाटू लागली होती. मांसाहार आणि मद्यपान यांना या विश्वात असलेले प्रतिष्ठेचे स्थान मला मी ऑड मॅन आउट असल्याची सतत जाणीव करुन देत असे. ही माझी मधुशाला नाही असे कायम वाटत असे. मानसोपचार करुन घ्यावेत की काय असं वाटू लागलं होतं. सगळीकडेच एक निरर्थकता दिसत होती. जर कधीतरी मरूनच जायचे आहे, तर जगायचं कशासाठी , हे जग, यातले सो कॉल्ड प्रॉब्लेम्स, सो कॉल्ड सुखं, सगळंच मला अनावश्यक वाटू लागलं होतं.

अशात एक दिवस माझा तोच रुममेट मला बंगळूरात भेटला. त्याला बाजूला घेऊन विचारले, अजून साधना करतोस का? माझ्या डोळ्यांत पहात त्याचे टिपिकल स्मितहास्य करत माझ्या डाव्या खांद्यावर त्याचा उजवा हात ठेवला आणि म्हणाला आज संध्याकाळी सहा वाजता, माझ्या क्वार्टरवर.

संध्याकाळी ठीक सहाच्या ठोक्याला मी त्याच्या घरी हजर झालो. तो मला बाल्कनीत घेऊन गेला. तिथे एक चाळीशीतले वाटणारे योगी अगोदरच येऊन बसलेले होते. भगवा कुर्ता, भगवी लुंगी, भगवा फेटा – शीख बांधतात तसा – रुबाबदार दाढी, आणि आपल्याला भेदून पाहताहेत असं वाटणारे लकाकते तेजस्वी डोळे. मला पाहताच खुर्चीतून उठले आणि दोन्ही हात जोडून हसतमुखाने ‘नमश्कार!’ असं म्हणाले. माझ्या नकळत मी अगदी तसाच नमस्कार त्यांना केला.

आजपर्यंत इतके आकर्षण मला कुणाविषयीच वाटले नव्हते. मी भरभरुन बोलायला सुरुवात केली. स्वामीजी शांतपणे मान डोलावत ऐकून घेत होते. मित्र शांत बसला होता. स्वामीजी मला म्हणाले, तुला हे सगळं काय चाललंय याचा अर्थ जाणून घ्यायचाय असं दिसतंय. मी हो म्हणालो. मला शिकवाल का? अवश्य. त्यांनी लगेच तयारी दाखवल्यानंतर मात्र मी अचानकच सावध झालो. मी म्हणालो, मला दीक्षा वगैरे घ्यायची नाही. मला फक्त तुमचं मार्गदर्शन हवंय. माझा गोंधळ कमी करायचाय. वाढवायचा नाहीय. आश्वासक हसत स्वामीजी म्हणाले, असं करुया, मी तुला एक मोटरबाइक देतो. चालवून बघ. राइड आवडली तर तुला जेट विमान देतो, कसं? काहीच नाही आवडलं तरी हरकत नाही. नुकसान कशातच नाही. तुझं आहे तेच आयुष्य चालू ठेव. तुझ्या मर्जीचा तू राजा आहेस. कसलाही डॉग्मा नाही. कसलीही बंधनं नाहीत. जी बाइक तुला देणार आहे, त्या बाइकचं मॅन्युअलदेखील मी तुला देणार आहे. ती कशी चालते, मेंटेनन्स कसा ठेवायचा, सगळं सांगणार आहे. आता तू ठरव केंव्हा घ्यायची ते!

पुढील तीन चार दिवस मी रोज स्वामीजींना भेटत राहिलो. चार चार तास आमच्या अखंड गप्पा चालत. युरोप आणि ऑस्ट्रेलियात ते बराच काळ राहिले होते. पूर्व भारत जवळजवळ सगळा पायाखाली घातला होता. इकॉनॉमीचा त्यांचा चांगलाच अभ्यास होता. प्रचलित अर्थव्यवस्थेत गरिबी कधीच हटणार नाही, आणि गरीब हा कायमच नाडला जाणार असे त्यांचे ठाम मत होते. अर्थकारण, राजकारण, समाजजीवन, आणि वैयक्तिक आयुष्याला आवश्यक असणारी आध्यात्मिक बैठक याची सांगड घालत ते विविध विषयांवर बोलत रहात. सकारण मीमांसा करुन ते मला आपला दृष्टीकोन पटवून देत. त्यांच्या आर्ग्युमेंट्स मध्ये कसलाच हट्ट नसे. स्वत:विषयी ते बोलत नसत. पण एकदा मी खूपच खोदल्यावर त्यांनी मला एवढंच सांगीतलं, आजुबाजूच्या काही प्रश्नांमुळे मला झोप येत नसे. ते सोडवायला म्हणून मी राजकारणात जायचा प्रयत्न केला. तो कचरा साफ होणं शक्य नाही असं मला लवकरच लक्षात आलं. सगळ्या गोष्टींचा पायाच चुकीचा आहे. मी पक्का नास्तिक होतो. पण घटना अशा घडत गेल्या की मी या आध्यात्मिक संघाच्या संपर्कात आलो आणि मला माझी मधुशाला मिळाल्याचा आनंद झाला. माझ्याच शंका, माझेच प्रश्न इथे उपस्थित केले जात होते. फरक एवढाच, की त्या अधिक व्यवस्थित मांडलेल्या होत्या, आणि सुटकेच्या आशेचा किरण दाखवलेला होता. मग मी इथलाच झालो. शारिरीक आणि मानसिक आरोग्यासाठी म्हणून गुरुंनी शिकवलेली बेसिक तंत्रसाधना स्वीकारली आणि गुरुकृपेने एकेक पापुद्रे उलगडत गेले. आज मी अवधूत आहे.

यासोबत आचार्यांनी त्यादिवशी त्यांच्या स्मशानसाधनेविषयी, गुरुंविषयी मला कैक गोष्टी सांगितल्या. त्यांच्या सामाजिक कार्याविषयी मला ओळख झालेली होतीच. त्यांच्या तांत्रिक साधनेच्या माहितीने या आयुष्यात काही अर्थ असू शकतो, आणि तो समजू शकतो असं मला अचानक वाटून गेलं. या अंत माहीत नसलेल्या रस्त्यानं जाण्यातलं साहस मला खुणावू लागलं.

मोटरबाइक घेण्याचा माझा निर्णय पक्का झाला. त्यात आध्यात्मिक ओढीचा भाग कमी, आणि साहसी जीवनशैलीच्या आकर्षणाचा भाग अधिक होता. दुसऱ्या दिवशी पहाटे आंघोळ करुन मी स्वामीजींपुढे उभा राहिलो. मी त्यांच्या पाया पडू लागताच त्यांनी मला अडवले. म्हणाले, मी गुरु नाही. मी आचार्य आहे. माझे आचरण पाहून तुला गुरु काय म्हणताहेत ते समजेल. गुरु एकच. तारकब्रह्म. सदाशिव. ज्याची अज्ञ लोक पिंडी बांधून पूजा करत बसतात. त्याने शिकवलेली साधना स्वत: करण्याऐवजी, मंत्रांचा अर्थ समजून घेण्याऐवजी पूजेचा शॉटकट मारतात. आज मी तुला खरी पूजा शिकवणार आहे. अगोदर तुला गोपनीयता आणि जनकल्याणाची शपथ घ्यावी लागेल. या मार्गात मिळणाऱ्या सिद्धी केवळ जनकल्याणासाठीच वापरशील अशी शपथ घ्यावी लागेल.

मला मौज वाटली. जणू काही मी मंत्रीपदाचीच शपथ घेत होतो!

होय. तू मंत्रीच आहेस आता. सदाशिवाच्या सरकारचा. माझे विचार पकडून आचार्यांनी पहिल्यांदाच त्यांच्या ऑकल्ट पॉवरची झलक दाखवली. विजेचा झटका बसल्याप्रमाणे मी डोळे मिटून ताठ बसलो आणि आचार्यांनी ध्यान शिकवायला सुरुवात केली. एक तासाने डोळे उघडले. काहीतरी वेगळं घडलेलं आहे असं उगाचंच वाटत होतं. आचार्य म्हणाले, आता गुरुदक्षिणेची वेळ झाली. गुरुदक्षिणा म्हणून पैसे किंवा तत्सम गोष्टी देण्याचा मूर्खपणा मी अर्थातच केला नाही. मी माझा हात गुरुंना अर्पण केला – मला चालवा म्हणून.

त्याच रात्री हट्टाने मी आचार्यांसोबत पहिल्यांदा स्मशानात गेलो.


********


मुळातच मी हट्टी स्वभावाचा आहे. एखादी गोष्ट हातात घेतली की तडीला न्यायची. मध्ये सोडून द्यायची नाही. हे आचार्य स्मशानात जातात तर मी का नाही, म्हणून हट्टाने गेलो. त्यांनी मला समजावायचा प्रयत्न केला – स्मशानसाधना कापालिकांसाठी आवश्यक आहे. तू सहजयोग करतोयस, आवश्यक नाही. शिवाय तिथे जाऊन येणारे अतिरिक्त वैराग्य सांभाळता आले नाही तर नैराश्याच्या गर्तेत अडकशील. मी अधिकच हट्टाला पेटलो. त्यारात्री स्मशानात एका विझत असलेल्या चितेसमोर आचार्यांनी आखून दिलेल्या मंडलात बसून ध्यान करताना मी देहभान विसरलो.

दुसऱ्याच दिवशी मी चंबुगबाळे आवरुन बंगालमधील संघाच्या हेडक्वार्टरकडे प्रयाण केले. मी आर्म्ड फोर्सेसमधून पळून गेलो असल्याने मला पोलीस वॉरंटशिवाय पकडू शकत होते. त्यामुळे सात वर्षे तरी मला खेड्यापाड्यांतूनच फिरावे लागणार होते. पण हे माझ्या पथ्यावरच पडले. साहसाची माझी हौस व्यवस्थित भागत होती. देश जवळून पहायला मिळत होता. विनोबांनी जसा अर्थव्यवस्थेचा अभ्यास स्वत: दरिद्री राहून, अनुभवून, केला होता, तसाच माझाही विनासायास होत होता. अध्यात्माची मुळं माझ्या देशात किती खोलवर रुजली आहेत, आणि भगव्या कपड्यांना किती आदर आहे हे अनुभवत होतो. याला नीट दिशा आणि नेतृत्त्व नसल्याने समाज कसा मूर्ख समजुती आणि अंधश्रद्धांच्या आहारी गेलेला आहे हे दिसत होतं. यातूनच माझी साधना प्रखर होत होती. गुरुंचे वचन होते – मिशनचे काम करत असाल तर वेगळ्या साधनेची आवश्यकता नाही. पण एव्हाना मला साधनेचे व्यसनच लागले होते. बसल्या बसल्या माझे मन आज्ञाचक्रात एकाग्र होई आणि थोड्याच वेळात एक सुन्न करणारा पण अतिशय सुखद असा आवाज मला डाव्या कानशिलाजवळून यायला लागे आणि मी त्यात बुडून जाई. माझ्या मणक्यांमधून मेंदूपर्यंत काय होत होते ते सांगता येणार नाही, पण मेंदूमध्ये सोमरसाचा एक थेंब जरी पडला तरी मला दिवसभर ती नशा बस्स होई. जेवायचे भान नसे. आजुबाजूला काय चालले आहे ते अर्धवट समजे, आणि चालतोय की तरंगतोय ते उमजत नसे. स्मरणशक्ती काहीच्या काही बनली होती. बारीक बारीक तपशील फोटो काढल्यासारखे डोळ्यांपुढे येत. मनात येणारे विचार अनपेक्षितपणे तास दोन तासात खरे व्हायला लागले होते. स्मशानसाधना करतेवेळी तर विशेष अनुभव येत. साधना संपवून स्मशानाबाहेर येई तेंव्हा असे वाटे जणू या जगात मी एकटाच सिंह आहे, आणि बाकी सगळ्या मेंढ्या माना टाकून झोपी गेलेल्या आहेत. संपूर्णपणे निर्भय झालो होतो. अभी.

लखनौजवळच्या त्या स्मशानात पोचलो तेंव्हा मी अभी होतो.

रविवार, २९ ऑगस्ट, २०१०

प्रांतांच्या गोष्टी - काही संदर्भ

डिस्क्लेमर: लोकप्रशासनावरील हा ऑथेंटिक वगैरे लेख नाही. प्रशासनाशी सहसा संबंध न येणाऱ्या मित्रांना ढोबळ कल्पना यावी एवढाच हेतू आहे. कुणी भर टाकल्यास स्वागत आणि आनंद आहे. काही चूक आढळल्यास अवश्य सांगावे.

प्रेरणा (!)-

पण मला प्रांत म्हणजे कलेक्टर/डेप्युटी कलेक्टर की अजुन कुठली पोस्ट ते अजुन कळल नाही.

*******

जिल्हा प्रशासनामध्ये दोन प्रमुख उतरंडी असतात. राज्या राज्यांनुसार थोडे फरक असतात. प्रस्तुत संदर्भामध्ये –

विकास (डेव्हलपमेंट) उतरंड / हाएरार्की–

कलेक्टर – पीडी(डीआरडीए)/ अध्यक्ष जि.प. – बीडीओ/ सभापती पंचायत समिती – पीइओ/ सरपंच

पीडी(डीआरडीए) – प्रोजेक्ट डायरेक्टर (डिस्ट्रिक्ट रुरल डेव्हलपमेंट एजन्सी) (महाराष्ट्रात सीइओ असतात, पीडी पेक्षा रॅंक आणि जबाबदारीने वरचे पद); बीडीओ – ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर; पीइओ - पंचायत एक्स्टेन्शन ऑफिसर (महाराष्ट्रात ग्रामसेवक असतात.).

महसूल (रेव्हेन्यू) उतरंड –

कलेक्टर (जिल्हाधिकारी/ जिल्लापाळ) – सबकलेक्टर (उपजिल्हाधिकारी/ उपजिल्लापाळ - प्रांत) – तहसीलदार – रेव्हेन्यू इन्स्पेक्टर.

(रेव्हेन्यू इन्स्पेक्टर हा साधारणपणे पन्नास साठ गावे पाहतो. जमीनीचे सर्व कागद याच्या ताब्यात असतात. सरकारची शेवटची कडी. पृथ्वीवरचा सर्वात महत्त्वाचा माणूस! आपल्याकडे जसा तलाठी!)

याशिवाय कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी या महसूल यंत्रणेतील अधिकाऱ्यांकडे असते. ते एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट असतात. म्हणजे कलेक्टर असतो डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट (डीएम), सबकलेक्टर – सब डिव्हिजनल मॅजिस्ट्रेट (एसडीएम), तहसीलदार – एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट. ही मंडळी क्रिमिनल प्रोसीजर कोड, तसेच पोलीस ऍक्ट अंतर्गत काही अधिकार बाळगून असतात. कायदा सुव्यवस्थेसाठी हे जबाबदार असतात, आणि पोलीसांच्या साहाय्याने त्यांनी हे काम करायचे असते. गुन्हे तपासामध्ये यांचा काही संबंध नसतो. ते पोलीसांचे काम. म्हणजे पोलीसांना दुहेरी काम असते – कायदा-सुव्यवस्था, आणि गुन्हे अन्वेषण. [हे ग्रामीण भागात. शहरी भागात पोलीस कमिशनरेट असेल, तर असे अधिकार पोलीसांकडेच असतात. म्हणून त्यांना कमिशनर असे पद असते. म्हणजे आयुक्त – आयोगाचे अधिकारी, अर्धन्यायिक काम. पोलीस त्यामुळे कायदा सुव्यवस्था संपूर्णपणे सांभाळतात. तसेच वेगवेगळ्या किरकोळ परवानग्या/ लायसेन्स – मोर्चा/ लाउडस्पीकर/ इ. तेच देतात.]

तसेच, डिझॅस्टर मॅनेजमेंट ही संपूर्णपणे रेव्हेन्यू अधिकाऱ्यांची जबाबदारी असते. इमर्जन्सी ड्यूटी यांच्याकडे असते. उदा. पूर, दुष्काळ, उष्माघात, अपघात, इ.

निवडणुकांचे काम रेव्हेन्य़ू अधिकाऱ्यांनाच करावे लागते.

जनगणना यांच्याकरवीच.

व्यक्तीच्या ओळखीशी संबंधित रहिवासी प्रमाणपत्र, जातीचे दाखले, उत्पन्नाचे दाखले, पासपोर्टसाठी प्रमाणपत्र इ. दाखले देण्याचे अधिकार यांच्याकडे असतात. कदाचित माणसाची ओळख जमिनीशी निगडित असते, आणि जमिनीचे काम बघणारे लोक म्हणून असेल. (काही राज्यांत हे अधिकार लोकनियुक्त प्रतिनिधींना दिलेले आहेत, पण अशी प्रमाणपत्रे सगळीकडे ग्राह्य धरली जात नाहीत, फॉर ऑबव्हियस रीझन्स, आणि मुळातच ते त्यांचे काम नव्हेच.)

ही ठळक कामे. याशिवाय बरीच कामे असतात.

इतर विभाग – लाइन डिपार्टमेंट्स

यांना जिल्हे नसतात. म्हणजे यांचे जिल्हे थोडे वेगळे असतात असे म्हणणे जास्त योग्य ठरेल. म्हणजे असं – प्रत्येक खात्यासाठी एकेक मंत्री असतात. ते राज्यातले त्या त्या खात्याचे टॉप एक्झिक्युटिव्ह. हे टू इन वन असतात – एक्झिक्युटिव्ह पण आणि लेजिस्लेटर पण. जसे रेव्हेन्यू अधिकारी टू इन वन असतात – एक्झिक्युटिव्ह पण आणि (क्वासी) ज्युडिशियल पण.

मंत्री – सेक्रेटरी – डायरेक्टर – जिल्हा स्तरावरील अधिकारी.

उदा. शिक्षण मंत्री – शिक्षण सचिव – शिक्षण संचालक – जिल्हा शिक्षण अधिकारी – शिक्षण निरीक्षक.

हे ढोबळ उदाहरण झाले. प्रत्यक्षात थोडी अधिक गुंतागुंत असते. म्हणजे, वरील उदाहरणात बीडीओ, जिल्हा परिषद, कलेक्टर यांचेही अधिकार मिसळलेले असतात. शिवाय, सचिवालयाची वेगळी उतरंड असते, निर्देशालयाची (डायरेक्टोरेट/ डिरेक्टोरेट) वेगळी उतरंड.

सेक्रेटरी – सचिव हे खरे नोकरशहा. ब्युरोक्रॅट्स. मंत्र्यांचे सल्लागार. हे एक्झिक्युटिव्ह यंत्रणेचे सगळ्यात वरचे अधिकारी. डायरेक्टर म्हणजे फिल्डवरचे लोक आणि ब्युरोक्रॅट्सना जोडणारी कडी. यांच्या कामात सचिव आणि जिल्हा स्तरावरचे अधिकारी यांच्या प्रोफाइलचा संगम असतो. जिल्हा स्तरावरचे अधिकारी म्हणजे फिल्डवरचे लोक.

फिल्डवरचे सगळे अधिकारी जरी आपापल्या उतरंडीमध्ये काम करत असले, तरीही जिल्हा प्रशासनाला टाळून त्यांना काम करता येत नाही. त्यामुळे जिल्हा प्रशासन प्रमुख अर्थात कलेक्टर हा एकप्रकारे त्यांचा (म्हणजे सगळ्या जिल्ह्याचाच) सुपरवायजरी अधिकारी असतो.

********

विशेष टिप्पणी!

आमदार/ खासदार/ लोकनियुक्त प्रतिनिधी यात नेमके कुठे येतात हे सूज्ञांना वेगळे सांगायला नकोच.Wink
माझ्या मते ते ‘नेमके’ कुठेच नसतात, दुधात मिसळलेल्या साखरेसारखे/ मिठाच्या खड्याप्रमाणे सर्वव्यापी असतात! त्यांच्या चवीनुसार व्यवस्था नीट काम करते किंवा फेफरे आल्यासारखी वागून आपली वाट लावते.


शुक्रवार, २७ ऑगस्ट, २०१०

खरे खोटे - भाग १ (प्रांतांच्या गोष्टी - ४)

प्रांतांना कलेक्टरांनी एक ऍडिशनल जबाबदारी दिली होती. त्यांच्या सबडिव्हिजनच्या अखत्यारीत नसलेल्या पळसपंगा ब्लॉकच्या विकासकामांचा नोडल ऑफिसर बनवले होते. हा ब्लॉक हळूहळू नक्षलग्रस्त होत होता, आणि ब्लॉक ऑफिस भ्रष्टाचारग्रस्त झालेले होते. हरिविलासपूर पोलीस ठाण्यातल्या एका एएसआय ला नक्षलवाद्यांनी पकडून नेऊन ओलीस ठेवल्यापासून कलेक्टर आणि एस्पींची झोप उडाली होती. जिल्ह्यातील अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि पुनर्रचना जिल्हाधिकाऱ्यांच्या हातात नव्हती, पण अनौपचारिकरीत्या त्यांनी वेगवेगळ्या विभागांतील वीस चांगले अधिकारी निवडून त्यांना जिल्ह्यातील वीस ब्लॉक्सचे नोडल अधिकारी बनवले होते. आपल्या हुकुमी एक्क्याचे पान म्हणजे नवीनच जॉइन झालेला, आणि इमेज आणि करियर बनवायला उत्सुक असलेला आय ए एस प्रांत कलेक्टरांनी पळसपंग्याशी पंगा घ्यायला पाठवला होता.

प्रांतांची स्ट्रॅटेजी होती भरपूर फिल्ड व्हिजिट्स. सरकारातला एक महत्त्वाचा अधिकारी गावांगावांतून फिरतो ही एकच गोष्ट नक्षलवादाच्या सुरुवातीच्या उसवणीला टाका घालायला बऱ्यापैकी पुरेशी होती. त्यानंतर ब्लॉक ऑफिसची झडती. पण पळसपंगा ब्लॉक होता प्रांतांच्या ठाकूरगढ हेडक्वार्टरपासून दोन तास लांब. हे वेळेचे गणित pr
असे दोन महिने गेले. एक दिवस संध्याकाळी प्रांत सेन्ससचे काम बघत रेस ऑफिसमध्ये बसले असता प्रधानबाबूंचा फोन आला. “सर आहात का? भेटायचं होतं जरा.” प्रधानबाबू म्हणजे दैनिक समाजचे वार्ताहर. संयमित बोलणारा आणि प्रांतांना आवडणारा सुसंस्कृत माणूस. प्रांतांनी लगेच होकार दिला. दहा मिनिटांत चार पाच वार्ताहर आले. त्यात सितारा टीव्ही चॅनेलचे मोहंतीबाबू पण होते. हे स्थानिक आमदारांचे भाऊ होते. या मंडळींविषयी सबडिव्हिजनमधले काही अधिकारी फारसे चांगले मत बाळगून नव्हती. ही मंडळी काही अधिकाऱ्यांकडे ‘खंडणी’ मागतात असं प्रांतांच्या कानावर आलं होतं. खरं खोटं माहित नव्हतं.पण प्रांतांना मात्र त्यांनी आपल्या सुसंस्कृत वागण्याने जिंकले होते. एक दोन वेळा प्रांत त्यांच्याच गाडीत बसून जलशुद्धीकरण प्लॅंटचा खोललेला कच्चा चिट्ठा ऑंखो देखा बघायला गेलेही होते. लॉ ऍण्ड ऑर्डर समस्येतही एक दोन वेळा या मंडळींची प्रांतांना साथ मिळाली होती. दुसऱ्या बाजूने, पत्रकारांनादेखील प्रांतांच्या गुड बुक मध्ये राहण्यात मजा येत होती. तक्रार केली की लगेच दखल आणि हालचाल होत होती. प्रांतांच्या कानाजवळ असल्यामुळे खालच्या ऑफिसांमध्ये शब्द रहात होता. असे एकूण सिम्बायोसिस होते.

मंडळी जरा सिरीयस होती. प्रधानबाबू म्हणाले, “सर आपल्याला माहीत आहे का, आपल्या सबडिव्हिजनमध्ये एक गाव असे आहे, जिथे गेली सोळा वर्षे एकही सरकारी योजना पोचलेली नाही. एवढंच नाही, तर आपल्या गाडीने तिथंपर्यंत आपण जाऊसुद्धा शकणार नाही!”

प्रांतांना आश्चर्य वाटले. “प्रधानबाबू, आपली सबडिव्हिजन इतकी पण दुर्गम नाही, इथे आल्यापासून मागच्या चार महिन्यांत मला एवढे तरी समजले आहे. अन्यथा मी अशा गावात पहिल्यांदा आल्या आल्या गेलो असतो. असो. कोणते आहे हे गाव?” आपल्या इथे कमी केलेल्या भेटींकडे तर या मंडळींचा रोख नसावा, प्रांतांना वाटून गेलं. शक्य नव्हतं. इन एनी केस इतका भटका अधिकारी ठाकूरगढने पाहिलाच नव्हता आजपर्यंत.

“सर पारुडीपोसी नावाचे हे गाव आहे. एन एच २१५ पासून आत पाच किमी. बाळीबंधपासून. बाळीबंध म्हणजे ते बघा तुम्ही त्या शहीद आयटीबीपी जवानाच्या अंत्यसंस्काराला गेला होतात, ते गाव.”

“हो, मला माहीत आहे बाळीबंध. मी दोन वेळा गेलोय तिथं. असं एखादं गाव तिथून हाकेच्या अंतरावर आहे यावर माझा विश्वास बसत नाही.”

“व्हिडीओच बघा ना सर,” मोहंतीबाबू आपला कॅमेरा बंदुकीसारखा बाहेर काढत म्हणाले.

प्रांतांना हसू आले. “विकासच नाही म्हणताय मोहंतीबाबू तर चित्रं कशाची दाखवणार आहात?”

“बाइट आणलेत ना सर, लोकांचे. पण अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे.”

“बरं. सांगा. पण त्याअगोदर मला एक सांगा – हे दुर्गम गाव तुम्हाला कसं काय सापडलं, आणि तेही आत्ता. गेली सोळा वर्षे हे गाव हायवेपासून एवढं जवळ असूनही सरकारपासून आणि तुमच्यापासून लपून कसं काय राहू शकलं? आज अचानक असं
काय घडलं की तुम्हाला याचा शोध लागला, हं?”

“सर आजचीच गोष्ट आहे. आम्ही कोर्टात बातम्यांसाठी गेलो होतो. रुगुडी ठाणेदारांनी वीसेकजण पकडून आणले होते. आम्ही विचारलं काय झालं म्हणून तर समजलं की पारुडीपोसीमध्ये एक चर्च बांधायचं चाललंय. त्यावरुन हाणामारी झाली. मग आम्ही ताबडतोब गाडी काढली आणि गेलो त्या गावात. आम्ही बीडीओंना फोन लावला आणि भेटायला येऊ का म्हणून विचारलं. त्यांनी टाळाटाळ केली. मी इथे नाही, तिथे आहे, टूरवर आहे. आम्ही म्हणालो, आम्ही ’तिथे’ येतो, तर म्हणाले मी ’तिथून’ अजून कुठे चाललोय. आणि फार तुसडेपणाने बोलले.” मोहंतीबाबूंची शेवटची वाक्यं तक्रारीच्या सुरात होती.
प्रधानबाबू म्हणाले, “सर, आम्ही योग्य आदर ठेऊन बोललो असता असं तोडून बोलणं शोभतं का बीडीओंना? तुम्ही त्यांना समज द्यायला हवी.”

“शांत व्हा. कदाचित त्यांना कलेक्टर नुकतेच बोलले असतील, मूड खराब असेल, किंवा खरंच भेटता येणं शक्य नसेल. शिवाय, तुम्ही म्हणता तसं त्यांचं बिंग बाहेर पडणार असेल, तर ते तुम्हाला टाळणारच ना? का या आणि करा माझी हजामत असं म्हणणार?” प्रांत समजावणीच्या सुरात बोलले. मंडळींच्या गालावर हसू उमटले आणि आठ्या कमी झाल्या.

मोहंतीबाबू खुर्चीत पुढे सरकले आणि म्हणाले, “सर, या गावात जायला धड रस्ता नाही. आम्हाला गाडीतून उतरून चालत जावं लागलं.”
“तुमची गाडी तर जाऊच शकणार नाही सर,” साहूजींनी भर घातली.
मोहंतीबाबू पुढे बोलले, “या गावात ना रस्ते आहेत, ना वीज. गावाच्या सभोवार घनदाट जंगल आहे. दोन तीन महिन्यांतून एकदा केंव्हातरी बारीपदाहून काही मिशनरी रात्रीच्या वेळी लपत छपत गावात येतात आणि धर्मांतरं करतात. आता परिस्थिती अशी झालेली आहे, की गावातला एकजिनसीपणा कमी होऊन ख्रिश्चन आणि हिंदू असे तट पडलेत. आपली संस्कृती डोळ्यांसमोर नष्ट होताना काही लोक नाही बघू शकत. अशात एक चर्च या लोकांनी बांधायला काढलं. ते सरकारी जमिनीवर येतंय म्हणून लोकांनी त्याला विरोध केला आणि पोलीसांनापण सांगितलं. त्यातूनच भांडण वाढलं आणि आजची केस झाली.”

प्रांत ‘अम्यूझ’ झाले. त्यांना हे सगळं रंजीत वाटलं. पण काही बोलले नाहीत.

“आज मिशनरी येतायत, उद्या नक्षल येतील. या भागाचा दंतेवाडा किंवा कंधमाळ व्हायला वेळ लागणार नाही.”

“झालं तुमचं?” प्रांत म्हणाले, “आता जरा मला तो व्हिडीओ दाखवा बघू.”

प्रांतांनी दहा मिनिटे फास्ट फॉरवर्ड करुन तो व्हिडीओ पाहिला. काही लोकांच्या मुलाखती आणि एका अर्धवट बांधकामाचे चित्रण होते.

मोहंतीबाबू म्हणाले, “सर आम्ही एक स्टोरी बनवलीय. तुमच्या बाइटशिवाय पूर्ण होणार नाही!”
प्रांत म्हणाले, “मोहंतीबाबू, तुम्हाला माहीत आहे, मी ओल्ड फॅशन्ड बाबू आहे. माझ्या बातम्या न आलेल्या बऱ्या! माझ्या बऱ्या वाईट कामाविषयी जरुर आणा, पण माझं नाव, आणि चेहेरा आणू नका!”
“नाही नाही सर. हे फार महत्त्वाचं आहे. तुम्हाला बोललंच पाहिजे.”
“बरं बोलतो. पण धर्मांतरावर माझ्या नो कॉमेंट्स. आणि नक्षलवादावर पण मी काहीही बोलणार नाही. कबूल?”
“सर नुस्तं कॅमेऱ्यात दिसलात तरी बास आहे आम्हाला!”

मग बाइट द्यायच्या आधी प्रांतांनी त्यांना नक्षलवादावर आणि कंधमाळ प्रकरणावर एक छोटंसं लेक्चर दिलं, जेणेकरुन
बाइटचा हट्टाग्रह जरा शांत होईल!

(क्रमशः)

मंगळवार, ३ ऑगस्ट, २०१०

कस्टोडियल डेथ -भाग २ (प्रांतांच्या गोष्टी - ३)

एकच्या सुमाराला कोर्ट संपले. प्रांतांनी पोस्टमार्टेम संपल्याची खात्री करून घेतली. त्याचं व्हिडीओ शूटींग झालंय का ते विचारलं. मग तहसीलदारांना प्रोग्रेस विचारला. तर मयताची पत्नी, आई आणि बहीण ठाण्यात येऊन रडत बसल्या होत्या. बॉडी ताब्यात घेण्यासाठी तयार नव्हत्या.
पोलीसांचं त्या ऐकणं शक्यच नव्हतं. रारुआं भाग प्रांतांना ठाऊक होता. कुणी स्थानिक नेतापण धड नव्हता की ज्याच्या मार्फत काही बोलता येईल. प्रांत लगेच रारुआंला निघाले. जाताना घरातून एस्पींसाठी इडल्यांचा डबा घ्यायला विसरले नाहीत. रात्रभर माणूस जागा होता. प्रवासात होता. टेन्शनमध्ये होता. काहीच खाल्लं नसेल. तिथं रारुआं ठाण्यातही काही खायची सोय झाली नसेल या गोंधळात. त्यांच्या पत्नीचे कल्याणीला, प्रांतांच्या पत्नीला फोन येत होते, की हा माणूस काल सकाळी जो घराबाहेर पडलाय, ते आज पहाटे दोन तासांसाठी घरी येऊन गेलाय. कुठे आहे, जेवलाय का, काही बातमी आहे का? फोनही लागत नाहीये. कल्याणीला ही गोष्ट माहीत होतीच. तिने एस्पीच्या पत्नीला दिलासा दिला आणि इडल्यांचा डबा भरून प्रांतांच्या हाती दिला.
खड्ड्यांच्या रस्त्यातून धक्के खात प्रांत दुपारी अडीच वाजता रारुआंला पोचले. रस्त्यात पीएसओनं त्यांना डुबुणा गाव दाखवले. हेच त्या मयताचं गाव. इथून ठाणं दोन किमीवर. गावही रस्त्यापासून बरंच आत होतं. रस्त्याकडेला शाल वृक्षांची गर्द राई होती. या भागातलं टिपिकल आदिवासी गाव. प्रांत ठाण्याजवळ पोचले. ठाण्यापासून काही अंतरावर गर्दी जमा झालेली होती. पण रस्ता मोकळा होता. ठाण्याचं गेट बंद होतं. फोर्स होता.
एस्पी व्हरांड्यातच बसले होते. ऍडिशनल एस्पी होते. आवारात जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पहिबाबू एका मोठमोठ्यानं रडणार्या बाईची समजूत काढत होते. तिथे न थांबता प्रांत एस्पींकडे गेले. एस्पी त्यांना घेऊन आत गेले. आय आय सी च्या खुर्चीत बसून एस्पी प्रांतांना सांगू लागले, “अजित, हा पहि कॉंग्रेसचा आहे. आत्ता हा या मयताच्या बहिणीला समजावतोय. हे नाटक आज सकाळपासून चालले आहे. सकाळी बीजेडी ची माणसं समजाऊन गेली. हे लोक तयार झाले. आम्ही मयताच्या मेव्हण्याला गाडीतून सबडिव्हिजन हॉस्पीटलला बॉडी ताब्यात घ्यायला पाठवणार तेवढ्यात पुन्हा जमाव जमा झाला आणि दगडफेक केली. प्रकरण हाताबाहेर जाऊ नये म्हणून मला इथे यावं लागलं. मग ही कॉंग्रेसची माणसं आलीत. आता मी बीजेपीची वाट बघतोय! पुन्हा गावातली इतर टाउटर मंडळी आहेतच. प्रत्येकाला पैसे हवेत, क्रेडिट हवंय. पुन्हा ज्यांच्यावर इथे जुन्या केसेस आहेत ते दंगा करायला उत्सुक आहेत.”
प्रांतांनी अगोदर एस्पींना इडल्या खाऊ घातल्या. मग ते बाहेर गेले. पहिबाबू गेले होते. पण बायका तिथेच होत्या. प्रांतांनी मयताच्या मेव्हण्याला बोलावले. त्यांनी त्याला समजावले. असं जाग्यावर कॉम्पेन्सेशन मिळत नसतं. चौकशी होईल. इत्यादि. तो निमूटपणे ऐकून घेत होता. पण त्याची बहीण मोठमोठ्यानं ओरडत प्रश्न विचारत होती – माझ्या भावाला पोलीसांनी धरून आणला, गुरासारखं मारलं आणि त्याचा जीव घेतला. इतर काही मंडळी सुरात सूर मिसळून म्हणत होती – ज्या पोलीसानं त्याला अटक केली त्याला बोलवा, त्याची वर्दी काढा, त्याला आम्ही चपलीनं मारणार.
प्रांतांनी क्षणभर विचार केला. पोलीस डिफेन्सिव्ह आहेत. आपल्याला असायची गरज नाही. शिवाय प्रांतांना एक गोष्ट एव्हाना लक्षात आलेली होती, इथल्या लोकांना भूक सहन होत नसे. ट्रेनिंग देणारे कलेक्टर त्यांना सांगत, ‘अजित, लोक घेराव घालून, रस्ता अडवून बसले, की त्यांच्याशी चांगली दुपार होईपर्यंत बोलायला जायचंच नाही. भुकेची वेळ झाली की तेच मग तडजोड करायला लागतात.’ ही वेळ लोकांना हाकलायला योग्य होती. लोकंही पडत्या फळाची आज्ञा घेऊन पळाले असते.
ते म्हणाले, “अय बाबू, टिक्के रुह. तुमे कण मॅजिस्ट्रेट की? धर्मावतार? हं? हा जो माणूस मेलाय, तो कोण तुझा?”“अग्यां, गाववाला.”“मग जामीन द्यायला आला नाहीस काल ते?”“……”“दवाखान्यात इन्क्वेस्ट, पोस्टमार्टेमच्यावेळी गाववाल्यासाठी थांबायला कुणाला वेळ नव्हता ते?”“…..”“नीट ऐका सगळेजण. जो मेलाय तो तुमचा कुणी नव्हता. तो माझा माणूस होता. हे पोलीस माझे कुणी पाहुणे नाहीत. मी तुमच्यासाठीच आहे. पण म्हणून पोलीसांचे कपडे काढायची भाषा मी ऐकून घेणार नाही. असलं बोलायचं असेल तर चालायला लागा इथून.”“नाही अग्यां, आम्हाला न्याय पाहिजे. त्याशिवाय आम्ही जाणार नाही.”“जी चौकशी असेल ती मी करणार आहे. तुम्ही नाही. समजलं? तुम्ही इथे बडबड करून काही होणार नाही. चौकशीत तुम्ही मला तुम्हाला काय वाटतं ते सांगू शकता. आत्ता निघा.”मग मेव्हणा सगळ्या माणसांना घेऊन गेटबाहेर गेला. प्रांतांनी त्याला परत बोलावलं. कसंबसं त्या बायकांना समजाऊन प्रांतांनी त्यांना राजी केलं आणि मेव्हण्याला पोलीसांच्या गाडीतून हॉस्पीटलकडे रवाना केलं.
मग प्रांत आणि एस्पी थोडे रिलॅक्स झाले. अजून साधारण तीन तासांनी बॉडी गावात येणार. अंधार पडायच्या आत अंत्यसंस्कार झाले पाहिजेत. नाहीतर पुन्हा सकाळपर्यंत जर थांबलो तर सकाळी फ्रेश झालेली टाउटर मंडळी उद्याचा सगळा दिवस वाया घालवतील. एस्पींनी ताबडतोब रिझर्व्ह ऑफिसला फोन केला आणि अंत्यसंस्कारासाठी खड्डा खणण्यासाठी चार मजूर बोलावून घेतले.गावातून सहकार्याची काहीच अपेक्षा नव्हती.
प्रांत IAS आणि एस्पी IPS. लगतच्याच बॅचमधले असल्यामुळे दोघांमध्ये अनौपचारिक नातं होतं. प्रांतांनी एस्पींना खरी गोष्ट विचारली.
एस्पी म्हणाले, “अरे, ही खरंच आत्महत्या आहे. पोलीस म्हणलं की लोकांना पहिलं मनात येतं की ही ‘मारणारी’ माणसं. झालं असं, की काल संध्याकाळी हा माणूस, घासीराम मुर्मू, ठाकूरगढला जाणार्या रस्त्यावर उभा राहून गाड्या अडवून पैसे गोळा करत होता. ट्रकच नव्हे, तर चार चाकी पण. मग एक बलेरो गाडी ठाण्यात आली आणि लोकांनी ओआयसीला हे सांगीतलं. ओआयसी दोन होमगार्डांना घेऊन पोलीस जीपमध्ये बसून तिथं गेला आणि घासीरामला रस्त्यावर उभा असलेला पाहिलं. तिथल्या दुकानदारांनी पोलीसांना सांगीतलं की हा प्यायलेला आहे आणि रस्त्यावर गाड्या अडवतोय. एखाद्या ट्रकाखाली येऊन मरायचा. याला घेऊन जावा. मग त्याला धरून आणला. एका दुकानदाराकडून तक्रार पण लिहून घेतली. त्याला आणून इथं व्हरांड्यात बसवलं आणि ओआयसी खुर्चीत बसून त्याचा क्लास घेऊ लागला. पण तो अर्धवट नशेत होता. वाद घालू लागला. दोन-तीन वेळा पळून जायचा प्रयत्न केला. तोपर्यंत एक तास होऊन गेला होता. त्याच्या घरचं किंवा त्याचा कुणी मित्र, कुणीही इकडं फिरकलं नव्हतं. त्याला अटक केलेली होती. मग यांनी त्याला टाकला हाजत मध्ये. हाजतमध्ये टाकताना आम्ही त्याच्या अंगावर फक्त एक चड्डी ठेवायला पाहिजे, कपड्यांनी फास वगैरे लावून घेऊ नये म्हणून. पण हे मालक फक्त लुंगी नेसून होते. आत मोकळेच. त्याला मग लुंगीवरच आत टाकला. थोड्या वेळाने अंधार पडला. अजून थोड्या वेळाने लाइट गेली. दोघेजण होमगार्ड इथे हाजतसमोर बसून होते. ते बाहेर व्हरांड्यात गेले. हाजतमध्ये, तू बघू शकतोस, वर उंचावर हवा येण्यासाठी एक झरोका आहे. या घासीरामाने संडासच्या तीन फुटी आडोशावर चढून त्या झरोक्याच्या गजाला धोतर बांधले आणि फास लावून उडी मारली.”
प्रांत उठले आणि हाजतचा कुंई कुंई आवाज करणारा भला मोठा लोखंडी कोयंडा काढला. आत जाऊन त्या भिंतीवर चढून झरोक्यापर्यंत हात जातोय का ते पाहिलं. असं घडणं शक्य होतं.
एस्पी म्हणाले, “अजित, इथले पोलीस हे स्थानिक आहेत. हे लोक मूर्ख आहेत, पण क्रूर नाहीत. जवळच्या गावातल्या तोंडओळखीच्या माणसाला असं जिवे मारणार नाहीत. मारायची गरजच नव्हती रे. काही वदवून घ्यायचं नव्हतं. शिवाय पोलीस पोलीस म्हणजे कोण? एक ए एस आय आणि एक कॉन्स्टेबल. बाकी दोन होमगार्ड. हे लोक असं मारण्याचं अंगमेहनतीचं काम करतील असं वाटत नाही. आणि समजा त्यांचं त्या माणसाशी काही वैर असेल, त्यांना त्याला मारायचंच असेल, तर इथे आणून त्याला मारून स्वत:साठी कशाला खड्डा खणून ठेवतील?”
प्रांतांनी वाद घातला नाही. एकदा या पोलीसांना मूर्ख म्हटल्यावर ही मूर्ख माणसे काहीही करू शकतात. हाजतमध्ये मारुही शकतात. पण वाद घातला नाही. लक्ष देऊन ते एस्पींच्या शब्दांमागचे शब्द टिपत होते. त्यांच्या दृष्टीने दोनच गोष्टी महत्त्वाच्या होत्या – लवकरात लवकर अंत्यसंस्कार, आणि मॅजिस्टेरियल इन्क्वायरी. इन्क्वेस्ट आणि पोस्टमार्टेममध्येच अर्धं सत्य बाहेर येणार होतं. प्रांतांनी तहसीलदारांना डुबुणा गावात पोलीसांसोबत धाडून दिले. थोडी शहाणीसुरती माणसं जमा करून अंत्यसंस्काराची तयारी करण्यासाठी.
एस्पी म्हणाले, “अजित, तुला काय वाटतं हे नाटक कशासाठी चाललं आहे? हा सगळा पैशांचा खेळ आहे. आमची पन्नास हजाराची तयारी आहे.”प्रांत चमकले. म्हणाले, “सर हे तुमच्याकडून अपेक्षित नव्हतं.”“तुला काय अपेक्षित आहे? हा दंगा वाढत जावा, कधीच न थांबावा? वरिष्ठांनी आमचा बकरा बनवावा?”“तसं नाही. एकतर हे पैसे आणणार कुठून? दुसरं. का द्यायचे? देऊन लोकांना अशा सवयी लावायच्या का?”“ही तर सुरुवात आहे. अजून कुठे कुठे किती द्यावे लागतील कुणास ठाऊक! आणि सवयी लावणारे आपण कोण? हे आहे हे असं आहे. असं का आहे याचा विचार करणं वेगळं आणि काम करणं वेगळं. आपण काम करतोय. असलं चिंतन वगैरे करत बसलो तर काम कोण करणार?”“सुखी आहात सर. विचार करत नाही तुम्ही.”“सुखी! हे पैशाचं तर फार मोठं नाटक आहे बाबा. मी पैसे खात नाही. पण याचा अर्थ असा नाही की माझ्याखालचं दुसरं कुणी खात नाही, किंवा मला कुणाला कधी द्यावे लागणार नाहीत. पैसे न खाता खात्यात राहणं ही अतिशय अवघड गोष्ट आहे. यू आर पर्सोना नॉन ग्राटा. संधी मिळाली की तुम्हाला अडचणीत पकडतात. आता हीच गोष्ट बघ. एरवी एस्पी या पैसे खाणाऱ्या लोकांच्या पठडीतला असता तर त्याला इथं माझ्यासारखं येऊन बसावं लागलं नसतं. या लोकांनी परस्पर पैसे वगैरे देऊन एव्हाना मिटवून टाकलं असतं. पण आता ही लोकं माझी परीक्षा बघतायत. यांना मी माझ्या तोंडानं सांगीतलेलं हवंय की पैसे द्या. बघ कसे साळसूद होऊन बसलेत. पैसे न देता या ‘ऑनेस्ट’ माणसाला परिस्थिती सांभाळता आली तर ठीकच. नाही आली तरी कुठल्या तोंडानं पैसे मागतोय बघू.”
मोठे मासे छोटे मासे. प्रांतांच्या कानात आवाज झाला.
एस्पी म्हणाले, “काय रे बोलत नाहीस. ही नोकरी अवघड आहे बाबा. कुठे फसलास बिसलास तर बाहेर निघायला किती वेळ लागेल आणि किती खर्च येईल ते समजणार नाही. न्यायानं लढाई करायची म्हणालास तरी न्याय स्वस्त नाही. अडीच तीन लाख खास अशा कॉन्टिन्जन्सीसाठी बाजूला ठेवावे लागतात.”
प्रांत गप्प बसले. आपली तीन लाखाची बचत व्हायला किती वर्षे लागतील याचं गणित हबकलेल्या मनानं एव्हाना करायला सुरुवात केली होती.
पाच वाजेपर्यंत बॉडीची बातमी नाही म्हणता प्रांत आणि एस्पी चिंतेत पडले. तेवढ्यात तहसीलदारांचा फोन आला. “सर लोकांनी बॉडी आणणारा टेम्पो इथे गावाजवळ रस्त्यावरच अडवलाय. पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जावा म्हणतायत. पोलीस त्याचं काय करायचं ते करू देत म्हणतायत.” एस्पींनी ऍडिशनल एस्पींना तिकडे पाठवले. प्रांत म्हणाले मीच जातो .
प्रांत घटनास्थळी गेले. रस्त्यात टेम्पो थांबला होता. बाजूला शाल वृक्षांच्या झाडीमध्ये लोकांचा जमाव पोलीसांशी हुज्जत घालत होता. रस्त्यावर थोड्या अंतरावर पोलीसांची जाळ्या लावलेली व्हॅन उभी होती. त्या व्हॅनच्या कडेने सगळे पोलीस शिपाई उभे होते. हळूहळू अंधार पडू लागला होता. प्रांत त्या गर्दीत शिरले. तहसीलदारांना म्हणाले, हे असं समोर येईल त्याच्या तोंडाला लागू नका. चार पाच म्होरके आणि मृताचे नातेवाईक यांना बाजूला घ्या. बरं म्हणून तहसीलदार गेले. प्रांत ऍडीशनल एस्पींना घेऊन जंगलातून बाहेर रस्त्यावर येऊन थांबले.
ऍडीशनल एस्पी म्हणाले, “सर, हा प्रॉब्लेम असा सुटणार नाही. तुम्ही बोलून काही होणार नाही.” प्रांत म्हणाले, “हं. बघूया.”
गावकरी चार पाच गटांत विभागले गेले होते आणि सगळे एकाच वेळी बोलत होते. त्यातल्याच एका गटापुढे तहसीलदार उभे राहून त्यांच्या स्टाईलमध्ये चर्चमध्ये सर्मन दिल्याप्रमाणे काहीतरी बोलत होते. कुणीच ते ऐकत नव्हतं. त्याचवेळी त्यांच्यासमोर उभी असलेली चार पाच टाळकी काहीतरी बडबड करत होती. प्रांत हळूच तहसीलदारांच्या मागे जाऊन उभे राहिले. त्यांना एवढंच समजलं, की काही लोक म्हणतायत बॉडी ठाण्याला न्या. काही लोक म्हणतायत आम्ही ठाण्यातून घेतो. काही लोक म्हणतायत काहीही करा. काही लोक म्हणतायत आम्हाला कुणीच काही सांगीतलं नाही, पोलीसांनी त्याला पकडला, मारला, दवाखान्यात नेला, परत आणला; मग आत्ता कशाला विचारायला आलाय? ही सर्व मंडळी प्यायलेली असल्याचं प्रांतांच्या लक्षात आलं. कुणाशीच बोलून काहीच उपयोग नव्हता. प्रत्येक माणसाची स्वत:ची अशी एक जाहीर सभा चालली होती. एव्हाना अंधार पडलेला होता. इथे लाईटही नव्हती. कोण बोलतंय, प्रांत कोण, पोलीस कोण, पत्रकार कोण काहीच समजत नव्हतं. प्रांत पुन्हा मागे फिरले आणि आपल्या गाडीजवळ येऊन उभे राहिले.
ऍडीशनल एस्पी त्यांच्या कानाला लागत म्हणाले, “सर त्या मयताच्या मेव्हण्याला पाहिलं का?” प्रांत चमकले. “अरे हो. कुठाय तो? धरा त्याला. तोच गेला होता ना बॉडी आणायला? त्याला घेऊन जाऊ आणि उरकून टाकू.” ऍडीशनल एस्पी समजूतदारपणे हसले. म्हणाले, “सर तो गेला पन्नास हजार घेऊन. म्हणून तर हे बाकीचे लोक चिडलेत त्याच्यावर. हे उपाशीच. आता त्याला हे लोक गद्दार म्हणतायत. तो कुठला येतो आता. आम्ही यातल्या दहा वीस जणांना हजार हजार रुपये देऊन कटवतो.” प्रांतांनी मनातल्या मनात त्यांना वंदन केलं. म्हणाले, “या पैसे देण्याला काही अंत नाही. या लोकांनी बॉडी घेतली ठीक. नाहीतर सरळ आपण मॉर्गमध्ये घेऊन जाऊ. उद्या अंत्यसंस्कार करू. असंही त्या मेव्हण्यानं कागदावर बॉडी स्वीकारली आहेच.”
तेवढ्यात काही लोकांचा घोळका प्रांतांजवळ आला. पांढरे कपडे घातलेला एक दाढीधारी ठेंगणा माणूस प्रांतांना हात जोडून नमस्कार म्हणाला. प्रांतांनी पण हात जोडून नमस्कार परत केला.
“सर मी अमुक अमुक इथला माजी आमदार अमुक अमुक पक्षाचा. हे पोलीस स्टेशन इथं व्हावं म्हणून मीच प्रयत्न केले होते… ब्ला… ब्ला.”याच माणसाला आपण आज दुपारी आलो तेंव्हा ठाण्याच्या बाहेर पडताना पाहिले होते, प्रांतांना आठवले. अजून एक टाउटर!“काय आमदारसाहेब एवढं एक छोटंसं गाव तुमचा शब्द मानत नाही?”“तसं नाही अग्यां, लोकं चिडलीत. आपण जरा हुशारीनं काम घेऊया. आपण असं करू, ही बॉडी त्या पलीकडच्या रस्त्यानं वळसा घालून आणूया.”“त्यानं काय होईल?”“लोक जरा शांत होतील.”“कसं काय?”“त्या वाटेवर पोलीस स्टेशन आहे. लोकांचं पण समाधान की बॉडी स्टेशनपासून घेऊन आले, आपला पण प्रश्न सुटेल.”प्रांतांनी शांत शब्दांत माजी आमदारसाहेबांचा मुत्सद्दीपणा मोडीत काढला. तिथून निघून परत रारुआं ठाण्यात आले.
ठाण्यात आल्या आल्या प्रांत एस्पींना म्हणाले, “आपल्यापुढे पर्याय दोन. एक, गाववाल्यांची पर्वा न करता आज रात्री दफन उरकायचं. दोन, आज रात्री गावात आपली डिस्ट्रिक्ट इंटेलिजन्सची माणसं सोडायची आणि गावातला एक तरी गट आपल्या बाजूला करुन घ्यायचा.”एस्पी म्हणाले, “पर्याय दुसरा. गाववाल्यांची पर्वा एवढ्यासाठी करायची की आपल्या विरोधात जाईल अशी एकही गोष्ट ठेवायची नाही. आपली माणसं ऑलरेडी गावात गेलेली आहेत.”प्रांतांनी ताबडतोब बीडीओंना फोन लावला. सरपंच, ग्रामसेवकांचा पत्ता नव्हता. त्यांना ताबडतोब दुसऱ्या दिवशी पहाटे ठाण्यात यायला सांगीतलं. बीडीओंना सांगीतलं, ब्लॉकमध्ये कामं घेणारा या भागातला कॉंट्रॅक्टर धरुन आणा. त्याच्या शब्दात असणारी काही माणसं तरी या भागात असतीलच.
पोलीस बंदोबस्त व्यवस्थित असल्याची खात्री करून एस्पी आणि प्रांत रात्री बारा वाजता आपापल्या घरी निघून गेले.
दुसऱ्या दिवशी पहाटे पाच वाजताच प्रांत घरातून निघाले. डुबुणाजवळ रात्री रस्त्यावरच आडवा झालेला फोर्स एव्हाना जागा होऊन नित्यकर्मं आवरण्यासाठी क्रमाक्रमाने ठाण्याच्या बराककडे चालला होता. ठाण्यात पोचल्यावर आपण उगाचच एवढ्या लवकर आलो असं प्रांतांना वाटलं. ते आपले शांतपणे आत जाऊन ध्यान लाऊन बसले.
सात वाजता एस्पी पोचले. प्रांतांनी सरपंच आणि ग्रामसेवकांना पाचारले. थोड्या वेळाने एक बाई आणि दोन पुरुष बुजत बुजत ठाण्यात आले. बाई सरपंच होत्या. एकजण ग्रामसेवक आणि एकजण सरपंच-पती. प्रांतांनी त्यांना बसतं केलं आणि परिस्थिती सांगीतली. ही मंडळी कसलीच मदत करु शकणार नाहीत हे त्यांनी दोनच मिनिटांत ताडलं. मग त्यांनी सांगीतलं हा मृतदेह स्वीकारा. ग्रामपंचायतीचं कर्तव्य आहे, बेवारस शवांची व्यवस्था लावणं. सरपंच बाई घाबरुन गेल्या होत्या. ग्रामसेवकपण टाळाटाळ करु लागला. प्रांतांनी त्यांना सुरक्षेचं आश्वासन दिलं. तरीही फायदा नाही म्हणल्यावर प्रांत म्हणाले, “तुम्हाला जीव जाईल अशी भीति वाटतेय म्हणून नकार देताय. पण त्या नादात तुमची नोकरी जातेय त्याचं काय?” सरपंचांना म्हणाले, “मॅडम, तुम्ही पुन्हा कधीच निवडणुकीला उभं राहू शकणार नाही याची व्यवस्था मी करीन.” दोघांनाही कापरं भरलं होतं. एका बाजूला गावकऱ्यांची भीति तर दुसरीकडे प्रांतांचा दम. प्रांतांनाच दया आली. ते म्हणाले, “गुपचुप एक कागद करा आणि फाइलला लाऊन ठेवा. आम्हीच करतो सगळं. तुम्ही फक्त संस्काराला हजर रहा. तेवढं तरी जमेल ना?” होकारार्थी माना हलवून मंडळी निघून गेली.
एस्पी म्हणाले, “अजित, लोक आज पुन्हा फ्रेश झालेत भांडायला. आपण आज कोणत्याही परिस्थितीत एक गट बाजूला करून घेतलाच पाहिजे. ही या भागातली शांती कमिटीची माणसं पण कालपासून प्रयत्न करतायत.”
अकरा वाजत आले होते. गेले दोन दिवस जिल्ह्यातला बराचसा फोर्स इथं अडकून पडला होता. दरम्यान हुंडुळा ठाण्याच्या आयआयसीने खासदारांना गाठून त्यांना गावाकडे आणण्याची व्यवस्था केली होती. खासदार गावातल्या लोकांशी बोलत असल्याचे समजताच प्रांत तडक तिकडे निघाले. खासदार स्वत: आदिवासीच होते. त्यांचं वक्तृत्त्व विशेष नव्हतं. त्यांनाच गावकरी गुंडाळून ठेवण्याची शक्यता अधिक होती. प्रांत तिथे पोचल्यावर खासदार त्यांना बाजूला घेऊन म्हणाले, “माझी माणसं गावात गेलीत लोकांना बोलावून आणायला. आपण थांबू इथेच.” प्रांत त्यांच्याभोवती जमा झालेल्या कोंडाळ्याकडे बघत म्हणाले, “मग ही जनता कुठली?” खासदार म्हणाले, “हे लोक म्हणतायत आम्ही शेजारच्या गावचे. या पंचायतीचे नाही.” प्रांतांना संताप आला. म्हणाले, “काय रे, लग्नातलं जेवायला चालते ना शेजारची पंचायत? मग स्मशानात जायला चालत नाही?” लोक चुप्प. हुंडुळा आय आय सी प्रांतांच्या कानाला लागत म्हणाला, “सर यात काही माणसं आहेत गावातली, पण ती हळूच मागून पुटपुटतायत की बघूया कोण घेतो बॉडी!” प्रांतांनी खासदारांना बाजूला घेतले आणि म्हणाले, “काय म्हणाली ही लोकं तुम्हाला?” खासदार म्हणाले, “काही नाही, त्या विधवेला थोडं अधिक कॉम्पेन्सेशन – पन्नास ऐवजी साठ हजार, आणि एखादी नोकरी.” प्रांत त्यांना म्हणाले, “सर, आम्ही सांभाळतो आता. आपण कष्ट घेतले त्याबद्दल थॅंक्स! गावातून कुणीही येणार नाही आपलं बोलणं ऐकून घ्यायला.” खासदारांनाही अंदाज आला होताच. लोकांवर दबाव टाकू शकत नाही हे पण त्यांच्या लक्षात आलं होतं. ते निघून गेले.
बॉडीचा दर्प सुटला होता. पोलीस नाकाला रुमाल बांधून उभे होते. प्रांतांनी मेडीकल ऑफिसरना फोन लावला आणि ताबडतोब एक सर्टिफिकीट बनवायला सांगीतले – शव डिकॉम्पोज होऊ लागलेले आहे, त्यामुळे यापुढे ते असेच ठेवणे हितकारक नाही.
कलेक्टरांचा फोन आला. “काय चाललंय अजित?”“मॅडम आम्ही बॉडी मॉर्गमध्ये हलवतोय. एस्पींशी बोलतो आणि फायनल करतो.”“गुड. ताबडतोब करा. मला तू आणि एस्पी एक तासाच्या आत इथे हवे आहात. रेल्वेची लोकं येऊन थांबलीत. तुमच्यासाठी मी टास्क फोर्स ची मीटिंग थांबवलीय. तहसीलदाराला चार्ज दे आणि सुट तिथून.”
*******
दुसऱ्या दिवशी संध्याकाळी सात वाजता जिल्ह्याच्या ठिकाणी शे पाचशे उदबत्त्यांच्या धुरामध्ये घासीरामच्या दुर्दैवी देहाला मोजक्या गावकऱ्यांनी पोलीसांच्या मदतीने मूठमाती दिली.
*******

गुरुवार, १५ जुलै, २०१०

कस्टोडियल डेथ -भाग १ (प्रांतांच्या गोष्टी - ३)

रात्री साडेआठ वाजता एस्डीपीओंचा प्रांतांना फोन आला.

“सर रारुआं थानारे जणे सुइसाइड अटेम्प्ट करिछि, मु सेआडे जाउछि. सरंक इन्फर्मेशनपाई जणाइली.” प्रांतांना चटकन काही लक्षात आले नाही. त्यांनी एवढंच विचारलं, जिवंत आहे का?

“हां सर. व्यस्त होअन्तु नाही. मु खबर देइ देबि. रहिली सर, नमस्कार.” एस्डीपीओंनी प्रांतांना अधिक संधी न देता फोन कट केला.

प्रांतांनी एस्पींना फोन लावला. फोन स्वीच ऑफ. प्रांतांना काही सुचेना. पहिलंच पोस्टिंग. जेमतेम सहा महिने झालेले. पोलीस कस्टडीत मृत्यु हे पोलीसांना भलतंच महाग पडणारं प्रकरण असतं हे त्यांना माहीत होतं. खरंतर तेवढंच माहीत होतं. कायद्याच्या आणि नियमांच्या पुस्तकात वाचून त्यांना तशी माहिती बरीच होती. पण प्रत्यक्षात अशी परिस्थिती आली तर काय करावे हे फक्त अनुभव नावाच्या पुस्तकातच वाचायला मिळत असल्यामुळे आणि हेच पुस्तक जवळ नसल्यामुळे प्रांत बेचैन झाले. एवढ्यात कलेक्टरांचा फोन आला.

“अजित, अरे एक प्रॉब्लेम झालाय. रारुआं ठाण्यात एकानं फास लाऊन घेतलाय.”

“हो मॅडम, आत्ताच समजलं. मी जाऊ काय तिथं?”

“नाही. तू जायची गरज नाही. पण सावध रहा. बातम्या घेत रहा. एस्पी राऊरकेला ला आय जीं कडे गेलेत. मला एकच काळजी आहे, हा माणूस मेला नाही पाहिजे. निदान हॉस्पीटलमध्ये आणेपर्यंत तरी जगला पाहिजे. तू असं कर, मेडीकल ऑफिसरशी बोल. किमान दोन डॉक्टर हजर हवेत जेंव्हा केंव्हा त्याला सबडिव्हिजन हॉस्पीटलमध्ये आणतील तेंव्हा. माणूस मेला तर हॉस्पीटलमध्ये आणि गावामध्ये फोर्स राहिला पाहिजे. दंगा होऊ शकतो.”

“काळजी करू नका मॅडम. मी बघतो. गरज वाटलीच तर तुमच्याशी बोलीनच.”

प्रांतांनी लगोलग मेडीकल ऑफिसरना फोन लावला आणि सगळे डॉक्टर जाग्यावर असल्याची खात्री करून घेतली. हेडक्वार्टर इन्स्पेक्टरला फोन करून दोन कॉन्स्टेबल दवाखान्यात पाठवून दिले. परत एस्डीपीओंना फोन लावला.

“सर मी इथं पोचलोय. त्याला आम्ही उखुंडाला प्रायमरी हेल्थ क्लिनिकमध्ये घेऊन चाललोय. मी परत लावतो तुम्हाला फोन.” एस्डीपीओंनी पुन्हा प्रांतांना काही संधी न देता फोन कट केला. प्रांत वैतागले. पण एस्डीपीओ कामात असेल, घाईत असेल अशी मनाची समजूत घातली.

रारुआं प्रांतांच्या हेडक्वार्टरपासून साधारण तीस किलोमीटरवर. म्हणजे पाऊण तास. उखुंडा रारुआंपासून पाच किमी. म्हणजे दहा मिनिटं. प्रांतांनी हिशेब केला. आत्ता नऊ वाजलेत. उखुंडातून निघायला साडेनऊ ते दहा वाजतील. म्हणजे इथे यायला कमीत कमी अकरा वाजणार. त्यांनी मेडीकल ऑफिसरला पुन्हा फोन लाऊन कल्पना दिली, की त्यावेळेत ड्यूटी शिफ्ट होणार असेल तर पुढचे डॉक्टर येईपर्यंत अगोदरचे डॉक्टर थांबले पाहिजेत. एवढा वेळ तो दुर्दैवी माणूस जिवंत राहणार का अशी शंका प्रांतांना वाटून गेली. त्यांनी परत एस्डीपीओंना फोन लावला. यावेळी त्यांना काही न विचारता प्रांत म्हणाले, “दासबाबू, तुम्ही त्याला उखुंडाला नेऊन पुन्हा एक तास कशाला वाया घालवताय? सरळ इकडे घेऊन या.”

“नाही सर. तुम्ही काळजी करू नका. मी आहे इथं.”

“तुम्ही डॉक्टर आहात का?”

“तसं नाही सर, आम्हाला त्याला जवळच्या दवाखान्यात लगेच नेलं असं दाखवणं भाग आहे.”

प्रांतांची ट्यूब पेटली. म्हणजे जीव वाचवणे हा मुद्दाच नाही; गाडी प्रोसीजरच्या रस्त्याला लागलेली आहे.

“कुठे मेला? कस्टडीत की उखुंडाला?” प्रांतांनी पॉइंट ब्लॅंक शूट केलं.

“सर आम्ही त्याला उखुंडाला लगेच हलवलं. तिथल्या डॉक्टरांनी सबडिव्हिजन हॉस्पीटलला हलवण्याचा सल्ला दिला. त्यानुसार आम्ही तिकडे घेऊन येणार. तिथे पोचल्यावर तो मरेल.”

पोलीसांच्या त्या प्रोफेशनल उत्तरानं प्रांत अचंबित झाले. आपली कातडी अशी टणक व्हायला किती दिवस लागतील असा एक विचार त्यांचा मनात चमकून गेला. प्रांत त्यांना इतकेच म्हणाले, जी काही प्रोसीजर असेल ती काळजीपूर्वक करा, गॅप ठेऊ नका. नंतर मी काहीच मदत करू शकणार नाही. प्रांतांनी कलेक्टरांना फोन लावला.

“मॅडम, तो मेलाय. एस्डीपीओ काही नीट सांगत नाहीये.”

“तो नाहीच सांगणार. कारण इन्क्वायरी तुलाच करायची आहे. असो. शक्य ती मदत आपण करायची आहे. लॉ ऍण्ड ऑर्डर आपल्यालाच सांभाळायची आहे.”

प्रांतांनी एस्पींना पुन्हा फोन लावला. ते रस्त्यात होते. सहा तासांचं अंतर होतं. रात्रभर प्रवास करून हा बाबा सकाळपर्यंत पोचला असता. एस्पी उत्तर प्रदेशातले होते. पण त्यांच्यात गुण शिवाजीच्या मावळ्यांचे होते. कुणालाही कल्पना न देता जिल्ह्यात कुठेही ते अकस्मात अवतीर्ण होत असत. यापूर्वी एका नक्षलग्रस्त भागात काम करून त्यांनी तिथे बर्‍याच शरणागती घडवून आणून चांगलं नाव कमावलं होतं. नक्षल्यांच्या हिट लिस्टवर होते. तरीही केवळ दोन साध्या वेषातल्या पीएसओंना सोबत घेऊन ते रात्री बेरात्री बिनदिव्याच्या गाडीतून फिरत असत. काही वेळा मोटरसायकलनेही आठ-दहाजणांचा गट करून फिरत असत. हा माणूस मध्यरात्रीदेखील इथं पोहोचू शकतो असं वाटून प्रांतांनी पीडब्ल्यूडी च्या आयबी मधली एकमेव ठीक खोली त्यांना फ्रेश व्हायला तयार ठेवली.

हॉस्पीटलमध्ये चक्कर मारावी का – प्रांतांना वाटलं. पण त्यांनी न जायचं ठरवलं. त्यांनी तहसीलदारांना सांगीतलं तिथं जाऊन थांबायला. त्यांनी स्वत: जाणं ठीक वाटलं नाही. नंतरची चौकशी बहुतेक त्यांनाच करावी लागणार होती. अशावेळी पोलीसांनी या प्रकरणात काहीतरी बनवाबनवी केली असलीच तर आपल्या तिथं हजर राहिल्यानं आपण त्यांना सामील आहोत असा आरोप होऊ शकतो. शिवाय रात्रीच्या वेळेत तसेच सकाळीदेखील इथं सबडिव्हिजनमध्ये काही गोंधळ होण्याची शक्यता फारच कमी होती. गोंधळ घालणार्‍यांना इथं येण्यापेक्षा जवळच्याच रारुआं ठाण्यात जाणं सोपं होतं.

रस्त्यातच गाडीमधून फोनाफोनी करून एस्पींनी फोर्स मोबिलाइज करुन रातोरात रारुआं ठाण्याला गढीचं रूप द्यायचा एक अयशस्वी प्रयत्न केला. राज्यामध्ये पोलीसांचे कमालीचे दयनीय संख्याबळ होते. त्यातही रारुआंसारख्या तुलनेनं शांत भागांमध्ये तर पोलीस ठाण्यांमध्ये दहापेक्षा कमी माणसं असत. कारकून, प्यून यांचा तर प्रश्नच नव्हता. यात तीन पाळ्या, आणि रजेवर जाणारी माणसं धरायची. म्हणजे कोणत्याही वेळी ठाण्यात दोन शिपाई असणार. यांनी चाळीस पन्नास गावांकडं बघणं अपेक्षित होतं. होमगार्ड गोळा करून खाकी कपड्यांचं अस्तित्त्व दाखवत राहणे आणि एखाद-दुसर्‍या बदमाशाला धाक बसण्यासाठी केसेस करणे एवढाच काय तो अशा पोलीस ठाण्यांचा उपयोग. लोक गरीब होते. अल्पसंतुष्ट होते. गुन्हेगारी नसल्यात जमा होती म्हणून इतके दिवस रेटून नेलं गेलं होतं. पण हळूहळू परिस्थिती बदलत होती. लोकांनी पोलीसांची ताकद जोखायला सुरुवात केली होती. कुठे गोंधळ झाला तर काठ्या बसत नाहीत, उलट समजावणीच केली जाते हे लोकांना कळून चुकले होते. त्यामुळे कुठेही परिस्थिती आजिबात हाताबाहेर जाऊ न देणे हीच प्रशासनाची पहिली कमांडमेंट होती. गेलीच तर ताकदीच्या अभावामुळे माघार घ्यावी लागणं निश्चित होतं. अशा परिस्थितीमध्ये उद्या रारुआंला गोंधळ झाला तर आपल्याला आणि तहसीलदाराला तिथं उभं राहून झटावं लागणार हे प्रांतांना ठाऊक होतं.

दरम्यान रात्री एका बॅचमेटशी फोनवर बोलताना प्रांतांनी ही गोष्ट त्याला सांगितली. हा बॅचमेट यापूर्वी आय पी एस मध्ये होता. तो एवढंच म्हणाला, ‘कस्टोडियल डेथची चौकशी करणार असशील तर, पोलीसांशी तुझे कितीही चांगले संबंध असले तरीही त्यांना मुद्दामहून वाचवण्याचा प्रयत्न आजिबात करू नकोस. तुझ्या करियरची वाट लागेल, काही गोष्टी लपवल्यास किंवा बदलल्यास तर.’

रात्री पावणेबाराच्या सुमाराला बॉडी सबडिव्हिजन हॉस्पीटलमध्ये आली. तहसीलदारांनी तसं प्रांतांना कळवलं. पहाटे तीनच्या सुमाराला एस्पी तिथं पोचले. हॉस्पीटलमध्ये जाऊन स्थिती पाहिली आणि प्रांतांना डिस्टर्ब न करता तसेच जिल्ह्याला निघून गेले.

दुसर्‍या दिवशी सकाळी सात साडेसात वाजता प्रांत हॉस्पीटलमध्ये गेले. तहसीलदारांना रारुआंला पाठवून दिलं. रेव्हेन्यू ऑफिसरना इन्क्वेस्ट करण्यासाठी डेप्यूट केलं. बीडीओ देखील एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट होते. त्यांना हॉस्पीटलसाठी नेमलेल्या फोर्ससोबत डेप्यूट केले. मेडीकल ऑफिसरांच्या चेंबरमध्ये जाऊन प्रांत बसले. प्रेसवाले गोळा झाले होते. व्हिडीओ कॅमेरे चालू होते. प्रांत ‘बाइट’ देत नाहीत हे माहीत असूनही चिकाटी न सोडता प्रश्नांची सरबत्ती चालूच होती. साडेनऊ वाजत आले तरी इन्क्वेस्ट सुरू होईना. आता केंव्हा इन्क्वेस्ट संपणार, मग केंव्हा पोस्टमार्टेम होणार, केंव्हा नातलग बॉडी ताब्यात घेणार…प्रांत बेचैन झाले. उशीर परवडणारा नव्हता. हॉस्पीटलमध्ये लोकांची गर्दी होऊ देणं योग्य नव्हतं. शिवाय ही कामं आटपेपर्यंत फोर्स इथे अडकून पडणार होता. उशीर होईल तसं टाउटर लोकांना नातलगांना भडकावणं शक्य होणार होतं. याच कारणासाठी एस्पीसुद्धा बेचैन झाले होते. एस्डीपीओ प्रांतांना म्हणत होते, “सर मयताचा कुणीतरी नातलग तर आला पाहिजे. त्याच्या मेव्हण्याला आम्ही रात्री घेऊन आलो होतो. आता बघतो तर पसार झालाय.” प्रांत सावध झाले. टाउटर मंडळींनी आपले काम सुरू केलेले दिसते. एस्डीपीओंना म्हणाले, “त्याच्या गावातलं कुणीही बघा. बाजूला घ्या आणि काम उरकून टाका. आजिबात वेळ घालवू नका. आणि तो मेव्हणासुद्धा इथेच चहा घ्यायला गेला असेल. शोधा त्याला.” एस्पी रारुआं ठाण्यात जाऊन बसले होते आणि प्रकरण लवकर संपवण्याच्या नादात होते. त्यांना हे समजताच एस्डीपीओला त्यांनी फोनवरून लाखोली वहायला सुरुवात केली.

दहा वाजता कसेबसे इन्क्वेस्ट सुरु झाले आणि प्रांत आपल्या कोर्टात येऊन बसले. तहसीलदार एव्हांना रारुआंला पोचले होते आणि प्रांतांना त्यांनी कल्पना दिली होती की सगळा गाव ठाण्याच्या समोर जमा झाला आहे. पोलीसांची एक जीप जमावाने दगडफेक करून फोडली आहे, आणि ड्रायव्हर व फौजदाराला जमावाने मारहाणही केलेली आहे. प्रांत एस्पींशी बोलले. एस्पी म्हणाले, “काळजीचं फार कारण नाही, मी इथे आता पुरेसा फोर्स गोळा केला आहे. दगडफेक करणारी माणसं पांगली आहेत. आम्ही केसेस बुक केल्या आहेत. फक्त इथे आता प्रोसीजर निस्तरायची आहे. ” म्हणजे घरातल्यांनी बॉडी ताब्यात घेतली पाहिजे. प्रांतांना आणि एस्पींना याच गोष्टीची चिंता होती. रस्त्यात अपघात झाला आणि माणूस मेला तर लोक नातेवाइकांना जवळ जाऊ देत नसत आणि पोलीस/ प्रशासन जोपर्यंत रेडक्रॉसमधून किंवा कसेही करून पाच-दहा हजार जोपर्यंत देत नाहीत तोपर्यंत शव रस्त्यातच पडून रहात असे. प्रांतांना लोकांच्या या पशुवत वागण्याची चीड येत असे आणि लोक असे रस्ता अडवून बसले तर नाईलाजाने पैसे तर देत, पण पुढे पुढे होऊन बाता मारणारांच्यावर केस बुक होईल हे पहात असत. प्रशासनाचा तसेच पोलीसांचा धाक कमी झाल्याची ही लक्षणे होती. गावपातळीवर नेतृत्व नसल्याचाही हा परिणाम होता. गर्दी जमा झाली की संपलं. कुणाचंच कसलंच नियंत्रण रहात नसे. काठ्या मारण्याची पण सोय नव्हती. इथे तर पैसे मागणार्‍यांच्या हातात चांगलेच कोलीत मिळाले होते. पोलीसांच्या ताब्यात असताना माणूस मेला होता. पोलीस अजूनच डिफेन्सिव्ह झालेले होते. काठ्या बसण्याची शक्यता आजिबातच नव्हती.

साडेअकराच्या सुमाराला एस्पींचा फोन आला.

“अजित, रेडक्रॉसमधून किती पैसे देऊ शकतोस?”

“मी पाच हजार. कलेक्टर दहा.”

“मग मी इथे दहा कबूल करू का?”

“हो सर. मी मॅडमशी बोलतो. लोक काय म्हणतायत?”

“लोक! अरे ते पन्नास लाख मागतायत!”

प्रांतांना हसू आवरले नाही. पन्नास लाख म्हणजे किती हे रारुआंतल्या किती जणांना ठाऊक असेल?


“मॅडम, आम्ही रेडक्रॉसमधून दहा हजार देतोय.”

“कशासाठी?”

“तिथं दंगा सुरू आहे. थोडं तातडीनं कॉम्पेन्सेशन दिलं तर वातावरण निवळेल.”

“अजित, वेडा आहेस काय? रेडक्रॉसला हातही लावायचा नाही. त्या माणसाला पोलीसांनी अटक केली होती. तो नशेत होता. त्यानं आत्महत्या केली आहे. त्याला कोण जबाबदार आहे हे अजून समजलेले नाही. कॉम्पेन्सेशन म्हणून रेडक्रॉसमधून मदत केली तर पोलीस जबाबदार आहेत हे आपण स्वीकारल्यासारखं होतं. एस्पी आहेत तिथं. त्यांच्याकडेही निरनिराळे फंड असतात. शिवाय तू तुझ्या कपॅसिटीत एनएफबीएस मधून त्याच्या पत्नीला दहा हजार देऊ शकतोस. शिवाय विधवा पेन्शन सुरू करू शकतोस. पण नो रेडक्रॉस. मेसेज बरोबर गेला पाहिजे. चुकुनही कॉम्पेन्सेशन हा शब्द वापरायचा नाही. समजलं?”


“सर, मी दहा हजार देऊ शकतो. पण लगेच नाही. थोडी प्रोसीजर आहे. रेडक्रॉसला परवानगी नाही.”

“हं. ठीक आहे. पैशाचा फार मोठा प्रश्न नाहीये. मी करीन ऍरेंज. हे वाढू नये एवढीच मला चिंता आहे.”

(क्रमश:)


गुरुवार, ८ जुलै, २०१०

अद्दल (प्रांतांच्या गोष्टी - २)


आज शनिवार म्हणजे तक्रार निवारणाचा दिवस. सरकारी इंग्रजीत ग्रिव्हन्स (रिड्रेसल) डे. जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांनी मिळून जनतेची गार्‍हाणी ऐकण्याचा दिवस. इतर दिवशी भेट होवो न होवो, आज कुणीही नाडलेला थेट कलेक्टर एस्पींना भेटू शकत असे. मुख्यमंत्री जातीने हे होत आहे की नाही याची तपासणी करत. ग्रिव्हन्स डे ला हजर राहिला नाही या एका कारणावरून एका एस्पीची बदली करून त्यांनी याचं गांभीर्य जाणवून दिलं होतं. त्यांच्या मते नक्षलवादाला शह देण्यासाठी हे अत्यंत महत्त्वपूर्ण पाऊल होते. बर्‍याच अंशी ते खरंही होतं. शिवाय प्रशासनावर पकड बसवण्याच्या दृष्टीनेही जिल्हाधिकार्‍यांसाठी हे फार उपयोगी साधन होते.

ठाकूरगढ च्या प्रांतांचा यावर फारसा विश्वास नव्हता. एकतर त्यांना हे दरबार भरवल्यासारखं ‘गरीबांच्या’ तक्रारी ऐकून त्यांचा ‘मसीहा’ असल्याचा देखावा करण्याची आजिबात हौस नव्हती. उलट तिटकाराच होता. दुसरं म्हणजे त्यांचं दार लोकांसाठी सदैव उघडं असे. प्रांतामधील वेगवेगळ्या कार्यालयांना आकस्मिक भेटी देणे हा त्यांचा आवडता छंद होता. गावपातळीवरच्या क्षुल्लक चौकशांनादेखील ते कधी कधी स्वत: जात. त्यानिमित्तानं त्यांना लोकमानस समजायला मदत होत असे. त्यांचा सेलफोन नंबर सगळ्या सरपंचांकडे होता. सुरुवातीला त्यांच्याकडे दर शनिवारी गर्दी होत असे. पण हळूहळू शनिवारी लोक येणं फार कमी झालं. एकतर केंव्हाही गेलं तरी चालायचं, दुसरं म्हणजे साध्या कागदावर तक्रार केली तरी त्या कागदाची दखल घेतली जायची. त्यामुळेच प्रांतामधल्या तक्रारी सहसा जिल्ह्यापर्यंत जात नसत. लोखंडाच्या खाणींमधल्या पैशांच्या व्यापातून उद्भवलेल्या आणि खोडसाळपणे होणार्‍या तक्रारी एवढ्याच काय त्या कलेक्टरांपर्यंत पोचत.

ग्रिव्हन्स संदर्भात कलेक्टरांचा फोन आल्यावर त्यामुळेच प्रांतांना आश्चर्य वाटले. अशी कोणती तक्रार आहे जी थेट तिथे गेली? ‘अजित, एका गावाचं नाव टिप,’ कलेक्टर म्हणत होत्या, ‘गुमरा.’ प्रांतांच्या क्षणार्धात लक्षात आलं. कलेक्टरांना थांबवीत प्रांत म्हणाले, ‘मॅडम, हे त्या गावातल्या कळापोखरीसंदर्भात आहे का?’ मॅडम म्हणाल्या, ‘हो, तो कुणी नारायण महंत गावकर्‍यांना पाणी घेऊ देत नाही त्याचा बंदोबस्त कर. गरज पडली तर ११० मध्ये त्याला आत टाक.’ प्रांतांना वाटलं मॅडम त्या तक्रारदारांसमोरच हे बोलत असाव्यात. ते म्हणाले, ‘मॅडम, जे लोक आपल्याकडे आलेत, ते लबाड आहेत. मला हे माहीत आहे. त्या नारायण महंतने सरकारी जमिनीवर पोखरी खणली आहे, त्याच्यावर हायकोर्टात प्रकरणही सुरू आहे. प्रश्न पाण्याचा नाही, तर नारायण त्या पोखरीत मासे वाढवून पैसे करतोय, त्याचा या लोकांना पोटशूळ उठला आहे. बीडीओ याची चौकशी करत आहेत, या लोकांना हे ठाऊक आहे. माझ्याकडेही येऊन या लोकांनी नाटक केलं आहे. त्यांनी तुमच्याकडे यायचं कारण नव्हतं.’ कलेक्टरांना प्रांतांची टिप्पणी आवडली नाही. त्या म्हणाल्या, ‘आपण फोनवर चर्चा करून हा प्रश्न सुटणार नाही. तू मला रिपोर्टही दिलेला नाहीस. हा प्रश्न मला सुटलेला पाहिजे.’ प्रांतांनी वाद न वाढवता ‘मॅम’ एवढंच म्हणून फोन ठेऊन दिला.

***************

दोन महिन्यांपूर्वी गुमरा गावातली दहा वीस मंडळी प्रांतांकडे ही तक्रार घेऊन आली होती. प्रांतांनी त्यांना नारायण महंतला घेऊन यायला सांगीतलं होतं. नारायणचं म्हणणं होतं की ही कळापोखरी त्याच्या आजोबांनी खणली होती आणि गेली साठ वर्षे त्यावर त्यांचा कब्जा असल्यामुळे ती सरकारी जागा त्यांच्या नावे व्हायला हवी. तशी केसही तहसील कोर्टात सुरू होती. शिवाय ग्रामपंचायतीच्या मार्फत या पोखरीचा लिलाव होऊ नये असा हायकोर्टाचा आदेशही होता. प्रांतांनी नारायणाला समज दिली होती की त्याची मालकी सिद्ध झालेली नाही, त्यामुळे तो कुणाला तिथे अटकाव करू शकणार नाही. त्याने ते मानलेही होते. त्यानंतर एकाच आठवड्याने प्रांतांना झुमपुरा बीडीओंचा फोन आला की काही लोकांनी गुमरा ग्रामपंचायतीला टाळं ठोकलं आहे. त्यांची मागणी आहे की कळापोखरीचा लिलाव व्हावा. पण ग्रामपंचायत तसे करत नाही. प्रांतांनी पोलीस पाठवले आणि टाळं फोडलं. दुसर्‍या दिवशी गुमरा गावच्या सरपंच प्रांतांना भेटायला आल्या. बाई आपल्या ‘सरपंच पती’ ला घेऊन आल्या होत्या. प्रांत सहसा सरपंच पतींना थारा देत नसत. पण या बाई बिचकत होत्या. घाबरल्या होत्या. पोखरीचा लिलाव झाला नाही तर तंगडं तोडू, ग्रामपंचायत उघडू देणार नाही अशा धमक्यांना भ्याल्या होत्या. प्रांतांनी त्यांच्याकडून तक्रार लिहवून घेतली आणि झुमपुरा फौजदाराला फोन करून याच तक्रारी आधारे एफायार नोंदवून घ्यायला सांगितलं. सरपंचांना दिलासा दिला आणि स्वत:च्या सहीचं एक पत्र लगेचच दिलं की हायकोर्टाच्या आदेशानुसार तसेच, माझ्याकडून जोपर्यंत चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत कळापोखरीचा लिलाव होणार नाही. तरी बाईंची भीति काही गेली नाही.

प्रांतांनी आजूबाजूला चौकशी करून खात्री करून घेतली की नारायण महंत पाण्यासाठी खरंच कुणाला अडवत नाहीये. गावातली काही मंडळी खोडसाळपणा करत आहेत असं प्रांतांना वाटलं. कदाचित नारायणासोबत भांडण असेल, किंवा गावात नेतागिरी करून पुढारपणाचे काही फायदे लाटायचे असतील. या किरकोळ भांडणात फार लक्ष घालायचं नाही असं प्रांतांनी ठरवलं. तेवढा त्यांच्याकडे वेळही नव्हता. पण पुन्हा पुढच्या आठवड्यात गुमरा ची मंडळी मोठ्या घोळक्यानं प्रांतांच्या ग्रिव्हन्स सेलमध्ये आली. यावेळी त्यांच्यासोबत बायकांची एक फळी होती. त्यातली एक म्हातारी बाई तर प्रांतांसमोर मटकन खालीच बसली आणि कपाळावर हात मारून रडू लागली. दुसर्‍या बायका म्हणू लागल्या, त्या नारायणानं या बाईला ती पोखरीवर आंघोळीला गेली होती तर मारलं. त्याला जोपर्यंत अटक होत नाही तोपर्यंत आम्ही इथेच बसणार! प्रांतांना किंचित काळजी वाटली. घेराव घालतात की काय? म्हणाले, तुम्ही इतके लोक संघटितपणे फिरता तक्रारी करत, तुम्हाला तो एकटा नारायण कसा काय मारू शकेल? तर लोक म्हणाले, ‘अग्यां, तो गुंड आहे’. प्रांत म्हणाले, ‘पंचायतीला टाळं कुणी ठोकलं, नारायणानं की तुम्ही लोकांनी?’ मग लोक बिचकले. ते आम्ही नव्हतो, गावकर्‍यांनी ठोकलं म्हणू लागले. आवाज चढवून प्रांत म्हणाले, ‘मला माहीत आहे हे धंदे कुणी केलेत ते. गरीब लोकं म्हणून गप्प बसलो होतो. अजून नाटकं केलीत तर आत्ताच इथंच तुम्हाला डांबतो.’ ही मात्रा लागू पडली. मग ‘नाही अग्यां, चौकशी करा, न्याय द्या’ अशा विनवण्या करत मंडळ पांगलं.

**************

या पार्श्वभूमीवर कलेक्टरांचा प्रांतांना फोन आला होता.

प्रांतांना गुमरा गावातल्या या लोकांचा संताप आला. प्रांतांकडे नाटकं चालली नाहीत तर ही माणसं जिल्हाधिकार्‍यांकडे गेली! कलेक्टरांचा इगो दुखावला होता कारण लोकांच्या नाटकाला आपण फसलो आणि लगोलग प्रांतांना फोन लावला हे त्यांना उमगल्यामुळेच त्या प्रांतांना कठोर बोलल्या. प्रांत स्वत:ही आय ए एस होते. त्यांनाही कलेक्टरांचा चढा आवाज सहन झाला नाही. गुमरातल्या या लबाड लोकांना अद्दल घडवायचं त्यांनी ठरवून टाकलं.

चारच दिवस मध्ये गेले. सकाळी प्रांत रेस ऑफिसमध्ये मतदार याद्यांमध्ये कितीजणांचे फोटो काढून झालेत ते बघत होते. झुमपुरा बीडीओंचा फोन आला. सर गुमरा पंचायतीला पुन्हा लोकांनी टाळं ठोकलंय. प्रांतांच्या तळपायाची आग मस्तकात गेली. बीडीओंना ओरडून म्हणाले, ‘मला काय फोन करत बसलाय? ताबडतोब त्या गावात जावा आणि कुलूप फोडा. मी आलोच तिथं. आज जे कुणी तिथं असेल त्याला अटकच करून टाकतो.’ फोन ठेऊन प्रांतांनी डोळे बंद केले. संतापून चालणार नव्हतं. अद्दल घडवण्याची नामी संधी चालून आली होती. पण याक्षणी त्या गावातलं वातावरण तापलेलं असणार. बायकांची मोठी फौज पदर खोचून उभी असणार. शिवाय स्वत:च्याच गावात दंगा करत असल्यामुळे लोक ऐकणारही नाहीत. प्रांतांनी फौजदाराला फोन लावला. म्हणाले मी गुमरा गावात चाललोय. या तिथं. फौजदारांनी विनंती केली, सर एक अपघात झालाय, डेड बॉडी दवाखान्यात हलवायची आहे, माणसं पाठवून दिली गावात तर चालेल का? प्रांत म्हणाले ठीक आहे. फौजदार शहाणा होता. त्यानं डीवायएस्पीला सांगितलं. डीवायएस्पींना वाटलं हा नवीन आय ए एस अधिकारी रागाच्या भरात गावात जायचा आणि काहीतरी भलतंच होऊन बसायचं. लोकांनी याच्या अंगाला हात लावला तर एस्पी आपलीच चामडी सोलून काढायचे. यानं कुणावर हात उगारला तर गाव गप्प बसणार नाही. डोक्याला तापच आहे. डीवायएस्पी घाईघाईने प्रांतांच्या रेस ऑफिसवर आले. म्हणाले, सर आम्ही फोर्स जमवतोय. आम्ही जातो तिथं. तुम्ही कशाला त्रास घेताय? प्रांतांना हसू आले. म्हणाले, काळजी करू नका. मी सांभाळतो. डीवायएस्पी तरी म्हणाले, सर मी फोन करेपर्यंत तुम्ही ऑफिस सोडू नका. फोर्स जमा झाला की कळवतो.

प्रांतांनी दहा मिनिटं वाट पाहिली. त्यानंतर फोर्सची वाट बघण्यात वेळ न दवडता पीएसओ ला सोबत घेऊन गुमराकडे निघाले. गाव हायवेपासून थोडं म्हणजे पाच किमी आत होतं. रस्त्यात असतानाच सप्लाय इन्स्पेक्टरचा फोन आला, सर गुमरा गावात दोन रुपये किलो तांदळाचं वाटप सुरू होतं, ते गाववाल्यांनी बंद केलंय. इथं फार लोक जमा झालेत. प्रांत म्हणाले र्‍हावा तिथंच. आलोच.

क्षणभर प्रांतांना वाटलं थांबावं इथंच वाटेत. पोलीस जाऊ देत पुढे. न जाणो तिथं काय परिस्थिती असेल. दगडफेक होईल का, आपल्याला परतावे लागेल का…पण गाडी पुढे जातच राहिली. प्रांतांना आतून कुठेतरी वाटत होतं की हा गोंधळ घालणारे लोक खोटे आहेत, त्यांचा आपल्यापुढे टिकाव लागणार नाही. आपण एकटे पुरे आहोत.

प्रांतांना गावात पोचतानाच रस्त्यात गर्दी दिसली. त्यांनी ड्रायव्हरला आदेश दिला, वाटेत न थांबता थेट ग्रामपंचायतीसमोर थांबायचं. गर्दीच्या मधोमध गाडी थांबली. पीएसओ ची वाट न बघता प्रांत उतरले. बीडीओ सामोरे आले. प्रांतांनी सरपंच आणि ग्रामसेवकाला पाचारले. त्यांना चढ्या आवाजात म्हणाले, कुलुप फोडा. पीएसओने रस्ता करून दिला. ऑफिस उघडून प्रांत गर्दीत कुणाशीही न बोलता सरळ आत शिरले आणि सरपंचांच्या खुर्चीत जाऊन बसले. पीएसओ दारात उभा राहिला. प्रांत म्हणाले, ज्या लोकांना तांदूळ वाटप बंद करायचंय त्यांना बोलवा. दाराजवळ गर्दी जमा झाली. प्रांत म्हणाले, हे माझं कोर्ट आहे, तमाशा नाही. सगळ्या लोकांना पंचायतीबाहेर काढा. फक्त दोघेजण माझ्यासमोर उभे राहतील. याचा तत्काळ परिणाम झाला. ग्रामसेवक आणि पीएसओ अशा दोघांनीच सगळ्या लोकांना बाहेर हाकलले. लोकही गेले. प्रांत मनातून रिलॅक्स झाले. चला अर्धं काम झालं. आता फक्त नेतेमंडळींची झडती! तोपर्यंत डीवायएस्पी फोर्स घेऊन पोचले. प्रांत त्यांना म्हणाले, या इथं बसा. फोर्स बाहेरच ठेवा. गरज नाही. पण आलेच आहेत तर करू उभे म्हणत डीवायएस्पींनी पोलीस पंचायतीच्या आवारात उभे केले.

त्यानंतर प्रांतांनी टाळं ठोकणार्‍यांची अशी झडती घेतली की बिचार्‍यांनी हात जोडून सरपंच बाईंची माफी मागितली आणि परत असं करणार नाही असं सर्वांसमक्ष कबूल केलं. प्रांतांनी त्यांनाच उभं करून त्यांच्याकडूनच तांदूळ वाटप करवलं. सरपंच बाई लाजून तोंडाला पदर लाऊन हसत होत्या. या प्रकरणात कलेक्टरांकडे पुन्हा जाणार नाही असंही प्रांतांनी वदवून घेतलं. अडीच तीन तासांचं हे नाटक संपवून प्रांत तसेच पुढे मतदार याद्यांमधल्या फोटोंचं काम बघायला नारदपूरकडे रवाना झाले.

पण अजून मंडळींना अद्दल घडली नव्हती. उठसूठ ग्रामपंचायतीला टाळं ठोकणं, रस्ता अडवून बसणं असल्या माकडचेष्टांना आळा घालणं आवश्यक होतं. आता या लोकांची त्यांच्याच गावात लाज काढली असली तरी पुन्हा लिलावाच्या वेळी असला गोंधळ प्रांतांना नको होता. आपल्या खोडकर मुलाला फार दंगा करायला लागला की प्रांत थोडावेळ बाथरूममध्ये कोंडत असत. तसं काहीतरी या मंडळींच्या बाबत करणं गरजेचं होतं. यांना अटक करण्याची किंवा झोडपण्याची गरज नव्हती, तसं करणं परवडणारंही नव्हतं. प्रांत विचारमग्न झाले. दोनच मिनिटांनी त्यांनी डीवायएस्पीला फोन लावला.

**********

जिल्ह्याच्या ठिकाणची मीटिंग संपायला दुपारचे तीन वाजले. पेशकाराचा फोन आला, सर गुमरा गावची १०७ ची नोटीस दिलेली लोकं आलीत. जाऊ का विचारतायत. प्रांत म्हणाले, ‘सगळे आलेत ना? केंव्हा आलेत?’ ‘हो सर, ३२ जण आलेत. सकाळी दहा वाजता आलेत.’ ‘छान’, प्रांत म्हणाले, ‘कोर्टाची नोटीस आहे म्हणावं ती. जायचं नाही. रात्र झाली तरी सुनावणी होईल. थांबायला सांगा.’ अशा कमीत कमी दहा तारखा पडणार होत्या. दहा वेळा या लबाडांना खेटे घालावे लागणार होते. पदरमोड करून दिवस वाया घालवून वकीलांची भर करावी लागणार होती. आणि घरात बायकांच्या शिव्या खाव्या लागणार होत्या, काय गरज होती नेतेगिरी करायची?

आता आसपासच्या दहा गावांमध्ये तरी चार पाच महीने शांतता राहणार होती.