गुरुवार, २ डिसेंबर, २०१०

स्मशानानुभव - दोन

दोन

साधना करण्यासाठी साधक जेंव्हा जेंव्हा स्मशानात पाय ठेवील तेंव्हा तेंव्हा मी स्वत: त्याच्यासोबत तिथे असेन.

गुरुंनी हे अनेक वेळा बोलून दाखवलेले होते. मला त्यांच्या या आश्वासनाची गरज नव्हती. तारकब्रह्माच्या सर्वव्यापकत्त्वाची आणि अंतर्यामीत्त्वाची प्रचीती मी कैक वेळा स्वत: घेतलेली होती. तरीही, ‘व्याघ्रो मिथ्या, पलायनोपि मिथ्या’ या न्यायाने गुरुंनी स्मशानातील संभाव्य धोके कापालिक दीक्षेच्या वेळी समजाऊन दिले होते. काय काळजी घ्यायची तेही समजाऊन सांगितले होते. त्यातील हा सर्वात मोठा धोका होता – अविद्या तांत्रिकाशी सामना.

मी तांत्रिकच. पण विद्या तांत्रिक.

तंत्र म्हणजे तन आणि त्र. मनाला विस्तारून मुक्त होण्याचा मार्ग. याची बीजे सजीवांच्या रचनेतच दडलेली आहेत. उत्क्रांती होता होता मानव अशा टप्प्याला आला की त्याला हे गवसले. अपघाताने म्हणा, जाणीवपूर्वक अभ्यासाने म्हणा. पण त्याला दिशा नव्हती. शिस्त नव्हती. हजारो वर्षांपूर्वी – वेदांच्याही निर्मीतीपूर्वी आदिगुरू दक्षिणामूर्ती शंकराने, ज्याला आपण भगवान शिव मानतो त्याने, एका शिस्तीमध्ये तंत्रविद्या बांधली. दोन दिशांनी एकाच ध्येयापर्यंत जाणारी. विद्या तंत्र आणि अविद्या तंत्र. विद्या तंत्र पुढे अष्टांग योग आणि नंतर भक्तिमार्गामध्ये मिसळून गेले. तंत्राची ओळख प्रामुख्याने अविद्या तंत्रातूनच होत राहिली. बौद्ध, जैन तंत्र याचीच रूपे. स्मशानसाधना हे तंत्राचे अत्यावश्यक अंग अविद्या तंत्राशीच प्रामुख्याने जोडले जाऊ लागले. स्मशानात रात्रीच्या रात्री घालवणारा शंकर, शं म्हणजे कल्याण करणारा शंकर, आदिनिवासी अनार्यांचा गुरु शंकर पुढे आर्य संस्कृतीनेही स्वीकारला, ईश्वराचे स्थान देऊन. या इतिहासाला आधार केवळ माझ्या गुरुंचा शब्द. माझ्यासाठी प्रमाण असणारा.

अविद्या तंत्र फारच वेगळ्या वाटेने जाणारे. विद्या तंत्रात असलेल्या विधीनिषेधांना इथे स्थान नाही. रामकृष्णांचे समकालीन महान सिद्ध अविद्या तांत्रिक वामा खेपा तर देवीला अर्वाच्य शिव्या देत. उन्मत्तासारखे वागत. तोही सत्य जाणण्याचा एक मार्गच. सत्य अमुक एका प्रकारचेच असते, आणि ते अमुक अमुक मार्गानेच गवसते असे म्हणण्यात काहीच अर्थ नाही. त्यामुळे अविद्या तंत्राला मी नाक मुरडण्याचे कारण नाही. परंतु, या अविद्या तंत्राने भल्यापेक्षा बुरंच अधिक केलेलं आहे. हे तांत्रिक साधनेच्या मार्गाने जात असता अधिकाधिक शक्ति मिळवत जातात. एकामागोमाग एक सिद्धी अर्जत जातात. वामा खेपांसारखे अतिशय मोजके महासाधक या सिद्धी बाजूला टाकत पुढे पुढे जात राहतात. बाकीचे अडकतात एकेका सिद्धीच्या मोहात. वापरायला लागतात. वापरली तर वापरली. कशासाठी वापरतात, तर हेव्या-दाव्यांचे हिशेब पूर्ण करण्यासाठी. किरकोळ मानसिक शक्ती मिळताच निसर्गनियमांत ढवळाढवळ करायला लागतात आणि लोकांच्या आयुष्यात अजून दु:खं निर्माण करून सोडतात. पाच मकारांचा अर्थ अविद्या तांत्रिक शब्दश: घेतात. विद्या तांत्रिक त्यामागचा अर्थ शोधतात. साधनेसाठी, आणि एरवीही, पशुहत्येला विद्यातंत्रात स्थान नाही. वेदांमध्ये शब्दश: यज्ञ दिलेले आहेत; वेदांतामध्ये यज्ञाचा सांकेतिक अर्थ समजावला आहे, तशापैकी. विद्या तंत्राने, आणि नंतर योग मार्गाने, भक्तिमार्गाने, कायम सिद्धींच्या मोहापासून दूर रहायची शिकवण दिली आहे. समस्त मानवजातच नव्हे, तर अखिल प्राणिमात्रांच्या कल्याणाचा मार्ग दाखवला आहे. असो.

अविद्या तांत्रिक हा माझ्यासाठी धोका अशासाठी होता, की स्मशानसाधना करत असताना मला परास्त करून माझी तप:साधना हस्तगत करण्याचा विधी अविद्या तंत्रात आहे. कुणीही अविद्या तांत्रिक हे करणारच करणार. मी त्याच्याकडे दुर्लक्ष करीन, पण तो नाही करणार. माझे ध्येय आहे गुरुप्राप्ती. त्याचे ध्येय आहे अधिकाधिक शक्ति मिळवणे. कसे जमायचे!

त्या रात्री ती जी आरोळी ऐकू आली ती ऐकून माझ्यासारखा निर्भय तांत्रिकदेखील क्षणभर स्तब्ध झाला. माझा वाटाड्या मित्र मागच्या मागे पसार झाला होता. त्याच्या पायांत पळण्याची ताकत उरली होती ह्याचेच मला क्षणभर आश्चर्य वाटून गेले. दुसऱ्याच क्षणी मी पाऊल पुढे टाकले. पुन्हा तशीच धमकी. असला आवाज मी आजपर्यंत ऐकला नव्हता. त्या माणसाच्या आतड्यांत विलक्षण ताकत होती. नुसत्या आवाजाने त्याने एखाद्याला मारुन टाकले असते. तिसऱ्या वेळी त्याने अर्वाच्य शिव्या द्यायला सुरुवात केली. मी दाट अंधारात तसाच पुढे चाललो होतो. दूर कुठेतरी मला काहीतरी चमकताना दिसत होते. त्या दिशेने मी जाऊ लागलो. मला दुसरा रस्ताच नव्हता. आता मला तो तांत्रिक स्पष्ट धमकी देऊ लागला, परत फिरला नाहीस तर इथेच तुझी खांडोळी करून आख्खा खाऊन टाकीन! ही धमकी कदाचित तो खरी करू शकला असता. आचार्यांनी मला या तांत्रिक विधीविषयी सांगीतले होते.

गुरुंवर हवाला टाकून मी कीर्तन गुणगुणत पुढे चाललो. त्या तांत्रिकाची बसण्याची जागा मला अंदाजाने लक्षात आली होती. मी त्याच्या विरुद्ध दिशेने चाललो होतो. स्मशानाच्या दुसऱ्या टोकाला नदीकिनारा होता असे वाटाड्याने सांगितले होते. मला तिकडे जायचे होते. त्या चमकणाऱ्या ठिकाणी मी पोचलो. मला गुर्र गुर्र असे आवाज ऐकू येऊ लागले. एक जवळजवळ विझलेली चिता होती. त्या अंधुक प्रकाशात मला चमकणारे कैक डोळे दिसले. मी थबकलो. अनेक कुत्री की तरसे माझ्या रस्त्यात उभी होती. माझ्यावर डोळे रोखून. दहा-पंधरा-वीस-तीस किती होते कुणास ठाऊक. सगळीकडे इतका दाट अंधार होता की मला तिथूनच जाण्याखेरीज पर्याय नव्हता. मी गुरुमंत्र स्मरला आणि पाऊल पुढे टाकले. आश्चर्य म्हणजे त्यांची गुरगुर चालूच राहिली, पण अंगावर कुणीच आलं नाही. मी तो भाग ओलांडताच मात्र आश्चर्यकारकरीत्या त्यांचं भुंकणं एकदम वाढलं. पण त्यांनी माझा पाठलाग केला नाही.

नदीजवळ पोचलो. कपडे उतरवले. उपकरण हातात घेऊन थंडी जाईपर्यंत तांडव केले. यावेळेपर्यंत सगळे शांत झाले होते. हवी तशी स्मशानशांतता पसरली होती. शांत चित्ताने ध्यानस्थ झालो.

ध्यान संपवून आल्या रस्त्याने परत निघालो. आता मात्र मला आश्चर्याचा धक्का बसला. ती सर्व कुत्री माझ्यासमोर उभी ठाकली होती. एका लष्करी शिस्तीत. सर्वात पुढे एक. त्यामागे दोन. त्यामागे तीन. अशा बाणाच्या टोकाच्या आकारात. माझ्यावर कोणत्याही क्षणी हल्ला करण्याच्या तयारीत सज्ज.

त्या नेमक्या क्षणी गुरूंनी काय विचार माझ्या मनात उत्पन्न केला…मी झोळीतून बाळगत असलेला सुरा हातात घेतला आणि मनाशी म्हणालो हा पहिला कुत्रा तरी निश्चित मरणार! त्याच क्षणी कुत्र्यांची ती ऑर्डर विस्कटली. सगळी कुत्री वेदनेने विव्हल झाल्यासारखी भुंकत शेपूट पायांत घालून स्वत:भोवती गिरक्या घेऊ लागली. मी तिथून निघून आलो.

*****

पोस्ट स्क्रिप्ट

आचार्यांना हा अनुभव सांगितला. ते म्हणाले, गुरुंवरील अढळ भक्तीने तुला वाचवले. कुत्र्यांचे हे असे संघटन हा बऱ्यापैकी सामान्य अनुभव आहे. तांत्रिक त्यांच्या रक्षणासाठी आणि प्रसंगी हल्ला करण्यासाठी त्यांना वापरतात. कुत्र्यांशी लढण्याचा तुझा विचार पकडूनच तांत्रिक घाबरला, त्याने कच खाल्ली. एका जरी कुत्र्याला इजा झाली असती तरी त्याचे प्राण धोक्यात आले असते.

(इति.)