गुरुवार, २६ जुलै, २०१२

एका म्यानात दोन तलवारी


सकाळी नऊ वाजता चीफ डिस्ट्रिक्ट मेडीकल ऑफिसर डॉ कर यांचा फोन आला. कलेक्टरांनी उचलला. "गुड मॉर्निंग सर. मला लगेच भेटायचंय, येऊ का?" "गुडमॉर्निंग डॉक्टर. या. काय अर्जंट? " कलेक्टर उत्तरले. "सर मी चाललो तुमच्या जिल्ह्यातून. मी एकही क्षण इथे थांबणार नाही. माझ्यावर काय अ‍ॅक्शन घ्यायची ती घ्या. " उत्तेजित स्वरात डॉक्टर बोलले. कलेक्टर म्हणाले, "लगेच या डॉक्टर. बोलू आपण."
*********
कलेक्टरांना आश्चर्य वाटले. डॉ करांना जिल्ह्यात येऊन चारच महिने झाले होते. आल्यापासून त्यांनी कलेक्टरांना कसलीच तोशीस पडू दिली नव्हती. एनआरएचएमचा कोट्यवधी रुपयांचा व्याप सांभाळणे साधी बाब नव्हती. मेडीकल ऑफिसर्सच्या तीव्र कमतरतेमुळे जिल्ह्यात मेडीकल सेटपमध्ये कमालीचा सावळा गोंधळ माजला होता. देखरेखीच्या नावाने आनंद होता. वाड्यावस्त्यांवरुन बाळंतपणाला येणार्‍या बायाबापड्यांच्या हातात जननी सुरक्षा योजनेचे सगळे पैसे पडतील याची खात्री नव्हती. रेडक्रॉसमधून फुकट दिलेल्या अ‍ॅम्ब्युलन्सचा ड्रायव्हर पेशंटकडून पैसे घेणारच नाही याची शाश्वती नव्हती. जिल्ह्याभरातील करोडो रुपयांची बांधकामे निधी दिलेला असूनही खोळंबून पडली होती. अशा परिस्थितीत कलेक्टरांनी आरोग्य सचिवांच्या मागे लागून डॉ करांना या नक्षलग्रस्त जिल्ह्यात आणले होते. डॉ कर आपल्या सचोटीसाठी आणि ज्ञानासाठी ख्यात होते. रिटायरमेंटला दीडच वर्ष राहिल्यामुळे ते राजधानीपासून एवढ्या दूर यायला नाखूश होते. पण कलेक्टरांनी त्यांना संपूर्ण सहकार्य आणि संरक्षणाची हमी दिली होती. त्यांचे अधिकृत आवास अद्ययावत करुन दिले होते.
डॉक्टरांनीही आल्या आल्या व्यवस्थेचा ताबा घेतला होता. फाइलींना शिस्त लावली होती. वेळी अवेळी मुख्य दवाखान्यात अचानक चकरा मारुन नर्सेस वॉर्डबॉइज जागेवर आहेत का ते बघत. औषधांच्या दुकानांमध्ये जेनेरिक मेडीसिन्स मिळतायत याची खातरजमा करीत. पेशंट्सची हालहवाल विचारुन त्यांच्यासोबत आलेल्या मंडळीचीही विचारपूस करीत. दररोज तीन चार तास ते जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणी भेटी देण्यासाठी राखून ठेवीत. खेड्यापाड्यांतून फिरुन मोबाइल हेल्थ युनिट तिथे जाते आहे की नाही, मुख्यमंत्री सहायता निधीचा लाभ गरीब रुग्णांना मिळतो आहे की नाही ते पहात. कुपोषण रोखण्याच्या कार्यक्रमात अंगणवाडी सेविका, आशा दिदि आणि एएनएम यांच्यात ताळमेळ आहे की नाही ते तपासत. प्रायमरी हेल्थ सेंटर्सच्या नूतनीकरणासाठी आलेला पैसा मार्गी लागतो आहे की नाही त्याचा पाठपुरावा करीत. एवढेच करुन ते थांबले नव्हते. कलेक्टरांकडे ठाण मांडून त्यांनी जिल्हा मुख्य दवाखान्यासाठी एक अधिकचा मॅटर्निटी वॉर्ड, स्पेशल न्यू बॉर्न केअर युनिट, आय वॉर्ड, कँटीन, पेशंट्सच्या सोबत्यांसाठी डॉर्मेटरी, ब्लड बँकेसाठी ब्लड सेपरेशन युनिट असा तीनेक कोटींचा हिस्सा इंटिग्रेटेड अ‍ॅक्शन प्लॅनमधून मिळवला होता. कलेक्टरांनीही कौतुकाने त्यांनी न मागता हॉस्पिटलसाठी पाणी शुद्धीकरणासाठी एक आरओ प्लँट आणि पाणी तापवण्यासाठी सोलार पॅनेल मंजूर केले होते. एकदा जिल्ह्यात एका गंभीर अपघातात सतरा ठार आनी चाळीस जखमी झाले होते. सकाळी सहाला त्यांनी डॉक्टरांना फोन लावला तर ते स्पॉटवर हजरच होते. प्रांत आणि पोलीसांच्या बरोबरीने आपली टीम घेऊन जखमींवर प्रथमोपचार, अम्ब्युलन्स, शववाहिका इत्यादि सोपस्कार पार पाडीत होते. साधे श्रेय घेण्यासाठीही त्यांनी कलेक्टरांना डिस्टर्ब केले नव्हते.
असला हिरा व्यवस्थेत असू शकतो असे कलेक्टरांना यापूर्वी कधी वाटले नव्हते. डॉक्टर मात्र प्रत्येक गोष्टीचे श्रेय कलेक्टरांच्या नेतृत्वालाच द्यायचे. कलेक्टर त्यांच्या वयाचा, ज्ञानाचा, आणि चारित्र्याचा मान राखून त्यांना वडीलांच्या जागी मानायचे तर डॉक्टर कलेक्टरांना जिल्ह्याच्या पित्याच्या जागी मानून अतिशय आदराने वागायचे. या अशा मधुर संबंधांमध्ये मिठाचा खडा कुणी बरे टाकला असावा? काय घडले असावे? कलेक्टर विचारात पडले.
*****
दहाच मिनिटांत डॉक्टर आले. भावनावेगाने कापत्या आवाजात कलेक्टरांना म्हणाले, "आत्ता सकाळी मला कालीप्रसाद पाणिग्रही नावाच्या एका माणसाचा फोन आला. अतिशय गलिच्छ आणि अर्वाच्य भाषेत त्याने मला शिव्या घातल्या. आजवर माझा असा अपमान कुणीच केलेला नाही. या जिल्ह्यासाठी मी कायकाय केले नाही? माझी फॅमिली सोडून मी इथे येऊन राहिलो. सगळ्या प्रतिकूल परिस्थितीत आरोग्यसेवा सुरळीत चालू ठेवतोय. आणि कुणी एक माजी आमदार उठतो आणि मला अपशब्द बोलतो?" नकळत डॉक्टरांच्या डोळ्यांतून संतापाचे अश्रू वाहू लागले. कलेक्टर उठले. त्यांच्याजवळ जाऊन त्यांना हाताला धरुन उठवले आणि घराबाहेरील लॉनमध्ये घेऊन गेले. लाकडी घडीच्या खुर्च्यांवर बसत त्यांनी सुभाषला पाणी आणायला सांगितले आणि कॉफी मागवली. कलेक्टर काहीच बोलले नाहीत. थोडा वेळ जाऊ दिला. डॉक्टर म्हणाले, "सर या असल्या रिमोट आणि नक्षलग्रस्त जिल्ह्यामध्ये कोण येतंय? अर्धा जिल्हा अधिकार्‍यांवाचून रिकामा पडलाय. माझे वय असल्या दगदगी करण्याचे नाही. तरी तुम्ही बोलला म्हणून मी आलो. कधी तुम्हाला माझ्या कामात काही कुचराई दिसली? त्या कालीप्रसादला माहीत नसेल असल्या डोंगरांमधल्या वाड्यांवर मी या वयात जाऊन तिथे कुणी गरोदर बाया आहेत का, कुणी औषधांवाचून मरतंय का ते बघून आलोय. काय मोबदला मागतो मी? माझ्या वयाचा नसू देत, कामाचा तरी आदर रहावा? तोही नसेल रहात तर मी कशासाठी राबू? मी चाललो."
कलेक्टर म्हणाले,"बरोबर आहे तुमचं. पण कालीप्रसाद असं बोलणं शक्य नाही. तो रीझनेबल माणूस आहे. तुमची खात्री आहे तो नक्की कालीप्रसादच होता?"
"शंभर टक्के. तो स्वतःच म्हणाला. आणि त्याचा नंबर मी बिजयला दाखवला. त्यानेही कन्फर्म केलं."
"अस्सं. काय म्हणाला तो?"
" तो म्हणाला, की लक्ष्मीपूर सब डिव्हीजन हॉस्पीटलमध्ये ऑर्थोपेडीक सर्जन नाही, गायनॅकॉलॉजिस्ट नाही, पेशंट्सचे हाल होतायत, तुम्ही काय करताय? मी म्हणालो, डॉक्टर नाहीत हे मला माहीत आहे. सगळ्या जिल्ह्यातच नाहीत. तरी आम्ही तिथे आठवड्यातून तीन दिवस दोन डॉक्टरांची ड्यूटी लावलेलीच आहे. यापेक्षा वेगळे मी काय करु शकतो? तो म्हणे, ते मला माहीत नाही. इथे कायमस्वरुपी डॉक्टर दिले नाहीत तर मला इथे एजिटेशन करावे लागेल. मी म्हणालो, करा. तुमचा धंदाच आहे. मी नको म्हणलो तर थांबणार आहात का? यावर त्याने सरळ मला शिव्या घालायला सुरुवात केली. म्हणाला हाताला धरुन फरफटत जिल्ह्यातून हाकलून देईन. आणि बरंच काहीबाही बोलला."
"हं. ठीक आहे. मी बोलतो त्याच्याशी. विचारतो त्याला," कलेक्टर म्हणाले.
"हे बघा सर, तुम्ही त्याच्याशी बोला किंवा बोलू नका. मला ते सांगू नका. मी आत्ता चाललोय. तुम्हाला सांगायला आलोय एवढंच."
"बरं डॉक्टर. मी अडवणार नाही तुम्हाला. फक्त आजच्या ऐवजी उद्या जा. जमेल?"
डॉकटरंना हे थोडेसे अनपेक्षित असावे. ते म्हणाले, "सर माझ्या टीमने स्ट्राइक करायचा निर्णय घेतलाय. निषेध म्हणून."
कलेक्टर म्हणाले, "तुम्हाला जर असं वाटत असेल की स्ट्राइक केल्यानं तुमचा झाला अपमान धुऊन जाणार आहे, तर अवश्य करा. पण ज्या गरीब पेशंट्स साठी तुम्ही एवढ्या खस्ता खाता त्यांचाही जरा विचार करा."
"सर, तुम्ही मला ओळखत नाही काय? हा स्ट्राइक ही माझी तुम्हाला नाही, तर त्या कालीप्रसादला धमकी आहे. त्याच्या गाढवपणामुळे लोकांना त्रास होतो, हे मला दाखवायचे आहे."
"हं. ठीक आहे. तुम्ही हा स्ट्राइक उद्यापासून करा. मला एक दिवस वेळ द्या."
"हवा तेवढा वेळ घ्या सर. माझा निर्णय बदलणार नाही. तुम्हाला माहीत आहे, इथे यायच्या अगोदर माझ्या मागच्या पोस्टिंगमध्ये मी माझ्या घरी लोकांवर मोफत उपचार करायचो. बाकीच्या डॉक्टरांसारखा खाजगी प्रॅक्टिस नव्हतो करत. अजून लोक रोज विचारत असतात, डॉक्टर केंव्हा येणार म्हणून. सामळबाबू तर मला रिटायरमेंटनंतर पार्टीत या, तिकीट देतो म्हणून मागे लागलेत. फक्त तुमच्या शब्दाखातर मी इथे आलो."
"डॉक्टर, तुम्ही माझ्या वडीलांच्या जागी. पेशंटमध्ये तुम्ही तुमचा साई पाहता, मी माझ्या जिल्ह्यातील दीन माणसामध्ये माझा गुरु पाहतो. आपण दोघेही गुरुबंधू. माझ्याशब्दाखातर इथे आलात असं म्हणता. हा अहंकार तुम्हाला कसा काय डसला? कुणा एकाने अपमान काय केला, लगेच तुमच्या साईला विसरलात? ह्या दीनदुबळ्यांना असं वार्‍यावर सोडून निघालात? अहंकारासाठी? साईंनी विचारलं तर काय उत्तर देणार?"
डॉक्टर कलेक्टरांकडे पहात राहिले. काहीच बोलले नाहीत. कलेक्टरांनी वेगवेगळे विषय काढत तासभर बोलून डॉक्टरांना शांत केले.
डॉक्टर गेल्यावर कलेक्टरांनी एस्पीला फोन लावला. "विशाल, अरे हा कालीप्रसाद सीडीएमओंना वाकडंतिकडं बोललाय. ठीक आहे ना तो? असं ऐकलं नव्हतं त्याच्याबद्दल." "दारु प्यायला असेल. शहाणा नाहीच आहे तो." "नाही रे. सकाळी सकाळी त्याने फोन केलावता. जरा इन्स्पेक्टरकडून चौकशी कर काय भानगड आहे ते." "ठीक आहे. मी बघतो," एस्पी म्हणाले.
कलेक्टरांनी क्षणभर विचार केला, कालीबाबूंनाच फोन लावावा का? कालीबाबूंशी त्यांचे व्यवस्थित संबंध होते. कलेक्टर त्यांना पुरेपूर मान देत. विरोधी पक्षाचे माजी आमदार असले तरी अधून मधून त्यांना फोन करीत. कधी भेटायला आले तर बसवून चहा पाजून पंधरावीस मिनिटे खर्चत त्यांच्याकडून बातम्या काढून घेत. त्यांचे एखादे किरकोळ काम लगोलग करुन टाकीत त्यांचा विश्वास त्यांनी मिळवला होता. कालीबाबूंनीही कधी त्याचा गैरफायदा घेतला नव्हता.
थोडा विचार करुन कलेक्टरांनी त्यांच्या एका तहसीलदाराला फोन लावला. हा नोकरीत यायच्या अगोदर राजकारणात होता, आणि एक निवडणूकपण त्याने लढवली होती. फक्त चार हजार मतांनी हरला होता. आदिवासी होता. भरवशाचा आणि तल्लख बुद्धीचा माणूस. कालीप्रसाद त्याला मानत असे.
"हन्ताळबाबू, कालीप्रसादला जरा विचारा तर सीडीएमओंना काय बोलला ते. त्याला म्हणावं सीडीएमओ कुणाला सांगत नाहीत, पण मला एका हॉस्पिटल स्टाफकडून समजलंय, आणि कलेक्टरांच्या पण कानावर गेलं असेल बहुदा, अशा पद्धतीने बोलून बघा जरा."
"सर्टनली येस, सर." हन्ताळबाबू उडत्या पाखराची पिसे मोजणारातले होते. दहाच मिनिटांनी त्यांनी कॉल बॅक केला. म्हणाले, "सर मी बोललो कालीशी. तो खरंच अपशब्द बोललाय सीडीएमओंना. पण त्याला वाईट वाटतंय आणि समजत नाही काय करायचं ते. काळजी करु नका सर, तो येतोय की नाही बघा तुमच्याकडे."
अर्ध्या तासाने कालीप्रसादांचा कलेक्टरांना फोन आला. इकडचे तिकडचे बोलून म्हणाले, "तुम्हाला सीडीएमओ काही बोलले का?"
वेड पांघरत कलेक्टर म्हणाले, "नाही. कशाच्या संदर्भात? तुम्ही काही काम सांगीतलंय का त्यांना?"
"नाही. जरा घोटाळा झाला. आज सकाळी मी त्यांना फोन केला होता. तुम्हाला माहीत आहे, मी कधी कुठलया अधिकार्‍याला फोन करत नाही. अगदीच लोकांचं काही काम असेल तरच मी भेटतो किंवा बोलतो. तर मी या सीडीएमओंनापण ओळखत नाही. पण आज मी असाच सहज चक्कर मारायला लक्ष्मीपूर दवाखान्यात गेलो असताना तिथल्या अडचणींसंदर्भात मी त्यांना फोन लावला. ते माझं काही ऐकून न घेता मला म्हणाले काय करायचं ते करा, तुमचा धंदाच आहे. मग मला संताप आला. हा माझा धंदा नाही. लोकांसाठी मी जगतो. मी सरळ बोलत असताना त्यांना असं वाकड्यात बोलायची गरज नव्हती. मी रागाच्या भरात फार बोलून बसलो."
कलेक्टर म्हणाले, "झाली गोष्ट बरी नाही झाली कालीबाबू. या डॉक्टरांना मी मागे लागून आपल्या जिल्ह्यासाठी आणले होते. त्यांनी गेल्या चार महिन्यांत किती सुधारणा आणली तुम्हीच बघा.त्यांना सांभाळणं आपली सगळ्यांची जबाबदारी आहे. या नक्षल भागात एक तर डॉक्टर मिळत नाहीत आपल्याला. आपणच असं वागलो तर दोष कुणावर येईल सांगा बरं."
कालीबाबू नम्र आवाजात म्हणाले, "चूक झाली खरी. पण काय करावे म्हणता? तुमच्याकडे येतो संध्याकाळी."
"या," कलेक्टर सुटकेचा निश्वास सोडत म्हणाले. प्रॉब्लेम सुटल्यात जमा होता. त्यांनी डॉक्टरांना फोन लावला. "कालीप्रसाद संध्याकाळी माझ्याकडे येतोय. मी तुम्हाला बोलावीन, तेंव्हा या."
"तुम्ही त्याला बोलावलं असेल तर मी येणार नाही. मला अजून त्या माणसाचे तोंडही बघायचे नाही, आणि अजून काही वाकडं ऐकायची माझी तयारी नाही."
"डॉक्टर, माझ्यावर विश्वास आहे ना? तुम्ही या."
******
संध्याकाळी कलेक्टरांनी पीए ना सांगून ठेवले, कालीबाबू आल्यानंतर पंधरा मिनिटांनी सीडीएमओंना बोलवायचे. ठरल्याप्रमाणे कालीबाबू आले. कलेक्टरांनी प्रसन्न हसतमुखाने स्वागत केले. चहा मागवला. इकडच्या तिकडच्या गप्पा मारल्या. तोवर सीडीएमओ केबिनमध्ये आले. "या डॉक्टर! या, बसा. हे कालीबाबू. माजी आमदार. आणि माझा फार मोठा आधार. आपले टीम मेंबरच म्हणा ना. आणि कालीबाबू, हे आपले सीडीएमओ. एक्स्ट्राऑर्डीनरी ऑफिसर."
डॉक्टर कलेक्टरांपुढे, कालीबाबूंशेजारी बसले. टेबलकडे पहात. कालीबाबू अपराधी नजरेने एकदा कलेक्टरांकडे तर एकदा डॉक्टरांकडे पहात नम्र आवाजात बोलले, "चूक झाली माझी. वाईट बोललो आपल्याला." सीडीएमओंच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. चष्मा काढून टेबलवर ठेवत रुमालाने डोळे पुसत कापत्या आवाजात म्हणाले, "असला अपमान उभ्या आयुष्यात झाला नाही माझा. आपली ओळख तरी आहे का? काय केलंत?" कालीबाबू उठले आणि वाकून सरळ सीडीएमओंचे पाय धरले. सीडीएमओ पाय बाजूला सारत उठले आणि म्हणाले, "काय करता!" कालीबाबूंनी सीडीएमओंना मिठी मारली आणि म्हणाले, "माफ करा मला. अडाणी माणूस मी. असं होणार नाही परत."
दोघेही बसले. कलेक्टर कृतज्ञ स्वरात म्हणाले, "कालीबाबू तुमचं मन किती मोठं आहे ते आज मी पाहिलं. असे नेते असतील तर या जिल्ह्याला काळजी नाही. आणि डॉक्टर, आज तुम्हाला एक असा मित्र मिळालाय, जो अर्ध्या रात्री येऊन तुमची मदत करील."
"हण्ड्रेड पर्सेंट," कालीबाबू म्हणाले.
चहा घेऊन निरोप घेऊन सीडीएमओ निघून गेले. कालीबाबू कलेक्टरांना म्हणाले, "आज दुपारी मी घरी जेवायला गेलोच नाही. माझ्या धाकट्या भावाने जर मला विचारलं असतं, असं का बोललास, तर मी माझ्या धाकट्याला जाब द्यायचा काय? तुम्हीपण मला विचारलं असतंत तर काय राहिली असती माझी इज्जत?" कलेक्टरांनी उठून कालीप्रसादचा हात हातात घेतला आणि म्हणाले, "एवढा आत्मसन्मान असलेला मित्र मला मिळाला, भरुन पावलो," आणि कालीबाबूंना निरोप दिला.
जिल्हा चालवण्यासाठी कलेक्टर दोघांपैकी कुणालाही गमावू शकत नव्हते, आणि दोघांच्याही चारित्र्यामुळे एकाच म्यानात दोन तलवारी ठेवणे कलेक्टरांना शक्य झाले होते.