मंगळवार, १७ जून, २०१४

तू ता

'अरे तुरे' ला ओडियामध्ये 'तू ता' म्हणतात.
एका अतिरिक्त जिल्हाधिकार्यांनी सांगितलेला किस्सा. तीसेक वर्षांपूर्वी ते उत्तर ओरीसामध्ये तहसीलदार होते. एक दिवस त्यांच्या ऑफिसबाहेर एक संथाळ आदिवासी बसून होता. तहसीलदार आपले काम संपवून ऑफिसबाहेर आले तर हा दिसला.
यांनी विचारले काय रे बाबा काही काम आहे का? तो म्हणाला, "हो. तहसीलदार तूच का?"

हे नोकरीत नवीन आलेले. लोकांकडून मान घ्यायची सवय. यांना त्याच्या 'तू ता' ची मौज वाटली. ते म्हणाले, "हो. मीच. बोल काय काम आहे?"

"तुला वेळ आहे का? काही विचारायचं होतं."

"हो आहे. विचार."

"मला सांग, तहसीलदार होण्यासाठी तू काय शिकलास?"

"तहसीलदार होण्यासाठी काही वेगळं शिकावं लागत नाही. आहे तेच शिक्षण घ्यायचं. शाळा, कॉलेज पूर्ण करायचं. मग एक परीक्षा असते. ती पास झालं की तहसीलदार होता येतं. का रे?"

"असं बघ, मला माझ्या जमिनीचा पट्टा पाहिजे."

"मग त्यासाठी तुला तहसीलदार व्हायचंय का?"

"मला नाही. तुझा जो तलाठी आहे, त्यानं मला सहा महिने झालं झुलवत ठेवलंय. पहिल्यांदा त्यानं सहाशे रुपये घेतले. मग एक कोंबडी मागितली. आता म्हणतोय चारशे रुपये दे. मी म्हटलं राहू देत पट्टा. आत्ता जातो तहसीलदाराकडं आणि विचारतो त्याला कसा झालास तहसीलदार. मग माझ्या पोरालाच तहसीलदार करतो. आणि माझ्या जमिनीचा पट्टा मीच करून घेतो."

तहसीलदार स्तंभित झाले. त्यांनी दुसर्‍याच दिवशी त्याचे काम करवून घेतले.

[किस्सा ऐकून माझ्या मनात अनेक प्रतिक्रिया आल्या. त्यातच एक आठवण टाटांची. ताज हॉटेलची प्रेरणा त्यांना अशीच - सत्ताधार्यांच्या मग्रूरीमधून मिळाली होती. सत्तेच्या मग्रूरीची प्रतिक्रिया एक विधायक वळणाची. दुसरी तथाकथित नक्षलवादाची.]