साधारणपणे पंधरा सोळा वर्षांपूर्वी अविनाश धर्माधिकारींच्या तोंडून हे नाव पहिल्यांदा ऐकले होते. जुलिओ रिबेरो यांच्या कारकिर्दीमध्ये मुंबई (बॉम्बे) पोलीसांनी केलेले पहिले "एन्काउन्टर". मन्या सुर्वेचे. उत्सुकता होती. पण अधिक माहिती मिळाली नव्हती. रमा नाईक, अरुण गवळी, सदा पावले अशी आपल्या भागातील वाटावीत, गावाकडली माणसे वाटावीत अशी नावे असणारी माणसे मुंबई अंडरवल्डमध्ये काय करतायत असा एक भाबडा प्रश्न मनात येऊन जाण्याचे नाव काढीत नसे. हाजी मस्तान, वरदराजन मुदलियार, दाऊद इब्राहिम इत्यादि नावे जरा तरी 'एलियन' होती. तरी 'कासकर' त्या एलियनगिरीला छेद देत होतेच. हिंदी सिनेमांमध्ये गुन्हेगारीचे जे काही चित्रण केले गेलेले आहे ते त्या पटकथाकार आणि दिग्दर्शकांच्या अकलेची कीव करण्यापलीकडे काहीही साध्य करत नाही. त्यामुळे असल्या चित्रणातून या अंडरवल्डविषयी काहीही ज्ञान मिळणे केवळ दुरापास्त. त्यातल्या त्यात थोडी समज वाढवणारा एक चित्रपट फार पूर्वी येऊन गेला - सिंहासन. त्यात तत्कालीन सामाजिक परिस्थिती दाखवण्याच्या मिषाने स्मगलिंगविषयक एक उपकथानक येऊन जाते. स्मगलिंग हा अंडरवल्डचा एक आस्पेक्ट झाला. 'अर्धी मुंबई' हे युनिक फीचर्स ने प्रसिद्ध केलेले पुस्तक या विषयाची समज थोडी खोल करते. अर्थात हे गुन्हेगारीविषयक पुस्तक नव्हे. पण मुंबई समजत गेली की अंडरवल्ड आपोआप उलगडत जाते. अलीकडेच वाचनात आलेल्या "डोंगरी टू दुबई" या पुस्तकाने माझी बरीचशी उत्सुकता शमवली, आणि अजून बरेच कुतुहल चाळवले. ब्लॅक इकॉनॉमी कशी आपल्या रोजच्या जगण्याला भिडलेली आहे, आपण ब्लॅक इकॉनॉमीचे कळत नकळत कसे भाग आहोत, आणि ब्लॅक इकॉनॉमीचे इंजिन चालवणारे अंडरवल्डमधील मोहरे प्रत्यक्षात आपल्या जगण्याचे कसे सूत्रधार आहेत याच्या बर्याच हिंट्स या पुस्तकातून समोर येतात.
हाजी मस्तान, दाऊद, वरदराजन यांच्या आख्यायिकांवर/ दंतकथांवर आधारीत अगणित सिनेमे येऊन गेले. अमिताभचे करियर या आख्यायिकांनी घडवले म्हणा ना. दीवारमधील हमाली करणारा अमिताभ, ब्रॅण्डेड गॉगल्स घालून गगनचुंबी इमारतीकडे ऐटीत पहात 'ही इमारत मी माझ्या आईला भेट देणार आहे, कारण इथे माझ्या आईने डोक्यावर विटा वाहल्या आहेत' असे म्हणणारा अमिताभ, अमर अकबर अँथनी मधील स्मगलर्स, आदि असंख्य भूमीकांमधून दिग्दर्शक त्यांच्या कल्पनांमधील अंडरवल्डचा रोमान्स आपल्याला दाखवत राहिले. त्यांच्या कल्पनेतील मस्तान, दाऊद, वरदा आपल्याला दाखवत राहिले. अगणित सुमार दर्जाच्या चित्रपटांनी याच्या नकला पाडण्यात धन्यता मानली. तरी दयावान/ नायकन सारखे अपवाद वगळता कुणी खर्या 'डॉन' मंडळींचे चरित्रपट काढण्याचा प्रकार केला नव्हता. राम गोपाल वर्माच्या 'सत्या'मध्ये देखील कुठे खर्या गुन्हेगार मंडळींचा संदर्भ घेतलेला नव्हता. पहिल्यांदा अंडरवल्डचे पद्धतशीर चित्रण करण्याचा प्रयत्न राम गोपाल वर्माने 'कंपनी' मध्ये केला. फार चांगला प्रयत्न. त्या सिनेमातील मोहनलालने ज्यांची भूमीका साकारली होती त्या डी शिवानंदन या वरीष्ठ पोलीस अधिकार्यांना भेटण्याचा एकदा योग आला होता. त्यावेळी त्यांना याबाबत विचारले असता ते म्हणाले होते, की 'कंपनी' सिनेमा हा वास्तवाच्या खूपच जवळ जाणारा आहे. कंपनी हा सिनेमा अनेक कारणांसाठी इतर सर्व गुन्हेगारपटांहून सरस होता. त्याचे मुख्य कारण म्हणजे "धंदा" हा अंडरवल्डमधील अत्यंत महत्वाचा आणि (सर्वात महत्वाचा) घटक या सिनेमात व्यवस्थित अधोरेखीत केलेला होता; रस्त्यावरची मारामारी ही "कॉन्सिक्वेन्शियल" आहे, मूळ महत्वाचा आहे "धंदा" - ही बाब इतर गुन्हेगारपटांमध्ये दिसत नाही. अंडरवल्डच्या चित्रणामध्ये 'कंपनी'वरही मात करणारा सिनेमा म्हणजे 'ब्लॅक फ्रायडे' होय. ब्लॅक फ्रायडेची दोन बलस्थाने म्हणजे लेखक हुसेन झैदी, आणि दिग्दर्शक अनुराग कश्यप. अशी संधी खरेतर अजून दोन चित्रपटांना मिळाली होती, पण दिग्दर्शकामध्ये पुरेसा वकूब नसल्याने दोन्ही सिनेमे सुमार दर्जाचे बनून वाया गेले - शूट आउट अॅट लोखंडवाला, आणि शूट आउट अॅट वडाळा.
शूट आउट अॅट वडाळा हा एक सुमार दर्जाचा चित्रपट एका अतिशय उत्तम दर्जाच्या "डोंगरी टू दुबई" या झैदीने लिहिलेल्या पुस्तकातील एका प्रकरणावर आधारीत आहे. अनुराग कश्यपने याचे सोने केले असते असे पुस्तक वाचून आणि सिनेमा पाहून वाटते. मला इथे सिनेमाची समीक्षा करायची नाहीये, त्या लायकीचा सिनेमा नाहीच आहे मुळात. मन्या सुर्वे नावाच्या हाँटिंग कॅरॅक्टर वर मनात असंख्य विचार येऊ लागले म्हणून हे लिहावेसे वाटले. १९६९ साली मन्याला अटक झाली. तुरुंगवास झाला. ७२ साली तुरुंगातून तो पळून गेला. दहा वर्षे पोलीसांच्या हातावर तुरी देत मुंबईत आपली दहशत माजवत बँका लुटत, खंडण्या गोळा करत माजात फिरत राहिला आणि शेवटी १९८२ मध्ये पोलीसांच्या गोळ्यांनी संपला. दाऊद त्याच्या आधीही होता. त्याच्यासोबतही होता. त्याच्यानंतरही आहे. अजून किती काळ राहणार आहे कोण जाणे. दाऊद हा कंटेम्पररी इतिहासातील एक महत्वाचा घटक आहे. गुन्हेगारी, अंडरवल्ड, टेररिझम या सगळ्या कक्षा ओलांडून दाऊद पल्याड पोचला आहे. पाकिस्तानी अर्थव्यवस्थेचा तो आधार बनल्याचे दावे केले जात आहेत. अजूनही दाऊदचे भूत महत्वाच्या घोटाळ्यांभोवती फिरत असते. डोंगरी टू दुबई या पुस्तकामध्ये झैदीने या संदर्भातील अर्थकारण, राजकारण, गुन्हेगारी फार सुंदर रीतीने उलगडून दाखवली आहे. मन्या सुर्वे हा या पार्श्वभूमीवर अगदीच किरकोळ आणि नगण्य असा भिडू वाटतो. पण कॅरॅक्टर इंटरेस्टिंग. या माणसाने नेहेमी असा दावा केला, की मला गुन्हेगार व्हायचे नव्हते; मला सिस्टमने गुन्हेगार बनवले. मला माहीत नाही असा दावा किती गुंड करतात. पण या एका दाव्याभोवती कितीतरी सिनेमे बनलेले आहेत. मला चटकन आठवणारा (आणि आवडता) सिनेमा म्हणजे 'गर्दिश'. अनेक आहेत. असंख्य आहेत. बरेचसे असह्य आहेत. पण सगळ्यांचा सोर्स हा एकच - मन्या सुर्वे. त्याचे नाव घेऊन सिनेमा हा आत्ता पहिल्यांदाच निघाला. (बँडिट क्वीन फूलन देवी, पान सिंग तोमर हेही असाच दावा करायचे. पण ते मुंबईबाहेरचे.) पण मन्याचे पुढले "करियर" पाहिले तर त्याचा हा 'मजबूरी' वाला दावा पोकळ वाटतो.
मन्या म्हणजे मनोहर अर्जुन सुर्वे. हा बीए पास होता. डिस्टिंक्शन मध्ये. हॅडली चेस च्या कादंबर्या वाचायचा याला नाद. स्वत: गुन्हे करतानाही तो चेसच्या कादंबर्यांमध्ये दाखवल्याप्रमाणे प्लॅनिंग करायचा. त्याचे शरीर कमावलेले होते. तो सतत हत्यारे - पिस्तूल, सुरा - बाळगून तर असायचाच, पण हँड बॉम आणि अॅसिडही सोबत बाळगायचा. दहा वर्षे फरारच असल्यामुळे तो ही सावधगिरी कायम बाळगायचा. त्याचे पोलीसांशी साटेलोटे कधीच नव्हते. ६९ साली अटक, आणि ८२ साली एन्काउंटर एवढाच त्याचा पोलीसांशी प्रत्यक्ष सामना. हा अतिशय गरम डोक्याचा होता. कुणी "नाही" म्हटले की झाला याचा शत्रू. अगदी किचनपर्यंत घरोबा असलेल्या कॉलेजपासूनच्या मित्रालाही याने पैसे दिले नाहीत म्हणून त्याच्या पायावर गोळ्या झाडल्या होत्या. असल्या वृत्तीचा मन्या हा "मजबुरीने" गुन्हेगार झाला हा दावा पटत नाही. एकंदर मन्या सुर्वे हे एखाद्या सिनेमासाठी अत्यंत आकर्षक असे पात्र ठरते. एक सिनेमा अर्थातच वाया गेलेला आहे.
मन्याचे एन्काउंटर अटळ होते असे एकंदर त्याच्या बाबतीतला घटनाक्रम पाहून वाटते. रिबेरोंसारखे उज्वल प्रतिमा असणारे पोलीस कमिशनर असताना त्याचा पोलीसांनी खातमा केला - कायदा हातात घेणारे काम केले. हे थोडे कोडे वाटते. दाऊदचे असल्या बाबतीतले तरबेज डोके पाहता त्याने पोलीसांना सुपारी दिली असे म्हणावे तर रिबेरोंची प्रतिमा आड येते. आणि हे एन्काउंटर अटळ होते, नाइलाजाने पोलीसांना करावे लागले असे म्हणावे तर मन्यानंतर केल्या गेलेल्या साडेआठशे एन्काऊंटर्स आणि त्यात मेलेल्या तेराशे लोकांचे काय जस्टिफेकेशन राहते? ही सर्व एन्काउंटर्स नाइलाजाने केली गेलीत? न्यायव्यवस्था इर्रिलेव्हंट झाल्याचे आपण चक्क मान्य करत आहोत? की या बहाण्याने पोलीसही अंडरवल्ड या 'सिस्टेमिक बग' चाच भाग बनल्याचे आपल्याला पहावे लागत आहे?
मन्या सुर्वेच्या निमित्ताने हे विचार मनात आले.