त्या दिवशी अमावस्या होती. सलग तीन दिवस निर्जळी उपासाचा तिसरा दिवस. आजची स्मशानसाधना अतिशय महत्त्वाची. दीक्षा घेऊन दहा वर्षे झाली. अजून तरी गुरुकृपेने साधना कधी चुकलेली नव्हती. पण आज जरा बिकटच प्रसंग होता. गेले दोन महिने सतत फिरतीवर होतो. मला दिलेल्या अंचलातल्या गावांमध्ये शाळांची काय अवस्था आहे याचा सर्व्हे जवळजवळ पूर्ण होत आला होता. अमावस्या-पौर्णिमेला एखाद्या ठिकाणी तरी एखाद्या देवळात किंवा संघ बंधूकडे मुक्काम पडलेला असायचा. तिथले स्मशान जवळ करणे अवघड नसायचे. कुणीतरी संघ बंधू वाट दाखवायला मिळेच. संध्याकाळी आंघोळ करुन ताजेतवाने व्हायचे, कीर्तन करायचे, कुणी मंडळी भेटायला आली तर त्यांच्याशी गुरुचर्चा करायची, आणि अंधार पडल्यावर ध्यान लाऊन बसायचे. अर्ध्या रात्री साधनेची उपकरणे घेऊन स्मशानाची वाट चालू लागायची. पण त्या दिवशी मात्र रात्र होत आली तरी मी रेल्वेतच होतो. अनपेक्षितपणे वेळेचे सगळेच गणित सकाळपासून कोलमडले होते. रात्रीचे नऊ वाजत आले होते. कसली परीक्षा घेताय असे गुरुंना मनाशी विचारत मी सरळ आल्या स्टेशनला खाली उतरलो.
स्टेशन छोटेच होते. लखनौच्या जरा अलीकडले स्टेशन होते. त्या रात्रीची साधना याच ठिकाणी व्हायची होती असे मला वाटून गेले. स्मशानाचा पत्ता शोधण्याच्या कामाला लागलो. एका नवख्या दीक्षिताने एकदा विचारले होते, दादा, अनोळखी गावात स्मशान कसे शोधता? लोक संशय घेत नाहीत? मी त्याला हसून उत्तर दिले होते, तू हाच प्रश्न एखाद्या दारुड्याला विचार: अनोळखी गावात गुत्ता कसा शोधतोस!
अर्ध्या एक तासाने मला माझा वाटाड्या मिळाला. हो नाही करत मला रस्ता दाखवायला तो कसाबसा तयार झाला. मात्र त्याने मला सावधगिरीची सूचना दिली – त्या स्मशानात एक सिद्ध अविद्या तांत्रिक साधना करण्यासाठी अधूनमधून येत असे. गुरुंना माझी आज खरेच परीक्षा घ्यायची आहे असे मला वाटून गेले. भरीस भर म्हणून आजची अमावस्या सिद्धी प्राप्त करण्यासाठी सुयोग्य वेळ होती. माझे लर्नेड फ्रेंड आज नक्कीच स्मशानात असणार हे मी ताडले. माझ्या अनुत्सुक वाटाड्याला बोलण्यात गुंतवत माझा कार्यभाग उरकायच्या मागे लागलो.
गाव मागे पडले आणि अंधार दाट झाला. या प्रदेशातील स्पंदने मला स्पष्ट जाणवू लागली. कोणे एके काळी नक्कीच हे एक तंत्रपीठ असणार. माझा वाटाड्या मित्र मात्र पुरता भ्याला होता. दबल्या आवाजात त्याने मला सांगितले हे असेच सरळ पुढे गेले की स्मशान सुरु होते. पण बोलण्याच्या नादात आम्ही तिथवर पोचलोच होतो.
अचानक ती भयाण शांतता कापत एक आरोळी ऐकू आली – तिथेच थांब!
स्मशानात मी आज पहिल्यांदाच जात नव्हतो.
एअरफोर्सच्या ट्रेनिंग कॅम्पमध्ये असताना रुममेटला पहाटे एक तास आणि रात्री एक तास ध्यानस्थ बसलेला पहात असे. त्याला त्याविषयी विचारल्यावर तो मंद स्मित करुन एवढेच म्हणत असे, तुला बुद्धीविलास हवा आहे की अनुभव? अनुभव हवा असेल तर मला विचार. सांगतो. मी नंतर त्याच्या नादाला लागलो नव्हतो.
साहसाची आवड होती म्हणून तर एअरफोर्समध्ये दाखल झालो होतो. वडीलांचा स्थिरावलेला व्यापार सोडून देऊन. आईची नाराजी स्वीकारुन. पण इथे येऊन माझी साहसाची भूक भागण्याची चिन्हे दिसेनात. हे आयुष्य नि:संदेह साहसी होते. पण माझी भूक निराळी होती. रेजिमेंटेड लाइफ माझ्यासाठी नव्हते. चौकोनी शिस्तीच्या दिनक्रमात असणारी आखणी केलेली करमणूकदेखील मला कृत्रिम वाटू लागली होती. मांसाहार आणि मद्यपान यांना या विश्वात असलेले प्रतिष्ठेचे स्थान मला मी ऑड मॅन आउट असल्याची सतत जाणीव करुन देत असे. ही माझी मधुशाला नाही असे कायम वाटत असे. मानसोपचार करुन घ्यावेत की काय असं वाटू लागलं होतं. सगळीकडेच एक निरर्थकता दिसत होती. जर कधीतरी मरूनच जायचे आहे, तर जगायचं कशासाठी , हे जग, यातले सो कॉल्ड प्रॉब्लेम्स, सो कॉल्ड सुखं, सगळंच मला अनावश्यक वाटू लागलं होतं.
अशात एक दिवस माझा तोच रुममेट मला बंगळूरात भेटला. त्याला बाजूला घेऊन विचारले, अजून साधना करतोस का? माझ्या डोळ्यांत पहात त्याचे टिपिकल स्मितहास्य करत माझ्या डाव्या खांद्यावर त्याचा उजवा हात ठेवला आणि म्हणाला आज संध्याकाळी सहा वाजता, माझ्या क्वार्टरवर.
संध्याकाळी ठीक सहाच्या ठोक्याला मी त्याच्या घरी हजर झालो. तो मला बाल्कनीत घेऊन गेला. तिथे एक चाळीशीतले वाटणारे योगी अगोदरच येऊन बसलेले होते. भगवा कुर्ता, भगवी लुंगी, भगवा फेटा – शीख बांधतात तसा – रुबाबदार दाढी, आणि आपल्याला भेदून पाहताहेत असं वाटणारे लकाकते तेजस्वी डोळे. मला पाहताच खुर्चीतून उठले आणि दोन्ही हात जोडून हसतमुखाने ‘नमश्कार!’ असं म्हणाले. माझ्या नकळत मी अगदी तसाच नमस्कार त्यांना केला.
आजपर्यंत इतके आकर्षण मला कुणाविषयीच वाटले नव्हते. मी भरभरुन बोलायला सुरुवात केली. स्वामीजी शांतपणे मान डोलावत ऐकून घेत होते. मित्र शांत बसला होता. स्वामीजी मला म्हणाले, तुला हे सगळं काय चाललंय याचा अर्थ जाणून घ्यायचाय असं दिसतंय. मी हो म्हणालो. मला शिकवाल का? अवश्य. त्यांनी लगेच तयारी दाखवल्यानंतर मात्र मी अचानकच सावध झालो. मी म्हणालो, मला दीक्षा वगैरे घ्यायची नाही. मला फक्त तुमचं मार्गदर्शन हवंय. माझा गोंधळ कमी करायचाय. वाढवायचा नाहीय. आश्वासक हसत स्वामीजी म्हणाले, असं करुया, मी तुला एक मोटरबाइक देतो. चालवून बघ. राइड आवडली तर तुला जेट विमान देतो, कसं? काहीच नाही आवडलं तरी हरकत नाही. नुकसान कशातच नाही. तुझं आहे तेच आयुष्य चालू ठेव. तुझ्या मर्जीचा तू राजा आहेस. कसलाही डॉग्मा नाही. कसलीही बंधनं नाहीत. जी बाइक तुला देणार आहे, त्या बाइकचं मॅन्युअलदेखील मी तुला देणार आहे. ती कशी चालते, मेंटेनन्स कसा ठेवायचा, सगळं सांगणार आहे. आता तू ठरव केंव्हा घ्यायची ते!
पुढील तीन चार दिवस मी रोज स्वामीजींना भेटत राहिलो. चार चार तास आमच्या अखंड गप्पा चालत. युरोप आणि ऑस्ट्रेलियात ते बराच काळ राहिले होते. पूर्व भारत जवळजवळ सगळा पायाखाली घातला होता. इकॉनॉमीचा त्यांचा चांगलाच अभ्यास होता. प्रचलित अर्थव्यवस्थेत गरिबी कधीच हटणार नाही, आणि गरीब हा कायमच नाडला जाणार असे त्यांचे ठाम मत होते. अर्थकारण, राजकारण, समाजजीवन, आणि वैयक्तिक आयुष्याला आवश्यक असणारी आध्यात्मिक बैठक याची सांगड घालत ते विविध विषयांवर बोलत रहात. सकारण मीमांसा करुन ते मला आपला दृष्टीकोन पटवून देत. त्यांच्या आर्ग्युमेंट्स मध्ये कसलाच हट्ट नसे. स्वत:विषयी ते बोलत नसत. पण एकदा मी खूपच खोदल्यावर त्यांनी मला एवढंच सांगीतलं, आजुबाजूच्या काही प्रश्नांमुळे मला झोप येत नसे. ते सोडवायला म्हणून मी राजकारणात जायचा प्रयत्न केला. तो कचरा साफ होणं शक्य नाही असं मला लवकरच लक्षात आलं. सगळ्या गोष्टींचा पायाच चुकीचा आहे. मी पक्का नास्तिक होतो. पण घटना अशा घडत गेल्या की मी या आध्यात्मिक संघाच्या संपर्कात आलो आणि मला माझी मधुशाला मिळाल्याचा आनंद झाला. माझ्याच शंका, माझेच प्रश्न इथे उपस्थित केले जात होते. फरक एवढाच, की त्या अधिक व्यवस्थित मांडलेल्या होत्या, आणि सुटकेच्या आशेचा किरण दाखवलेला होता. मग मी इथलाच झालो. शारिरीक आणि मानसिक आरोग्यासाठी म्हणून गुरुंनी शिकवलेली बेसिक तंत्रसाधना स्वीकारली आणि गुरुकृपेने एकेक पापुद्रे उलगडत गेले. आज मी अवधूत आहे.
यासोबत आचार्यांनी त्यादिवशी त्यांच्या स्मशानसाधनेविषयी, गुरुंविषयी मला कैक गोष्टी सांगितल्या. त्यांच्या सामाजिक कार्याविषयी मला ओळख झालेली होतीच. त्यांच्या तांत्रिक साधनेच्या माहितीने या आयुष्यात काही अर्थ असू शकतो, आणि तो समजू शकतो असं मला अचानक वाटून गेलं. या अंत माहीत नसलेल्या रस्त्यानं जाण्यातलं साहस मला खुणावू लागलं.
मोटरबाइक घेण्याचा माझा निर्णय पक्का झाला. त्यात आध्यात्मिक ओढीचा भाग कमी, आणि साहसी जीवनशैलीच्या आकर्षणाचा भाग अधिक होता. दुसऱ्या दिवशी पहाटे आंघोळ करुन मी स्वामीजींपुढे उभा राहिलो. मी त्यांच्या पाया पडू लागताच त्यांनी मला अडवले. म्हणाले, मी गुरु नाही. मी आचार्य आहे. माझे आचरण पाहून तुला गुरु काय म्हणताहेत ते समजेल. गुरु एकच. तारकब्रह्म. सदाशिव. ज्याची अज्ञ लोक पिंडी बांधून पूजा करत बसतात. त्याने शिकवलेली साधना स्वत: करण्याऐवजी, मंत्रांचा अर्थ समजून घेण्याऐवजी पूजेचा शॉटकट मारतात. आज मी तुला खरी पूजा शिकवणार आहे. अगोदर तुला गोपनीयता आणि जनकल्याणाची शपथ घ्यावी लागेल. या मार्गात मिळणाऱ्या सिद्धी केवळ जनकल्याणासाठीच वापरशील अशी शपथ घ्यावी लागेल.
मला मौज वाटली. जणू काही मी मंत्रीपदाचीच शपथ घेत होतो!
होय. तू मंत्रीच आहेस आता. सदाशिवाच्या सरकारचा. माझे विचार पकडून आचार्यांनी पहिल्यांदाच त्यांच्या ऑकल्ट पॉवरची झलक दाखवली. विजेचा झटका बसल्याप्रमाणे मी डोळे मिटून ताठ बसलो आणि आचार्यांनी ध्यान शिकवायला सुरुवात केली. एक तासाने डोळे उघडले. काहीतरी वेगळं घडलेलं आहे असं उगाचंच वाटत होतं. आचार्य म्हणाले, आता गुरुदक्षिणेची वेळ झाली. गुरुदक्षिणा म्हणून पैसे किंवा तत्सम गोष्टी देण्याचा मूर्खपणा मी अर्थातच केला नाही. मी माझा हात गुरुंना अर्पण केला – मला चालवा म्हणून.
त्याच रात्री हट्टाने मी आचार्यांसोबत पहिल्यांदा स्मशानात गेलो.
मुळातच मी हट्टी स्वभावाचा आहे. एखादी गोष्ट हातात घेतली की तडीला न्यायची. मध्ये सोडून द्यायची नाही. हे आचार्य स्मशानात जातात तर मी का नाही, म्हणून हट्टाने गेलो. त्यांनी मला समजावायचा प्रयत्न केला – स्मशानसाधना कापालिकांसाठी आवश्यक आहे. तू सहजयोग करतोयस, आवश्यक नाही. शिवाय तिथे जाऊन येणारे अतिरिक्त वैराग्य सांभाळता आले नाही तर नैराश्याच्या गर्तेत अडकशील. मी अधिकच हट्टाला पेटलो. त्यारात्री स्मशानात एका विझत असलेल्या चितेसमोर आचार्यांनी आखून दिलेल्या मंडलात बसून ध्यान करताना मी देहभान विसरलो.
दुसऱ्याच दिवशी मी चंबुगबाळे आवरुन बंगालमधील संघाच्या हेडक्वार्टरकडे प्रयाण केले. मी आर्म्ड फोर्सेसमधून पळून गेलो असल्याने मला पोलीस वॉरंटशिवाय पकडू शकत होते. त्यामुळे सात वर्षे तरी मला खेड्यापाड्यांतूनच फिरावे लागणार होते. पण हे माझ्या पथ्यावरच पडले. साहसाची माझी हौस व्यवस्थित भागत होती. देश जवळून पहायला मिळत होता. विनोबांनी जसा अर्थव्यवस्थेचा अभ्यास स्वत: दरिद्री राहून, अनुभवून, केला होता, तसाच माझाही विनासायास होत होता. अध्यात्माची मुळं माझ्या देशात किती खोलवर रुजली आहेत, आणि भगव्या कपड्यांना किती आदर आहे हे अनुभवत होतो. याला नीट दिशा आणि नेतृत्त्व नसल्याने समाज कसा मूर्ख समजुती आणि अंधश्रद्धांच्या आहारी गेलेला आहे हे दिसत होतं. यातूनच माझी साधना प्रखर होत होती. गुरुंचे वचन होते – मिशनचे काम करत असाल तर वेगळ्या साधनेची आवश्यकता नाही. पण एव्हाना मला साधनेचे व्यसनच लागले होते. बसल्या बसल्या माझे मन आज्ञाचक्रात एकाग्र होई आणि थोड्याच वेळात एक सुन्न करणारा पण अतिशय सुखद असा आवाज मला डाव्या कानशिलाजवळून यायला लागे आणि मी त्यात बुडून जाई. माझ्या मणक्यांमधून मेंदूपर्यंत काय होत होते ते सांगता येणार नाही, पण मेंदूमध्ये सोमरसाचा एक थेंब जरी पडला तरी मला दिवसभर ती नशा बस्स होई. जेवायचे भान नसे. आजुबाजूला काय चालले आहे ते अर्धवट समजे, आणि चालतोय की तरंगतोय ते उमजत नसे. स्मरणशक्ती काहीच्या काही बनली होती. बारीक बारीक तपशील फोटो काढल्यासारखे डोळ्यांपुढे येत. मनात येणारे विचार अनपेक्षितपणे तास दोन तासात खरे व्हायला लागले होते. स्मशानसाधना करतेवेळी तर विशेष अनुभव येत. साधना संपवून स्मशानाबाहेर येई तेंव्हा असे वाटे जणू या जगात मी एकटाच सिंह आहे, आणि बाकी सगळ्या मेंढ्या माना टाकून झोपी गेलेल्या आहेत. संपूर्णपणे निर्भय झालो होतो. अभी.
लखनौजवळच्या त्या स्मशानात पोचलो तेंव्हा मी अभी होतो.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा