डीआयजी अजून पोहोचले नव्हते. रवीन्द्र आणि प्रांत कार्यक्रमाविषयी बोलू लागले. हा कार्यक्रम सीआरपीच्या सिव्हिक अॅक्शन प्लॅनचा एक भाग होता. यामध्ये नक्षलग्रस्त भागात, तसेच इतरत्र कार्यरत असणाऱ्या दलांना काही फंड दिलेला असतो. त्यातून त्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातल्या नागरी भागात लोककल्याणाची काही कामं करणं अपेक्षित असतं. फोर्सेस ना एक ‘चेहेरा’ देण्याचा एक प्रयत्न. रयतेची मनं जिंकणं हे कुठलंही युद्ध जिंकण्यासाठी अत्यावश्यक. या फण्डमधून कुणी ग्रामपंचायतींना टीव्ही देत असे, कुणी एखाद्या स्पोर्ट्स क्लबला खेळसामुग्री देत असे तर कुणी एखादा कम्युनिटी हॉल बांधायला मदत करत असे. रवीन्द्रनी थोडा वेगळा विचार केला होता. त्यांनी साठ मुले आणि साठ मुली निवडल्या. एक साधी परीक्षा घेऊन. हार्डकोर नक्षलग्रस्त गावांमधून. त्यांना व्होकेशनल ट्रेनिंग देण्यासाठी. या बॅचमध्ये ड्रायव्हिंग आणि टेलरिंगचे प्रशिक्षण मिळणार होते. टेलरिंगच्या प्रशिक्षणासोबत प्रत्येक मुलीला एकेके शिलाई मशीन पण भेट देण्यात येणार होते.
प्रांतांना ही कल्पना आवडली. त्यांनी विचारलं, हे ट्रेनिंग ठीक आहे. पण व्हॉट अबाउट एम्प्लॉयमेंट? रवीन्द्र क्षणभर गोंधळल्यासारखे वाटले. त्यांनी याचा विचार केलेला नसावा असं प्रांतांना वाटून गेलं. पण रवीन्द्र लगेच सावरून म्हणाले, फॉर दॅट आय मस्ट रिक्वेस्ट यू टू इंटरव्हीन! प्रांतांच्या मनात आलं, व्वा याला म्हणतात तयारीचा शिपाईगडी! प्रांतांनी त्यांना अन्य सरकारी योजनांची थोडक्यात कल्पना दिली आणि परिसरातील इंडस्ट्रीजसोबत या विषयावर मेमोरंडम ऑफ अंडरस्टॅण्डिंग करण्याची कल्पना मांडली. स्वयंरोजगाराचे मॉडेल. प्लस बिझिनेस गॅरंटी.
हे असले प्रयत्न केवळ सिंबॉलिकच असतात याविषयी प्रांतांच्या मनात संदेह नव्हता. याने नक्षलवादाच्या प्रसारावर आणि कॅडरभरतीवर कितपत परिणाम होणार होता कुणास ठाऊक. पण समथिंग इज ऑलवेज बेटर दॅन नथिंग!
********
कार्यक्रम पार पडला. डीआयजी निघून गेले. ऑपरेशन्स सुरु होते. बिझी होते. प्रांत कमांडंटबरोबर थांबले. आदिवासी तरुणांसोबत बोलण्यासाठी. मुली शिलाई मशीन मिळणार म्हणून हरखल्या होत्या. बऱ्याच जणींना शिवणकाम अगोदरपासूनच येत होतं. त्या तरुणाईशी बोलताना प्रांतांना जाणवलं की यांच्यात आणि अन्य खेडुत तरुणांच्यात काहीच फरक नाही. आदिवासी आदिवासी म्हणजे काय? हे तर निव्वळ ‘कार्ड’ दिसतंय. ही मुलंही शहरात यायला, पैसे कमवायला तेवढीच उत्सुक होती. टीव्ही गावागावात पोचला होता. सगळ्यांकडे मोबाइल फोन होते. अमुक एक गोष्ट या मुलांना माहीत नाही असं म्हणणं धाडसाचं होतं.
********
डीआयजींसोबत बोलणी आटोपून एस्पी जरा उशीरानेच पोचले. रवीन्द्रने मिठी मारून धीरेन्द्रचे स्वागत केले. धीरेन्द्र एकदम जिंदादिल माणूस. टिपिकल एलिट बॅकग्राउंडचा. डून बॉय. एक भाऊ बीजिंगमध्ये वकिलातीत. आयएफएस. दुसरा सिंगापूरमध्ये आयबीएम मध्ये फार वरच्या पदावर. सासरे पंचतारांकित हॉटेल चेनचे मालक. वडील निवृत्त आयपीएस. आजोबा माजी आमदार.
प्रांतांना पाहून धीरेन्द्र हसत हसत प्रचंड थकल्याचा अभिनय करत सोफ्यात कोसळला. प्रांतांना एसेमेस वर लेटेस्ट बातमी समजली होतीच. त्यांनी एस्पींचं अभिनंदन केलं. पहाटे पहाटे त्यांनी चार नक्षल मारले होते. तीन जण पकडले होते. विशेष म्हणजे हे तीनही जण आसामचे होते. धीरेन्द्र एन्काउंटर मॅन म्हणून एव्हाना ओळखला जाऊ लागला होता. इंटेलिजन्स मॅन, सरेण्डर मॅन या अन्य ‘कॅटेगरीज’ होत्या. प्रांतांच्या स्वरातलं कौतुक ऐकून धीरेन्द्र फ्रेश झाला.
सोफ्यात सावरुन बसत धीरेन्द्र म्हणाले, ‘अजित, हे सगळं ठीक आहे. पण अजून एक वाईट बातमी ऐकलीयस का? सुन्द्री कुंभारची?’
‘कोण सुन्द्री कुंभार? काय झालं तिचं?’
एस्पी म्हणाले, सहा वर्षांपूर्वी सध्याचे डीआयजी इथे एस्पी होते. त्यांना एके रात्री बातमी मिळाली: ट्वेंटीटू प्लॅटूनची एक नक्षल मुलगी एका दवाखान्यात गर्भपात करुन घ्यायला आलीय. यांनी ताबडतोब माणसे पाठवून तिला ताब्यात घेतले. त्यावेळी सरकारची नक्षल्यांच्या शरणागतीविषयी, त्यांच्या पुनर्वसनासाठी काही पॉलिसी नव्हती. शहामृग अॅप्रोच होता. आपले डीआयजी मोठा विचारी माणूस. त्यांनी या मुलीला, सुन्द्रीला, विचारलं, शरण ये, तुझे गुन्हे माफ करतो. ती कबूल झाली. बरीच माहिती दिली. डीआयजी शब्दाला जागले. त्यांनी तिला इथेच सेटल करण्यासाठी; परत गावी पाठवू शकत नव्हते; तिचं लग्न एका रिलक्टंट तरुणाशी लावून दिलं. तो असाच दुसऱ्या एका केसमध्ये अडकला होता. त्यालाही माफीचं प्रलोभन दाखवून यांचा पाट लावून दिला. त्या बाबाला एका कारखान्यात नोकरीही लावून दिली. काही दिवस ठीक चाललं. पुन्हा हा माणूस दारुच्या आहारी गेला. मी इथे एस्पी झालो त्यावेळी ही बाई माझ्याकडे रडत आली. म्हणाली, मला त्यावेळी एस्पींनी पन्नास हजार द्यायचं कबूल केलं होतं. मला ते पैसे द्या. हे असं काही एस्पींनी कबूल केलेलं नव्हतं हे मला माहीत होतं. पण ती आमच्याच सांगण्यावरुन शरण आलेली होती. मग मी माझ्या अखत्यारीत तिला होमगार्डमध्ये भरती करुन घेतलं. महिना साडेचार हजाराची तिची सोय झाली.
पण नक्षल्यांना तिची आठवण सहा वर्षांनी कशी काय झाली? प्रांत कुतुहलाने म्हणाले.
सांगतो. आता हा आमचा अंदाज आहे. महंमद मलिक नावाचा एक डेडली नक्षल काल रात्री आम्ही मारला. त्याची माहिती ह्या बाईनं आम्हाला दिली अशा संशयावरुन त्यांनी तिला मारलं. संशय अशासाठी, की गेले दोन महिने या दोघांचं गुटुर्घू चाललं होतं. हिचा नवरा सहा महिन्यांपूर्वीच दारु पिऊन मेला होता. त्यानं त्याची नोकरीही केंव्हाच सोडलेली होती. महंमदच्या मोबाइलवरुन हिला शेवटचा एसेमेस असाच गेला होता – लव्ह यू. कल शामको मिलेंगे. दोघेही मेले बिचारे. त्या बाईचं मला खरंच वाईट वाटलं. तिचा नक्षल्यांशी हे महंमद प्रकरण सोडलं तर काहीच संबंध नव्हता.
प्रांत अलिप्तपणे सगळं ऐकत होते. त्यांच्या डोळ्यांपुढे फक्त गळा चिरलेलं ते पाच वर्षांचं अश्राप बालक दिसत होतं. त्यांना दु:ख फक्त त्याचंच वाटत होतं.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा