एकदा इंद्राने सगळ्या सरकारी यंत्रणेला मेजवानी द्यायचे ठरवले. या पापी लोकांना अशी स्वर्गात पार्टी देण्यामागे इंद्राचा अंतस्थ हेतू बहुदा एखादा भूखंड लाटण्याचा असावा अशी दाट शंका बर्याच देवांना होती. पार्टीत इंद्र कुणा कुणाला कशी वागणूक देतो यावर बर्याच जणांचे लक्ष होते. संध्याकाळी सात पासून पाहुणे यायला सुरुवात झाली. स्वर्गीय संगीताच्या तालावर अप्सरा नृत्य करु लागल्या. त्रिभुवनातील उत्तमोत्तम आणि प्राचीनतम मद्यांचे चषक किणकिणत पाहुण्यांमधून फिरू लागले. इंद्राने विशेष लक्ष असे अजूनपर्यंत तरी कुणाकडेच दिले नव्हते.
आयबी प्रमुख वरुणाकडे काही उत्सुक देव मंडळी काही बातमी लागते काय या अंदाजात आजूबाजूला घोटाळत होती. वरुणाने त्यांना एक टिप दिली - बाकी सगळी खाती आली, पण अजून महसूल खात्यातील कुणीही आलेलं नाहीये! इंद्राकडे आता सगळ्यांच्या नजरा अजूनच संशयाने वळल्या.
ठीक आठ वाजता मुख्यमंत्री दाराशी हजर झाले. इंद्राने बसल्या जागेहून त्यांच्याकडे एक स्मितहास्य फेकले. हे सगळ्यांनी टिपले. इंद्राने पहिल्यांदाच कुणाचीतरी आल्या आल्या दखल घेतली होती.
त्यानंतर आलेल्या महसूल मंत्र्यांनाही इंद्राने तसेच स्मितहास्य दिले. विभागीय आयुक्त आणि महसूल सचिव एकत्रच आले. इंद्राने हातातील चषक उंचावून त्यांचे स्वागत केले. कलेक्टर आले. इंद्र उठून उभा राहिला, आणि "यावे, यावे" असे स्वागत करता झाला.
समस्त देव मंडळी स्तब्ध होऊन इंद्रामध्ये पडत जाणारा फरक पहात होती. इंद्रावर कितीही मद्याचा अंमल होणे शक्य नाही हे माहीत असल्यामुळे त्यांचा अचंबा वाढतच होता. कलेक्टरांच्या मागोमाग प्रांत आपल्या तहसीलदारांचा ताफा घेऊन आले. इंद्राने यावेळी दोन्ही हात वर करून त्यांचे स्वागत केले आणि चित्रगुप्ताला त्यांना एस्कॉर्ट करून घेऊन यायला सांगितले.
देवांची बोटे तोंडात जात होतीच, तोवर त्यांनी पाहिले, की इंद्र लगबगीने आपला चषक बाजूला ठेऊन, आपले लाल रेशमी उत्तरीय सावरीत दरवाज्याकडे निघाला आहे. इंद्र घाईघाईने दरवाजापर्यंत पोहोचला, आणि एका पांढर्या दाढीचे खुंट वाढलेल्या, मळकट पांढर्या रंगाचा लूज फुलशर्ट घातलेल्या आणि किंचित पोक आलेल्या एका मध्यमवयीन आणि मध्यमवर्गीय दिसणार्या इसमाला हाताला अदबीने धरून रेड कारपेटवरून चालवत आणू लागला.
आपल्या आसनापर्यंत त्या अतिविशिष्ट व्यक्तीला इंद्राने आणले, आणि घोषणा केली, लेडिज अॅण्ड जंट्लमेन ऑफ दि हेवन अॅण्ड दि अर्थ, गिव्ह अ बिग हॅण्ड फॉर द मोस्ट सेलेब्रेटेड गेस्ट ऑफ टुडेज पार्टी -
दि तलाठी!
मस्त!
उत्तर द्याहटवाबाकी लोक येतील आणि जातील ... तलाठ्याची बडदास्त ठेवली पाहिजे बाबा - वेळोवेळी पाय धरायला लागणार आहेत त्याचे :)