जिल्हाधिकारी म्हणून बढती झाल्याची ऑर्डर मिळाल्यापासून प्रांतांना उसंत नव्हती. इस्पातनगरमध्ये अवघे सहा महिने अतिरिक्त जिल्हाधिकारी या नात्याने काम केल्यानंतर इतक्या लवकर ही बढती अनपेक्षित होती. हातात घेतलेली अनेक कामे अचानक अर्ध्यावर सोडून दुसऱ्या जिल्ह्यात जायचे प्रांतांच्या जिवावर आले होते. त्या नादात बढतीचा धड आनंदही घेता येत नव्हता. नियोजित कामांचे नीट टिपण काढून नवीन एडीएमसाठी ठेवायचे होते. अजून नवीन एडीएमची ऑर्डर निघाली नव्हती. तशातच या जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांचीही बदली झाली होती. तेंव्हा नवीन जिल्हाधिकाऱ्यांसाठी तरी तपशीलवार लेखाजोखा लिहून ठेवणे आवश्यक होते. सर्वच अधिकारी असे करणे आवश्यक समजत नसत. पण प्रांतांचा जीव इथे अडकला होता. तो नीट सोडवून घेण्यासाठी ही जबाबदारी पार पाडणे गरजेचे होते.
अनेक निरोप समारंभांना प्रांतांनी निग्रहाने ‘नाही’ म्हटले होते. वेळच नव्हता. शेवटच्या क्षणापर्यंत फाइली समोर येत होत्या. नवीन एडीएमना विषय समजेपर्यंत धीर नसणारी मंडळी कुठून कुठून फाइली उकरून काढून आणत होती. या सर्वांना ‘नाही’ म्हणणे सोपे होते, पण इथेही प्रांतांमधल्या माणुसकीने अडचण करुन ठेवली होती. मेरिट असलेली फाइल ठेऊन जायचे त्यांना नको वाटत होते. पुन्हा त्या माणसाला किती खेटे घालावे लागतील कुणास ठाऊक. पण त्यासोबतच गैरवाजवी कागदांवरही सह्या घेतल्या जात नाहीत हे बघणे आवश्यक होते. साहजिकच वेळेची प्रचंड टंचाई निर्माण झाली होती. सामानाच्या बांधाबांधीकडे बघण्याचा तर प्रश्नच उद्भवत नव्हता. सगळे कल्याणीवर सोडून प्रांत त्या गावचेच नसल्यासारखे रेस ऑफिसमध्ये बसून रहात शांतपणे कल्याणीचा वैताग कानामागे टाकत होते.
अशातच नसीमचाचा तीन वेळा बोलवणे द्यायला येऊन गेले होते. नसीमचाचा म्हणजे इम्रत शरीयाचे इस्पातनगरमधील संचालक. नसीमचाचा आणि घियासुद्दिन चाचा ही नाला रोडवरील वयोवृद्ध मंडळी. प्रांत इथे आल्या आल्या बक्रईद आली होती. पहिल्याच आठवड्यात. ईदगाह मैदानावर व्यवस्था बघायला प्रांत लगोलग गेले होते. तिथे पहिल्यांदा ही मंडळी प्रांतांना भेटली होती. त्यावेळी त्यांनी आग्रहाने प्रांतांना इम्रत शरीयाचे काम बघायला नेले होते. प्रांतांशी बोलून आणि त्यांचे विचार ऐकून घियासचाचा खुलले होते आणि आपली शायरी त्यांना ऐकवली होती. घियासचाचांचा इस्लामविषयक सखोल अभ्यास होता, आणि त्यांच्यात कडवेपणाचा लवशेषही नव्हता. त्यांची शायरी त्यामुळेच मधुर होती.
त्या ईदला नसीमचाचांचे प्रांतांना जेवायला निमंत्रण होते. प्रांतांनी आपण मांसाहार करत नसल्याचे सांगून नम्रपणे निमंत्रण नाकारले. पण नसीमचाचा ऐकणाऱ्यातले नव्हते. त्यांनी आग्रह सोडला नाही. तुमच्यासाठी शाकाहार राहील असे म्हणाले. अनिच्छेनेच प्रांत त्यांच्या घरी ईदच्या संध्य़ाकाळी पोहोचले. सर्वजण सोबतच जेवायला बसले. आणि प्रांतांना आश्चर्याचा धक्का बसला. केवळ प्रांतांचेच नव्हे, तर सर्वांचेच जेवण शाकाहारी होते. अतिशय उत्तम दर्जाची शाकाहारी बिर्याणी आणि शीरखुर्मा सर्वांनी मोठ्या आनंदाने सेवला. आपल्याला हा माणूस एवढा आदर देतो हे पाहून प्रांतांना नसीमचाचाविषयी कुतूहल निर्माण झाले. याचे आपल्याकडे काही महत्त्वाचे काम अडकले असेल का?
या मंडळींशी असलेल्या जिव्हाळ्याच्या संबंधांमुळे प्रांतांची त्या भागातील कायदा सुव्यवस्थेची, तसेच कसल्याही जातीयवादी तणावाची काळजी जवळपास मिटलेली होती. नाला रोडच्या प्रत्येक सांस्कृतिक कार्यक्रमाला प्रांत हजर असणार हे ठरलेले होते. एका मुशायऱ्यामध्ये प्रांतांनी आपल्या आवडत्या मधुशालेच्या पंक्ती म्हणून दाखवल्या होत्या आणि बच्चनजींना आदरांजली वाहिली होती तेंव्हापासून तर वयामध्ये बापलेकांचे अंतर असूनही नसीमचाचा आणि घियासचाचांनी प्रांतांना भाऊच मानले होते. त्यांच्या संगतीत प्रांतांनाही इस्लामची ओळख होत होती. मुसलमान समाज आर्थिक दृष्ट्या मागासलेला का राहतो, शिक्षणात मागे का, याचा उलगडा त्यांना हळूहळू होत होता. या समाजाच्या समस्या आदिवासी समाजाशी काही बाबतींत मिळत्या जुळत्या असल्याचेही त्यांच्या ध्यानात येत होते. व्यक्तीपेक्षा समाजाला महत्त्व देण्याच्या अतिरेकी वृत्तीचा हा परिणाम असावा असे प्रांतांना वाटू लागले होते. आपले डोळे उघडणाऱ्या नसीमचाचांचे आपल्याकडे काहीही काम पडत नाही हे प्रांतांना हळूहळू लक्षात येत गेले होते.
या पार्श्वभूमीवर नसीमचाचांचे निमंत्रण नाकारणे प्रांतांना, आजिबात वेळ नसला तरी, शक्य नव्हते. शेवटी जेवणाऐवजी चहावर तडजोड झाली.
नसीमचाचांकडचा चहा म्हणजे सुक्यामेव्याच्या आणि विविध फळांच्या पंधरावीस थाळ्या भल्यामोठ्या गालीच्यावर मांडलेल्या होत्या. घियासचाचा, इम्रत शरीयाचे पदाधिकारी यांच्यासोबतच नगरपालिकेचे मुख्याधिकारी, नगराध्यक्ष आणि स्थानिक नगरसेवक अफरोज ही मंडळी देखील हजर होती. बोलता बोलता नसीमचाचा प्रांतांच्या कानाला लागत म्हणाले, ‘सर जाता जाता आमचे एक काम करुन जावा’. प्रांत सावध झाले. ‘काय आहे’, म्हणाले. नसीमचाचांनी एक पत्र दाखवले. त्यांनी इम्रत शरीयातर्फे चीफ मेडीकल ऑफिसरना लिहिले होते. इम्रत शरीया दरमहा गरीब रुग्णांना मोफत औषधोपचारासाठी चाळीस ते पन्नास हजार रुपये खर्च करते. जर काही औषधे विनाशुल्क मिळाली तर मोठा आधार मिळेल. या पत्रावर नसीमचाचांना प्रांतांकडून शिफारस हवी होती. प्रांतांनी विनाविलंब दोन तीन फोन लावून लगेच व्यवस्था करुन दिली, हीच व्यवस्था त्यांनी या अगोदर शहर रुग्णालयात केलेली होती.
नसीमचाचांवर आपण उगाच शंका घेतली असं प्रांतांना वाटत असतानाच नसीमचाचांनी त्यांना दंडाला धरून उठवले, आणि आतल्या खोलीत नेले. प्रांतांना काही समजायच्या आत त्यांनी दार पुढे लोटले आणि खिश्यातून पाचशेची एक नोट काढली. प्रांतांना काही बोलायची संधी न देता त्यांच्यावरून ती नोट ओवाळली आणि प्रांतांच्या खिश्यात कोंबली. म्हणाले, ‘तुम्हाला काय वाटेल माहीत नाही, पण मी मन्नत मागितली होती, की आमचे एडीएम इथेच कलेक्टर होऊन येऊ देत…तुम्ही इथेच आला नाहीत खरे, पण कलेक्टर झालात. म्हणून हा सतका. आता याचा खुर्दा करा आणि तुम्ही नवीन जिल्ह्याच्या ठिकाणी जाल तेंव्हा वाटेत दिसणाऱ्या गरीबांना वाटत जावा!’
प्रांतांच्या नजरेला नसीमचाचांचा दयाळूपणे स्मित करणारा चेहेरा धूसर दिसू लागला होता…
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा