शनिवार, १० सप्टेंबर, २०११

प्रेरणा

“सर गेल्या वेळी आपल्या जिल्ह्यातून १९ आदिवासी तरुण आर्मीत भरती झाले होते. यावेळी किमान ८० जण तरी गेल्याशिवाय मला चैन पडणार नाही!” बारीक बाबू कलेक्टरांना म्हणत होते.

बारीक बाबू, म्हणजेच टुकू बारीक, हे होते पीए आय टी डी ए अर्थात प्रोजेक्ट ऍडमिनिस्ट्रेटर ऑफ इंटिग्रेटेड ट्रायबल डेव्हलपमेंट एजन्सी. अतिशय सिन्सिअर आणि विश्वासार्ह अधिकारी. या नक्षलग्रस्त जिल्ह्यात अधिकाऱ्यांच्या बदल्या व्हायच्या, पण फक्त जिल्ह्यातून बाहेर. आत यायला कुणी तयारच नसायचं. कुणाची बदली झालीच तर कुठेना कुठे काहीतरी वशिलेबाजी करुन बदली रद्द व्हायचीच व्हायची. ज्यांचा कुणीच गॉडफादर नाही ते बापडे नाइलाजाने पोटासाठी इथे येऊन पाट्या टाकत. एकूण चांगल्या अधिकाऱ्यांचा सोडा, अधिकाऱ्यांचाच दुष्काळ असलेल्या जिल्ह्यात टुकू बारीक ही रेअर कमोडिटी होती. त्यामुळेच कर्नल शर्मांचा फोन झाल्या झाल्या कलेक्टरांच्या डोळ्यांपुढे पहिले नाव टुकूचेच आले.

कर्नल शर्मा आर्मी रिक्रूटमेंट ड्राइव्हसाठी योग्य जिल्हा शोधत होते. हा जिल्हा सहा जिल्ह्यांना मध्यवर्ती पडत होता. गेल्या वेळी वेगळा जिल्हा होता. त्या जिल्ह्याची जागा चुकीची निवडली असे त्यांना वाटत होते. १२० जागा असताना केवळ ८० जणच निवडले जाऊ शकले होते. याला प्रमुख कारणे दोन – रिक्रुटमेंटचे ठिकाण आर्मी टीमसाठी, आणि उमेदवारांसाठी फारसे सोयीचे नसावे; आणि दुसरे म्हणजे तयारी असलेले पुरेसे उमेदवार मिळाले नाहीत/ उमेदवारांची पुरेशी तयारी रिक्रुटमेंटच्या दिवसापर्यंत होऊ शकली नाही. बारीकबाबूंनी उल्लेख केलेले १९ उमेदवार याच ड्राइव्हमध्ये निवडले गेले होते.

कर्नल शर्मांना बऱ्याच गोष्टी लागणार होत्या. बारीकबाबूंच्या भरवशावर कलेक्टरांनी मागचा पुढचा विचार न करता त्यांना मनमोकळे निमंत्रण दिले. “तुम्ही या तर खरे, जे काही लागेल ते सगळे होईल ऍरेंज.” या मागास जिल्ह्यात आठ दिवस ऐंशी जणांच्या आर्मी टीमची राहण्याची, कॅम्प ऑफिसची सोय करणे हे चुटकीसरशी होण्यासारखे नव्हते. झटावे लागणार होते. आधीच अधिकाऱ्यांचा दुष्काळ, त्यात राज्य सरकारच्या खंडीभर योजना, पंचायत राज निवडणुका तोंडावर आलेल्या, बीपीएल सेन्सस पुढच्या महिन्यात सुरु होत होती, त्यात आदिवासींना प्राणांहून प्रिय असलेला पारंपारीक उत्सव – या जिल्ह्याचे भूषण असलेला – “परब” दोन महिन्यांवर येऊन ठेपलेला. डेंग्यू आणि मलेरियाच्या आउटब्रेकमुळे अर्धे माणूसबळ तिकडे वळलेले. असे एकूण फायरफायटिंग सुरु होते.

कर्नलना शब्द तर दिला आपण, पण निभावायचे कसे या विचारात कलेक्टरांनी बारीकबाबूंना फोन लावला आणि रात्री घरीच बोलावले. संयत व्यक्तीमत्वाच्या बारीकबाबूंनी कलेक्टरांच्या सर्व आशंका ऐकून घेतल्या. शांतपणे विविध पर्याय कलेक्टरांच्या पुढे ठेऊन त्यांना आश्वस्त केले. दुसऱ्याच दिवशी कलेक्टरांनी साइट व्हिजिट ठेवली. लगोलग बीएसएफच्या डीआयजींना फोन करुन कल्पना देऊन ठेवली. त्यांचीही मदत लागणार होतीच.

प्लॅनिंग फायनल झाल्यावर बारीकबाबू म्हणाले, “सर, हा ड्राइव्ह आपल्याच जिल्ह्यात होऊ देत. यावेळी मी किमान ८० तरी पोटेन्शियल नक्षल आर्मीत पाठवतो की नाही बघा!”

कल्याणी, कलेक्टरांची पत्नी, तिथेच बसली होती. तिने चमकून बारीकबाबूंकडे बघीतले. बारीकबाबूंच्या संयत व्यक्तीमत्वातून झळकणारा त्यांचा उत्साह दिपवून टाकणारा नसला तरी मोहवून टाकणारा निश्चितच होता.

बारीकबाबू सांगत होते, “सर आपण एवढ्या पंचवीस हजार आदिवासी पोरा-पोरींना होस्टेल फॅसिलिटी देतोय, पण बारावीनंतर काय या मुलांचं? स्किल ट्रेनिंग देऊन किती जणांना असा जॉब मिळतो, आणि मिळाला तरी कोणत्या लेव्हलचा? आपण त्यांना एवढं शिकवूनही त्यांना त्याप्रमाणात काही जग बघायला मिळालं तर खरं. आर्मीचा जॉब त्यांना जग दाखवील, आणि ही आर्मीत जाऊन बाहेरचं जग पाहून आलेली मुलं आपल्या इथल्या विकासाच्या लढाईत आपले सैनिक बनतील. असा आर्मीत गेलेला एकेक मुलगा दहा गावांमध्ये चर्चेचा विषय बनेल. तुम्ही बघाच सर, मी यावेळी किमान हजार उमेदवारांचे महिन्याभऱ्याचे फिजिकल ट्रेनिंगचे कॅम्प्स घेणार आहे. बेसिक जनरल नॉलेजच्या उजळणीसाठी एक आठवडा माझे दहा शिक्षक इकडे वळवणार आहे. ही मुलं गेली पाहिजेत आर्मीत. त्याशिवाय मला झोप यायची नाही!”

बारीकबाबू निघून गेल्यावर कल्याणी कलेक्टरांना म्हणाली, “अजित, नक्षल बनणाऱ्या/ बनू पाहणाऱ्या आदिवासी तरुणांना काहीतरी निमित्त असेल – खरं, खोटं. आर्मीत जाऊ इच्छिणाऱ्यांनाही चांगलं आयुष्य बनवावंसं वाटणं साहजिक आहे. पण मला एक समजत नाही, महिना वीसपंचवीस हजार टिकल्या मिळत असताना, तेही या अशा निरुत्साही सरकारी वातावरणात, या टुकू ला या आदिवासींना या रानावनांतून बाहेर काढण्याचा एवढा उत्साह येतो तरी कुठून? कुठून मिळत असेल प्रेरणा या टुकुसारख्या लोकांना?”

याचे उत्तर कलेक्टरांकडेही नव्हते. ते एवढेच म्हणाले, “प्रेरणा कुठून येते हे माहीत नाही. पण हा देश याच प्रेरणेवर चाललेला आहे हे नक्की!”

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा