शुक्रवार, २५ ऑक्टोबर, २०१३

जय हिन्द - 2


दिवसभर हेच कलेक्टरांच्या मनात घोळत राहिले. रात्री जेवणानंतर शतपावली करत असताना त्यांनी डीआयजींना फोन लावला. डीआयजी, डेप्युटी इन्स्पेक्टर जनरल, यांच्या अखत्यारीत हा जिल्हा धरून एकूण सहा जिल्हे येत होते, आणि त्यांचे मुख्यालय हाच जिल्हा होते. बीएसएफ चा कारभार स्वतंत्र असला तरीही हे अर्धसैनिकी दल राज्य सरकार, आणि पर्यायाने जिल्हा प्रशासन आणि पोलीसांना जबाबदार होते. कलेक्टरांनी आपली काळजी डीआयजींना बोलून दाखवली. डीआयजींना समस्या समजली.

ते म्हणाले, 'बीएसएफ साधारणतः पाकिस्तान सीमेवर तैनात असल्यामुळे त्यांना तिरंग्याविषयी विशेष प्रेम असते, आणि इथल्या गावांमधून असलेल्या भारतीय नक्षल शत्रू आणि पाकिस्तानी शत्रूंमधील फरक त्यांच्या लक्षात येणे कठीणच दिसते. पण तुमची काय अपेक्षा आहे?' 

कलेक्टर म्हणाले, 'बीएसएफ ला शाळांमधील, तसेच ब्लॉक ऑफिसमधील झेंडावंदनाकडे दुर्लक्ष करायला सांगा.'

'बरे आहे,' डीआयजी म्हणाले.

कलेक्टरांनी फोन ठेऊन बीएसएफ च्या डीआयजींना फोन लावला. निर्भयसिंह. उमदा बिहारी राजपूत. दोनच महिने झाले होते त्यांना जॉईन होऊन. कलेक्टरांनी त्यांच्याशी अद्याप विशेष चर्चा केलेली नव्हती, त्यांना त्यांचा वेळ देत होते. फोनवर त्यांच्याशी बोलताना कलेक्टरांनी प्रस्तावनेने सुरुवात केली. त्यांना 'झेंडावंदन करु नका' असं सांगतोय असं वाटायला नको! पण कलेक्टरांना सुखद धक्का बसला. निर्भयसिंह म्हणाले, 'आमच्या जवानांना झेंडा पाहिला की विशेष जोम येतो. त्यांना मी शाळांकडे पाठवतच नाही. काही काळजी करु नका!'

कलेक्टरांची एक काळजी तात्पुरती का होईना, मिटली. पण त्यांचे काळीज कुरतडले जात होते. अगदी सुरुवातीपासून त्यांना जिल्हा मुख्यालयातील झेंडावंदनापेक्षा खेड्यापाड्यांतील शाळांमधील झेंडावंदन महत्वाचे वाटत आले होते. नक्षलग्रस्त खेड्यांमधील शाळेत जाणार्‍या मुलांना आपण काय संदेश देणार आहोत? आपल्याच देशात आपण आपला झेंडा फडकाऊ नाही शकत? तिढाच होता. इलाजही नव्हता. दिसला शत्रू-घाल गोळी इतके सरळ समीकरण नव्हते इथे.

*****

पंधरा ऑगस्ट पार पडला. सोळा ऑगस्टला कलेक्टरांनी निर्णय घेतला. एडगुमवाल्साला जायचे. कुणालाही न सांगता.

पंधरा ऑगस्टच्या आसपासचा एक आठवडा नक्षलग्रस्त भागात जाणे शहाणपणाचे नसे. कुठे भूसुरुंग लावलेले असतील आणि कुठे अ‍ॅम्बुश लावलेले असेल सांगता येत नसे. पोलीस आणि जवानांना तर जिवाचाच धोका होता; पण कलेक्टरांना तेवढाच मोठा धोका अपहरणाचा होता. अपहरण तर फारच सोपे. पन्नास शंभर लोक मोबिलाइज करणे नक्षलांना मुळीच अवघड नव्हते. आणायचे गाडीसमोर. त्यातही बायका असल्या म्हणजे काम फत्तेच. मग कितीही सुरक्षेचा ताफा सोबत असूनही काही उपयोग नाही. असेही कलेक्टर आपल्यासोबत केवळ एक सुरक्षा रक्षक घेऊन फिरत. साध्या वेशातील. त्याच्याजवळ एक कन्सील्ड पिस्तूल असे. त्याचे कमांडो ट्रेनिंग झालेले होते, आणि पूर्वी त्याने नक्षलविरोधी कारवायांमध्ये भाग घेतलेला होता. असे दोन रक्षक आळीपाळीने ड्यूटी करत. वास्तवात त्यांचेच संरक्षण ही कलेक्टरांना स्वतःची जबाबदारी वाटे. परिस्थिती अशीच होती. चार बंदूकधारी नक्षलांनी हल्ला केला किंवा पन्नास निशस्त्र लोकांचा जमाव चालून आला तरी दोन्ही परिस्थितींमध्ये अशा रक्षकाचा काहीही उपयोग नव्हता. शेजारील केसिंगा जिल्ह्याच्या कलेक्टरांना एका गावातील भर सभेतून नक्षलवाद्यांनी अपहृत करताना त्यांच्यासोबत असलेल्या दोन रक्षकांना अगोदर गोळ्या घालून मारले आणि मग कलेक्टरांना पकडले होते. आणि हे होत असताना केसिंगा कलेक्टर ओरडून सांगत होते, मी कलेक्टर आहे, कुणाला मारू नका. तरीही. केसिंगा कलेक्टर या कलेक्टरांचे मित्रच होते आणि ते किती संवेदनशील मनाचे होते हे यांना माहीत होते. कलेक्टरांनी आपल्या दोन्ही रक्षकांना कुठेही पोलीसाप्रमाणे न वागण्याविषयी बजावून ठेवले होते. केवळ सुरक्षा प्रोटोकॉल आणि दुर्गम भागातील टूरमध्ये सोबत या उद्देशांसाठी कलेक्टर हे रक्षक सोबत ठेवत असत.  

कलेक्टरांनी क्रांत राठोडला फोन लावला. क्रांत बीएसएफ मध्ये डेप्युटी कमांडंट होता. एडगुमवाल्सा त्याला तळहाताप्रमाणे पाठ होता. सगळी गावे त्याने गेल्या दोन वर्षांमध्ये कोम्बिंग ऑपरेशन्समध्ये पालथी घातली होती. सगळे अवघड डोंगर चढून उतरुन त्याने आदिवासी वाड्या वस्त्या जवळून पाहिल्या होत्या. कलेक्टरांना क्रांत विशेष आवडे कारण क्रांत विचारी होता. लढाईचा पेशा त्याचा होता खरा; पण बंदुकीवर त्याचा विश्वास नव्हता. बंदूक हातात असली की माणूस भित्रा बनतो असे त्याचे मत होते. सर्व आदिवासींकडे संशयाने बघत कॉर्डन अ‍ॅण्ड सर्च ऑपरेशन्स करणार्‍या बंदूकधारी सैनिकांमध्ये क्रांतसारखा अधिकारी अपवाद होता. नक्षलवादाची त्याची समज बंदुकीच्या लढाईच्या पलीकडे पोचली होती. इथले लोक गरीब असण्याचे कारण काय आहे; गरीब असूनही एवढे आनंदी असण्याचे कारण काय आहे; आनंदी असूनही इथेच एवढा 'असंतोष' असण्याचे कारण काय आहे अशा प्रश्नांचा मागोवा घेत त्याने कलेक्टरांसोबत बसून चर्चा करुन विकास यंत्रणा, पंचायत राज व्यवस्था समजाऊन घेतली होती. सरकारविरुद्ध शस्त्रे हातात घेतलेल्या आदिवासींची वर्णने करणार्‍या रोमँटिक विचारवंतांना क्रांत सहज निरुत्तर करु शकला असता इतका त्याने इथला आदिवासी जवळून पाहिला होता. नक्षल प्रोपॅगण्डा समजू शकणार्‍या फार कमी फौजींपैकी क्रांत होता. कलेक्टरांनी क्रांतला 'येतोस का' असे विचारले. क्रांतने आपल्या कमांडंटची परवानगी घेतली आणि कलेक्टरांच्या घरी हजर झाला.

कलेक्टरांनी नेहेमीच्या गाडीहून निराळी गाडी मागवली. क्रांतला सोबत घेऊन त्यांनी घर सोडले. 

६ टिप्पण्या:

  1. हे क्रमशः आहे का? पहिला भाग कुठंय?

    उत्तर द्याहटवा
  2. I was waiting to read from long time. When I came today on your blog, it was a pleasant surprise. I am very excited about what will happen next?
    I am aware that you are busy with many responsibilities, but I would request you to write the next part immediately! :-)

    उत्तर द्याहटवा
  3. sir, pleaz pudhe kay aahe te lavakar liha , becoz tumhi suspense story sarakhe lihta . mi tumachya lekhachi khup aaturtene vat pahto, aani pleaz tumi pustak (book) lihach.

    उत्तर द्याहटवा
  4. Pude Kay zale.............................

    उत्तर द्याहटवा
  5. पुढे काय झाले ते सांगा न् साहेब... कृपया विनंतीचा विचार व्हावा ही विनंती 😉 आणि plz sir काहीही करा पण लिहायचे थांबू नका plz plz plz 🙏 ....

    उत्तर द्याहटवा
  6. एवढ्यात तुम्ही काही लिहिलेच नाहीत, मला तुमचे लिखाण, विचार, कथा, अनुभव त्याला काहीही म्हणा किंवा सर्वच म्हणा ... ते मांडण्याची पद्धत खुप आवडते. तुमचे मराठी भाषेवरील प्रभुत्व, लिखाणातील ओघवतपणा, वाचकाला गुंतवून ठेवण्याची हातोटी वाखाणण्याजोगी आहे. मी कुणी साहित्यिक वा समीक्षक नाही पण एक सामान्य वाचक म्हणून वाटलं ते तुम्हाला कळवतेय एवढंच... म्हणून विनंती आहे कृपया लिहिते रहा म्हणजे आमच्यासारख्या कित्येकांना चांगले काही तरी वाचावयास मिळेल हीच आशा...

    उत्तर द्याहटवा