बुधवार, ८ एप्रिल, २००९

भारतीय इतिहासातील सुवर्णयुग – एक प्रश्नचिन्ह (दोन)

या सुवर्णकाळाचा अंत वायव्येकडून एकामागून एक अशा आलेल्या इस्लामी धाडींमुळे झाला हा आपला इतिहास. एवढी ताकत या आक्रमकांत खरेच होती का? इतके सामर्थ्यशाली आणि समृद्ध भारतवर्ष इतक्या सहज या टोळधाडींना बळी कसे काय पडले? आणि या टोळांना शह देऊ शकणारा या मातीतला पहिला वीर, शिवाजी, जन्मायला सतरावे शतक का उजाडावे लागले?  असे असेल तर या पराभवाची मुळे या तथाकथित सुवर्णकाळातच शोधायला हवीत.

मला सापडत असलेले उत्तर आहे, आपला भारत ज्यावेळी १२व्या शतकात अस्मानी सुलतानीला बळी पडत होता त्यावेळी मेलेलाच होता. तुरुकांनी ‘मढे’ जिंकले. छत्रपतींनी या मढ्यात प्राण फुंकला. तेवढ्या सोन्यासारख्या काळापुरता महाराष्ट्राने राष्ट्रगाडा चालवला. थोड्याच दिवसांनी हा उसना प्राणही विझला. कलेवराला नवा गोरा मालक मिळाला.

कशावरून माझा भारत मेलेला होता? आणि कोणत्या अर्थाने? 

एक जिवंत समाज म्हणून, एकजीव समाज म्हणून, राजकारणात रस असणारा समाज भारतात नव्हताच.

शिवाजी महाराज निवर्तल्यानंतरही सत्तावीस वर्षे जे मराठे औरंग्याशी लढले ते काही खडे लष्कर नव्हते, तर बारा बलुतेदारांची – माळ्याकुणब्यांची नांगरगट्ट्य्यांची फौज होती. आपल्याला काय करायचंय मरू देत असं म्हणत शिवाजीच्या अगोदर हीच माणसे नशीबाला बोल लावत गप्प बसत. महाराजांनी प्राण फुंकला तो असा – हाच मेलेला समाज जागा झाला, हे माझ्या घरचे राजकारण आहे असं म्हणत त्याने नांगर बाजूला ठेऊन महाराजांच्या गादीसाठी तलवार हातात घेतली. इस्लामी धाडी होत होत्या त्यावेळी हे घडले नव्हते. देवगिरी बुडली तेव्हा हे घडले नव्हते. पृथ्वीराज पडला तेव्हा हे घडले नव्हते. सोमनाथाला अनाथ केले तेव्हा हे घडले नव्हते. विजयनगरला हातोड्यांनी फोडले तेव्हा साधा माणूस खवळून उठला नव्हता. आपल्याला काय करायचंय, ती दोन लष्करं बघून घेतील काय ते. कुणीही राज्य केलं तरी काय फरक पडतो? असा निराशाजनक सूर आळवणाऱ्या समाजाला, राष्ट्राला जिवंत कोण म्हणेल? सातारा जिल्ह्यातल्या आडवाटेच्या खेड्यातला कुणबी जेव्हा म्हणाला ‘काय न्हाई कामधंदा, कारभारणी, अगं सौराज्य मिळवायचं औंदा’ तेव्हा कुठे ४२ च्या चळवळीत जीव आला. 

राष्ट्र आख्खंच्या आख्खं जेव्हा जिंकलं जातं तेव्हा लष्करापेक्षा महत्वाची गोष्ट असते जित आणि जेत्या राष्ट्रांमधल्या समाजांना असलेली शिस्त, त्यांच्यातला एकजिनसीपणा. समाजातल्या प्रत्येक घटकाला राजकारणाविषयी असलेला जिव्हाळा. बाराव्या शतकात आलेल्या इस्लामी आक्रमक लोकांच्या समाजात बंधुभाव हिन्दुस्थानी समाजाच्या तुलनेत अधिक होता, शिस्त अधिक होती, एकोपा, आपलेपणा अधिक होता. पुढे आलेल्या गोऱ्यांच्या बाबतीत ही गोष्ट अधिक ठळकपणे दिसून येते.

पहिले हरिकथानिरूपण। दुसरे ते राजकारण। तिसरे ते सावधपण। सर्वविषयी॥ असं म्हणताना समर्थांना हेच तर सांगायचं नसेल? भवतालच्या घडामोडींची जाणीव, राजकारण, आणि अध्यात्म हे सर्वच लोकांसाठी आहे. केवळ राज्यकर्त्या किंवा एखाद्या ठरावीक वर्गाची त्यावर मक्तेदारी नाही असा तर याचा अर्थ नव्हे? शिवाय या तीनही गोष्टी सारख्याच महत्त्वाच्या आहेत असं तर त्यांना सांगायचं नव्हतं? छत्रपतींच्या काळात ही मक्तेदारी नव्हती, हरिकथानिरूपणाइतकेच राजकारण आणि सावधपण यांना महत्त्व होतं. उत्तर पेशवाईत (नानासाहेबांपासून पुढे) ही मक्तेदारी हळूहळू वाढत गेली, तसेच हरिकथानिरूपण आणि राजकारण- सावधपण यांतलं संतुलन ढासळत गेलं आणि मराठशाही बुडायला सुरुवात झाली.

ठीक आहे. पण इस्लामी धाडी सुरू झाल्या तेव्हा समाज मेलेला होता म्हणजे नेमके काय? सांगतो. 


(क्रमशः)

२ टिप्पण्या:

  1. छान लिहितो आहेस. पहिला भाग पण सुंदर. दोन पूर्ण लेखमाला करता येतील तुला - एक ओडिशाविषयी आणि एक भारताच्या इतिहासावर.

    नवीन फोटो सुरेख आहे, ब्लॉगचं नवं रूप आवडलं. पुढच्या पोस्टची वाट बघते आहे.

    उत्तर द्याहटवा
  2. इतिहासाचा किडा थोडा त्रास देऊ लागलाय. पुस्तकं सोबत नसल्यामुळे फार तपशिलात शिरणे शक्य होत नाहीय. [बरंच आहे म्हणा; शहाणपण गाजवायला पुस्तकं कशाला!;-)]

    हा फोटो मयुरभंज जिल्ह्यात फिरताना काढला. बायका मागे वळून बघायला लागल्या आणि काम अवघड झालं. एकाच फोटोवर समाधान मानून काढता पाय घेतला.

    उत्तर द्याहटवा