बुधवार, ३१ ऑक्टोबर, २०१२

चक्रव्यूहात अडकलेले प्रकाश झा


मी सिनेमाच्या हाताळणीऐवजी त्यातील कथानक/ माहिती या सामग्रीवर लिहीत आहे. त्या अर्थाने ही चित्रपटाची समीक्षा नसावी.

प्रकाश झा यांनी काही चांगले चित्रपट अलीकडे दिलेले आहेत. मला आवडलेले म्हणजे अपहरण, गंगाजल. व्यवस्थेचे बर्‍यापैकी ज्ञान त्यात दिसले होते. पोलीस इन्स्पेक्टर रँकच्या अधिकार्‍यांना आयजी रँकचे गणवेश चढवणार्‍या आणि पोलीस कमिशनर या पदाच्या अधिकार्‍यांना हास्यास्पद पद्धतीने रंगवणार्‍या हिंदी सिनेसृष्टीकडून फारशा अपेक्षा कधीच नव्हत्या. काही अपवाद आहेत, त्यात झा आहेत असे वाटत असतानाच हा चक्रव्यूह नावाचा वैचारीक गोंधळ बघण्यात आला. झांकडून असलेल्या अपेक्षा आणि चित्रपटाचा विषय संवेदनशील, आणि माझ्या जिव्हाळ्याचा. म्हणून दखलपात्र. लिहावेसे वाटले.

नक्षल प्रश्नाच्या पार्श्वभूमीवर दोन मित्रांच्या नातेसंबंधांचा वेध/ वेगवेगळ्या दिशांनी नेणार्‍या विचारांचे वादळ असे काहीतरी दाखवायचे असेल, त्यातील नाट्य रंगवायचे असेल - असे असू शकते. तसेही या सिनेमात ठीक दिसत नाही. नक्षल प्रश्नच साकल्याने दाखवायचा असेल - तर तसेही ठीक दिसून येत नाही. थोडे विस्तारानेच सांगतो. ही दखल अशासाठी, की या असल्या सादरीकरणातून लोकांचे नक्षलवादाविषयी, या समस्येविषयी गैरसमज वाढण्याची शक्यता अधिक. या विषयावर भरपूर साहित्य उपलब्ध आहे असेही नाही, आणि वारंवार अशा विषयावर चित्रपट/ नाटक निघणेही कमी संभव. त्यामुळे सिनेमातील तृटींचे विवरण आणि सादरीकरणातून दाखवल्या गेलेल्या काही मिसलिडींग गोष्टींवर उजेड टाकणे आवश्यक आहे.

कथानक थोडक्यात असे - "नंदीघाट" नावाच्या "मध्य भारत" राज्यातील नक्षलग्रस्त जिल्ह्यामध्ये प्रोफेसर गोविन्द (आणि अन्य अनेक नावांनी वावरणारा) (ओम पुरी) हा नक्षल आयडॉलोग कार्यरत असतो. कॉम्रेड राजन (मनोज वाजपेयी) आणि त्याचे नक्षल दलम आपल्या ट्रेनिंग सेंटरसहित या भागात आपले अस्तित्व दाखवत रहात असतात. महान्ता ग्रुपला आपला स्टील प्लँट या जिल्ह्यात सुरु करायचा असतो. परंतु नक्षलांच्या वाढत्या वर्चस्वामुळे तिथे काहीच हालचाल करणे सरकारला आणि महान्ता ग्रुपला शक्य होत नसते. नक्षलांचा पाडाव करण्यासाठी सिनियर एस्पी आदिल खान (अर्जुन रामपाल) या डेकोरेटेड आयपीएस अधिकार्‍याची तिथे बदली होते - तोच पोस्टिंग मागून घेतो. त्या भागात जाऊन खेडोपाडी जाऊन लोकांशी संपर्क साधू लागतो. स्थानिक उद्योजक, कंत्राटदारांना समजावतो आणि नक्षलांना खंडणी देण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करतो. पण पुरेशा गुप्तचर यंत्रणेअभावी त्याला फारसे यश मिळत नाही. त्याचा कॉलेजमधील मित्र कबीर (अभय देओल) त्याला या दरम्यान भेटतो. हा धाडसी असतो, लहरी असतो, आणि अन्यायाची चीड असणारा आणि त्याविरोधात कुठल्याही टोकाला जाणारा असा विक्षिप्त मनुष्य असतो. तो आदिलला ऑफर देतो की नक्षल कॅडर बनून, त्यांच्यात मिसळून तो आदिलला सर्व गुप्त माहिती पुरवील आणि नक्षलांना संपवील. त्याप्रमाणे घडत जाते, आणि आदिलला यश मिळत जाते. मार्ग मोकळा झाल्याने महान्ता ग्रुप आपला प्लँट नंदीघाटला सुरु करण्यासाठी हालचाल सुरु करतो. प्रोजेक्टसाठी संपादित केलेली गावे मोकळी करुन देण्याची, आणि त्याबदल्यात पैसे देण्याची ऑफर महान्ता एस्पीला करतो. एस्पी त्याला नकार देतो. महान्ता स्थानिक राजकारण्यांना हाताशी धरुन जबरदस्तीने गावे जमीनदोस्त करतो. एस्पी यात गुंतलेल्या गुंडांना अटक करतो. गृहमंत्री, डीजीपी त्याच्यावर दबाव आणतात आणि लँड अ‍ॅक्वीझिशनचे काम पाहण्यासाठी अन्य पोलीस अधिकार्‍याची नेमणूक करतात. दरम्यान सरकारची ही जबरदस्ती पाहून आणि गरीब आदिवासींचे हाल पाहून द्रवलेला कबीर आपली भूमीका बदलतो, आणि खराच नक्षल बनतो. शेवटी एका एन्काउंटरमध्ये आपला मित्र आदिल आणि मैत्रीण रिया (आदिलची पत्नी आणि सहकारी पोलीस अधिकारी) यांच्याकडून मारला जातो.

घोर अज्ञानाने भरलेली ही काल्पनिक कथा सांगून झा महाशय सिनेमाच्या शेवटी आपल्याला सांगतात की या नक्षलवादाच्या चक्रव्यूहातून आपण कसे सुटणार? मोजके शंभर परिवार देशातील २५% संपत्ती बाळगून आहेत, आणि ७५% लोकसंख्या दिवसाला २० रुपयांत गुजराण करतेय, इत्यादि.

***********

कसल्यातरी घाईघाईत सिनेमा बनवला आहे असे सतत वाटत राहते. कोणत्याही गोष्टीचा साकल्याने विचार केला आहे असे कुठेच दिसत नाही.

१. राज्याचे राजकारण, सरकार चालवत असलेल्या लोकांची कंपल्शन्स कुठे दिसत नाहीत. कॉर्पोरेटची भूमीका नाही. सरकार आणि कार्पोरेटचे संबंध म्हणजे कॉर्पोरेट सरकारला (पार्टीला) पैसा देणार, आणि त्याबदल्यात सरकार कार्पोरेटला पोलीस पुरवणार असे सरळधोपट आणि दिशाभूल करणारे अतिसुलभीकरण.

२. राजकीय विरोधकांचा पत्ताच नाही. कार्पोरेट विरोधकांचाही पत्ता नाही.

३. केंद्र सरकार, राज्य सरकार यांतील संबंधांचा उल्लेखही नाही. केंद्र सरकार पूर्ण गैरहजर. वास्तवात युद्ध पेटले आहे ते केंद्र सरकार आणि नक्षल यांच्यात. राज्य सरकारे केंद्र सरकारला धरुन काय ते झगडत आहेत. राज्ये यासाठी सर्वस्वी केंद्रावर अवलंबून आहेत. पैसा, माणूसबळ, सगळ्याच बाबतींत.

४. स्थानिक राजकारणी म्हणजे निव्वळ गुंड. बुल्डोझर घेऊन गावे जमीनदोस्त करणारे. आणि विशेष म्हणजे हे करत असताना त्यांना नक्षलांचे मुळीच भय नसते. एरवी मात्र नक्षलांची प्रचंड दहशत वगैरे असते. आणि स्थानिक राजकारण्यांच्या या असल्या गुंडागर्दीला "सलवा जुडूम" असे म्हणतात म्हणे.

५. एन्जीओ नाही. फ्रंटल ऑर्गनायझेशन नाही.

६. जिल्हा प्रशासनाचा पत्ताच नाही. जिल्हा इथे एस्पीच जणू सांभाळत असतो. तोच गावांमध्ये जातो, लोकांच्या जखमांना मलम लावतो, त्यांना विकासाचा शब्द देतो. आश्चर्य म्हणजे लँड अ‍ॅक्विझिशनही इथे एस्पीच करत असतो. आणि त्यावर थेट राज्याचे गृहमंत्री देखरेख करत असतात. डीजीपी त्यांचे भालदार चोपदार असल्यासारखे सतत त्यांच्यामागे उभे असतात आणि फोनवरून एस्पीला सबूरीचा सल्ला देत असतात.

७. इथली लढाई म्हणे आदिवासी करत असतात, आणि हे ओम पुरी, वाजपेयी इत्यादि त्यांना केवळ मदत करत असतात. सिनेमात एकाही आदिवासीने एकदाही तोंड उघडलेले नाही.

८. हे नक्षल पोलीसांना थेट अंगावर घेतात. त्यांच्या हेडक्वार्टरमध्ये वगैरे घुसून थेट दे दणादण गोळीबार करतात. पोलीसही नक्षलांना सरळ भिडत असतात. लारा क्रॉफ्ट टूम रेडर मध्ये दाखवल्यासारख्या अगदी आमने सामने गोळागोळी सुरु असते. गुरिला वॉरफेअर नावाला किंवा चवीलाही नाही. अ‍ॅम्बुश नावाचा प्रकार नंदीघाटमध्ये माहीत नसतो.

९. नंदीघाट हा एक मागासलेला भाग असतो, आदिवासी भाग असतो. आणि स्वातंत्र्यानंतर सरकारने तिथे कसलाच विकास केलेला नसतो. (विकास करणे हे सरकारचे काम असते म्हणे. लोकांनी काही करायचे नसते.). पण तिथे खूप मोठ्या संख्येने कंत्राटदार असतात. ते नक्षलांना भरपूर खंडणीपण देत असतात. ते नेमकी कोणती कामे करत असतात त्याचा पत्ता लागत नाही. ती विकासाची कामे नसावीत बहुदा.

मला आता कंटाळा आलाय. किती म्हणून काय काय सांगायचे! या गोष्टी कुठल्याही नक्षल रिलेटेड कथेमध्ये असणे अत्यावश्यक आहे. किमान ओझरता संदर्भ आवश्यक आहे. त्याशिवाय पान रंगणार नाही. आणि निरनिराळ्या बातम्यांची कटिंग्ज एकत्र करुन कथा बनवली तर ती झिरझिरीत कापडतुकड्यांची ठिगळाठिगळांनी बनवलेली गोधडी रंगीत दिसेल, पण ऊब देण्याच्या कामाला यायची नाही. रामायण जर वानरसेनेशिवाय दाखवले तर कोणती कथा निर्माण होईल? तसे झालेले आहे. प्रत्येक फ्रेममध्ये अज्ञान ठासून भरलेले आहे. प्रकाश झांची ही नोट वाचा -

The world looks at India, as a shining nation on the rise. Stories of economic growth, and a newly affluent middle class dot our consciousness. But in the underbelly of the world’s largest democracy,far away from the glitz of the big cities, a war is brewing.


India has been free and independent for over six decades. But go into the heart of the India’s forests and villages, “What freedom?” asks a tribal. “We have lost everything after India became independent.”

The state needs control over the land and the natural resources. But the tribals and villagers who have seen neither development nor compensation for this displacement, have decided to protest. They will not give up their forests, their rivers and their homes.

Young educated citizens from cities are leading the way, helping the tribals protest. But this protest knows only one language – the language of violence. And the State too knows only one language – the language of violence.

I found, as I traveled through beautiful green forests, and lush untouched landscapes that there was fear lurking in every corner. There were gunshots and there was a haunting silence. But there was no development.

I have tried to chronicle this conflict by telling the story of two friends, who eventually find themselves on opposing sides of this conflict. I have made this film to bring this conflict into public focus.

Chakravyuh, the word, implies a war formation from which there is no escape. My film is about this sense of being cornered from all sides. The dilemma of finding yourself in a war from which there is no escape.

ही नोट वाचून तर मला हसावे की रडावे तेच समजेना. भारत स्वतंत्र झाल्यानंतर आदिवासींचे सर्वस्व हरण झाले; या भागात बंदुकांचे बार आणि भीषण शांतता आहे, पण विकास नाही; विस्थापनाचा मोबदला मिळाला नाही; स्टेटला फक्त हिंसेचीच भाषा समजते; मी हा सिनेमा बनवला तो हा संघर्ष लोकांपर्यंत आणण्यासाठी- ही भूमीका मांडणार्‍या दिग्दर्शकाने आपले हे मुद्दे कथानकात यावेत याची जराही फिकीर करु नये? बरोबर असोत वा चुकीचे असोत, मुद्दे तरी नीट मांडावेत.

केवळ पेपरातील बातम्या वाचून आणि एखाददुसरे नक्षलांची भलावण करणारे पुस्तक वाचून काढण्यात आलेला हा सिनेमा आहे यात मला शंका नाही. ऋणनिर्देश म्हणून सिनेमात सुरुवातीला काही आयपीएस अधिकार्‍यांची नावे आली आहेत. पण ती काही कन्सल्टन्सीसाठी असावीत असे म्हणवत नाही. त्यांना कन्सल्ट करुनही जर व्यवस्थेविषयीचे आणि त्याविरोधातील शक्तींविषयीचे, त्यांच्यातील संघर्षाचे असले अज्ञानी प्रदर्शन होत असेल तर दिग्दर्शकाची करावी तेवढी कीव थोडीच.

तर कुणाला या नक्षलवादाच्या प्रश्नात आस्था असेल, आणि हा सिनेमा पाहिलाच तर त्यावर चर्चा करता येईल. व्यक्तीशः मला हसू आलेले आहे, कीव आलेली आहे, चीडही आलेली आहे. ज्याप्रकारे नक्षॅलिझमला ट्रिव्हियलाइझ केलेले आहे, आणि एकूणच प्रश्नाला अत्यंत बेजबाबदार रीतीने हाताळले आहे ते चीड आणणारे आहे. अंकुर आणि निशांतमध्ये बेनेगलांनी या समस्येला अतिशय भेदकपणे तोंड फोडलेले आहे. त्याला नाव त्यांनी दिले नसेल नक्षलवाद, पण अतिशय मार्मिकपणे समस्या उलगडली आहे. झांकडून तेवढ्या टॅलेंटची अपेक्षा नसली तर माणूस अगदीच ढ नसावा असे वाटत होते. अपेक्षाभंग झालेला आहे. आणि जवळच्या काही मंडळींना सिनेमा आवडलाय असे दिसल्यामुळे काळजी वाटली. (आणि हे लिहीण्यात वेळ घालवला!)

शनिवार, १३ ऑक्टोबर, २०१२

वासेपूर



आत्ता पहायला मिळाला. 

गँग्ज ऑफ वासेपूर पाहताना त्यातील अनेक गोष्टी आपण प्रथमच पहात नसलो तरीही अंगावर येतात. शिवराळ बोली भाषा आणि मॅटर ऑफ फॅक्ट व्हायलन्स अनेक सिनेमांमधून पहायला मिळतो. वासेपूरचे ते काही यूएसपी नाही. प्रकाश झाच्या अपहरण, गंगाजल मधून व्यवस्था, गुन्हेगारी, राजकारण यांचे पद्धतशीर आकलन करवून देणारे दर्शन घडते. वासेपूर त्या बाबतीतही काही अगदी वेगळा, उठून दिसणारा किंवा पहिलाच सिनेमा नाही. कथानक म्हणाल तर खानदानी दुश्मनी, रोमिओ जुलिएट स्टाइलचे दुश्मन खानदानांतील प्रेमप्रकरण, माफिया धंदापद्धती या गोष्टीही नव्या नाहीत. अनेकानेक हिंदी सिनेमांच्या कथानकांमध्ये वासेपूरमधील प्रत्येक गोष्ट येऊन गेलेली आहे. त्यातही नवीन काहीच नाही. गॉडफादरच्या कथानकाची भ्रष्ट नक्कल असलेला सरकार असो, की सत्या-कंपनीसारखे, सेहर सारखे वास्तवाच्या जवळ जाऊन थेट शैलीत माफिया अंडरवल्ड दाखवणारे सिनेमे असोत - कथेत किंवा सादरीकरणातही "प्रथमच आपल्या शहरात" असलाही प्रकार नाही. असे असतानाही हा सिनेमा मला "हाँटिंग" वाटला. स्टाइल नवीन नाही; कथानक नवीन नाही. मग नवीन आहे तरी काय? 

विशेष आहे आकलन, आणि ते आकलन सादर करण्याची शैली यांचा सुरेख संगम. कथानक घोटाळते मायक्रोलेव्हलवर. धनबाद - वासेपूर भागातील स्थानिक माफियागिरी - राजकारण. पण पट प्रचंड व्यापक आहे. पूर्व भारतातील म्हणा, किंवा एकंदरच भारतातील म्हणा, गव्हर्नन्स (फॉर दॅट मॅटर अ‍ॅबसेन्स ऑफ गव्हर्नन्स) वर हा सिनेमा म्हणजे एक जबरदस्त टिप्पणी आहे. ज्या कुणी आपली कायदा आणि न्यायव्यवस्था आणि त्यासंदर्भात राजकारण थोडे जवळून पाहिले आहे त्याला या सिनेमा निर्मात्यांच्या आकलनाचे कौतुक वाटल्याखेरीज राहणार नाही. 

इतिहासाचे पद्धतशीर संदर्भ देत स्वातंत्र्यपूर्व काळापासून सद्य काळापर्यंतचा पट हे कथानक व्यवस्थित गोंधळ न घालता उलगडत नेते. अगदी छोट्या छोट्या गोष्टींमधून राजकारण, पोलीस, माफिया, सामाजिक उतरंड - सगळे  खाडकन असे समोर येते. अन्स्टेटेड नॅरेशन - न सांगता बरेच काही सांगायचे, आणि तेही निष्कर्ष न काढता - हे या सिनेमाला उत्तम साधलेले आहे. 

शाहिद पठाण डकैती सोडून बायकोला वचन दिल्याप्रमाणे इमानदारीत कोळशाच्या खाणीमध्ये मजूरी करु लागतो. आपल्यावरचा अन्याय सहन न होऊन तिथल्या खाणमालकाच्या पैलवानाचा तो मालकासमक्ष खून करतो. बेरकी मालक त्यालाच आपला पैलवान बनवतो, आणि आपली खाण चालवू लागतो. मजूरांना दम देणार्‍या शाहीदला एक मजूर म्हणतो, भाई तू तर आमचाच...तर त्याला शाहीद खाड्कन मुस्काटात ठेऊन देतो. शाहीदचा भाऊ फरहान त्याला म्हणतो, हे गरीब मजूर तर आपलेच सगे. त्यांच्या जमिनी हिसकाऊन घ्यायच्या, त्यांना वेठीला धरायचे हे तुला योग्य वाटते का? शाहीद उत्तरतो, यहाँ कोई किसीका सगा नही होता. बास. एका क्षणात राष्ट्रीय नेत्यांच्या भाबड्या समाजवादाच्या चिंध्या. चिंध्या अशासाठी की पंडीतजींचे "ट्रिस्ट विथ डेस्टिनी"चे शब्द अजून विरलेलेही नाहीत. हे असले खाणमालक, आणि त्यांचे पैलवान म्हणजे ग्रासरुटमधून येणारे लोकशाहीतील नेतृत्व. आपल्या देशातील राजकारणाची "हळूहळू" अधोगती होत गेली असे समजायचे काही कारण नाही. कधी कधी वाटते, आपल्या घटनाकारांनी ज्या न्याय समता बंधुता इत्यादि उदात्त विचारांवर आधारीत व्यवस्थेची मांडणी केली, ती नको तेवढी भाबडी तर नाही? लोकशाहीच्या आदर्श स्वप्नापुढे आपण कायदा सुव्यवस्था, न्यायव्यवस्था यांचा बळी तर दिलेला नाही? ज्या समाजामध्ये बळी तो कान पिळी हे तत्व सत्य म्हणून स्वीकारले गेले आहे, नाईलाज म्हणून नव्हे; तर वास्तव म्हणून, मूलभूत धारणा म्हणून, त्या समाजावर फ्रेंच राज्यक्रांतीतून निघालेले आणि मॅग्नाकार्टापासून विकसित होत असलेले युरोपियन सिद्धांत आपण २६ नोव्हेंबर १९४९ रोजी सरळ सरळ थोपून दिले. एखाद्या जुन्या भिंतीला वरवर गिलावा द्यावा तसे. त्याचे पद्धतशीर पोपडे पडताना आपल्याला वासेपूरमध्ये दिसतात. इंग्रज निघून गेले, आणि खाणवाटपाची बंदरबाँट चालू झाली. इंग्रज मजूर ठेवायचे, पण छत द्यायचे, हमारी वो औकात नही थी...असे आपल्याला निवेदक फरहान सांगतो. त्या पार्श्वभूमीवर शाहीद पठाण मजूरांच्या झोपड्या जाळताना आणि त्यांना खाणीसाठी हुसकावून लावताना दिसतो. याला सामाजिक परिस्थिती म्हणायचे की राजकीय परिस्थिती, की गवर्नन्सचे अपयश म्हणायचे हे बघणार्‍याने ठरवावे. 

माफियागिरी अर्थात संघटित गुन्हेगारी म्हणजे केवळ पोटे भरण्याचे साधन नसून सत्ताकारणाचा एक अविभाज्य अंग आहे. आता सत्ताकारणाच्या सोयीसाठी गुन्हेगारी; की गुन्हेगारी धंद्यांच्या सोयीसाठी सत्ताकारण हे वेगवेगळ्या परिस्थितीनुसार ठरेल. वासेपूरमध्ये आपल्याला दुसरा प्रकार पहायला मिळतो. विधायक रामधारी सिंग हा मुळात ठेकेदार, खाणमालक, आणि आपल्या व्यावसायिक हितांना जपण्यासाठी सत्ताकारण करणारा. धान्याने भरलेल्या ट्रेन लुटणारे कुरेशी, पठाण हे मुळात वाटमारी करुन पोटे भरणारे. पण गव्हर्नन्सच्या अभावी सत्तेची आणि नेतृत्वाची पोकळी भरुन काढून आपापल्या भागातील सत्तेची सूत्रे हातात ठेवणारे. मोहर्र्मच्या छाती पिटण्याच्या उन्मादक विधीत कुरेशी मंडळी मग्न असताना वासेपूरमध्ये अगदी निवांतपणे सरदार पठाण मोटरसायकलवरुन आपल्या भावासोबत फिरत कुरेशांच्या घरां-दुकानांवर गावठी बाँम टाकत फिरतो. कसायांचे सुरे घेऊन अगदी थंड डोक्याने एकेकाला धरुन खाली पाडून मारुन अक्षरशः खांडोळी करतात. बारीक बारीक तुकडे करुन शव नाहीसे करतात. या प्रकाराला केवळ गुन्हेगारी म्हणताच येत नाही. हे तर सत्ताकारण. स्वतःचे अस्तित्व टिकवण्याचा संघर्ष. आणि येथे कायद्याच्या राज्याला स्थान नाही. या सर्वांची ऐतिहासिक मुळे शाहीद पठाणाच्या इंग्रजी काळात ट्रेन लुटण्याच्या "पेशा"पासून आपल्याला हा सिनेमा दाखवतो. कोळसा खाणींचे राष्ट्रीयीकरण करुन प्रशासक नेमला जातो. त्या कोल इंडियाच्या अधिकार्‍याचा सिंग मंडळींना ताप होऊ लागतो, तर त्याला सरळ कापून काढतात. ही केवळ गुन्हेगारी नव्हे. निव्वळ माफियागिरीही नव्हे. कारण ही कापाकापी करणारा रामधारी सिंग आमदार होतोय. मंत्री होतोय. एस्पीला हाताशी धरुन डोके वर काढणार्‍या सरदार पठाणाला चेपू पाहतोय. स्वतःच्या धंद्यासाठी सत्ता राबवतोय. 

एका अर्थाने ही सध्याच्या राजकारणावरील टिप्पणी आहे. राजकारणाच्या गुन्हेगारीकरणाचा (़किंवा गुन्हेगारीच्या राजकियीकरणाचा) हा प्रकार केवळ बिहारपुरता मर्यादित होता, आणि नंतर सगळीकडे पसरला असे काही नाही. टगेगिरीचे राजकारण हा शब्दप्रयोग महाराष्ट्रात अलीकडे आला असला, आणि "इलेक्टिव्ह मेरिट" च्या नावाखाली भाई ठाकूर्स आणि पप्पू कलानीजना काँग्रेससारख्या पक्षाने तिकीटे देणे हे प्रकार नव्वदीच्या दशकानंतर प्रचंड वेगाने देशभर (आणि सर्व पक्षांमध्ये) फोफावले असले तरी स्थानिक राजकारण हे कायमच टग्यांच्या हातात होते. थिंकिंग पॉलिटिशियन (प्लेटोचा फिलॉसफर किंग) हे अगदी वरच्या पातळ्यांवरच मर्यादित राहिले. पंडित नेहरु म्हणा, किंवा यशवंतराव चव्हाण म्हणा. आता तर त्या पातळीवरही वासेपुरी राजकारण स्थिरावत चालले आहे. वासेपूरमध्ये राजकारणाचा हा प्रकार थेट सामोरा येतो. 

वासेपुरचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे सिनेमातील पात्रे आपल्याला त्यांच्या विचारांची मीमांसा त्यांच्या संवादांमधून सांगत बसत नाहीत. अनस्टेटेड नॅरेशन. "हमारे धंदेमे डर रहना जरुरी है" असली फिलॉसफी समजावणारी वाक्ये नाहीत. ही शैली भिडणारी आहे. तेंडुलकरांच्या सखाराम बाइंडरमध्ये ही शैली दिसली होती. सखाराम असे का वागतो, चंपा असे का वागते - याची स्पष्टीकरणे/ अंदाज कुठेही कुणाच्याही संवादांमध्ये येत नाहीत. धिस स्टाइल ऑफ नॅरेशन मेक्स द शो हाँटिंग. (तरी नाटक माध्यमाच्या मर्यादांमुळे सखाराम स्वतःविषयी बरेच काही बडबडतो. सिनेमा माध्यमाला तेवढ्याचीही गरज नाही.) 
  
चित्रपट पाहून मूळ कादंबरी वाचायची उत्सुकता लागून राहिली आहे. बिमल मित्रांच्या साहेब बिबी गोलाम या कादंबरीचा पट असाच विशाल आहे (त्यावरचा सिनेमा हा त्या कादंबरीची थट्टा आहे). हा सिनेमा एक सबंध कालखंड उजळून टाकणारा आहे. आपल्या आकलनातील कच्चे दुवे सांधणारा आहे. बाकी चित्रपटातील तांत्रिक बाबींविषयी अज्ञान असल्याने मौन बाळगतो. सिनेमातील सगळेच आवडले, संगीत विशेष आवडले, हे आवर्जून नमूद करतो. कथानकाची ताकदच एवढी जबरदस्त आहे की सादरीकरण कसलाही सिनेमॅटिक इफेक्ट न वापरता केले तरी प्रभावी ठरते. छोटे छोटे कमी कालखंडांचे अनेक तुकडे करुन एकेक प्रसंग रंगवला आहे. त्यामुळे सिनेमात वेग प्रचंड राहतो, आणि कंटाळा येत नाही.  

थोडक्यात - मस्ट वॉच. 

मंगळवार, २१ ऑगस्ट, २०१२

जय हिन्द


ऑफिसला सकाळी बाहेर पडताच गेटबाहेर काही लोक वाट पहात उभे असलेले लोक कलेक्टरांना दिसले. हे आता सवयीचेच झाले होते. जेंव्हा जाऊ तेंव्हा हा कलेक्टर आपल्याला भेटतोच असा अनुभव आल्यामुळे वेळी अवेळी केंव्हाही लोक भेटत. त्यावर उपाय म्हणून मग कलेक्टर फक्त आपल्याच ऑफिसमध्ये बसण्याऐवजी वेगवेगळ्या ठिकाणी मीटिंग्ज घेत. म्हणजे मीटिंग्जनाही अडथळा नको, आणि लोकांनाही नाराज करायला नको. अ‍ॅडिशनल डीएमना ते सर्व अर्ज निवेदने गोळा करायला सांगत आणि नंतर स्वतः डोळ्यांखालून घालत. तरीही गरजू माणसाला प्रत्यक्ष कलेक्टरांकडून दोन धीराचे शब्द ऐकायचे असत, आणि म्हणूनच अमूकच वेळेत भेटा असे करणे कलेक्टरांच्या जिवावर येत असे. आताही या लोकांना पाहताच कलेक्टरांनी गाडी थांबवली आणि एकेक गार्‍हाणे तिथेच ऐकू लागले.
सगळी गार्‍हाणी संपल्यावर मागे उभा असलेला एक माणूस पुढे आला. हात जोडून आणि कमरेत थोडा वाकून त्याने नम्रपणे नमस्कार केला. कलेक्टरांनी हात होडून नमस्कार परत करत विचारले, "काय अडचण आहे आपल्याला?" तो माणूस म्हणाला, "सर मी हरडापुट हायस्कूलमध्ये असिस्टंट टीचर आहे. मला नक्षलवाद्यांनी धमकी दिलीय. मी अर्ज लिहून दिलाय. माझी बदली केलीत तर बरं होईल." "ठीक आहे, मी बघतो, " एवढेच कलेक्टर म्हणाले आणि गाडीत बसून निघून गेले.
बदलीसाठी या भागातील काही चाकर ही तक्रार आवर्जून करीत असत. नक्षलवाद्यांची धमकी. त्यात नवीन काहीच नव्हते. सगळ्यांनाच हेडक्वार्टर पाहिजे. कसे जमायचे. उपाय म्हणून एकेक वर्ष अफेक्टेड भागात पोस्टिंग करायच्या बोलीवर कलेक्टर वेगवेगळ्या डिपार्टमेंटच्या स्टाफला पाठवत असत. पण खरा धोका असलाच तर रेव्हेन्यू, फॉरेस्ट आणि पोलीस स्टाफलाच असे. शिक्षक, डॉक्टर, ग्रामसेवक यांना नक्षल्यांकडून काही धोका असण्याचे कोणतेच कारण कलेक्टरांना दिसत नव्हते.
पण ही केस निराळी होती. एडगुमवालसा ब्लॉक म्हणजे नक्षलांचा गढ बनला होता. शेतकरी मजूर आदिवासी संघ या नावाने स्थानिक निरक्षर आदिवासींची एक सुरेख ढाल तेलुगू नक्षल नेतृत्वाने बनवली होती. या ढालीमुळे पोलीस फोर्सेसना पुरते जखडून टाकले होते. काहीच कारवाई धड करता येत नव्हती. एक जरी निरपराध आदिवासी मार्‍यात सापडला की संपलेच. आयते कोलीतच नक्षल प्रोपॅगंडाला मिळे. ह्यूमन राइटचे लचांड मागे लागे ते निराळेच. या संघाचे मोर्चे वेळी अवेळी विना सूचना विना परवानगी तहसील ऑफिस, ब्लॉक ऑफिसवर येत. हजारोंच्या संख्येने. एवढ्या मोठ्या गर्दीमध्ये काही विपरीत होण्याची शक्यता नेहेमीच असे. त्यामुळे अलीकडे प्रशासन पोलीसांनी या असल्या रॅल्यांवर बंदी आणली होती. त्याबद्दलही एक ह्यूमन राइटस केस सुरु होती. गरीब आदिवासींचा 'निषेध करण्याचा घटनात्मक हक्क' हिराऊन घेतल्याबद्दल. या केसबद्दल कलेक्टरांना फार काळजी नव्हती, कारण अलीकडच्या काळात संघाचा बुरखा फाडणारे अनेक प्रकार घडले होते. संघाला न जुमानणार्‍या आदिवासींच्या हत्या झाल्या होत्या, अनेक आदिवासी कुटुंबांना संघातीलच लोकांनी गावांमधून हुसकाऊन लाऊन बेघर केले होते. या सर्वांची गार्‍हाणी फाइलींमध्ये बंद होती, आणि एकूणच संघाच्या खर्‍या स्वरुपाविषयी एक मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले होते. त्यामुळे आदिवासींवरील तथाकथित अत्याचारांविरुद्ध आवाज उठवून संघाची भलामण करणार्‍या काही एनजीओज अलीकडील काळात चुप बसल्या होत्या. तरीही नक्षल मिनेस हा होताच. बीएसएफ च्या सहा कंपन्या या ब्लॉकच्या परिसरात असूनही स्थानिक आमदारांना नक्षलांनी पळवून नेऊन महिनाभर ताब्यात ठेवले होते. एक वर्षाच्या काळात शेजारील दोन जिल्ह्यांचे कलेक्टर अपहृत झाले होते. प्रॉब्लेम सोपा नव्हता. फ्रंटल ऑर्गनायझेशनच्या ढालीमुळे प्रश्न गंभीर बनला होता. ही ढाल भेदणे सोपे नव्हते. ही ढाल भय आणि विश्वास/ अविश्वास या तत्वांवर बनली होती. नक्षलांचे भय, पोलीस फोर्सेसचे भय. प्रशासनाला लोकांपासून तोडून टाकायचे, आणि अविश्वास वाढीला लावायचा. अपहरणे करुन प्रशासनाच्या मनात भय बसवायचे. प्रशासनालाही लोकांविषयी अविश्वास वाटला पाहिजे. हे असे भय, अविश्वास खेळवत रहायचे. मग ही मानवी ढाल मजबूत होत जात असे. या शिक्षकाची केस ऐकून कलेक्टरांना काळजी वाटली. या लोकांनी शाळाही बंद केल्या म्हणजे कल्याणच. मग तर प्रशासन पूर्णच निकम्मे म्हणायचे. नक्षलांचे काम अजूनच सोपे.
दुपारी परत आल्यावर कलेक्टरांनी डिस्ट्रिक्ट वेलफेअर ऑफिसरना बोलावले. आदिवासी आश्रम शाळा यांच्या अखत्यारीत येत होत्या. हरडापुटच्या शिक्षकांविषयी त्यांना विचारले.
डीडब्लूओ म्हणाले, 'सर हे शिक्षक त्यांच्या ओळखीच्या एका बीएसफ जवानासोबत एकदा मोटरसायकलने कुठेतरी जाताना दिसले, आणि नक्षलांनी त्यांना बोलावून विचारले की तू इन्फॉर्मर का? आता त्यांच्या प्रजा कोर्टाची वाट बघण्यापेक्षा आपण त्यांना तिथून बदललेले बरे.'
कलेक्टर म्हणाले, 'ठीक आहे. पण बदली शिक्षक गेले पाहिजेत.'
थोडे थांबून डीडब्लूओ म्हणाले, 'सर अजून एक गोष्ट आहे. परवा पंधरा ऑगस्ट. चौदा ऑगस्टला रात्री नक्षल शाळांमध्ये जाऊन काळे झेंडे लावतात. मागच्या वर्षी असे झाले होते. आपण शिक्षकांना फोर्स करत नाही. दुर्लक्ष करतो. कारण ते भितीच्या दडपणाखाली असतात. हे असे पाच सहा शाळांमध्ये होते. या शाळांमध्ये दुसर्‍या दिवशी पोलीस आणि तहसीलदार जाऊन ते काळे झेंडे काढतात आणि तिरंगा फडकाऊन येतात.'
'बरं. मग?' कलेक्टरांनी विचारले.
'सर, आज सकाळी बीएसफचे काही जवान काही शाळांमध्ये गेले होते आणि शिक्षकांना झेंडावंदन करण्याविषयी बजावून आले. शिक्षक घाबरलेत. इकडून मार आणि तिकडूनही मार.'
विचारमग्न होऊन कलेक्टर 'ठीक आहे,' एवढेच म्हणाले.
(क्रमशः)

मंगळवार, १४ ऑगस्ट, २०१२

कृतज्ञता


लोकसत्ताच्या १३ ऑगस्टच्या अंकात "वाचावे नेटके" मध्ये अभिनवगुप्त यांनी या ब्लॉगची ओळख मांडली. लोकसत्ताची नेट एडिशन मी रोज पहात असलो तरी कामाच्या व्यापात मला लोकसत्ता पहायची त्या दिवशी सवड झाली नव्हती. मला महाराष्ट्रातून माझ्या मित्राचा फोन आला. त्यालाही मी या नावाने लिहितो हे माहीत नव्हते; पण त्याने "राऊ" हे नाव आणि त्याचा फोटो यावरुन ओळखले आणि मला फोन केला. माझ्या वडीलांना पण त्यांच्या एका मित्राने मुंबईतून असेच ओळखून फोन केला.

हा समीक्षावजा ओळख करुन देणारा लेख मी वाचला आणि कृतज्ञतेने भरुन आलो. आपले कौतुक केलेले कुणाला नाही आवडणार! पण त्याहून अधिक म्हणजे माझे लिखाण अगदी काळजीपूर्वक वाचून, समजून घेऊन, त्यामागची भूमीका समजून घेऊन लिहिलेला हा लेख मला उपकृत करुन गेला. 

अभिनवगुप्त हेही टोपणनावच असावे. पडद्यामागे राहून तटस्थपणे वाचनीय लेखांचा परिचय करुन देणार्‍या या अनामिकाला मी माझे आभार इथूनच कळवतो.

ब्लॉगच्या सर्व वाचकांचे आणि प्रतिसादकांचेही मी मनापासून आभार मानतो. त्यांच्या प्रोत्साहनामुळेही लेखनाचा हुरुप वाढतो.

वाचावे नेट-के : कलेक्टराच्या कथा..
अभिनवगुप्त : सोमवार, १३ ऑगस्ट २०१२

शनिवार, ११ ऑगस्ट, २०१२

ज्यां दूधकि नदियां बाहे...


१९७६ साली, म्हणजे माझ्या जन्माच्या जवळपास प्रदर्शित झालेला "मंथन" मी आजवर पाहिला नव्हता. मला आता राहून राहून याचे आश्चर्य वाटतेय. म्हणजे गाजलेला प्रत्येक सिनेमा मी पाहिलेलाच आहे, किंवा पाहिलेला असायला हवा वगैरे काही मनात नाही; पण माझ्याच डोक्यात घोळत असलेल्या "प्रांतांच्या गोष्टीं" च्या अनेक बीजांपैकी एक जणू साकार होऊन चित्रपटरुपात आपल्या समोर येतंय असं वाटत राहिलं. म्हणून आश्चर्य.
ही समीक्षा नाही. चित्रपट समजणे आणि तो समजाऊन सांगणे एवढी प्रगल्भता माझ्याकडे नाही. हे एक शेअरिंग आहे.
चित्रपट गाजलेला तर आहेच. एक उत्कृष्ट चित्रपट, श्याम बेनेगल - विजय तेंडुलकरांचा, ऑस्करसाठी भारताची एंट्री असलेला, स्मिता पाटील, गिरीश कर्नाड, नसिरुद्दिन शाह, डॉ मोहन आगाशे, अनंत नाग, अमरीश पुरी अशी तगडी स्टारकास्ट असलेला म्हणून दखलपात्र तर आहेच आहे. पण त्याहून अधिक महत्वाची गोष्ट म्हणजे "अमूल" चे आणि श्वेत क्रांतीचे शिल्पकार डॉ वर्गीस कुरीयन यांनी लिहीलेली कथा, स्वत:वर बेतलेले नायकाचे पात्र, आणि 'गुजरात कोऑपरेटिव मिल्क मार्केटिंग फेडरेशन' च्या पाच लाख शेतकरी भागधारकांनी प्रत्येकी दोन दोन रुपये जमा करुन निर्मीलेला सिनेमा या दोन बाबी या सिनेमाला एका वेगळ्या "एकमेव" कॅटॅगरीत नेऊन ठेवतात.
मंथनमधील मला भावलेल्या काही बाबींबद्दल, आणि मंथन पाहून मनात आलेल्या गोष्टींबद्दल लिहिण्याआधी थोडक्यात कथेची रुपरेखा सांगणे आवश्यक वाटते.
***********
गुजरातमधील एका दूर कोपर्‍यातील खेड्यामध्ये लोकांचे आयुष्य संथ आणि सुरळीत सुरु असते. दारिद्र्याने गांजलेल्या लोकांना त्याची सवय होऊन काही खुपत नसते. गावामध्ये एक दूध डेअरी असते. डेअरीमालक मिश्रा त्याच्या मर्जीनुसार दुधाचे दर ठरवून भरपूर पैसा जोडत असतो आणि सोबत सावकारीही करत असतो. कुणालाच त्यात काही वावगे वाटत नसते. मोठ्यांची बरोबरी लहानांनी करु नये हे साधे सरळ तत्व लहानांच्या अंगवळणी पडलेले असते, आणि मोठ्यांच्या तर सोयीचेच असते. गावात दलितांचे प्रमाण लक्षणीय असते. त्यांना आर्थिक आणि सामाजिक असा दुहेरी दारिद्र्याचा शाप असतो. अशा वेळी दारिद्र्यनिर्मूलन योजनांआंतर्गत खेडोपाडी सहकारी तत्वांवर डेअरी सुरु करण्यासाठी एक टीम गावात येते. टीम लीडर डॉ राव हा तिशीतील उमदा आशावादी व्हेटरनरी डॉक्टर असतो. त्याची दॄष्टी केवळ जनावरांच्या आरोग्यापुरती किंवा डेअरी सुरु करण्यापुरती सीमित नसते. सहकारी सोसायटी स्थापन करुन गरीबांना आणि दलितांना सन्मानाने जगण्याची संधी मिळवून देण्याचे स्वप्न तो पहात असतो. त्याच्या टीमला त्याच्या या व्हिजनशी फारसे देणेघेणे नसते. एकजण पूर्ण निराशावादी असतो. हे असले सहकारी सोसायटीचे प्रयोग बोलायला ठीक असतात, प्रत्यक्षात कधी येत नसतात वगैरे. एकजण पूर्ण प्रॅक्टिकल असतो. आपण फक्त डेअरी बघायचीय. ते सामाजिक समता आणि गावातील राजकारण याच्याशी आपला काय संबंध? तिसरा आपला मस्तपैकी लाल शर्ट घालून गावातील सौंदर्य न्याहाळण्यात (आणि जमलेच तर हाताळण्यात) मग्न असतो. ही टीमची अवस्था. गावातही परिस्थिती फारशी बरी नसते. मिश्राला तर हा तापच असतो. गावचा सरपंच सोसायटीकडे त्याचा नवा प्लॅटफॉर्म म्हणून बघत असतो. गावातील अन्य लोक उदासीन असतात.
दलित वस्तीमधील भोला हा तरुण आक्रमक वृत्तीचा असतो, त्याचाही शहरी लोकांवर अकारण (अकारण म्हणा किंवा वैयक्तिक कारणांमुळे म्हणा. त्याच्या आईला एका शहरी बाबाने फसवलेले असते असा एका संवादात पुसट उल्लेख आहे) राग असतो. अशा सर्व बाजूंनी हताश वातावरणात हार न मानता डॉ राव आपले प्रयत्न जारी ठेवतात. एका प्रसंगात जनावरांचे इंजेक्शन एका मृत्युघटका मोजणार्‍या लहान मुलाला देऊन त्याचा जीव ते वाचवतात, आणि कृतज्ञता म्हणून त्या मुलाचे पालक त्यांच्या सोसायटीत यायला तयार होतात आणि गाडी रुळाला लागते. तरी भोलाला आपल्या बाजूला आणणे, आपल्या रंगील्या टीममेंबरला अर्ध्या रात्री सामानासकट गावाबाहेर काढणे, मिश्राच्या फोडा आणि झोडा कारवायांना पुरुन उरणे हा सर्व संघर्ष डॉ रावना करावाच लागतो. बरे, पत्नीची या सर्वात साथ असावी, तर तेही नाही. तिला या लष्करच्या भाकरी आजिबात पसंत नसतात. अशातच सोसायटीच्या निवडणुकीचा प्रश्न येतो. सरपंचाचा या निवडणुकीला विरोध असला तरी डॉ राव आग्रह धरतात, आणि भोलाच्या आक्रमक भूमीकेमुळे दलित मोती सरपंचाला हरवून अध्यक्ष बनतो. हे सहन न होऊन सरपंच आपल्या लोकांकरवी दलित वस्तीला आग लावून देतो. वर कायदा सुव्यवस्थेचे कारण दाखवून पोलीस दलितांनाच आत टाकतात. त्यांना बाहेर काढण्याचे आणि सर्व सहाय्य करण्याचे नाटक करुन मिश्रा पुन्हा सर्वांना आपल्या दावणीला बांधतो. डॉ रावचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी गावातील एका गरजू बाईकरवी त्यांच्यावर बलात्काराची खोटी तक्रार करवतो. इकडे डॉ रावांवर वैतागलेला सरपंच त्यांची बदली करवण्याच्या पक्क्या इराद्याने राजधानीला जातो. रावांची बदली होतेच. निराश मनाने डॉ राव कुणाचाही निरोप न घेता गाव सोडून निघून जातात. पण जिद्दी भोला सोसायटी पुनर्जीवित करतो, आणि हिंमतीने चालवायला घेतो.
**********
ही झाली थोडक्यात कथेची रुपरेखा. प्रत्यक्षात सिनेमा अनेक तरल बाबींना स्पर्शून जातो. स्मिता पाटीलने साकारलेली बिंदू ही व्यक्तिरेखा म्हणजे एक आख्खा वेगळा सिनेमाच आहे असे म्हणले तरी चालेल. डॉ राव यांच्या पत्नीच्या पात्राला जेमतेम एखादा संवाद असेल नसेल, पण डॉ रावांच्या अनेक लाएबलिटीजपैकी अजून एक असे ते ओझे संपूर्ण सिनेमाभर जाणवत राहते. डॉ मोहन आगाशे त्यांच्या कॅज्युअल रिमार्क देण्याच्या शैलीत ते पात्र गावातील राजकारणापासून किती अलिप्त असावे याचा एक स्पष्ट दाखला देऊन जातात. अशा किती म्हणजे किती गोष्टी सांगाव्यात! गिरीश कर्नाडांविषयी काहीही बोलण्याची मज पामराची आजिबात लायकी नाही एवढेच बोलतो. संपूर्ण सिनेमाला व्यापून हे पात्र उरते. एखादा आदर्शवादी, तरीही व्यवहारी हिंमतवान तरूण एखादे काम तडीस नेण्यासाठी कशा प्रकारे वागेल हे अतिशय वास्तविक रीतीने या सिनेमात दाखवले आहे.
चित्रपटाचे शीर्षक गीत म्हणजे एक वेगळाच विषय आहे. अलीकडेच अमूल ने सुनिधी चौहानच्या आवाजात पुनर्मुद्रित केले आहे. छानच आहे; पण मूळ गाण्यातील गोडवा काही वेगळाच. मेरो गांव काठाबाडे ज्यां दूधकि नदियां बाहे मारो घर आंगणाना भूलो ना...सिनेमात स्मिता पाटीलच्या भावमुद्रांवर हे चित्रित केले आहे.
***********
सिनेमात सहकारी चळवळ एका दुर्गम गावामध्ये प्रतिकूल परिस्थितीत रुजवण्याचे प्रयत्न चित्रीत केलेले आहेत. अतिशय सुंदर रीतीने हे चित्रण झालेले आहे. कुठेही अतिरेक नाही. अवास्तव प्रसंग नाहीत. साहजिकच आहे. स्वतःच्या अनुभवांवर आधारित अशी कथा पद्मविभूषण डॉ वर्गीस कुरीयनांनी लिहिलेली आहे, आणि तीही श्याम बेनेगलांसोबत. विजय तेंडुलकरांची पटकथा. परफेक्ट.
************
सिनेमाची गोष्ट आणि खरी गोष्ट यात थोडे अंतर आहे. काही महत्वाचे सत्याचे अंश असे, की दुधातील स्निग्धांशाच्या प्रमाणात दुधाचे मूल्य देणे ही पद्धत कुरीयनांनी सुरु केली. त्यातून सचोटीला इंसेटिव्हाइज करण्यात आले. दुसरे म्हणजे (जात हा मागासलेपणाचा निकष ठरवून) जातीवर आधारीत गरीबांचे संघटन करण्यात आले, आणि त्यातून सहकारी चळवळ उभी राहिली. (ते योग्य की अयोग्य हा भाग वेगळा; पण अमूलचा खरा इतिहास हा असाच आहे). डॉ रावांचा आदर्शवाद आणि त्यासाठी त्यांनी झटून केलेले परिश्रमही इतिहासावर आधारित आहेत. पण हा सिनेमा म्हणजे अमूलचा इतिहास असे मानण्यापूर्वी काही मुद्दे ध्यानात घेतले पाहिजेत. खरी गोष्ट अशी आहे, की ज्या आनंदमध्ये डॉ कुरीयननी ही चळवळ रुजवली, ते आनंद मुळीच दुर्गम नव्हते. अहमदाबाद मुंबईला जोडणार्‍या रेल्वे लाईनवर होते. (सिनेमातही रेल्वे लाईन दाखवली आहे म्हणा.) सहकारी चळवळीचे बीज आनंदमध्ये गांधीजी आणि सरदार पटेलांनी १९१८ मध्येच खेडा सत्याग्रहाने रुजवले होते. त्यामुळे सहकार तिथे नवा नव्हता. दूध व्यवसायही तिथे नवा नव्हता. पॉलसन डेअरी आनंदमधील दूध गोळा करुन मुंबईला विकायची. त्रिभुवनदास पटेलांनी या मक्तेदारीला आळा घातला. हे सरदार पटेलांचे चेले. सतत पंधरा दिवस पॉलसनला दूध द्यायचे नाही केवळ या अट्टाहासापाई शेतकर्‍यांनी दूध रस्त्यावर ओतले. हे १९४६ साली. त्यांनी खेडा डिस्ट्रिक्ट मिल्क प्रोड्युसर्स युनियन स्थापन केली. वर्गीस कुरीयनांचे भारत सरकारशी काँट्रॅक्ट होते. त्यांना सरकारने स्कॉलरशिप दिली होती. परदेशात शिकायला. त्याबदल्यात त्यांना आनंद इथे दूध पावडर करायचे एक काम करावे लागत होते. ही म्हणजे या मेटलर्जी आणि न्यूक्लियर फिजिक्स मध्ये उच्च शिक्षण घेतलेल्या माणसाची थट्टा होती. पण माणूस जबरदस्त सामाजिक जाणीव असलेला. राजीनामा देऊन कुरीयन तिथून काढता पाय घ्यायच्या बेतात असताना त्रिभुवनदासांनी त्यांना गाठले आणि थांबण्यासाठी गळ घातली. कुरीयनही थांबले. त्रिभुवनदास चेअरमन आणि कुरीयन जनरल मॅनेजर अशी नेता-टेक्नोक्रॅट जोडी जमली. सचोटीचे अधिष्ठान होतेच. सरकारी पाठींबा होता. लोकांचे संघटन करायला त्रिभुवनदासांची काँग्रेस आणि सरदारांची पुण्याई गाठीला होती. अमूल असे आकाराला आले.
अमूल ने केलेली तीन प्रकारे क्रांती केली असे म्हणता येते - १. गरीबांचे संघटन, आणि त्या संघटनाला अर्थकारणाची जोड, त्यातून ग्रामीण अर्थकारणाचे "मॉनेटायझेशन". २. जातीवर आधारीत संघटनातून सहकारी चळवळीचा विकास. (योग्य की अयोग्य माहीत नाही). ३. पायाभूत सुविधांचा ग्रामीण भागात प्रसार आणि डेअरीमधील अद्ययावत तंत्रज्ञानाची ग्रामीण भागाला ओळख.
अमूल अनेक गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे. अमूल गर्ल, अमूल साँग, मंथन सिनेमा, तसेच अमूलचे अजून एक अमूल्य योगदान स्वतंत्र भारताच्या इतिहासात आहे - नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड. राष्ट्रीय पातळीवरील ही एकमेव संस्था अशी आहे, की जी अमूल सारख्या एका स्थानिक संस्थेने, शेतकर्‍यांच्या सहकारी संस्थेने निर्माण केलीय. अमूलचा प्रयोग देशभरात रिप्लिकेट करण्यासाठी आजवर या संस्थेन ९६००० सहकारी संस्थाचे जाळे तयार केलेय. राजकीय नेतृत्वाने ठरवले तर कसले जबरदस्त सामाजिक काम होऊ शकते याचे अमूल जितेजागते उदाहरण आहे.
अमूलची फिलॉसॉफी समजून घेण्यासाठी मंथन हा सिनेमा अवश्य पहावा.

गुरुवार, २६ जुलै, २०१२

एका म्यानात दोन तलवारी


सकाळी नऊ वाजता चीफ डिस्ट्रिक्ट मेडीकल ऑफिसर डॉ कर यांचा फोन आला. कलेक्टरांनी उचलला. "गुड मॉर्निंग सर. मला लगेच भेटायचंय, येऊ का?" "गुडमॉर्निंग डॉक्टर. या. काय अर्जंट? " कलेक्टर उत्तरले. "सर मी चाललो तुमच्या जिल्ह्यातून. मी एकही क्षण इथे थांबणार नाही. माझ्यावर काय अ‍ॅक्शन घ्यायची ती घ्या. " उत्तेजित स्वरात डॉक्टर बोलले. कलेक्टर म्हणाले, "लगेच या डॉक्टर. बोलू आपण."
*********
कलेक्टरांना आश्चर्य वाटले. डॉ करांना जिल्ह्यात येऊन चारच महिने झाले होते. आल्यापासून त्यांनी कलेक्टरांना कसलीच तोशीस पडू दिली नव्हती. एनआरएचएमचा कोट्यवधी रुपयांचा व्याप सांभाळणे साधी बाब नव्हती. मेडीकल ऑफिसर्सच्या तीव्र कमतरतेमुळे जिल्ह्यात मेडीकल सेटपमध्ये कमालीचा सावळा गोंधळ माजला होता. देखरेखीच्या नावाने आनंद होता. वाड्यावस्त्यांवरुन बाळंतपणाला येणार्‍या बायाबापड्यांच्या हातात जननी सुरक्षा योजनेचे सगळे पैसे पडतील याची खात्री नव्हती. रेडक्रॉसमधून फुकट दिलेल्या अ‍ॅम्ब्युलन्सचा ड्रायव्हर पेशंटकडून पैसे घेणारच नाही याची शाश्वती नव्हती. जिल्ह्याभरातील करोडो रुपयांची बांधकामे निधी दिलेला असूनही खोळंबून पडली होती. अशा परिस्थितीत कलेक्टरांनी आरोग्य सचिवांच्या मागे लागून डॉ करांना या नक्षलग्रस्त जिल्ह्यात आणले होते. डॉ कर आपल्या सचोटीसाठी आणि ज्ञानासाठी ख्यात होते. रिटायरमेंटला दीडच वर्ष राहिल्यामुळे ते राजधानीपासून एवढ्या दूर यायला नाखूश होते. पण कलेक्टरांनी त्यांना संपूर्ण सहकार्य आणि संरक्षणाची हमी दिली होती. त्यांचे अधिकृत आवास अद्ययावत करुन दिले होते.
डॉक्टरांनीही आल्या आल्या व्यवस्थेचा ताबा घेतला होता. फाइलींना शिस्त लावली होती. वेळी अवेळी मुख्य दवाखान्यात अचानक चकरा मारुन नर्सेस वॉर्डबॉइज जागेवर आहेत का ते बघत. औषधांच्या दुकानांमध्ये जेनेरिक मेडीसिन्स मिळतायत याची खातरजमा करीत. पेशंट्सची हालहवाल विचारुन त्यांच्यासोबत आलेल्या मंडळीचीही विचारपूस करीत. दररोज तीन चार तास ते जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणी भेटी देण्यासाठी राखून ठेवीत. खेड्यापाड्यांतून फिरुन मोबाइल हेल्थ युनिट तिथे जाते आहे की नाही, मुख्यमंत्री सहायता निधीचा लाभ गरीब रुग्णांना मिळतो आहे की नाही ते पहात. कुपोषण रोखण्याच्या कार्यक्रमात अंगणवाडी सेविका, आशा दिदि आणि एएनएम यांच्यात ताळमेळ आहे की नाही ते तपासत. प्रायमरी हेल्थ सेंटर्सच्या नूतनीकरणासाठी आलेला पैसा मार्गी लागतो आहे की नाही त्याचा पाठपुरावा करीत. एवढेच करुन ते थांबले नव्हते. कलेक्टरांकडे ठाण मांडून त्यांनी जिल्हा मुख्य दवाखान्यासाठी एक अधिकचा मॅटर्निटी वॉर्ड, स्पेशल न्यू बॉर्न केअर युनिट, आय वॉर्ड, कँटीन, पेशंट्सच्या सोबत्यांसाठी डॉर्मेटरी, ब्लड बँकेसाठी ब्लड सेपरेशन युनिट असा तीनेक कोटींचा हिस्सा इंटिग्रेटेड अ‍ॅक्शन प्लॅनमधून मिळवला होता. कलेक्टरांनीही कौतुकाने त्यांनी न मागता हॉस्पिटलसाठी पाणी शुद्धीकरणासाठी एक आरओ प्लँट आणि पाणी तापवण्यासाठी सोलार पॅनेल मंजूर केले होते. एकदा जिल्ह्यात एका गंभीर अपघातात सतरा ठार आनी चाळीस जखमी झाले होते. सकाळी सहाला त्यांनी डॉक्टरांना फोन लावला तर ते स्पॉटवर हजरच होते. प्रांत आणि पोलीसांच्या बरोबरीने आपली टीम घेऊन जखमींवर प्रथमोपचार, अम्ब्युलन्स, शववाहिका इत्यादि सोपस्कार पार पाडीत होते. साधे श्रेय घेण्यासाठीही त्यांनी कलेक्टरांना डिस्टर्ब केले नव्हते.
असला हिरा व्यवस्थेत असू शकतो असे कलेक्टरांना यापूर्वी कधी वाटले नव्हते. डॉक्टर मात्र प्रत्येक गोष्टीचे श्रेय कलेक्टरांच्या नेतृत्वालाच द्यायचे. कलेक्टर त्यांच्या वयाचा, ज्ञानाचा, आणि चारित्र्याचा मान राखून त्यांना वडीलांच्या जागी मानायचे तर डॉक्टर कलेक्टरांना जिल्ह्याच्या पित्याच्या जागी मानून अतिशय आदराने वागायचे. या अशा मधुर संबंधांमध्ये मिठाचा खडा कुणी बरे टाकला असावा? काय घडले असावे? कलेक्टर विचारात पडले.
*****
दहाच मिनिटांत डॉक्टर आले. भावनावेगाने कापत्या आवाजात कलेक्टरांना म्हणाले, "आत्ता सकाळी मला कालीप्रसाद पाणिग्रही नावाच्या एका माणसाचा फोन आला. अतिशय गलिच्छ आणि अर्वाच्य भाषेत त्याने मला शिव्या घातल्या. आजवर माझा असा अपमान कुणीच केलेला नाही. या जिल्ह्यासाठी मी कायकाय केले नाही? माझी फॅमिली सोडून मी इथे येऊन राहिलो. सगळ्या प्रतिकूल परिस्थितीत आरोग्यसेवा सुरळीत चालू ठेवतोय. आणि कुणी एक माजी आमदार उठतो आणि मला अपशब्द बोलतो?" नकळत डॉक्टरांच्या डोळ्यांतून संतापाचे अश्रू वाहू लागले. कलेक्टर उठले. त्यांच्याजवळ जाऊन त्यांना हाताला धरुन उठवले आणि घराबाहेरील लॉनमध्ये घेऊन गेले. लाकडी घडीच्या खुर्च्यांवर बसत त्यांनी सुभाषला पाणी आणायला सांगितले आणि कॉफी मागवली. कलेक्टर काहीच बोलले नाहीत. थोडा वेळ जाऊ दिला. डॉक्टर म्हणाले, "सर या असल्या रिमोट आणि नक्षलग्रस्त जिल्ह्यामध्ये कोण येतंय? अर्धा जिल्हा अधिकार्‍यांवाचून रिकामा पडलाय. माझे वय असल्या दगदगी करण्याचे नाही. तरी तुम्ही बोलला म्हणून मी आलो. कधी तुम्हाला माझ्या कामात काही कुचराई दिसली? त्या कालीप्रसादला माहीत नसेल असल्या डोंगरांमधल्या वाड्यांवर मी या वयात जाऊन तिथे कुणी गरोदर बाया आहेत का, कुणी औषधांवाचून मरतंय का ते बघून आलोय. काय मोबदला मागतो मी? माझ्या वयाचा नसू देत, कामाचा तरी आदर रहावा? तोही नसेल रहात तर मी कशासाठी राबू? मी चाललो."
कलेक्टर म्हणाले,"बरोबर आहे तुमचं. पण कालीप्रसाद असं बोलणं शक्य नाही. तो रीझनेबल माणूस आहे. तुमची खात्री आहे तो नक्की कालीप्रसादच होता?"
"शंभर टक्के. तो स्वतःच म्हणाला. आणि त्याचा नंबर मी बिजयला दाखवला. त्यानेही कन्फर्म केलं."
"अस्सं. काय म्हणाला तो?"
" तो म्हणाला, की लक्ष्मीपूर सब डिव्हीजन हॉस्पीटलमध्ये ऑर्थोपेडीक सर्जन नाही, गायनॅकॉलॉजिस्ट नाही, पेशंट्सचे हाल होतायत, तुम्ही काय करताय? मी म्हणालो, डॉक्टर नाहीत हे मला माहीत आहे. सगळ्या जिल्ह्यातच नाहीत. तरी आम्ही तिथे आठवड्यातून तीन दिवस दोन डॉक्टरांची ड्यूटी लावलेलीच आहे. यापेक्षा वेगळे मी काय करु शकतो? तो म्हणे, ते मला माहीत नाही. इथे कायमस्वरुपी डॉक्टर दिले नाहीत तर मला इथे एजिटेशन करावे लागेल. मी म्हणालो, करा. तुमचा धंदाच आहे. मी नको म्हणलो तर थांबणार आहात का? यावर त्याने सरळ मला शिव्या घालायला सुरुवात केली. म्हणाला हाताला धरुन फरफटत जिल्ह्यातून हाकलून देईन. आणि बरंच काहीबाही बोलला."
"हं. ठीक आहे. मी बोलतो त्याच्याशी. विचारतो त्याला," कलेक्टर म्हणाले.
"हे बघा सर, तुम्ही त्याच्याशी बोला किंवा बोलू नका. मला ते सांगू नका. मी आत्ता चाललोय. तुम्हाला सांगायला आलोय एवढंच."
"बरं डॉक्टर. मी अडवणार नाही तुम्हाला. फक्त आजच्या ऐवजी उद्या जा. जमेल?"
डॉकटरंना हे थोडेसे अनपेक्षित असावे. ते म्हणाले, "सर माझ्या टीमने स्ट्राइक करायचा निर्णय घेतलाय. निषेध म्हणून."
कलेक्टर म्हणाले, "तुम्हाला जर असं वाटत असेल की स्ट्राइक केल्यानं तुमचा झाला अपमान धुऊन जाणार आहे, तर अवश्य करा. पण ज्या गरीब पेशंट्स साठी तुम्ही एवढ्या खस्ता खाता त्यांचाही जरा विचार करा."
"सर, तुम्ही मला ओळखत नाही काय? हा स्ट्राइक ही माझी तुम्हाला नाही, तर त्या कालीप्रसादला धमकी आहे. त्याच्या गाढवपणामुळे लोकांना त्रास होतो, हे मला दाखवायचे आहे."
"हं. ठीक आहे. तुम्ही हा स्ट्राइक उद्यापासून करा. मला एक दिवस वेळ द्या."
"हवा तेवढा वेळ घ्या सर. माझा निर्णय बदलणार नाही. तुम्हाला माहीत आहे, इथे यायच्या अगोदर माझ्या मागच्या पोस्टिंगमध्ये मी माझ्या घरी लोकांवर मोफत उपचार करायचो. बाकीच्या डॉक्टरांसारखा खाजगी प्रॅक्टिस नव्हतो करत. अजून लोक रोज विचारत असतात, डॉक्टर केंव्हा येणार म्हणून. सामळबाबू तर मला रिटायरमेंटनंतर पार्टीत या, तिकीट देतो म्हणून मागे लागलेत. फक्त तुमच्या शब्दाखातर मी इथे आलो."
"डॉक्टर, तुम्ही माझ्या वडीलांच्या जागी. पेशंटमध्ये तुम्ही तुमचा साई पाहता, मी माझ्या जिल्ह्यातील दीन माणसामध्ये माझा गुरु पाहतो. आपण दोघेही गुरुबंधू. माझ्याशब्दाखातर इथे आलात असं म्हणता. हा अहंकार तुम्हाला कसा काय डसला? कुणा एकाने अपमान काय केला, लगेच तुमच्या साईला विसरलात? ह्या दीनदुबळ्यांना असं वार्‍यावर सोडून निघालात? अहंकारासाठी? साईंनी विचारलं तर काय उत्तर देणार?"
डॉक्टर कलेक्टरांकडे पहात राहिले. काहीच बोलले नाहीत. कलेक्टरांनी वेगवेगळे विषय काढत तासभर बोलून डॉक्टरांना शांत केले.
डॉक्टर गेल्यावर कलेक्टरांनी एस्पीला फोन लावला. "विशाल, अरे हा कालीप्रसाद सीडीएमओंना वाकडंतिकडं बोललाय. ठीक आहे ना तो? असं ऐकलं नव्हतं त्याच्याबद्दल." "दारु प्यायला असेल. शहाणा नाहीच आहे तो." "नाही रे. सकाळी सकाळी त्याने फोन केलावता. जरा इन्स्पेक्टरकडून चौकशी कर काय भानगड आहे ते." "ठीक आहे. मी बघतो," एस्पी म्हणाले.
कलेक्टरांनी क्षणभर विचार केला, कालीबाबूंनाच फोन लावावा का? कालीबाबूंशी त्यांचे व्यवस्थित संबंध होते. कलेक्टर त्यांना पुरेपूर मान देत. विरोधी पक्षाचे माजी आमदार असले तरी अधून मधून त्यांना फोन करीत. कधी भेटायला आले तर बसवून चहा पाजून पंधरावीस मिनिटे खर्चत त्यांच्याकडून बातम्या काढून घेत. त्यांचे एखादे किरकोळ काम लगोलग करुन टाकीत त्यांचा विश्वास त्यांनी मिळवला होता. कालीबाबूंनीही कधी त्याचा गैरफायदा घेतला नव्हता.
थोडा विचार करुन कलेक्टरांनी त्यांच्या एका तहसीलदाराला फोन लावला. हा नोकरीत यायच्या अगोदर राजकारणात होता, आणि एक निवडणूकपण त्याने लढवली होती. फक्त चार हजार मतांनी हरला होता. आदिवासी होता. भरवशाचा आणि तल्लख बुद्धीचा माणूस. कालीप्रसाद त्याला मानत असे.
"हन्ताळबाबू, कालीप्रसादला जरा विचारा तर सीडीएमओंना काय बोलला ते. त्याला म्हणावं सीडीएमओ कुणाला सांगत नाहीत, पण मला एका हॉस्पिटल स्टाफकडून समजलंय, आणि कलेक्टरांच्या पण कानावर गेलं असेल बहुदा, अशा पद्धतीने बोलून बघा जरा."
"सर्टनली येस, सर." हन्ताळबाबू उडत्या पाखराची पिसे मोजणारातले होते. दहाच मिनिटांनी त्यांनी कॉल बॅक केला. म्हणाले, "सर मी बोललो कालीशी. तो खरंच अपशब्द बोललाय सीडीएमओंना. पण त्याला वाईट वाटतंय आणि समजत नाही काय करायचं ते. काळजी करु नका सर, तो येतोय की नाही बघा तुमच्याकडे."
अर्ध्या तासाने कालीप्रसादांचा कलेक्टरांना फोन आला. इकडचे तिकडचे बोलून म्हणाले, "तुम्हाला सीडीएमओ काही बोलले का?"
वेड पांघरत कलेक्टर म्हणाले, "नाही. कशाच्या संदर्भात? तुम्ही काही काम सांगीतलंय का त्यांना?"
"नाही. जरा घोटाळा झाला. आज सकाळी मी त्यांना फोन केला होता. तुम्हाला माहीत आहे, मी कधी कुठलया अधिकार्‍याला फोन करत नाही. अगदीच लोकांचं काही काम असेल तरच मी भेटतो किंवा बोलतो. तर मी या सीडीएमओंनापण ओळखत नाही. पण आज मी असाच सहज चक्कर मारायला लक्ष्मीपूर दवाखान्यात गेलो असताना तिथल्या अडचणींसंदर्भात मी त्यांना फोन लावला. ते माझं काही ऐकून न घेता मला म्हणाले काय करायचं ते करा, तुमचा धंदाच आहे. मग मला संताप आला. हा माझा धंदा नाही. लोकांसाठी मी जगतो. मी सरळ बोलत असताना त्यांना असं वाकड्यात बोलायची गरज नव्हती. मी रागाच्या भरात फार बोलून बसलो."
कलेक्टर म्हणाले, "झाली गोष्ट बरी नाही झाली कालीबाबू. या डॉक्टरांना मी मागे लागून आपल्या जिल्ह्यासाठी आणले होते. त्यांनी गेल्या चार महिन्यांत किती सुधारणा आणली तुम्हीच बघा.त्यांना सांभाळणं आपली सगळ्यांची जबाबदारी आहे. या नक्षल भागात एक तर डॉक्टर मिळत नाहीत आपल्याला. आपणच असं वागलो तर दोष कुणावर येईल सांगा बरं."
कालीबाबू नम्र आवाजात म्हणाले, "चूक झाली खरी. पण काय करावे म्हणता? तुमच्याकडे येतो संध्याकाळी."
"या," कलेक्टर सुटकेचा निश्वास सोडत म्हणाले. प्रॉब्लेम सुटल्यात जमा होता. त्यांनी डॉक्टरांना फोन लावला. "कालीप्रसाद संध्याकाळी माझ्याकडे येतोय. मी तुम्हाला बोलावीन, तेंव्हा या."
"तुम्ही त्याला बोलावलं असेल तर मी येणार नाही. मला अजून त्या माणसाचे तोंडही बघायचे नाही, आणि अजून काही वाकडं ऐकायची माझी तयारी नाही."
"डॉक्टर, माझ्यावर विश्वास आहे ना? तुम्ही या."
******
संध्याकाळी कलेक्टरांनी पीए ना सांगून ठेवले, कालीबाबू आल्यानंतर पंधरा मिनिटांनी सीडीएमओंना बोलवायचे. ठरल्याप्रमाणे कालीबाबू आले. कलेक्टरांनी प्रसन्न हसतमुखाने स्वागत केले. चहा मागवला. इकडच्या तिकडच्या गप्पा मारल्या. तोवर सीडीएमओ केबिनमध्ये आले. "या डॉक्टर! या, बसा. हे कालीबाबू. माजी आमदार. आणि माझा फार मोठा आधार. आपले टीम मेंबरच म्हणा ना. आणि कालीबाबू, हे आपले सीडीएमओ. एक्स्ट्राऑर्डीनरी ऑफिसर."
डॉक्टर कलेक्टरांपुढे, कालीबाबूंशेजारी बसले. टेबलकडे पहात. कालीबाबू अपराधी नजरेने एकदा कलेक्टरांकडे तर एकदा डॉक्टरांकडे पहात नम्र आवाजात बोलले, "चूक झाली माझी. वाईट बोललो आपल्याला." सीडीएमओंच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. चष्मा काढून टेबलवर ठेवत रुमालाने डोळे पुसत कापत्या आवाजात म्हणाले, "असला अपमान उभ्या आयुष्यात झाला नाही माझा. आपली ओळख तरी आहे का? काय केलंत?" कालीबाबू उठले आणि वाकून सरळ सीडीएमओंचे पाय धरले. सीडीएमओ पाय बाजूला सारत उठले आणि म्हणाले, "काय करता!" कालीबाबूंनी सीडीएमओंना मिठी मारली आणि म्हणाले, "माफ करा मला. अडाणी माणूस मी. असं होणार नाही परत."
दोघेही बसले. कलेक्टर कृतज्ञ स्वरात म्हणाले, "कालीबाबू तुमचं मन किती मोठं आहे ते आज मी पाहिलं. असे नेते असतील तर या जिल्ह्याला काळजी नाही. आणि डॉक्टर, आज तुम्हाला एक असा मित्र मिळालाय, जो अर्ध्या रात्री येऊन तुमची मदत करील."
"हण्ड्रेड पर्सेंट," कालीबाबू म्हणाले.
चहा घेऊन निरोप घेऊन सीडीएमओ निघून गेले. कालीबाबू कलेक्टरांना म्हणाले, "आज दुपारी मी घरी जेवायला गेलोच नाही. माझ्या धाकट्या भावाने जर मला विचारलं असतं, असं का बोललास, तर मी माझ्या धाकट्याला जाब द्यायचा काय? तुम्हीपण मला विचारलं असतंत तर काय राहिली असती माझी इज्जत?" कलेक्टरांनी उठून कालीप्रसादचा हात हातात घेतला आणि म्हणाले, "एवढा आत्मसन्मान असलेला मित्र मला मिळाला, भरुन पावलो," आणि कालीबाबूंना निरोप दिला.
जिल्हा चालवण्यासाठी कलेक्टर दोघांपैकी कुणालाही गमावू शकत नव्हते, आणि दोघांच्याही चारित्र्यामुळे एकाच म्यानात दोन तलवारी ठेवणे कलेक्टरांना शक्य झाले होते.