बुधवार, ८ एप्रिल, २००९

भारतीय इतिहासातील सुवर्णयुग – एक प्रश्नचिन्ह (तीन)


खजुराहो, कोणार्क आदि मंदिरांवरील मैथुन शिल्पांच्या कारणमीमांसेविषयी बरंच उलटसुलट वाचलं होतं. लैंगिक शिक्षण, कामसूत्राचे चित्रीकरण इ. स्पष्टीकरणे ऐकली होती. कोणार्क मंदिर पाहताना गाइडने दिवे पाजळले होते – म्हणे लोकांमध्ये बौद्ध धर्माच्या प्रभावामुळे विरक्ती वाढत चालली होती, ती कमी करून ‘प्रवृत्ती’ वाढवण्यासाठी ही उत्तेजक शिल्पे निर्मीली. ओशो रजनीश म्हणून गेले की ही शिल्पे मंदिराच्या बाहेर आहेत, आत नाहीत : याचा अर्थ असा की कामवासना बाहेर ठेऊन आत देवाजवळ या! गंमतच आहे. हा संदेश देण्यासाठी, देवाजवळ जाता जाता भक्ताला उत्तेजित करून तो विचलित होतो की नाही, अशी विचित्र परीक्षा घेण्याचे काय कारण? बौद्ध धर्माच्या प्रसाराने विरक्ती वाढत असती तर थायलंड मधला वेश्याव्यवसाय जगात अव्वल बनला नसता, आणि चीनची लोकसंख्या पण व्यवस्थित आटोक्यात राहिली असती. लैंगिक शिक्षण हे एक शास्त्र आहे. ही शिल्पे काही त्या दृष्टीने बनवली गेलेली नाहीत.शरीरशास्त्राच्या दृष्टीने त्यात काहीही नाही. ती सरळ सरळ ब्लू फ़िल्म आहे. 

कामसूत्राचे चित्रीकरण हे एकमेव स्पष्टीकरण येथे लागू पडते.

आता प्रश्न असा आहे, की शृंगाराचे हे नागडे प्रदर्शन देवळांवर का? दुसऱ्या जागा मिळाल्या नाहीत का? शोधलं तर हेच उत्तर मिळतं की ही देवळे देवाची नसून देवाचे स्थान स्वत: धारण करू इच्छिणाऱ्या सत्ताधाऱ्यांची होती. नावाला आपला देवाला ठेवायचा. बृहदेश्वर (तंजावर) मंदिरात तर राजराज चोळाची मूर्ती आहे पण. त्या मंदिराला राजराजेश्वर मंदिर असेही म्हणतात. राजा विष्णूचा अवतार म्हणे – कारण तो पृथ्वीपती! मग या विष्णूच्या अवताराचे विलास त्याच्या देवळावर नकोत? राजवाडे पुरेसे वाटले नाहीत, प्रासादातले भोग अपुरे वाटले. मग ही वासना सीमा ओलांडून देवळात शिरली. हा त्यावेळच्या विलासी सत्ताधाऱ्यांच्या मनाचा आरसा आहे. या मंदिरांच्या निर्मितीचा काळ पहा – गझनवी आणि घुरी याच काळात धाडी मारत होते. आणि या आपल्या रावबाजींना त्यांच्या चाळ्यांमधून फुरसत नव्हती. देवळे स्वतंत्र सत्ताकेंद्रे बनली होती. अफाट संपत्ती असायची यांच्याकडे. गावेच्या गावे या देवळांच्या सत्तेखाली असायची. आणि त्यांचे रक्षणकर्ते क्षत्रिय विलासात मग्न असायचे. हा कसल्या समाजाचा आरसा आहे?

याच काळात गझनवीसोबत भारतात आलेला अल्बेरूनी काय म्हणतो पहा – ‘भारतीयांकडे प्रचंड ज्ञान आहे, पण ती एका विशिष्ट वर्गाची मक्तेदारी आहे. या लोकांना वाटते त्यांच्याइतके शहाणे जगात कोणीच नाही. यांना समुद्र ओलांडून जाणे म्हणजे पाप वाटते.’ समाजाने स्वतःला कोंडून घेतले होते. शेकडो जाती निर्माण झाल्या होत्या. निरनिराळ्या स्मृती लिहिल्या गेल्या. या स्मृती सर्वांसाठी न्याय्य नक्कीच नव्हत्या.

शहरे जातींची बंधने शिथील करतात. शहरीकरण व्यापाराला उत्तेजक, पोषक असते. आर्थिक हितसंबंध समाजाला खुले करतात. मोकळे वारे वाहतात. याउलट खेडी. साचलेली डबकी असे आंबेडकर खेड्यांना म्हणत ते उगीच नाही. ते म्हणायचे, खेडी हा भारताच्या गौरवाचा विषय नसून ती इतिहासातली काळी पाने आहेत. खेडी होती म्हणून जातीव्यवस्था मजबूत राहिली, अस्पृष्यता जन्मली, आणि फोफावली.

आपण विचार करत असलेल्या काळात हेच घडले. शहरीकरण कमी झाले, ग्रामीणीकरण वाढले. कशावरून? पहा. गुप्तांच्या अगोदर कुषाण होते. रेशीम मार्ग यांच्या राज्यातून जायचा. समृद्ध व्यापारामुळे शहरीकरण होते. या काळात सोन्याच्या नाण्यांपेक्षा तांब्याची नाणी अधिक प्रमाणात सापडली आहेत. याचाच अर्थ चलनी नाणी साधारण जनतेला उपलब्ध होती. वस्तुविनिमयाला चांगला पर्याय उपलब्ध होता. म्हणजेच शहरे होती. व्यापार होता. बंदरे होती. (असा तर्क आहे की दर्यावर्दी सिंदबादच्या कहाण्या अरबी नसून मूळ सिंधी व्यापारी नायकाच्या होत्या. युयुत्सु व्यापारी समुद्र ओलांडून दूर दूर जायचे. कौंडिण्य व्यापाऱ्यानेच तर आग्नेय आशियाचे आर्यीकरण केले. आजपावेतो (मुस्लिम) इंडोनिशिया मध्ये गरुडाला मानाचे स्थान आहे. थायलंडच्या राजाला ‘राम’ म्हणतात. सुकार्णो, मेगावती, ठकसिन, ही तर सरळ सरळ संस्कृत नावे आहेत. असो.) कुषाणांनंतरच्या काळात, गुप्त काळात ही तांब्याची नाणी खरंच गुप्तच झाली. सोन्याचीच नाणी! अर्थ काय? संपत्तीचे केंद्रीकरण. चलनाचा तुटवडा. वस्तुविनिमयाचा अधिक वापर. चलनाची गरज कमी, म्हणजे व्यापार कमी, व्यापारावर आधारीत शहरांचे पुन्हा खेड्यांमध्ये रुपांतर. अर्थसत्तेची जागा खेडी ताब्यात ठेवणाऱ्या धर्मसत्तांनी घेतली. अर्थसत्तेला शह देण्यासाठी समुद्रौल्लंघनासहीत सप्तबंदी लागू केली. (मजेशीर गोष्ट अशी की चीनमध्ये पंधराव्या शतकात हे अगदी असेच घडले होते, आणि युरोपीय त्यामुळे तिथे सहज शिरू शकले.) 

ताकत वाढवण्यासाठी धर्मसत्तेने राजसत्तेशी साटेलोटे केले. राजपूत कुळांच्या गौरवशाली कथा निर्मिल्या, चंद्रवंश, सूर्यवंश इ. वंशावळ्या तयार केल्या. नवीन सत्ताधाऱ्यांना ‘शुद्ध’ करून ‘क्षत्रिय’ केले. (प्रतिहार हे शकांचे वंशज असा एक संदर्भ आहे. खजुराहो निर्मिणारे चंदेल मूळचे गोंड.) बदल्यात धर्मसत्तेने स्वतःचे अधिष्ठान पक्के केले. नवीन गावे वसवण्याची जबाबदारी ब्राह्मणांची. देव त्यांच्या ताब्यात. साहजिकच कोणतेही गाव व्यापाराने विकसित होऊन आपल्या कह्याबाहेर जाऊ नये याची पुरेपूर काळजी घेतली जाऊ लागली. (यावरून आठवले – पश्चिम महाराष्ट्रात साखर कारखाने असलेल्या भागात मोठे उद्योग आले नाहीत कारण साखर सम्राटांना त्यांच्या अर्थसत्तेला कॉर्पोरेटचा शह नको होता.) सप्तबंदी होतीच. कर्मकांडे वाढवली. सती प्रथा याच काळात सुरू झाली. 

व्यापार नाही, तर केंद्रित झालेल्या संपत्तीचे करायचे काय? बांधा मंदिरे. या मंदिरांनी आणि आलिशान प्रासादांनी लोकांचे काहीही भले केलेले नाही. वाटोळेच केलेले आहे. एकमेव शहाणा राजा शिवाजी कधी मोठी देवळे, वाडे बांधायच्या भानगडीत पडला नाही. पैसा भरपूर होता त्याच्याकडे. पण प्राधान्य वेगळ्या गोष्टींना होते. राज्य मजबूत करायचे होते. व्यापार वाढवायचा होता. आरमार बांधायचे होते. किल्ले घडवायचे होते. सिंधुदुर्गाच्या पायात शिसे ओतायचे होते. दुष्काळात रयतेला सावली द्यायची होती. सुरत सहज लुटू शकणाऱ्या महाराजांना ताजमहाल बांधावासा वाटता तर शक्य होते. (या मुत्सद्द्याने राज्याभिषेकासारख्या अतिशय आवश्यक आणि महत्त्वाच्या बाबीवर किती खर्च केला ते पहा.)  

तर सांगायची गोष्ट, तुरूक येत होते, आपली राजसत्ता आणि धर्मसत्ता लोकांना धारण करण्याऐवजी त्यांच्या शोषणात व्यस्त होती. लोकांना काय आपुलकी असेल असल्या राजकारणाविषयी? जिथे लोकच लढले नाहीत तिथे गझनवीला आणि घुरीला काय कठीण गेले असेल? लोक लढले म्हणून हिटलरला स्टालिनग्राडमध्ये धूळ खावी लागली. (क्लाइव्ह लिहितो, प्लासीच्या लढाईनंतर त्याचे पाचशे गोरे जवान दिमाखात मुर्शीदाबादेत शिरले. त्यावेळी या नव्या जेत्यांना बघायला पाचहजारांहून अधिक बघे जमले होते. त्या सर्वांनी नुसता आवाज केला असता तरी क्लाइव्हचे पाचशे गोरे पळून गेले असते. पण हे बघे आजच्या मतदान न करणाऱ्या लोकांसारखेच राजकारणाविषयी उदासीन होते.आपल्याला काय करायचंय? असं म्हणून पोटाची काळजी मोठी म्हणणारे.)

या काळातली आपली गौरवाची स्थाने – उत्कर्षाला पोचलेले तत्त्वज्ञान, गणित, युद्धकला, संगीत, नृत्य, साहित्य, खगोलशास्त्र, भवनशास्त्र (आर्किटेक्चरला काय म्हणावे?) ही निर्विवादपणे अभिमानास्पद आहेत. पण एक मोठे प्रश्नचिन्ह या अभिमानाच्या प्रतीकांना डाग लावते – हे सगळ्या भारतीयांसाठी होते, की मूठभर शोषकांसाठी होते? सगळ्यांसाठी असते तर अठराव्या शतकात युरोपात झाली तशी औद्योगिक किंवा तत्सम क्रांती इथे घडायला काय हरकत होती? क्रांती राहिली दूर, मूठभर इस्लामी तलवारबहाद्दरांपुढे पत्त्यांच्या बंगल्यासारखे भारतीय सामर्थ्याचे मिथ ढासळले.

सर्व काही होते. पण दिशा देणारे द्रष्टे नेतृत्त्व नव्हते. ज्या सामान्य लोकांनी मिळून राष्ट्र बनते त्या जनसाधारणाची शक्ती ओळखणारा, आणि राज्य त्यांचे आहे याची जाणीव करून देणारा जाणता राजा अभावानेच जन्मला, हे आपले दुर्दैव. नेतृत्त्वाचा अभाव केवळ राजकीय क्षेत्रातच नव्हता, तर अन्यत्रही होता. उदाहरण देतो. ज्ञानेश्वर माऊलींनी एक दृष्टांत दिला आहे - ज्याप्रमा्णे सूर्य आकाशात स्थिर असूनही फिरत असल्याचा भास होतो त्याचप्रमाणे ज्ञानी स्थितप्रज्ञ प्रपंचात नसूनही असल्याचा भासतो. आता हे सूर्याचे वैज्ञानिक सत्य माऊलींना ठाऊक होते, पण त्यांनी ज्ञानाची गंगा लोकांच्या दारात नेली तरी लोकांची वैज्ञानिक दृष्टी काही विकसित झाली नाही, का्रण या क्षेत्रातले नेतृत्व मिळाले नाही. 

कोणत्याही काळाचे मूल्यमापन त्याकाळानंतरच्या काळात काय घडते यावरूनच करायला हवे. आपले सुवर्णयुग या कसोटीवर दुर्दैवाने उतरत नाही. आपल्याला केवळ राजकीय पारतंत्र्यच आले नाही, तर सर्व क्षेत्रात आपण जिथे पोचलो होतो तिथेच थांबलो. एवढेच नाही, तर आपण ते सर्व विसरूनही गेलो! अगदी अलीकडच्या काळातल्या विजयनगरचीसुद्धा साहेबाने ‘फ़रगॉटन एम्पायर’ लिहीपऱ्यंत आपल्याला आठवण आली नाही. (कडवट सत्य हे आहे, की अगदी आजही आपले राजकारण आणि समाजकारणाच्या सर्व अंगांत नेतृत्त्वाचा जो अभाव दिसतो आहे त्य़ाचा अर्थ हाच होतो की आपण अजूनही एक ‘मढे’ आहोत.)

सोन्यासारख्या सगळ्या गोष्टी होत्या. पण सु्वर्णयुगाची व्याख्या पूर्ण होत नाही. कमीत कमी अजून चार शिवाजी असते तर कदाचित ही व्याख्या पूर्ण झाली असती.

याउपर आपला हा वैभवशाली काळ कुणाला सुवर्णयुग वाटत असेल तर ज्याचा त्याचा इतिहास! 

(संपली शाणपट्टी!)

भारतीय इतिहासातील सुवर्णयुग – एक प्रश्नचिन्ह (दोन)

या सुवर्णकाळाचा अंत वायव्येकडून एकामागून एक अशा आलेल्या इस्लामी धाडींमुळे झाला हा आपला इतिहास. एवढी ताकत या आक्रमकांत खरेच होती का? इतके सामर्थ्यशाली आणि समृद्ध भारतवर्ष इतक्या सहज या टोळधाडींना बळी कसे काय पडले? आणि या टोळांना शह देऊ शकणारा या मातीतला पहिला वीर, शिवाजी, जन्मायला सतरावे शतक का उजाडावे लागले?  असे असेल तर या पराभवाची मुळे या तथाकथित सुवर्णकाळातच शोधायला हवीत.

मला सापडत असलेले उत्तर आहे, आपला भारत ज्यावेळी १२व्या शतकात अस्मानी सुलतानीला बळी पडत होता त्यावेळी मेलेलाच होता. तुरुकांनी ‘मढे’ जिंकले. छत्रपतींनी या मढ्यात प्राण फुंकला. तेवढ्या सोन्यासारख्या काळापुरता महाराष्ट्राने राष्ट्रगाडा चालवला. थोड्याच दिवसांनी हा उसना प्राणही विझला. कलेवराला नवा गोरा मालक मिळाला.

कशावरून माझा भारत मेलेला होता? आणि कोणत्या अर्थाने? 

एक जिवंत समाज म्हणून, एकजीव समाज म्हणून, राजकारणात रस असणारा समाज भारतात नव्हताच.

शिवाजी महाराज निवर्तल्यानंतरही सत्तावीस वर्षे जे मराठे औरंग्याशी लढले ते काही खडे लष्कर नव्हते, तर बारा बलुतेदारांची – माळ्याकुणब्यांची नांगरगट्ट्य्यांची फौज होती. आपल्याला काय करायचंय मरू देत असं म्हणत शिवाजीच्या अगोदर हीच माणसे नशीबाला बोल लावत गप्प बसत. महाराजांनी प्राण फुंकला तो असा – हाच मेलेला समाज जागा झाला, हे माझ्या घरचे राजकारण आहे असं म्हणत त्याने नांगर बाजूला ठेऊन महाराजांच्या गादीसाठी तलवार हातात घेतली. इस्लामी धाडी होत होत्या त्यावेळी हे घडले नव्हते. देवगिरी बुडली तेव्हा हे घडले नव्हते. पृथ्वीराज पडला तेव्हा हे घडले नव्हते. सोमनाथाला अनाथ केले तेव्हा हे घडले नव्हते. विजयनगरला हातोड्यांनी फोडले तेव्हा साधा माणूस खवळून उठला नव्हता. आपल्याला काय करायचंय, ती दोन लष्करं बघून घेतील काय ते. कुणीही राज्य केलं तरी काय फरक पडतो? असा निराशाजनक सूर आळवणाऱ्या समाजाला, राष्ट्राला जिवंत कोण म्हणेल? सातारा जिल्ह्यातल्या आडवाटेच्या खेड्यातला कुणबी जेव्हा म्हणाला ‘काय न्हाई कामधंदा, कारभारणी, अगं सौराज्य मिळवायचं औंदा’ तेव्हा कुठे ४२ च्या चळवळीत जीव आला. 

राष्ट्र आख्खंच्या आख्खं जेव्हा जिंकलं जातं तेव्हा लष्करापेक्षा महत्वाची गोष्ट असते जित आणि जेत्या राष्ट्रांमधल्या समाजांना असलेली शिस्त, त्यांच्यातला एकजिनसीपणा. समाजातल्या प्रत्येक घटकाला राजकारणाविषयी असलेला जिव्हाळा. बाराव्या शतकात आलेल्या इस्लामी आक्रमक लोकांच्या समाजात बंधुभाव हिन्दुस्थानी समाजाच्या तुलनेत अधिक होता, शिस्त अधिक होती, एकोपा, आपलेपणा अधिक होता. पुढे आलेल्या गोऱ्यांच्या बाबतीत ही गोष्ट अधिक ठळकपणे दिसून येते.

पहिले हरिकथानिरूपण। दुसरे ते राजकारण। तिसरे ते सावधपण। सर्वविषयी॥ असं म्हणताना समर्थांना हेच तर सांगायचं नसेल? भवतालच्या घडामोडींची जाणीव, राजकारण, आणि अध्यात्म हे सर्वच लोकांसाठी आहे. केवळ राज्यकर्त्या किंवा एखाद्या ठरावीक वर्गाची त्यावर मक्तेदारी नाही असा तर याचा अर्थ नव्हे? शिवाय या तीनही गोष्टी सारख्याच महत्त्वाच्या आहेत असं तर त्यांना सांगायचं नव्हतं? छत्रपतींच्या काळात ही मक्तेदारी नव्हती, हरिकथानिरूपणाइतकेच राजकारण आणि सावधपण यांना महत्त्व होतं. उत्तर पेशवाईत (नानासाहेबांपासून पुढे) ही मक्तेदारी हळूहळू वाढत गेली, तसेच हरिकथानिरूपण आणि राजकारण- सावधपण यांतलं संतुलन ढासळत गेलं आणि मराठशाही बुडायला सुरुवात झाली.

ठीक आहे. पण इस्लामी धाडी सुरू झाल्या तेव्हा समाज मेलेला होता म्हणजे नेमके काय? सांगतो. 


(क्रमशः)

भारतीय इतिहासातील सुवर्णयुग – एक प्रश्नचिन्ह (एक)


गुप्त काळापासून (४थे शतक) पुढे साधारणतः विजयनगरच्या पाडावापर्यंतच्या (सोळावे शतक) काळाला अभिजात युग (क्लासिकल एज) म्हणतात. (विजयनगर अपवाद धरायचा - ४थे ते १२वे शतकच खरे तर). याच काळाला विशेषतः गुप्त काळ आणि त्यालगतचा काळ -  साधारणपणे बाराव्या शतकापर्यंत - याला सामान्यतः सुवर्णयुग मानले जाते. भारतातून या काळात सोन्याचा धूर निघत असे असे म्हणतात. या काळात सर्वाधिक सोन्याची नाणी सापडली आहेत. अभिजात संस्कृत साहित्य (कालिदास इ.) या काळात जन्मले. पुढे पुढे विकसित होत गेले. महत्त्वाची आस्तिक आणि नास्तिक दर्शने (महत्त्वाचे - न्याय, वेदान्त) याच काळात विकसित झाली. आदि शंकराचार्य (८वे शतक) याच काळातले. भारतीय इतिहासातील युद्धांच्या रम्य कथा या काळापासून पुढे सापडतात. बुद्धीवैभव आणि बलवैभव या काळात शिखरावर होते. मोठी साम्राज्ये याच काळात घडली. (अर्थात याच्या अगोदरही होती – मौर्य, सातवाहन, कुषाण, शक. पण हा काळ काही वैशिष्ट्यांमुळे वेगळा ठरतो – पुढे हे येईलच). हर्षवर्धन (सातवे शतक) हा या काळाचा जणू उत्कर्षबिंदूच. जवळजवळ सबंध उत्तर भारत याच्या ताब्यात होता.

यानंतर राजपुतांचा वैभवशाली काळ येतो. राजपूत फक्त उत्तरेपुरते म्हणजे राजस्थानपुरते मर्यादित नव्ह्ते. सध्याच्या मध्यप्रदेशात (उदा. चंदेल, कलचुरी) होते, काश्मीर (लोहर), उत्तरप्रदेश (राठोड), बिहार-बंगाल (पाल, सेन), ओरिसा(भंज, चोळगंग, देव), आंध्र (चालुक्य,चोळ), तामिळनाडु (चोळ, पल्लव), कर्नाटक (चालुक्य, गंग, कदम्ब,सेन),महाराष्ट्र (चालुक्य,राष्ट्रकूट,वाकाटक,यादव), गुजरात(चालुक्य/ सोळंकी, प्रतिहार) या सर्व ठिकाणी होते. सगळे एकमेकांशी नात्यांच्या रेशीमगाठींनी बांधले गेले होते. (चोळ-पल्लवांना कुणी राजपूत म्हणत नाही, पण चालुक्य, गंग, कदंब आदिंशी यांचे अगदी जवळचे नातेसंबंध होते. यातले बरेचसे त्यांच्या गुणदोषांमध्ये सारखेच होते, त्यामुळे त्यांना एकाच गटात मोजायला हरकत नाही.) आठवे ते बारावे शतक – साधारणपणे. हे नामांकित योद्धे. हे हो्ते म्हणूनच सिंधपर्यंत आलेले आणि नुकतेच मुसलमान झालेले पराक्रमी अरब सिंधपर्यंतच थांबले. चालुक्य (गुजरात) आणि प्रतिहार (राजस्थान) यांची ताकत अफाट होती. यांच्या ताकतीपुढे काही चालले नाही तेव्हा अरब पुन्हा पश्चिमेकडे वळले आणि युरोप (विशेषतः स्पेन) आणि आफ्रिकेला हाल भोगावे लागले. भारत ‘हिन्दुस्थान’ राहिला यांकारणे. चालुक्य फार मोठे. हर्षवर्धनाला यांनीच नर्मदेवर अडवले. केरळ-तामिळनाडुच्या सीमेपासून गुजरातपर्यंत आणि गोव्यापासून आख्खा आंध्र यांच्या ताब्यात होता. पण चालुक्य आणि प्रतिहारांनाही पुरून उरले राष्ट्रकूट. चालुक्यांना हटवून दख्खनचे राजे बनले आणि एक काळ असा होता की यांचा झेंडा गंगेपासून रामेश्वरमपर्यंत फडकत होता. वेरूळची कैलास लेणी ही यांचीच देणगी.

यानंतरच्या लगतच्याच काळामध्ये मोठमोठाली मंदीरे बांधली गेली. उदा. दक्षिणेतील तंजावरचे बृहदेश्वर (राजराजेश्वर), खजुराहो, कोणार्क, पुरी, इ. (१०वे ते १२वे शतक). या सुरेख आणि थक्क करणाऱ्या कलाकृतींना प्रगत गणिताचे भक्कम अधिष्ठान होते. लीलावती (१२वे श), पंचसिद्धांत (७-८ वे श), समरांगणसूत्रधार(११वे श) इ. वैज्ञानिक ग्रंथ याच काळातले. पृथ्वी सूर्याभोवती फिरते असे कोपर्निकसच्या आधी हजार वर्षे सांगणारे आर्यभट्ट (५वेश), वराहमिहीर(८वे श), शून्याचा शोध लावणारे ब्रह्मगुप्त याच काळातले. शास्त्रीय संगीत, अभिजात नृत्ये – भरतनाट्यम, ओडिसी इ. – याच काळात विकसित झाली. कौतुक सांगता हजार पाने पुरणार नाहीत. या काळावर मी फिदा होतो, अजूनही आहे; पण...

हे असे सर्व असताना या वैभवशाली सुवर्णयुगावर प्रश्नचिन्ह का?

(क्रमशः)


(चित्रे इंटरनेट वरून)