बुधवार, ८ एप्रिल, २००९

भारतीय इतिहासातील सुवर्णयुग – एक प्रश्नचिन्ह (तीन)


खजुराहो, कोणार्क आदि मंदिरांवरील मैथुन शिल्पांच्या कारणमीमांसेविषयी बरंच उलटसुलट वाचलं होतं. लैंगिक शिक्षण, कामसूत्राचे चित्रीकरण इ. स्पष्टीकरणे ऐकली होती. कोणार्क मंदिर पाहताना गाइडने दिवे पाजळले होते – म्हणे लोकांमध्ये बौद्ध धर्माच्या प्रभावामुळे विरक्ती वाढत चालली होती, ती कमी करून ‘प्रवृत्ती’ वाढवण्यासाठी ही उत्तेजक शिल्पे निर्मीली. ओशो रजनीश म्हणून गेले की ही शिल्पे मंदिराच्या बाहेर आहेत, आत नाहीत : याचा अर्थ असा की कामवासना बाहेर ठेऊन आत देवाजवळ या! गंमतच आहे. हा संदेश देण्यासाठी, देवाजवळ जाता जाता भक्ताला उत्तेजित करून तो विचलित होतो की नाही, अशी विचित्र परीक्षा घेण्याचे काय कारण? बौद्ध धर्माच्या प्रसाराने विरक्ती वाढत असती तर थायलंड मधला वेश्याव्यवसाय जगात अव्वल बनला नसता, आणि चीनची लोकसंख्या पण व्यवस्थित आटोक्यात राहिली असती. लैंगिक शिक्षण हे एक शास्त्र आहे. ही शिल्पे काही त्या दृष्टीने बनवली गेलेली नाहीत.शरीरशास्त्राच्या दृष्टीने त्यात काहीही नाही. ती सरळ सरळ ब्लू फ़िल्म आहे. 

कामसूत्राचे चित्रीकरण हे एकमेव स्पष्टीकरण येथे लागू पडते.

आता प्रश्न असा आहे, की शृंगाराचे हे नागडे प्रदर्शन देवळांवर का? दुसऱ्या जागा मिळाल्या नाहीत का? शोधलं तर हेच उत्तर मिळतं की ही देवळे देवाची नसून देवाचे स्थान स्वत: धारण करू इच्छिणाऱ्या सत्ताधाऱ्यांची होती. नावाला आपला देवाला ठेवायचा. बृहदेश्वर (तंजावर) मंदिरात तर राजराज चोळाची मूर्ती आहे पण. त्या मंदिराला राजराजेश्वर मंदिर असेही म्हणतात. राजा विष्णूचा अवतार म्हणे – कारण तो पृथ्वीपती! मग या विष्णूच्या अवताराचे विलास त्याच्या देवळावर नकोत? राजवाडे पुरेसे वाटले नाहीत, प्रासादातले भोग अपुरे वाटले. मग ही वासना सीमा ओलांडून देवळात शिरली. हा त्यावेळच्या विलासी सत्ताधाऱ्यांच्या मनाचा आरसा आहे. या मंदिरांच्या निर्मितीचा काळ पहा – गझनवी आणि घुरी याच काळात धाडी मारत होते. आणि या आपल्या रावबाजींना त्यांच्या चाळ्यांमधून फुरसत नव्हती. देवळे स्वतंत्र सत्ताकेंद्रे बनली होती. अफाट संपत्ती असायची यांच्याकडे. गावेच्या गावे या देवळांच्या सत्तेखाली असायची. आणि त्यांचे रक्षणकर्ते क्षत्रिय विलासात मग्न असायचे. हा कसल्या समाजाचा आरसा आहे?

याच काळात गझनवीसोबत भारतात आलेला अल्बेरूनी काय म्हणतो पहा – ‘भारतीयांकडे प्रचंड ज्ञान आहे, पण ती एका विशिष्ट वर्गाची मक्तेदारी आहे. या लोकांना वाटते त्यांच्याइतके शहाणे जगात कोणीच नाही. यांना समुद्र ओलांडून जाणे म्हणजे पाप वाटते.’ समाजाने स्वतःला कोंडून घेतले होते. शेकडो जाती निर्माण झाल्या होत्या. निरनिराळ्या स्मृती लिहिल्या गेल्या. या स्मृती सर्वांसाठी न्याय्य नक्कीच नव्हत्या.

शहरे जातींची बंधने शिथील करतात. शहरीकरण व्यापाराला उत्तेजक, पोषक असते. आर्थिक हितसंबंध समाजाला खुले करतात. मोकळे वारे वाहतात. याउलट खेडी. साचलेली डबकी असे आंबेडकर खेड्यांना म्हणत ते उगीच नाही. ते म्हणायचे, खेडी हा भारताच्या गौरवाचा विषय नसून ती इतिहासातली काळी पाने आहेत. खेडी होती म्हणून जातीव्यवस्था मजबूत राहिली, अस्पृष्यता जन्मली, आणि फोफावली.

आपण विचार करत असलेल्या काळात हेच घडले. शहरीकरण कमी झाले, ग्रामीणीकरण वाढले. कशावरून? पहा. गुप्तांच्या अगोदर कुषाण होते. रेशीम मार्ग यांच्या राज्यातून जायचा. समृद्ध व्यापारामुळे शहरीकरण होते. या काळात सोन्याच्या नाण्यांपेक्षा तांब्याची नाणी अधिक प्रमाणात सापडली आहेत. याचाच अर्थ चलनी नाणी साधारण जनतेला उपलब्ध होती. वस्तुविनिमयाला चांगला पर्याय उपलब्ध होता. म्हणजेच शहरे होती. व्यापार होता. बंदरे होती. (असा तर्क आहे की दर्यावर्दी सिंदबादच्या कहाण्या अरबी नसून मूळ सिंधी व्यापारी नायकाच्या होत्या. युयुत्सु व्यापारी समुद्र ओलांडून दूर दूर जायचे. कौंडिण्य व्यापाऱ्यानेच तर आग्नेय आशियाचे आर्यीकरण केले. आजपावेतो (मुस्लिम) इंडोनिशिया मध्ये गरुडाला मानाचे स्थान आहे. थायलंडच्या राजाला ‘राम’ म्हणतात. सुकार्णो, मेगावती, ठकसिन, ही तर सरळ सरळ संस्कृत नावे आहेत. असो.) कुषाणांनंतरच्या काळात, गुप्त काळात ही तांब्याची नाणी खरंच गुप्तच झाली. सोन्याचीच नाणी! अर्थ काय? संपत्तीचे केंद्रीकरण. चलनाचा तुटवडा. वस्तुविनिमयाचा अधिक वापर. चलनाची गरज कमी, म्हणजे व्यापार कमी, व्यापारावर आधारीत शहरांचे पुन्हा खेड्यांमध्ये रुपांतर. अर्थसत्तेची जागा खेडी ताब्यात ठेवणाऱ्या धर्मसत्तांनी घेतली. अर्थसत्तेला शह देण्यासाठी समुद्रौल्लंघनासहीत सप्तबंदी लागू केली. (मजेशीर गोष्ट अशी की चीनमध्ये पंधराव्या शतकात हे अगदी असेच घडले होते, आणि युरोपीय त्यामुळे तिथे सहज शिरू शकले.) 

ताकत वाढवण्यासाठी धर्मसत्तेने राजसत्तेशी साटेलोटे केले. राजपूत कुळांच्या गौरवशाली कथा निर्मिल्या, चंद्रवंश, सूर्यवंश इ. वंशावळ्या तयार केल्या. नवीन सत्ताधाऱ्यांना ‘शुद्ध’ करून ‘क्षत्रिय’ केले. (प्रतिहार हे शकांचे वंशज असा एक संदर्भ आहे. खजुराहो निर्मिणारे चंदेल मूळचे गोंड.) बदल्यात धर्मसत्तेने स्वतःचे अधिष्ठान पक्के केले. नवीन गावे वसवण्याची जबाबदारी ब्राह्मणांची. देव त्यांच्या ताब्यात. साहजिकच कोणतेही गाव व्यापाराने विकसित होऊन आपल्या कह्याबाहेर जाऊ नये याची पुरेपूर काळजी घेतली जाऊ लागली. (यावरून आठवले – पश्चिम महाराष्ट्रात साखर कारखाने असलेल्या भागात मोठे उद्योग आले नाहीत कारण साखर सम्राटांना त्यांच्या अर्थसत्तेला कॉर्पोरेटचा शह नको होता.) सप्तबंदी होतीच. कर्मकांडे वाढवली. सती प्रथा याच काळात सुरू झाली. 

व्यापार नाही, तर केंद्रित झालेल्या संपत्तीचे करायचे काय? बांधा मंदिरे. या मंदिरांनी आणि आलिशान प्रासादांनी लोकांचे काहीही भले केलेले नाही. वाटोळेच केलेले आहे. एकमेव शहाणा राजा शिवाजी कधी मोठी देवळे, वाडे बांधायच्या भानगडीत पडला नाही. पैसा भरपूर होता त्याच्याकडे. पण प्राधान्य वेगळ्या गोष्टींना होते. राज्य मजबूत करायचे होते. व्यापार वाढवायचा होता. आरमार बांधायचे होते. किल्ले घडवायचे होते. सिंधुदुर्गाच्या पायात शिसे ओतायचे होते. दुष्काळात रयतेला सावली द्यायची होती. सुरत सहज लुटू शकणाऱ्या महाराजांना ताजमहाल बांधावासा वाटता तर शक्य होते. (या मुत्सद्द्याने राज्याभिषेकासारख्या अतिशय आवश्यक आणि महत्त्वाच्या बाबीवर किती खर्च केला ते पहा.)  

तर सांगायची गोष्ट, तुरूक येत होते, आपली राजसत्ता आणि धर्मसत्ता लोकांना धारण करण्याऐवजी त्यांच्या शोषणात व्यस्त होती. लोकांना काय आपुलकी असेल असल्या राजकारणाविषयी? जिथे लोकच लढले नाहीत तिथे गझनवीला आणि घुरीला काय कठीण गेले असेल? लोक लढले म्हणून हिटलरला स्टालिनग्राडमध्ये धूळ खावी लागली. (क्लाइव्ह लिहितो, प्लासीच्या लढाईनंतर त्याचे पाचशे गोरे जवान दिमाखात मुर्शीदाबादेत शिरले. त्यावेळी या नव्या जेत्यांना बघायला पाचहजारांहून अधिक बघे जमले होते. त्या सर्वांनी नुसता आवाज केला असता तरी क्लाइव्हचे पाचशे गोरे पळून गेले असते. पण हे बघे आजच्या मतदान न करणाऱ्या लोकांसारखेच राजकारणाविषयी उदासीन होते.आपल्याला काय करायचंय? असं म्हणून पोटाची काळजी मोठी म्हणणारे.)

या काळातली आपली गौरवाची स्थाने – उत्कर्षाला पोचलेले तत्त्वज्ञान, गणित, युद्धकला, संगीत, नृत्य, साहित्य, खगोलशास्त्र, भवनशास्त्र (आर्किटेक्चरला काय म्हणावे?) ही निर्विवादपणे अभिमानास्पद आहेत. पण एक मोठे प्रश्नचिन्ह या अभिमानाच्या प्रतीकांना डाग लावते – हे सगळ्या भारतीयांसाठी होते, की मूठभर शोषकांसाठी होते? सगळ्यांसाठी असते तर अठराव्या शतकात युरोपात झाली तशी औद्योगिक किंवा तत्सम क्रांती इथे घडायला काय हरकत होती? क्रांती राहिली दूर, मूठभर इस्लामी तलवारबहाद्दरांपुढे पत्त्यांच्या बंगल्यासारखे भारतीय सामर्थ्याचे मिथ ढासळले.

सर्व काही होते. पण दिशा देणारे द्रष्टे नेतृत्त्व नव्हते. ज्या सामान्य लोकांनी मिळून राष्ट्र बनते त्या जनसाधारणाची शक्ती ओळखणारा, आणि राज्य त्यांचे आहे याची जाणीव करून देणारा जाणता राजा अभावानेच जन्मला, हे आपले दुर्दैव. नेतृत्त्वाचा अभाव केवळ राजकीय क्षेत्रातच नव्हता, तर अन्यत्रही होता. उदाहरण देतो. ज्ञानेश्वर माऊलींनी एक दृष्टांत दिला आहे - ज्याप्रमा्णे सूर्य आकाशात स्थिर असूनही फिरत असल्याचा भास होतो त्याचप्रमाणे ज्ञानी स्थितप्रज्ञ प्रपंचात नसूनही असल्याचा भासतो. आता हे सूर्याचे वैज्ञानिक सत्य माऊलींना ठाऊक होते, पण त्यांनी ज्ञानाची गंगा लोकांच्या दारात नेली तरी लोकांची वैज्ञानिक दृष्टी काही विकसित झाली नाही, का्रण या क्षेत्रातले नेतृत्व मिळाले नाही. 

कोणत्याही काळाचे मूल्यमापन त्याकाळानंतरच्या काळात काय घडते यावरूनच करायला हवे. आपले सुवर्णयुग या कसोटीवर दुर्दैवाने उतरत नाही. आपल्याला केवळ राजकीय पारतंत्र्यच आले नाही, तर सर्व क्षेत्रात आपण जिथे पोचलो होतो तिथेच थांबलो. एवढेच नाही, तर आपण ते सर्व विसरूनही गेलो! अगदी अलीकडच्या काळातल्या विजयनगरचीसुद्धा साहेबाने ‘फ़रगॉटन एम्पायर’ लिहीपऱ्यंत आपल्याला आठवण आली नाही. (कडवट सत्य हे आहे, की अगदी आजही आपले राजकारण आणि समाजकारणाच्या सर्व अंगांत नेतृत्त्वाचा जो अभाव दिसतो आहे त्य़ाचा अर्थ हाच होतो की आपण अजूनही एक ‘मढे’ आहोत.)

सोन्यासारख्या सगळ्या गोष्टी होत्या. पण सु्वर्णयुगाची व्याख्या पूर्ण होत नाही. कमीत कमी अजून चार शिवाजी असते तर कदाचित ही व्याख्या पूर्ण झाली असती.

याउपर आपला हा वैभवशाली काळ कुणाला सुवर्णयुग वाटत असेल तर ज्याचा त्याचा इतिहास! 

(संपली शाणपट्टी!)

४ टिप्पण्या:

 1. अतिशय सुन्दर आणि मार्मिक परिक्षण...
  आणि आपला समाज आजही मढ़च आहे ... आणि राजकारणी मढयचा टालूवरल लोनी खाणारे... :-(

  उत्तर द्याहटवा
 2. सचिन,

  लेखमाला वाचली. तुमचं म्हणणं काही पटलं, तर काही नाही. माझं मत सांगतो.

  १.
  >> गझनवी आणि घुरी याच काळात धाडी मारत होते. आणि या आपल्या रावबाजींना त्यांच्या चाळ्यांमधून फुरसत नव्हती.

  हे फार सरसकट विधान आहे. एखादं उदाहरण मिळालं तर बरं होईल. तसंही पाहता गझनवी आणि घोरी काय फार उच्चकोटीचे राज्यकर्ते नव्हते. उच्चकोटीचे दरोडेखोर म्हणता येतील फारतर. मोहम्मद गझनवी त्याच्या नातेवाईकाकडून (पुतण्या?) मारला गेला. आपापसांतली वैरांनी त्याचा घास घेतला. सोमनाथचं म्हणाल तर १७ वेळा देऊळ लुटलं गेलं तरी १८ व्या वेळी परत बांधलंच ना? घोरींना ख्वाराझ्मींनी संपवलं. या ख्वाराझ्मींना मंगोल नेता चेंगीझखानाने संपवलं. त्यामानाने भारत आजूनही अस्तित्वात आहे. हेच भारतीयांचं यश नव्हे काय?

  अर्थात मी इंद्रियगामी राजांचं समर्थन करीत नाहीये.

  २.
  >>‘भारतीयांकडे प्रचंड ज्ञान आहे, पण ती एका विशिष्ट वर्गाची मक्तेदारी आहे. या लोकांना वाटते त्यांच्याइतके शहाणे
  >> जगात कोणीच नाही. यांना समुद्र ओलांडून जाणे म्हणजे पाप वाटते.’

  मान्य.

  ३.
  >> कुषाणांनंतरच्या काळात, गुप्त काळात ही तांब्याची नाणी खरंच गुप्तच झाली. सोन्याचीच नाणी! अर्थ काय?
  >> संपत्तीचे केंद्रीकरण. चलनाचा तुटवडा. वस्तुविनिमयाचा अधिक वापर. चलनाची गरज कमी, म्हणजे व्यापार कमी,
  >> व्यापारावर आधारीत शहरांचे पुन्हा खेड्यांमध्ये रुपांतर. अर्थसत्तेची जागा खेडी ताब्यात ठेवणाऱ्या धर्मसत्तांनी घेतली.

  माझ्या माहितीप्रमाणे इंग्रज येईस्तोवर भारताचा व्यापार कमी कधीच झाला नव्हता. वास्तुविनिमय (बार्टर) पद्धती असली तरी सुबत्ता असू शकते. त्यामुळे केवळ सोन्याची नाणी मिळणे हे सुबत्ता आटल्याच लक्षण नव्हे.

  देवळांना जी खेडी आंदण दिलेली असायची त्यांच्या केवळ उत्पन्नावर देवळांचा अधिकार असे. तोही क्षत्रिय राजाकडून मिळालेला असे. माझ्या मते तुम्ही म्हणता तशी खेडी ताब्यात घेणारी धर्मसत्ता नव्हती. तरीही एखादं उदाहरण मिळालं तर बरं होईल. चूकभूल देणेघेणे.

  ४.
  >> व्यापार नाही, तर केंद्रित झालेल्या संपत्तीचे करायचे काय? बांधा मंदिरे. या मंदिरांनी आणि आलिशान प्रासादांनी लोकांचे काहीही भले केलेले नाही. वाटोळेच केलेले आहे.

  व्यापार भरपूर होता. त्यातून शोषण होऊ नये म्हणून अतिरिक्त पैसा मंदिरांना अर्पण करण्यात येत असे. अन्यथा असा पैसा इंद्रियभोगांवर खर्च होतो. आज काळा पैसा इतका जमला आहे की तो बीभत्स मार्गाने उधळला जातोय. बारबाला, भागसट्टा (शेअर मार्केट स्पेक्युलेशन), क्रीडा सट्टेबाजी या गोष्टी बंद केल्या तर भारताची गरिबी चुटकीसरशी दूर होईल.

  मंदिरांचे उद्दिष्ट भक्तांना अध्यात्मिक लाभ करून देण्याचे आहे. त्यामुळे लोकांचे वाटोळे होत नाही. अलिशान प्रासादांचे काम लोकांचे भले करण्याचे नाही. अर्थात शिवाजी महाराजांनी ऐषाराम त्याज्य मानला कारण परिस्थितीच तशी होती. शहाजी महाराजांची राहणी शिवाजी महाराजांपेक्षा अधिक विलासी होती. मात्र त्यांच्यासमोरील अडचणी वेगळ्या होत्या. त्यांच्या शैलीला अनुरूप अशी त्यांची राहणी होती म्हणून त्यांना कोणी विलासांध म्हणत नाही. त्यांच्या बाबतीत विलास कर्तव्याच्या आड आला नाही.

  ५.
  >> जिथे लोकच लढले नाहीत तिथे गझनवीला आणि घुरीला काय कठीण गेले असेल?

  माझ्या माहितीप्रमाणे सोमनाथला पहिल्या स्वारीच्या वेळेस ५०,००० साधू लढून धारातीर्थी पडले होते. हे सारे अर्थात नि:शास्त्र होते. क्षत्रियांनी आपली जबाबदारी उचलली नाही म्हणून साधूंना लढ्यात उतरावे लागले. लोक लढले, पण राजसत्ता कमी पडली. अगदी महाराष्ट्रातही शंभूराजांच्या मृत्योत्तर लोकं लढले ते राजाराममहाराज दूर जिंजीस सुखरूप होते या भरवश्यावर.

  पुढे चालू
  ...२

  उत्तर द्याहटवा
 3. मागील संदेशावरून पुढे
  ...१ ...
  ६.
  >> हे सगळ्या भारतीयांसाठी होते, की मूठभर शोषकांसाठी होते? सगळ्यांसाठी असते तर अठराव्या शतकात युरोपात झाली
  >> तशी औद्योगिक किंवा तत्सम क्रांती इथे घडायला काय हरकत होती?

  औद्योगिक क्रांती मूठभर धनिकांसाठी होती. इंग्लंडमध्ये कामगारांना बराच लढा दिल्यावर मगच हक्क मिळाले. युरोपीय प्रबोधनाचं (रेनेसां) म्हणाल तर या चळवळीचे आद्य केंद्र फ्लोरेन्स याची परिस्थिती आज काय आहे? आज ते इटली नावाच्या देशात आहे जो माफियांकारिता कुप्रसिद्ध आहे आणि त्याचा राज्यकर्ता बेर्लुस्कोनी परम भ्रष्टाचारी आहे. आज इटलीत भ्रष्टाचार आहे म्हणून कोणी रेनेसां ला नावे ठेवत नाही. तद्वत भारतीयांनाही नावे ठेवण्यात येऊ नयेत. भारतीय धर्म व क्षात्र नेतृत्वाच्या चुका झाला असतील, पण त्या नेतृत्वपद्धती सरसकट टाकाऊ आहेत असा अर्थ काढणे अमान्य.

  मकियाव्हेलीचा इटली वेगळा. खरंतर तेव्हा इटली नव्हताच. माझिनी व ग्यारीबाल्डी यांनी इटलीचं एकीकरण केलं. म्हणून त्यावेळचा इटली वेगळा. मुसोलिनी यांचा इटली वेगळा. आणि आजचा बेर्लुस्कोनीचा इटली वेगळा आहे. असा खंडितपणा भारतात आढळून येत नाही. अगदी पांडवकाळापासून आजपर्यंत वैदिक परंपरेची एक सलग संस्कृती नांदत आलेली आहे. हे भारताचं यश नव्हे काय?

  ७.
  >> क्रांती राहिली दूर, मूठभर इस्लामी तलवारबहाद्दरांपुढे पत्त्यांच्या बंगल्यासारखे भारतीय सामर्थ्याचे मिथ ढासळले.

  आजिबात नाही. मुस्लिमांसमोर पत्त्यांच्या बंगल्यासारखी ढासळली ती उत्तर आफ्रिकेतली राज्ये. भारतीय राज्ये नव्हेत. भारतात इस्लामचा बराच प्रसार सूफीमार्गेही झाला आहे.

  उलट मी म्हणेन की भारतीयांनी इस्लामी वरचष्मा कधीच मान्य केला नाही. लाहोरहून दिल्लीला यायला मुस्लिमांना २०० वर्षे लागली. त्यादरम्यान इजिप्त ते स्पेन पर्यंत मुलूख इस्लामच्या अधिपत्याखाली आला.

  ८.
  >> ज्या सामान्य लोकांनी मिळून राष्ट्र बनते त्या जनसाधारणाची शक्ती ओळखणारा, आणि राज्य त्यांचे आहे
  >> याची जाणीव करून देणारा जाणता राजा अभावानेच जन्मला, हे आपले दुर्दैव.

  काही अंशी तुमचं बरोबर आहे. अर्थात शिवाजीमहाराज अभावानेच जन्मतात.

  ९.
  >> पण त्यांनी ज्ञानाची गंगा लोकांच्या दारात नेली तरी लोकांची वैज्ञानिक दृष्टी काही विकसित झाली नाही, का्रण या क्षेत्रातले नेतृत्व मिळाले नाही.

  असं आपणांस का वाटतं? जाणून घ्यायला आवडेल. मी इंग्लंडमध्ये राहायला असतो. इथली लोकं काही फार महान वैज्ञानिक दृष्टीबिष्टी बाळगून नाहीत.

  १०.
  >> आपल्याला केवळ राजकीय पारतंत्र्यच आले नाही, तर सर्व क्षेत्रात आपण जिथे पोचलो होतो तिथेच थांबलो.
  >> एवढेच नाही, तर आपण ते सर्व विसरूनही गेलो!

  हे मात्र मान्य आहे. आपण यापूर्वीच मोठा पल्ला गाठणं अपेक्षित होतं. आपली विस्मरणशक्ती फार जोरदार आहे. एव्हढा मोठा दैदिप्यमान शिवाजी राजा होऊन गेला, पण त्यांच्याकडून आपल्या नेतृत्वाने धडा घेतला नाही. तुमचं हे निरीक्षण १००% मान्य.

  ११.
  >> पण सु्वर्णयुगाची व्याख्या पूर्ण होत नाही. कमीत कमी अजून चार शिवाजी असते तर कदाचित ही व्याख्या पूर्ण झाली असती.

  भारतीय जनतेत राजकीय औदासिन्य खोलवर दडलंय. ते दूर करून त्यांना सजग बनवले की सुवर्णयुग अवतरेल.

  असो.

  बरंच लिहिलं आहे. वाचल्याबद्दल आभार! :-)

  आपला नम्र,
  -गामा पैलवान

  उत्तर द्याहटवा