गुरुवार, १२ मार्च, २००९

ब्रिज ऑन रिवर क्वाइ


चारित्र्य आणि नेतृत्वाची कहाणी


दि ब्रिज ऑन दि रिवर क्वाइ हा 1957 सालचा ब्रिटीश दिग्दर्शक डेविड लीन चा गाजलेला यद्धपट. कथा काल्पनिक असली तरी 1942 साली दुसर्‍या महायुद्धा च्या दरम्यान घडलेल्या हकिकतीं वर आधारित आहे.

क्वा‌इ नदीवरील पूल हे एक निमित्त आहे. कथेचा गाभा आहे एका लष्करी अधिकार्‍याचा आत्मसन्मान. त्याची कहाणी. काळ आहे दुसर्‍या महायुद्धातला. स्थळ आहे आग्नेय आशियातील बँकॉक जवळील घोर अरण्य. एक ब्रिटीश बटालियन जपान्यान्च्या तावडीत सापडून युद्धकैदी झाली आहे. जपानी कर्नल सैतो या बटालियानला बजावतो की सर्व युद्धकैद्यांना एका पुलाचे काम करायचे आहे. हा पूल सिंगापूर ते बँकॉक रेल्वेमधला महत्त्वाचा दुवा असतो. एका विशिष्ट तारखेच्या आत तो पूर्ण होणे आवश्यक आहे कारण मामला युद्धाचा आहे. हा पूल पूर्ण झाल्यास जपानला फार मोठी आघाडी मिळणार असते.

 

ब्रिटीश कर्नल निकोल्सन सैतो च्या निदर्शनाला आणून देतो की जीनिव्हा करारानुसार अधिकारी युद्धकैद्यांना शारीरिक कामे करण्यापासून मोकळीक आहे. परंतु कर्नल सैतो सुनावतो की अधिकाऱ्यांनासुद्धा काम हे करावेच लागेल. एक तर त्यांच्याच नाकर्तेपणामुळे आणि भित्रेपणामुळे त्यांची बटालियन शरण आली आहे. जपानी अधिकारी असते तर त्यांनी हाराकिरी केली असती पण शरण नसते गेले. अशा भित्र्या अधिकाऱ्यांना आपल्या सैनिकांसोबत काम करण्याची मुळीच लाज वाटता कामा नये.

 

निकोल्सन आपल्या भूमिकेवर ठाम राहतो. तो शरण आलेला असतो कारण तसे आदेश आलेले असतात. आणि तो शारीरिक काम नाकारत असतो कारण त्याच्या सैनिकांची अस्मिता त्याला जपायची असते. सैतो निकोल्सन आणि त्याचे अधिकारी यांना टॉर्चर चेम्बर मध्ये डाम्बतो. दरम्यान त्याचा जपानी इंजिनियर ब्रिटिश सैनिकांना कामाला लावतो. पण पुलाचे काम रखडत चालते. जपानी इंजिनियर्सना पुलांचा अनुभव नसतो, आणि ब्रिटिश सैनिकही पुलाचे काम इमाने इतबारे करण्याइतके खुळे नसतात.

 

ब्रिटिश डॉक्टर सैतोला समजावतो, की ब्रिटिश अधिकारी पुलाच्या कामात अनुभवी आहेत. त्यांच्या हाती हे काम सोपवले तर काम निश्चित तडीस जाईल. वेळ चाललेला असतो. सैतोचा अहं काही कमी होत नसतो. हो नाही करत वाटाघाटी होतात आणि सैतोला निरुपायाने निकोल्सनला शरण जावे लागते.

 

पण गोष्ट इथे संपत नाही; तर इथून सुरू होते.

 

निकोल्सन आपल्या लोकांना  सांगतो की पुलाचे काम वेळेत पूर्ण करायचे. या जपान्यांना दाखवून द्यायचे की ब्रिटिश लष्कर ही काय चीज आहे. त्याचे अधिकारी चक्रावून जातात. शत्रूला मदत करायची? का? निकोल्सन त्यांना समजावतो की युद्धकैद्यांना काम नाकारण्याचा अधिकार नसतो. त्यामुळे ते देशद्रोही ठरवले जाऊ शकत नाहीत. हे एक. दुसरे. त्याला पुलापेक्षा महत्त्वाचे वाटत असते ते त्याच्या सैनिकांचे मनोबल. ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या अधीन राहून सैनिक शिस्तबद्ध रीतीने काम करत राहिले तर ते गुलाम किंवा कैदी राहणार नाहीत, तर सैनिक राहतील. उद्या युद्ध संपल्यानंतर ते जेंव्हा हे स्मरतील तेंव्हा त्यांचा स्वाभिमान आणि देशाभिमान उफाळून येईल. ताठ मानेने जगू शकतील. एक ब्रिटिश जवान प्रतिकूल परिस्थितीत काय साध्य करू शकतो हे निकोल्सनला दाखवून द्यायचे असते.

 

त्यानुसार निकोल्सन आपल्या बटालियनची पुनर्बांधणी करतो आणि कामाला आरंभ करतो. या दरम्यान तो एक महत्त्वाची गोष्ट साध्य करतो - जपान्यांकडून आदराची वागणूक. 

 

ठरल्याप्रमाणे सर्व अडचणींवर मात करून ब्रिटिश सैनिक पूल वेळेत पूर्ण करतात.

 

सिनेमा एवढाच नाही. तो मुळातूनच बघण्याचा विषय आहे. पण चारित्र्य आणि नेतृत्व यांचे इतके सुंदर चित्रण करणारा सिनेमा मी आजवर पाहिला नव्हता.

 

५ टिप्पण्या:

  1. tu cinema chi gosht khoop chhan sangatos. mala ajun satya ani matrix 'frame by frame' aikalele athavatat.

    hope this is the first post in a long series of film reviews / film related posts :)

    उत्तर द्याहटवा
  2. आता हा पिच्चर कुठे बघायला मिळेल ??? स्टोरी मस्त आहे...

    रोज काहीतरी नवीन वाचावे या हेतूने नवीन-नवीन ब्लॉग शोधत असतो. कुठलाही ब्लॉग नवीनच वाचायला घेतला की त्या ब्लॉगच्या पाहिल्या पोष्टवर जाउन प्रतिक्रिया द्यायची ही आपली स्टाइल... :D

    तेंव्हा अगदी पहील्यावहिल्या पोष्टवर प्रतिक्रिया आल्याचे पाहून दचकू नका.. आता संपूर्ण वाचायचा आहे तुमचा ब्लॉग.

    उत्तर द्याहटवा
  3. तुला सांगायचं राहिलं. गेल्या वर्षी श्रीलंकेत केलनी नदीवर राफ्टिंग केलं, तेंव्हा अचानक या चित्रपटाच्या चित्रीकरणाची जागा, त्या पुलासकट बघायला मिळाली. राफ्टिंग करत असल्यामुळे कॅमेरा सोबत नव्हता, पण अप्रतिम जागा आहे. सिनेमा नुकताच बघितलेला होता, त्यामुळे अजून जास्त भावली.

    उत्तर द्याहटवा
  4. http://thepiratebay.org/torrent/3921414/The.Bridge.on.the.River.Kwai[1957].Dvdrip.Xvid.AC3[5.1]-RoCK

    इथे आहे...

    उत्तर द्याहटवा