शनिवार, १४ मार्च, २००९

माझा राऊ


 

राऊ  मला भेटायच्या आधीपासूनच माझ्या मनाने हे पक्के घेतले होते की राऊ माझा मित्र असेल. त्याचे नाव त्यावेळी नक्की नव्हते. पण तो आल्याक्षणी आणि त्याला पाहताक्षणी हे नक्की झाले की तो माझा मित्रच असणार! त्या चोराने पण हे ओळखले असणार बरोबर. आमच्या वडीलांना आम्ही अजूनही भितो, पण या साहेबांना आमची सोडा, त्यांचीच आम्हाला भीति वाटत असते.

 

सगळ्याच आई बापांना त्यांची बाळे छान छान वाटत असतात. आम्हाला पण वाटते. पण आम्हालाही याचे कधी कधी आश्चर्य वाटते की तो आमचे ‘क्रिएशन’ आहे असे कधीच वाटले नाही. उलट वाटत राहते की आमचा कुणी सखाच आला आहे सोबतीला.

 

राऊ चंचल खूप. सारखा हलत असतो. एका जागी बसणे म्हणजे त्याला शिक्षाच. चालायला येत नव्हते तेंव्हा पडल्या पडल्या आणि उचलून गेतल्यानंतर पाय इतक्या वेगाने झाडत राही की अभिषेक म्हणायचा याच्या ढुंगूमध्ये ड्युरासेल लावले आहेत! पण अगदी बाळ असताना माझ्याजवळ पडला की मधूनच एकदम शांत होऊन जाई. सुलभाला पण याचे आश्चर्य वाटे आणि म्हणे की बघ त्याला तुझ्या व्हाइब्ज जाणवतात. चांद्याला असताना तो कुठे जाईल आणि कुठे सापडेल याचा काही नेम नसे. नुकतेच त्याला पाय फुटले असल्यामुळे त्याचे काही ना काही प्रयोगातून विज्ञानाचे प्रकार सुरू असत. अवती भवती सगळे जंगलच असल्यामुळे आम्हाला फार भीति वाटत राही. पण राऊ बिनधास्त कुठल्यातरी रोपट्याच्या मागे जाऊन समाधी लावून बसलेला सापडे.  

 

हे अवखळ क्षण पकडून ठेवण्यासाठी मी एक छान कॅमेरा घेतला. पण मला बरेच वेळा ‘स्पाय फोटोग्राफी’ च करावी लागली. कारण हा पठ्ठ्या माझ्या हातात कॅमेरा दिसला रे दिसला की झेपावून पहिल्यांदा तो ताब्यात घेई. त्याला कंठ फुटल्यानंतर त्याने फर्मान सोडायला सुरूवात केली – असा उभा रहा, कॅमेरा इकडे दे, वगैरे.

 

त्याला झोपवण्याचा तर एक मोठाच कार्यक्रम असे. पहिल्यांदा अंधार करून सुलभा आणि मी आपसात कुजबुजत बोलत असू की एक माऊ आणि एक मोठा राक्षस खिडकीत आला आहे आणि विचारतोय राऊ झोपला का म्हणून. एवढ्याने भागण्याची शक्यता नगण्यच. मग मी हळूच उठून बाहेर जात असे आणि मांजराचा आवाज काढून खिडकीवर मोठ मोठ्याने आवाज काढत असे. तेंव्हा कुठे महाराज शांत पडून रहात. पण कराडला असताना एकदा राऊने माझी विकेटच काढली. झोपताना आजीला म्हणाला, असं झोपायचं नसतं; अगोदर तातू बाहेर जाता (म्हणजे जातात), मग माऊचा आवाज काढता, मग खिडकीवर थप थप करता, मग झोपायचं!

 

सर्किट हाऊस वर येणाऱ्या पोलीसांचे याला भारी आकर्षण. आपल्या खेळातल्या बंदूका त्यांना दाखवून त्यांच्या बंदुकींना हात लावण्यासाठी तो त्यांना मस्का लावत बसे.

 

मी बी. डी. ओ. चा चार्ज सांभाळत होतो तेंव्हा मला परतायला काही वेळा उशीर होई. अशावेळी तो दारात उभा राहून म्हणे – माझ्या ऑफिसमध्ये कशाला आलाय? तुमच्या तुमच्या ऑफिसला जावा बघू. बऱ्याच वेळाने त्याचा राग शांत होत असे. कधी मजेत असला की मला म्हणे कसलं तुमचं ऑफिस? ए बी सी डी शिकवतात का तिथं? या इकडे मी शिकवतो.

 

काही गोष्टींना त्याची नावे पण मजेशीर असतात. गोपबंधू ऍकॅडेमीला तो डोकंबंदूक म्हणतो. धमक्या पण त्याला व्यवस्थित देता येतात. मला आणि सुलभाला एकमेकांच्या नावाच्या देतो आणि दोस्त राष्ट्रांचा एकदमच हल्ला झाला तर हल्ला ओसरल्यानंतर सरळ कराड किंवा उस्मानाबादला फोन लावा म्हणतो आणि एफ. आय. आर. नोंदवतो. कधी कधी ‘सावजीं’ च्या कडेही कंप्लेंट फाइल केली जाते. सावजी म्हणजे साहू – सर्किट हाउसचा खानसामा. कराडला गेल्यानंतर तर त्याची खोडी काढायची माझी काय बिशाद आहे; सरळ दारामागची काठी नेऊन आजोबांना देतो आणि हुकुम सोडतो – हेला मारा.

 

जसजसा मोठा होत चालला आहे तसतसं मला बेचैन वाटत आहे. हा माझा राऊ हळू हळू हरवत जाणार आहे. हे सगळं इथंच असंच थांबवून नाही ठेवता येणार?

 


१५ टिप्पण्या:

 1. छान लिहिले आहेत. ब्लॉग देखणा आहे

  उत्तर द्याहटवा
 2. तुम्हाला आवडला...भरून पावलो!

  उत्तर द्याहटवा
 3. he kshan jastit jast pakadun thev ... lihinyatun, phototun. (aani blog var share kar :)) tula kalanyapurvi motha hoil to. navin goshti shikel, navin gamati karel. he sagale visarun jail.

  उत्तर द्याहटवा
 4. मुठीत पकडलेली वाळू निसटत जावी तसं आयुष्य निघून चाललं आहे. काय काय म्हणून पकडून ठेऊ?

  उत्तर द्याहटवा
 5. ह्म्म. तेही खरंच. जुनं पकडता पकडता नवं निसटून नको जायला.

  उत्तर द्याहटवा
 6. are kay re sachin, etke chhan lihiles ani mala mahitich nahi. aaj asa kade bhetlo tevha teene sangitale. aso. asach lihi ani kalav na pl....z. mala avdate tu lih-ilele vachayla.

  उत्तर द्याहटवा
 7. वाळू जशी मुठीत पकडता येत नाही तसं आयुष्यदेखील ... :( पण त्यातच जगण्याची ख़री मजा आहे ना रे. सैल सोडून दे... दरवेळी एक नवा राऊ उभा राहील तुझ्यासमोर ... :) मला फोटो जाम आवडला. तुझी स्पाय फोटोगिरी मस्त आहे ... :D

  उत्तर द्याहटवा
 8. सो स्वीट.. आवडला तुमचा राऊ आणि त्याचे व्यक्तिचित्रही!!!! चेहर्‍यावरूनच एकदम बदमाश दिसतोय. :)

  उत्तर द्याहटवा
 9. i think about my Dhruv like you. life is too smaller than we think.your rau is so sweet.sending love for him.

  उत्तर द्याहटवा
 10. majhi ananya suddha itki god harkati karat aste ki mahabharatatlya samay ne gothun jaav asa vatata..

  उत्तर द्याहटवा
 11. tyache dole far sundar ni niragas aahet ...i love his eyes
  n naav tar vicharu naka..! mala Thorlya Bajirawanchi aatwan zali . mast naav thewlet...

  उत्तर द्याहटवा
 12. tyache dole far sundar ni niragas aahet .. i love his eyes
  n naav tar vicharu naka .. ! mala tar Thorlya Bajiraw Peshvyanchi aathwan zali .. naav khup chan aahe tyachyasarkhech...

  उत्तर द्याहटवा