गुरुवार, १९ मार्च, २००९

पैसे मिळवण्याचा कुठलाच मार्ग चांगला नसतो?

एक मित्र होते माझे. वयाने माझ्याएवढेच. पण योग्यतेने श्रेष्ठ. व्यासंगी, आध्यात्मिक. इन्फटेक मध्ये खूप सीनियर. एकेकाळी पैसा खूप मिळवला. पण काय झाले मला माहीत नाही. त्यांनी धंदापाणी सोडून दिले. त्यांना मी एकदा विचारले. तुम्ही एवढे शिकलेले, अनुभवी. काम करणे बंद का केले? पैसे मिळवणे बंद का केले? त्यांनी उत्तर दिले, हे खरे आहे की मी आज काम करू लागलो तर खूप पैसे मिळवीन. मिळवले आहेतही. पण पैसे मिळवणे म्हणजे शोषण. म्हणून त्या घाणीत जायची माझी इच्छा नाही. मला चमत्कारिक वाटले हे विचार. चांगल्या मार्गाने पैसे मिळवताच येत नाहीत का? त्यांचे उत्तर होते, नाही. पैसे मिळवण्याचा कुठलाच मार्ग चांगला नसतो. गरजा भागवणे वेगळे आणि पैशांचा संग्रह करणे वेगळे. माझा प्रश्न होता, मग जग चालेल कसे? संग्रहाशिवाय गृहसथाश्रम कसा चालणार? संस्कृती उत्क्रान्त कशी होणार? ते म्हणाले मला ते माहीत नाही. मी पैसे मिळवणार म्हणजे मी कुणाचे तरी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष शोषण करणार. मला हे करायचे नाही.

खंबानी नावाचा एक काल्पनिक उद्योजक घेउया. याचा उद्योग फार मोठा आहे. इतका मोठा की कर भरण्याचे नियम थो~डेसे इकडे तिकडे केले तरी त्याचे शेकडो कोटी वाचतात. म्हणजे सरकारला किंवा दुसर्‍या शब्दांत लोकांना जे मिळायला हवे होते ते मिळत नाही. पण खंबानी हे 'वाचलेले' पैसे एकटाच खात नाही. त्याच्या सरकारी मित्रांना, त्याच्या नोकरांना आणि त्याच्या भागधारकांना वाटून खातो. त्याच्याकडे काम करणार्‍या आणि इमाने इतबारे पगार घेणार्‍या लोकांना वाटते ते 'चांगल्या' मार्गाने पैसा मिळवतात. त्याचे 'भाग' बाळगून असणारे लोक समजतात की ते कोणतेच गैर काम करत नाहीत. पण त्यांना ही कल्पना येत नाही की त्यांनीच गुन्तवलेल्या पैशांमधून मोठ मोठे सट्टे खेळले जात असतात.

सगळेच उद्योग 'असले' धंदे करत नाहीत. खरे आहे. पण अर्थकारणामध्ये एवढी गुंतागुंत आहे, की प्रत्येक गोष्ट ही दुसर्‍या अनेकानेक घटकांवर अवलंबून असते. मग अर्थकारणात गुंतलेल्या प्रत्येकावरच ही जबाबदारी येत नाही का? कुणाला किती श्रमांच्या बदल्यात किती पैसे मिळायला हवेत हे कोण ठरवते? जे लोक हे ठरवण्याच्या 'वॅंटेज पॉइण्ट' ला बसलेले आहेत तेच. ते योग्य तेच करतात कशावरून?  

मांस खाणारा प्रत्येक जण हिंसेला - हत्येला जबाबदार आहे. त्याचप्रमाणे पैसा मिळवणारा प्रत्येक जण अर्थकारणात होणार्‍या कुणाच्यातरी शोषणाला जबाबदार आहे.

विचार करतोय या गोष्टीचा.

1 टिप्पणी:

  1. विचार चांगला आहे पण चूक आहे. मी असे म्हणत नाही की ज्या लोकांकडे पैसा
    आहे ते सर्व चांगले लोक आहेत पण आपल्याकडे खूप पैसा असावा असे वाटणे हे
    शोषण असलेच पाहिजे असे नसावे. किती पैसा असल्यावर तो बास आहे हे ज्याचे
    त्याने ठरवायचे असते. तुझ्या माझ्याकडे पैसे नसतात असे आपल्याला नक्कीच
    वाटते. त्याचे कारण हे की आपल्या गरजांच्या मानाने तो कमी आहे. जगात cost
    अशी नसतेच ..... फक्त value असते. प्रत्येक वस्तुची असते. ही वॅल्यू त्या
    त्या करेन्सी मधून व्यक्त होते एवेढच..निसर्गातस्वार्थ नसतो असे म्हणतात
    पण माणसासारखी sympathy देखील नसते. एखादा प्राणी कमकुवत असेल तर निसर्ग
    त्याला जगायचा अधिकार नाकारून त्या उर्जेला सामावून घेतो. त्या वेळेला
    ते धड धाकट प्राण्यान्नी केलेले शोषण नसते. आपल्या व्यवस्थेत जे लोक पैसा
    नसल्यामुळे त्रासात आहेत त्या सगळ्यांना मदत मिळत नसेल पण खूप लोकांना
    मदत मिळते. इतराना मदत करायची वृत्ती माणसात आहे तीच तुझ्या शोषणाच्या
    विचाराला उत्तर आहे. आपल्या अंगावर दहा किलो जास्त वजन ठेवले आहे आपण. Do
    you know that 10 kg weight is equivalent to one days nourishment for
    32 people. पैसे कमवायचेय बरेच मार्ग चांगले नाहीत पण काही मार्ग नक्कीच
    चांगले आहेत. त्यांना शोधणे आपले काम आहे कारण जर पैसे कमवायचा कुठलाच
    मार्ग चांगला नसेल तर माणसाचे जगणेच निरर्थक ठरते.

    -अजित

    उत्तर द्याहटवा