जगन्नाथस्वामी नयनपथगामी भवतु मे ।
-जयदेव, गीतगोविंद
उद्यम कमी असला तरी उत्सव साजरे करण्याच्या बाबतीत ओडिया लोकांइतके उत्साही देशात (पर्यायाने जगात) सापडणार नाहीत. ‘बारो मास तेरो पोर्ब’ अशी म्हणच आहे. पोर्ब म्हणजे पर्व – सण/ उत्सवांना इथे पर्व – पर्वणी म्हणतात. वर्षभरात इथे किती सण होतात त्याची यादीच करतोय. प्रत्येक महिन्यात सरासरी तीन-चार तरी असतातच. रथजात्रा हा इथल्या उत्सवांचा राजा. मागे सांगितल्याप्रमाणे इथे ‘य’ म्हणता येत असले तरी बऱ्याच ठिकाणी ‘ज’ वापरला जातो. कुठे ‘ज’ वापरायचा याचा माझ्यापुरता मी आडाखा बांधला आहे – जिथे ओठ, तोंड, जीभ थोडी वळवावी लागेल, तिथे बिनधास्त ‘ज’ वापरा. उदा. जोजना (योजना), अविजान (अभियान). पण जबाबदारीला दायित्व म्हणतात. दाजित्वपेक्षा सोपे पडते. शाब्बास. याला म्हणतात खरी आळशी भाषा!
ही रथयात्रा म्हणजे धमाल असते. या धमालीपुढे हौशी पंजाब्यांचे लग्न काहीच नाही. काय म्हणता, गणपती? ना, ना. इथली गंमतच न्यारी. गणपतीचे काय लाड करता सांगा बरं तुम्ही? त्याला वेगवेगळे कपडे घालता का? थोड्या थोड्या वेळाने त्याला छप्पन प्रकारचे भोग खाऊ घालता? आंघोळ केल्यावर त्याला पंधरा दिवस ताप येतो? थांबा, व्यवस्थितच सांगतो सगळं.
रथयात्रेची थोडक्यात गोष्ट अशी – आषाढाच्या शुक्ल द्वितिये दिवशी जगन्नाथ, बळभद्र आणि सुभद्रा ही तीन भावंडे आपली मावशी गुंदेचा देवीच्या घरी सुट्टीला म्हणून जातात. आपले आपले तीन रथ घेऊन. हे तीन रथ लोक ओढतात. हीच रथयात्रा – ओडिया भाषेत ‘रथजात्रा’. नऊ दिवसांनी देव परत फिरतात. त्या यात्रेला ‘बाहुडा’ म्हणतात. बाहुडा करून आल्यानंतर लक्ष्मी तिला सोडून जगन्नाथ आपल्या भावा-बहिणीबरोबर गेला म्हणून भांडण काढते आणि रथ मोडून टाकते. (म्हणजे जगन्नाथ पुन्हा पुढच्या वर्षी नवीन रथात बसून यात्रा करायला मोकळा!)
भगवान श्री आदि शंकराचार्यांनी स्थापन केलेल्या चार पीठांपैकी पुरीचे गोवर्धन पीठ हे सर्वश्रेष्ठ. (पुरीत २८ मोठे मठ आहेत. लाहिरी महाशयांचे शिष्य आणि परमहंस योगानंदांचे गुरू श्री युक्तेश्वरांचा मठही येथे आहे.) जगन्नाथाचे श्रीमंदीर १२व्या शतकात अनंतवर्मन चोळगंगाने बांधले असून हे नागर शैलीचा एक अप्रतीम नमुना आहे. जगन्नाथ हा श्रीकृष्ण नसून कृष्णाचेही आदिरूप आहे. तो सर्व सृष्टीचे कारण आहे. सगुण – साकार ब्रह्म आहे. जनसाधारणांसाठी त्याने पार्थीव रूप धारण केले आहे.
जगन्नाथाची मूर्ती परंपरागत मूर्तींप्रमाणे नसते. निंबाच्या लाकडाची असते. एखाद्या आदिवासी देवाची आठवण
जगन्नाथाचे पार्थिव रूप बारा ते तेरा वर्षे (तिथीवर अवलंबून) राहते. त्यानंतर नवीन मूर्ती बनवावी लागते. कुणा एकाच्या स्वप्नात एक विशिष्ट वृक्ष येतो. त्याचा शोध घेतला जातो. त्यावर शंख – चक्र-गदा- पद्म आदि चिन्हे शोधली जातात. (दलाई लामांच्या शोधासारखेच आहे हे). विधीवत पूजा करून नवीन मूर्ती विश्वकर्मा घडवतो. जुन्या मूर्तीमधील ‘दारुब्रह्म’ (दारु म्हणजे देह, झाडाचे खोड – हे दारुब्रह्म म्हणजे श्रीकृष्णाच्या अस्थी होत) नवीन मूर्तीमध्ये प्रतिष्ठापित केले जाते. जुन्या मूर्तीचे विधीवत दफन केले जाते. त्या स्थानाला कुलेउ बैकुंठ म्हणतात.
रथयात्रेच्या अगोदर पंधरा दिवस देव समुद्रात आंघोळ करायला जातात आणि आजारी पडतात. मग पंधरा दिवस दर्शन बंद. या काळात रंगरंगोटी आणि यात्रेची कामे केली जातात. देवाला त्रास होतो म्हणून बॅण्ड वाजवणे इ. ला या काळात पुरीमध्ये बंदी असते.
जगन्नाथाच्या पुजाऱ्यांना पंडे म्हणतात. रथयात्रेच्या दिवशी यांच्याजवळ असेल नसेल ते सर्व सोने अंगावर चढवून ही मंडळी रथावर बसतात (हे व्ही आय पी – गर्दीत कसे बरे मिसळतील?) आणि थाळ्या पिटून कान बधीर करतात. लक्ष्मीला सोबत न घेता स्वतः जगन्नाथच एकटा निघाला आहे, तर या पंड्यांना अंगावर लक्ष्मी कशाला हवी हे मला समजलेले नाही. सोबतच अर्वाच्य शिव्याही देत असतात - देवाला. त्याचे कारण मला न पटल्यामुळे माहित असूनही मी येथे सांगणार नाही.
पुरीच्या गजपती घराण्याचा राजा (दिव्यसिंह देव – ओडिया मध्ये दिब्यसिंग देब) पहिला मानकरी. हा प्रभूचा मानस पिता. महाराज पालखीत बसून येतात आणि सोन्याच्या झाडूने रथ झाडतात. मग यात्रेला सुरुवात होते.
हे रथ ओढणे ही सुवर्णसंधी मानली जाते. रथाच्या दोरीला किंवा रथाला स्पर्श करणे हे गंगास्नानाइतके पवित्र मानले जाते. लाखोंचा समुदाय रथ ओढण्यासाठी चढाओढ करत असतो. एकूण दहा लाखांच्या आसपास लोक या यात्रेच्या काळात पुरीला भेट देतात. चेंगराचेंगरी नित्याचीच. रथाच्या खाली चिरडून मृत्यू येणे म्हणजे थेट वैकुंठारोहणच समजले जाते – अजूनही. श्री सनातन गोस्वामींनी (भगवान चैतन्य महाप्रभूंचे शिष्य) रथाखाली प्राण देऊन लोकांना हे नसते उदाहरण देऊन ठेवले. पण अलीकडे कडक पोलीस बंदोबस्तामुळे चेंगराचेंगरीला बराच आळा बसला आहे. प्रत्यक्षात पोलीसच रथ ओढत असतात. चाकाजवळ कुणाला फिरकूही देत नाहीत. तरीही मी जो अनुभव घेतला आहे त्याला भयानक म्हणू की थरारक म्हणू समजत नाही. पैशांचा पाऊस पडला तरी होणार नाही एवढी गर्दी आणि चेंगराचेंगरी रथाच्या दोरीला हात लावण्यासाठी होते. भक्तीचा उन्माद एवढा प्रचंड असतो की रॅशनॅलिटी, बुद्धीनिष्ठा सर्व विसरून जाऊन या सर्व एकजीव जनसागरातला आपण केवळ एक छोटासा थेंब आहोत असे वाटायला लागते. एवढा भला थोरला रथ – (त्यावर शंभरेक पंडे बसलेले असतात) पण आपण एक छोटासा हिसका देतो आणि वेगाने हलायला लागतो. आश्चर्य वाटल्याखेरीज रहात नाही. अशा वेगाने धावणाऱ्या अवढव्य रथाखाली चिरडून मरणारी माणसे बघूनच टोपीकराने ‘जगर्नॉट’ हा इंग्रजी शब्द उपयोगात आणला.
तीन रथ ओळीने उभे असतात. ‘हरी बोल’ आणि हुळहुळीच्या (हुळ हुळ असा आवाज बायका काढतात – बंगाली लग्नात वगैरे काढतात तसाच) गजरात पहिल्यांदा बळभद्राचा ताळध्वज निघतो. हा थोडा पुढे गेला की सुभद्रादेवी निघते. हिचा रथ अजून थोडा पुढे गेला की जगन्नाथस्वामी निघतात.
यांचा रथ सर्वात मोठा. अठरा चाकांचा नंदीघोष. पिवळ्या आणि लाल वस्त्रांनी आच्छादलेला. ४४ फूट उंच. तिन्ही रथांना बनवण्यासाठी एकूण ११३५ मोठे ओंडके (४०० घन मीटर) लाकूड लागते. हे आसन, कदम्ब, देवदार अशा चांगल्या दर्जाचे असते. आपल्याला वाटेल काय ही झाडांची नासाडी! हे दरवर्षी. शिवाय रोज श्रीमंदिरात महाप्रसाद शिजतो, तो शिजवायला आणि वाटायला मातीची भांडी लागतात. ही मातीची भांडी बनवायलाच पुरीतल्या कुंभारांना रोज २ ते ३ टन जळाऊ लाकूड लागते. आता बोला.
ही यात्रा गुंदेचाचे देऊळ किती लांब त्यावर अवलंबून आहे. पुरीत हे अंतर सुमारे दोन किमी आहे. एवढ्या गर्दीत एका दोरीला हात लागला तरी खूप. पण अजून पुण्य साठवायची हाव बाळगून बरेच लोक एक रथ थोडा ओढून लगेच दुसऱ्या रथाकडे पळत सुटतात. साहजिकच काही बापड्यांना वैकुंठाचे तिकीट मिळते.
रस्त्यात ‘जगा’ला भूक लागते. मग यात्रा थांबते आणि दशम्या सोडल्या जातात. आमचा जगा कपड्यांच्या आणि खाण्याच्या बाबतीत भलताच हौशी. (त्याला मांसाहार मात्र चालत नाही.) असे म्हणतात की विष्णु रामेश्वरात स्नान करतो, बद्रीनाथला ध्यान करतो, पुरीमध्ये जेवण करतो, आणि द्वारकेमध्ये झोपायला जातो. छप्पन प्रकारचे भोग त्याला लागतात. हे भोग मंदिराच्या आवारात बनवले जातात. सर्व एकत्रच वाफेवर शिजवले जातात. सेवायत आणि पण्डा मंडळी हे भोग नाममात्र मूल्याच्या बदल्यात भक्तांना देतात. जात पातीच्या बाबतीत ओरिसाची सहिष्णुता ही जगन्नाथाची अशी कृपा आहे. एकाच ठिकाणी शिजवलेले भोग सर्व जातींचे लोक मंदिराच्या आवारात एकत्र बसून खातात. येथे अस्पृश्यतेला थारा नाही.
मराठ्यांनी जगन्नाथ मंदिराला मिळणाऱ्या यात्राकराच्या अभिलाषेने मंदिर ताब्यात ठेवले होते. पण तिरूपतीच्या तुलनेत जगन्नाथ गरीबच. लक्ष्मीशी भांडत असल्याचा परिणाम असावा. रथयात्रेची एकंदर उलाढाल केवळ काही (२-३) कोट रुपये एवढीच असावी असा अंदाज आहे.
एकूण आपल्या पंढरपूरच्या वारीची ही यात्रा म्हणजे बहीण आहे असे म्हणायला हरकत नाही. तशीच भक्ती, तसाच मेळावा, तसाच भक्तवत्सल भगवंत, तसलेच बडवे, तसलेच पण्डे, आणि वाळवंटात अगदी तशीच असह्य दुर्गंधी आणि घाण!
its good information..Nice blog!
उत्तर द्याहटवाBHiSHAN SUNDAR !
उत्तर द्याहटवाप्रसाद, सुहास,
उत्तर द्याहटवाथॅंक्स!
लेख आवडला!
उत्तर द्याहटवापुरीच्या मंदिरात एवढ्या मोठ्या संख्येत विधवा स्त्रिया का आढळून येतात? एखाद्या सामाजिक प्रथेमुळे असे होते का?
ऊर्जस्वल,
उत्तर द्याहटवाथॅंक्स! विधवांच्या बाबतीत काही कल्पना नाही. चौकशी करतो.
Nice & informative
उत्तर द्याहटवाThanks to Loksatta
Please write more on Marathas control of Jagannath Temple
Thanks! Will try to write on Maratha history in Odisha.
हटवाkhup chan lihlet bt te lok dewala shivya ka detat tyabaddl utsukata lagliye ...
उत्तर द्याहटवाते पंडे लोक देवाला शिव्या का देतात ते जाणून घेण्याची खूप उत्सुकता आहे . माहिती मिळाली तर बरं होईल(जर सांगण्यासारखी असेल तरच) .. 😊
उत्तर द्याहटवा