शुक्रवार, १३ मार्च, २००९

संस्कृती स्त्रियांची, स्त्रियांसाठी, पुरुषांकरवी!

असे गमतीने म्हटले जाते की जगाच्या इतिहासात जी काही युद्धे झाली आहेत त्या सर्वांना कारण स्त्रिया होत. वानगीदाखल रामायण, महाभारत, इलियड यांचे दाखले दिले जातात. एका मजेशीर संस्कृत वचनात तर असे म्हटले आहे की कृत युगात रेणुका (भगवान परशुरामाची माता), त्रेता युगात जानकी, द्वापार युगात द्रौपदी, आणि कलियुगात घरा-घरातील बायका या कलहाचे कारण ठरतात!


गमतीचा भाग सोडला तरी माझे असे मत आहे की केवळ कलहाचेच नव्हे तर मानवी संस्कृतीचेही कारण स्त्रियाच होत. माझे मामा म्हणायचे की एका दहा बाय दहा च्या खोलीत दहा पुरुष सुखाने राह्तील पण दोन बायका मोठ्या बंगल्यातही शांतपणे नांदू शकणार नाहीत. हे आपण सोयीसाठी १००% खरे समजूया. यामागचे कारण विचार करण्यासारखे आहे. याचा सरळ सरळ अर्थ असा होतो की स्त्रियांची ’स्पेस’ ची गरज पुरुषांच्या तुलनेत अधिक तीव्र आहे. आणि संस्कृतीचा जन्म हा स्पेस च्या गरजेतूनच होत असतो.  


शरीरशास्त्राचा विचार करता निसर्गाने स्त्रीच्या पारड्यात झुकते माप टाकले आहे. कुणी म्हणेल कसं शक्य आहे, स्त्री तर अबला, शारीरिक कटकटींनी सतत गांजलेली. पण थांबा. टेक्नॉलॉजीचे विस्तारणारे जाळे आपल्याला निराळा विचार करणे भाग पाडणार आहे. परिस्थिती अशी आहे की संतती जन्माला घालण्यासाठी पुरुषाला स्त्रीची गरज आहे; स्त्रीला पुरुषाची मुळीच गरज नाही! रामायणात वाचलेले स्त्रीराज्य अगदीच अशक्य नाही. (मेघालय मध्ये ते वास्तविक अस्तित्त्वात आहेही, आणि बंगालातल्या स्त्रियांचा एकूण व्यवहारातला वरचष्मा सर्वश्रुत आहेच). जगभरातल्या सर्व देशांमध्ये असे दिसून येते की स्त्रियांचे सरासरी आयुर्मान पुरुषांच्या तुलनेत अधिक आहे. जोडीदाराच्या मृत्यूनंतर पुरुषांच्या तुलनेत स्त्रिया जास्त जगतात असे आढळून येते. ह्रृदयविकारापासून स्त्रिया तुलनेने अधिक सुरक्षित असतात. निसर्गाने त्यांचे शरीर लहान ठेवून त्यांना अजून एक आघाडी दिली आहे – अन्नाची कमतरता असेल तर स्त्री अधिक काळ निभावू शकेल. मानसिक क्षमतांमध्ये स्त्री कमी तर नसतेच, पण पुरुषापेक्षा काकणभर सरसच असते. बौद्धिक बाबतीत म्हणाल तर सर्व स्तरातल्या परीक्षा स्त्रियांचीच आघाडी दाखवतात. आता सांगा कोण आहे फायद्याच्या जागी?  


घरात पुरुष व्यक्ति नसेल तर त्या घराला लुळेपणा येतो खरा, पण तरी ते घर असते. पण जर का घरात स्त्री नसेल तर त्या घराला घरपणच उरत नाही. ते होस्टेल होते. का असे?  


माणूस जगतो कशाच्या आधाराने? त्याच्या आयुष्यातले महत्त्वाचे टप्पे कोणते? जन्म. स्त्रीशिवाय अशक्य. मोठे होणे. या प्रक्रियेमध्ये परंपरा दाखवते की बाप हे पैसे मिळण्याचे ठिकाण आणि आई हे संस्कार मिळण्याचे. मग लग्न. या गुंतागुंतीच्या प्रक्रियेमध्ये वरकरणी पुरुष पुढे असतात पण प्रत्यक्षात सर्व कारभार हा स्त्रियांच्या बोटावर नाचत असतो. म्हातारपणी पुरुषाला स्त्रीच्या आधाराशिवाय जगणे केवळ अशक्य बनते.  


जगणे एकूणच संघर्षमय आहे. कुठून आणायची शक्ति लढायची? आणि लढायचे तरी कुणासाठी? दोन्ही प्रश्नांचे एकच उत्तर – स्त्री. कोणताही विरंगुळा घ्या. कथा, काव्य, संगीत, नृत्य, नाटक, चित्रपट, काहीही घ्या. विषय हा स्त्री भोवती गुंतलेला असणार.  


बोलू तेवढे थोडे. आजच्या या गुंतागुंतीच्या सिव्हिलायझेशन (सभ्यता हा शब्द योग्य वाटत नाहीये) मध्ये, जिथे शारीरिक शक्ति दुय्यम ठरते आहे, तिथे स्त्रियांना निर्विवाद आघाडी आहे. थोडक्यात सांगायचे तर हे जग स्त्रियांनी स्त्रियांसाठी पुरुषांकरवी चालवलेले आहे! त्यांना अर्थातच हे सत्य सामूहिक रीत्या नीटसे लक्षात आले आहे असे दिसत नाही, नाहीतर एव्हाना पुरुष प्रधान संस्कृतीचे ’मिथ’ ढासळून पडले असते.  

९ टिप्पण्या:

  1. खरे आहे. आणि म्हणूनच स्री ही शक्तीचे पूर्ण रूप मानले जाते. मागे कुठल्याश्या लेखात वाचले होते की मोस्ट ऑफ द विमन इन वर्ल्ड डोण्ट वॉंट टू बी सेल्फ एमपोवर्ड. आज त्याचे कारणही समजले.

    उत्तर द्याहटवा
  2. स्त्री हा विषय समजणे केवळ अशक्य आहे असे माझे मत झाले आहे. स्त्रीलाच स्त्री समजू शकत नाही तर बाकीचे लोक काय समजणार! तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. स्त्रियांनाच एमपवरमेंट नको असते असे कधी कधी वाटू लागते. अवघड आहे.

    उत्तर द्याहटवा
  3. ब्लॉग प्रशासकाने ही टिप्पण्णी हटविली आहे.

    उत्तर द्याहटवा
  4. ही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.

    उत्तर द्याहटवा
  5. ही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.

    उत्तर द्याहटवा
  6. correctly put forward.......now u know y i keep telling you n Ajit to write........keep up the good job......am proud of u......

    उत्तर द्याहटवा
  7. तुला एक शिक्रेट सांगते. मला पण महित नव्हतं. स्त्रिया हरतालकेचं व्रत का करतात?
    आयुष्यभर त्यांना एकच काम असतं. बाप्यांना सुधरवून सोडायचं. मग तो बाप असो, भाऊ असो, मित्र असो, नवरा असो का मुलगा. त्यातल्या त्यात नवऱ्याला तर जास्तच. आणि त्याचं शेपूट कितीही नळीत घातलं तरी वाकडंच. त्याला सुधरवायला एक जन्म कुठला पुरतोय? दर जन्मी परत पहिले पाढे पंचावन्न नकोत. मागच्या जन्मी ज्याच्यासाठी एवढी उरस्फोड केली, त्यालाच परत पुढे सुधरवलेला बरा. म्हणून हरतालिका.

    उत्तर द्याहटवा
  8. कशाला हा अट्टाहास करत असतील बायका? ही एक गोष्ट त्यांनी सोडली तरी आख्खी पुरुषजात सुखी होईल!
    (दर जन्मात नवीन व्हरायटी मिळेल ती वेगळी!)

    उत्तर द्याहटवा
  9. सही.. मस्त आहे लेख. आज इन्सिडंटली मी पण माझ्या ब्लॉग वर हाच विषय घेतलाय, फक्त थोडा वेगळा. रोहनने लिंक दिलीय ह्या ब्लॉग ची म्हणुन लेख वाचता आला..

    उत्तर द्याहटवा